Friday, October 23, 2009

गर्विष्ठ की अभिमानी ??

हा लेख मी दुसर्या एका ब्लॉगवरून उचलला आहे. घाबरू नका. गंमत करत होतो. दुसरा ब्लॉग पण माझाच आहे. तेव्हा कॉपीराइटचा काही प्रॉब्लेम येणार नाही :-). नवीन मराठी ब्लॉगवर हा लेख जास्त योग्य वाटेल म्हणून इथे पुन्हा पोस्ट करतोय. बाकी काही नाही.


=============================================
आपण सर्वांनीच नितांतसुंदर असा "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" बघितला असेलच. तो किती अप्रतिम आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही किंवा त्याची उत्कृष्टता जोखण्याएवढी माझी कुवतही नाही. फ़क्त त्यातला एक खटकलेला मुद्दा मांडावासा वाटला जो (माझ्या मते) अतिशय महत्वाचा आहे आणि तो विषयाच्या हेतुच्या आड़ येणारा ठरू शकतो किंवा मराठीत चुकीच्या शब्दांचा पायंडा पाडणारा ठरू शकतो म्हणुनच हा ब्लॉग प्रपंच.
या चित्रपटाची tagline आहे "गर्व आहे मला महाराष्ट्रीय असल्याचा". माझ्या मते दिग्दर्शकाला "गर्व" च्या जागी "अभिमान" हा शब्द अभिप्रेत असावा किंबहुना "अभिमान" हा शब्दच तेथे जास्त समर्पक आहे परंतु हिंदी भाषेच्या अतिरेकामुळे
(किंवा पगडा म्हणा हवं तर) हा चुकीचा शब्दा प्रयोग कोणाच्याच लक्षात आलेला नाही. कारण हिंदीत "मुझे गर्व है की मैं आपका बेटा हूं" किंवा "मुझे अपने भारतवासी होनेपे गर्व है" असे शब्दप्रयोग वापरले जातात कारण त्या भाषेतील त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे ते योग्यही आहे. असं म्हणतात की कुठलीही भाषा जितकी जास्तीत जास्त वापरली जाते तितके तिच्यातील शब्दालन्कार, तिचे आयुष्या व्रुधिन्गत होत जाते. गुरुमुखी (किंवा पंजाबी) भाषा ही काही वर्षांपूर्वी मृतवत होऊ घातली होती परंतु त्यभाषिकांनी प्रयत्नपूर्वक अंगिकारलेल्या प्रयत्नांमुळे आज ती भाषा भारतातील अनेल हिंदी भाषिक राज्यांमधे संवाद साधण्याची एक प्रभावी भाषा बनली आहे। (आणि याउप्पर तिला बॉलीवुड च्या चित्रपटांमधे जवळपास राष्ट्रीय भाषेचा दर्जा ही मिळाला आहेच हे सांगणे न लगे). इथे मला मराठी भाषेच्या वापराच्या नावाने गळे काढायची इच्छा नाही. परंतु त्यामुळे वस्तुस्थितीत बदल होत नाही हे मात्र नक्की.
आपल्याला लहानपणा पासून शिकवण्यात आलेल्या "गर्वाचे घर खाली" किंवा "ग ची बाधा" अशा म्हणी किंवा शब्दप्रयोगांवरून गर्व हा शब्द गुणांच्या कक्षेत न येता त्याकडे अवगुण म्हणूनच पहिले जाते हे नक्की. (परंतु हिंदीत गर्व हे अभिमान या अर्थी आणि अभिमान हे गर्व या अर्थी वापरले जाते म्हणून आपणही मराठीतले अर्थ सोडून हिंदी अर्थ उसनवार घेण्याची गरज नाही.. आठवा अमिताभ आणि जया चा "अभिमान".... असो). प्राथमिक शिक्षण झालेल्या कुठल्याही व्यक्तीच्या हे खरतर चटकन ध्यानात यायला हवं होतं. क्षणभरासाठी आपण हे विसरू की सामान्य माणसाच्या हे लक्षात आले नाही परंतु इतके साहित्यिक, लेखक, मराठी कथा/पटकथा लेखक इत्यादी कोणाच्याच हे लक्षात आल नाही हे खर तर मोठ्ठं आश्चर्य म्हन्टल पाहिजे. किंबहुना चित्रपटाचा निर्माता, पटकथाकार हा महेश मांजरेकर सारखा प्रथितयश मराठी कलाकार असून ही त्याच्याही ही गोष्ट लक्षात आली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. कालांतराने पुढल्या पिढीने "गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा" आणि "गर्वाचे घर खाली" याच्या संधितून "त्यामुळेच महाराष्ट्रीय माणूस खाली असतो" असा निराळाच अर्थ काढला तर आश्चर्य वाटायला नको...

