Friday, September 23, 2016

ओझं

आज ट्रेनमध्ये दोन माणसं समोर येऊन बसली. एक साधारण चाळीशीच्या आसपासचा तर दुसरा पन्नाशीतला असावा. चांगल्याच गप्पा चालू होत्या त्यांच्या. मी पुस्तकात डोकं खुपसून बसलो होतो.

 "शेतकरी, आंदोलन, संघटना, विचार, चर्चा, धोरण, सभा" असं बरंच काही कानावर पडत होतं. थोडक्यात चांगलीच सिरीयस आणि जेन्युइन चर्चा चालू होती त्यांच्यात.

 बोलता बोलता जरा वेळाने चाळीशीने पन्नाशीला विचारलं "तुमचा मुलगा काय करतो?"

पन्नाशीचा चेहरा क्षणभरच पडला. पण लगेच सावरत तो उत्तरला "नाहीये मला"

चाळीशी एकदम चपापला. क्षणभर नजर झुकली.

तितक्यात पन्नाशी उत्तरला "मुलगी आहे"

चाळीशी म्हणाला "ओह सॉरी हां" . .

मी नकळतच एकदम सुटकेचा निःश्वास टाकला. पण क्षणभरच.........

.
.
.

नंतर एकदम मळमळल्यासारखंच व्हायला लागलं !!!!

Friday, September 16, 2016

पापी पेट : आपली पहिली नॅनो फिल्म

अँड फायनली.. आलेली आहे... आपली पहिली नॅनो फिल्म !!

"पापी पेट"

It's so nano that it'll be over even before you know it. So do watch it closely.

आणि हो. फक्त फिल्मच नॅनो आहे. बाकी सगळं एकदम जोरदार. सो एन्जॉय !!

Tuesday, September 13, 2016

गुडघ्याला बाशिंग : भाग २

गुडघ्याला बाशिंग : भाग १ इथे वाचता येईल.

-------------------------------------------------------------------------

नवीन आणलेल्या ड्रॉइंग बुकवर नाव घालण्याचा युवराजांचा कार्यक्रम चालू होता. एकीकडे आईसाहेबांच्या अक्षर चांगलं काढण्याबद्दलच्या सूचना चालू होत्या. नाव घालायला घेणार इतक्यात युवराज थबकले.

युरा : आई, हे काय लिहिलंय इथे?

आसा : काय लिहिलंय?

युरा : मास्टर की मिस्टर काहीतरी लिहिलंय. आणि मिसेस पण लिहिलंय. म्हणजे काय? काय लिहायचं तिकडे

आसा : (हसू आवरत).. अरे मिसेस नाही. मिस. मिस म्हणजे यंग गर्ल. लहान मुलगी. आणि मास्टर म्हणजे तू. यंग बॉय. लहान मुलगा. 

आईसाहेबांनी दोन मिनिट थांबून राजांना काही कळतंय का याचा अंदाज घेतला आणि पुढे बोलायला सुरुवात केली. 

"
आणि मिसेस म्हणजे मोठी मुलगी. लग्न झालेली. म्हणजे मी. आणि मिस्टर म्हणजे लग्न झालेला मोठा मुलगा. म्हणजे तुझा बाबा."  

युरा : अच्छा अच्छा. मला वाटलं मास्तर म्हणजे तुझं नाव लिहायचं. तू माझी ड्रॉइंग मास्तर आहेस ना. म्हणून.

आसा : काहीही काय? मी काय मास्तर आहे का? ते जाऊ दे. आता ते 'मिस' लिहिलंय ते कट कर आणि मास्टरच्या इथे तुझं नाव लिही पटकन.

युरा : हो. लिहितो.

आसा : कळला ना आता मास्टरचा अर्थ? (डब्बल कन्फर्मेशन यु नो.) 

युरा : हो कळला. मी यंग बॉय आहे म्हणून मास्टरच्या इथे माझं नाव लिहायचं आणि तशीही मला लग्न झालेली मिसेस नाहीच्चे म्हणून ते मिसेस कट करायचं. 

मिसेस आईसाहेब कोलमडल्यात आणि मास्टर (ऑफ द मास्टर्स) युवराज पुढच्या षटकाराच्या तयारीला लागलेत !!!!

Thursday, August 25, 2016

आशीर्वाद

कर्णकर्कश गोंगाट, मुन्नी-शीला-शांताबाई पासून ते थेट जिंगल बेल्स पर्यंतची प्रसंगानुरूप(!) गाणी, कुठले तरी साहेब-दादा-भाऊ-नाना इत्यादी १०१% मवाली दिसणाऱ्या आणि असणाऱ्या कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षातल्या नरपुंगवांची चित्रं छापलेले टी-शर्ट घालून अचकट विचकट बडबड करत, आरडाओरडा करत, दादागिरी करत , कानासकट मेंदूही फुटेल अशा डेसिबल्सच्या बाईक्सचे हॉर्न्स आणि थोबाडात सिगरेट्ससारख्या धरलेल्या पिपाण्यांचे आवाज करत, कृत्रिम ट्रॅफिक जाम करत, इतर वाहनांची, पादचाऱ्यांची आणि खुद्द ट्रॅफिक पोलिसांची पर्वा न करता झुंडशाहीच्या बळावर कधी गणपती, कधी देवी, कधी श्रीकृष्ण तर कधी इतर कोणी बुवाबाबा यांच्या मिरवणुका काढून सामान्य जनतेच्या आधीच त्रासलेल्या आयुष्यात सामाजिक, सांस्कृतिक प्रदूषणाबरोबरच ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा चिख्खल कालवून 'नास्तिक निर्मितीची केंद्रं' उभारणाऱ्या या समस्त माजोरड्या भक्तांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या आयुष्याची या सगळ्या कलेक्टिव्ह प्रदूषणाच्या किमान हजार पट नासाडी होवो हा प्रत्येक सामान्य माणसाने मनोमन दिलेला शाप खरा होवो हा आणि एवढाच आशीर्वाद दे रे बाबा श्रीकृष्णा/गणराया/लक्ष्मीमाते !!!!