=============================================

6 comments:

 1. शब्द बरोबर पकडला आहेस ... मला तर त्या चित्रपटात बरेच काही खटकले. महेश मांजरेकरने 'शिवाजी' होण्याची हौस भागवून घेतली आहे त्या पिच्चरमध्ये. अजून कोणीही त्या भूमिकेत फिट बसला असता 'महेश मांजरेकर सोडून'. तो 'राजे शिवाजी' सोडून अफझल खान जास्त वाटतो मला... :D शिवाय ह्या विषयावर पिच्चर बनव्ल्याचे त्याचे क्रेडिट सुद्धा तसेच राहिले असते. असो...काही गोष्टी चुकल्या असल्या तरी एकंदरीत पिच्चर चांगला आहे...

  ReplyDelete
 2. हो चित्रपट एकदमच छान आहे यात शंकाच नाही. पण गर्व आणि अभिमान यातील फरकाने त्या वाक्याचा, चित्रपटाचा, पूर्ण थीमचाच अर्थ बदलतो हे कसं कोणाच्याच लक्षात आलं नाही याचं मला आश्चर्य वाटतं.

  ReplyDelete
 3. हं.. पॉईंट आहे. गर्व हा शब्द मलाही खटकला होता मी जेव्हा पहिल्यांदा या चित्रपटाची जाहिरात पाहिली तेव्हा. आणि हा शब्द बाकीच्यांच्या लक्षात आला नाही यात काही नवल नाही. आजकाल किती लोकांना खरा अभिमान आहे मराठीचा? किती लोक शुद्ध बोलतात? बोलताना कोणत्याही ठिकाणी कुठलाही शब्द वापरला जातो. ’शब्द महत्त्वाचे नाहीत, भावना पोचल्या की झालं’ हे आणखी वर! किंबहुना मराठीत बोलणं हेही आजकाल कालबाह्य झालेलं आहे. ’मराठी बोलण्याची प्रॅक्टिस नाही ना, त्यामुळे वर्ड्स रिमेंबर करणं डिफिकल्ट आहे’ ही आजची भाषा! एका वाक्यात निदान ५ इंग्रजी किंवा इतर भाषीय शब्द आले नाहीत तर फाऊल धरतात आजकाल! कॉलेजात असताना मराठीत बोलतो म्हणून माझे अनेक मराठी मित्र माझ्यावर हसले होते. ’मराठीमे मत बोल, गावठी लगता है’ हा डायलॉग ऐकवण्यात आला होता मला. आता हे असे विचार असलेल्या लोकांना काय फरक पडणार आहे अर्थ बदलला तरीही? आणि आजकाल मराठी अशुद्ध लिहिण्याची फॅशन आहे. र्‍हस्व-दीर्घ लक्षात ठेवणं म्हणे फार त्रासाचं काम आहे. त्यामुळे शुद्ध लिहिलेली मराठी सापडणं हे शरद पवारांनी भ्रष्टाचार न करण्याएवढं अशक्य होत चाललं आहे दिवसेंदिवस. मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाची साईट बघ. ठायीठायी मराठीचे खून केलेले आहेत. एक वाक्य शुद्ध मिळणं कठीण आहे त्या साईटवर! तात्पर्य काय, मराठी अशुद्ध लिहिणं किंवा मराठीबद्दल पर्वा न करणं इज अ रूल रादर दॅन अ‍ॅन एक्सेप्शन.

  ReplyDelete
 4. >> ’मराठीमे मत बोल, गावठी लगता है’

  मायला.. मी तर आयमाय काढली असती अशांची.. आणि तीही शुद्ध आणि अशुद्धही (पक्षि नॉनव्हेज) मराठीत.

  "शब्द महत्त्वाचे नाहीत, भावना पोचल्या की झालं" हे तर इतकं इतकं फसवं आहे ना. साधं उदाहरण म्हणजे 'शुभदिन' च्या भावना 'शुभदीन' मधून कशा पोचणार? उगाच काहीतरी .. असो.. मलाही मराठी टाळून विंग्रजी/हिंदी बोलणारे मराठी मित्र ठायी ठायी भेटतात इथे.. मुंबईत तर काय मराठी मित्रांनी हिंदी बोलायची पद्धतच आहे आजकाल !!

  ReplyDelete