Monday, January 11, 2010

कारणं

चार महिन्यांपूर्वी साधनाताई आमटेंचं "समिधा" वाचून झाल्यानंतर कुठलंच मराठी पुस्तक वाचलं नव्हतं. "समिधा" च्या आधी आणि नंतर पण जॉन ग्रिशम च वाचत होतो. ग्रिशमचं "द चेंबर" (एकदम टुक्कार पुस्तक आहे) वाचल्यानंतर लायब्ररीत जाउन नवीन पुस्तक घ्यायला वेळ मिळाला नाही. तेवढ्यात कमल पाध्येंचं "बंध-अनुबंध" हाती पडलं. पहिली काही पानं वाचता वाचताच ते एकदम आवडून गेलं. मग म्हटलं "बंध-अनुबंध" होईपर्यंत ग्रिशमला कलटी. कमल पाध्ये म्हणजे लेखक, संपादक, विचारवंत प्रभाकर पाध्ये यांच्या पत्नी अशी त्यांची नेहमी करून दिली जाणारी पण त्यांना विशेष न रुचणारी ओळख मी करून दिली तर माझ्या त्या पुस्तकाच्या वाचनाला काही अर्थच उरणार नाही. तर कमल पाध्ये म्हणजे प्रजा-समाजवादी महिला दल, राष्ट्र सेवा दल अशा आणि यांसारख्या अनेक संस्थांमध्ये झोकून देऊन काम करणाऱ्या सच्च्या हाडाच्या समाजसेविका. त्यांनी जयप्रकाश नारायण, प्रभावती नारायण, बंडू गोरे, मृणाल गोरे, मधू दंडवते, प्रमिला दंडवते अशा अनेक समाजवादी नेत्यांच्या बरोबर काम केलं आहे. तसेच प्रभाकर पाध्ये धनुर्धारी, नवशक्तीचे संपादक असल्याने त्यांचे आणि कमलताईंचेही कुसुमाग्रज, पुल आणि सुनिताबाई, आचार्य अत्रे, दादा धर्माधिकारी, प्रभाकर पाध्येंना गुरुस्थानी असणारे डॉ आंबेडकर इ अनेकांशी जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. पुस्तकात या सर्व मान्यवरांच्या विचारांचे, कार्याचे, व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब तर पडतेच पण त्याच बरोबर कमलताईंचं  व्यक्तिमत्व कसं घडत गेलं तेही कळतं.
कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या पत्नीने लिहिलेल्या आत्मचरित्रात जसा एक नाराजीचा, (नवऱ्यामुळे) स्वतःवर अन्याय झाल्याचा जो एक सूर असतो (काही अपवाद वगळता) तो इथेही आहेच. तसेच घरातले रुसवे-फुगवे, समाज, गैरसमज, एकमेकांना गृहीत धरणं आणि त्यातून होणारी भांडणं इ इ विषयावर जवळपास निम्मी पाने खर्ची घातली आहेत. पण हा लेख (मी परीक्षण म्हणणार नाही त्याचं कारण नंतर कळेलच) मी लिहितोय तो उरलेल्या निम्म्या पानांबद्दल. ती खुपच सच्ची आणि अतिशय विचार करायला लावणारी अशी आहेत.
पुस्तक सुरु होतं ते मुंबईतल्या रामवाडीतल्या धनसंपन्न विनायक भटजींच्या कमळीच्या आठवणींपासून. त्यात कमळीला आलेले वेगवेगळे अनुभव, घरातला मोकळेपणा, दूरचे नातेवाईक, इतर ओळखी-पाळखीचे पुरुष यांनी जाणून बुजून सलगी करण्याचे केलेले प्रयत्न, त्यातून अनेकदा बसलेले धक्के, त्या नजरा, त्यांच्याबद्दल उत्पन्न झालेली किळस, मधेच लाभणारा  एखादा निखळ स्नेहाचा स्पर्श अशा अनेक गोष्टींतून प्रकट होतात. पुढे मग त्यांचं स्वतःच्या पुढाकाराने प्रभाकर पाध्यान्शी झालेलं लग्न, पाध्यांच्या घरची काही विक्षिप्त मंडळी, पाध्यांचा मित्र परिवार, त्यात त्यांचं सुरुवातीला बुजून जाणं, त्यानंतर प्रशांतचा जन्म हे तर येतंच पण त्याचा अकाली मृत्यु, पाध्यांचा मृत्यू, विविध संस्था, संघटनांशी वेळोवेळी झालेल्या वादांमुळे काम न करण्याचा घेतलेला निर्णय असे काही धक्कादायक प्रसंगही येतात. पण मी जी विचार करायला लावणारी पानं म्हणत होतो ती ही नाहीच. त्या पानांमध्ये कमल पाध्ये (सौ, श्रीमती काही नाही नुसतं कमल पाध्ये) या नुसत्या कमल पाध्ये न राहता त्या काळच्या पुरुषप्रधान संस्कृतीत घुसमटणाऱ्या स्त्रियांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या, वेगळ्या विचारांची कास धरणाऱ्या, वेळोवेळी त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अशा वेगवेगळया रूपात आपल्याला भेटतात.
राणीचा गुलाम असला तरी तो हाच विचार करतो की आपण हिचे गुलाम असलो तरी ही स्त्री असल्याने आपल्यापेक्षा कनिष्ठच हा विचार त्यांना ऐकवणाऱ्या, किंवा एका दारुड्याच्या बायकोने त्याच्यावर हात उचलला असता इतर बायकांनी "तो तर प्यालेला होता, तू कशापाई त्याच्यावर हात उगारलास" असे सल्ले देणाऱ्या, वेळोवेळी येणार्या भयानक अनुभव सांगणाऱ्या इतर अनेक बायकांची वर्णनं यात येतात. आणि आपण हादरून जातो. विचार करायला प्रवृत्त होतो.स्त्रियांवर पदोपदी होणारे छुपे अन्याय आपल्याला दिसायला लागतात. पण हे नेहमीचंच झाल्याने त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याची प्रवृत्ती आपल्यात बळावू लागलेली असते आणि तेही आपल्या अगदी नकळत. आणि अर्थात ते समाजमान्य पण असतं. कोणी काही वावगं करतंय, काही चुकीचं घडतंय असं कोणालाच वाटत नाही

********

आणि वाचता वाचता मी एकदम हतबुद्ध झालो. एकदा नाही अनेकदा. कारण हे सगळं भूतकाळात लिहिण्याची गरजच नाही असं वाटायला लागलं मला. त्यातल्या अनेक घटना घडून ५०-६०-७०-८० वर्षं उलटून गेली तरीही त्यावर केलेली भाष्य सद्यस्थितीत घडणाऱ्या कित्येक घटनांना अजूनही किती चपखल बसतात. आणि स्त्रियांवरचे अत्याचार वगैरे पाहण्यासाठी अगदी गावात वगैरे जायची काही गरज नाही (अर्थात तिकडे त्यांचं प्रमाण अधिक आहे हे निर्विवाद्च). शहरात घडणाऱ्या रुचिका, जेसिका आणि इतर अनेक अनाम बालिकांची प्रकरणं हा तर स्त्रियांवरच्या अन्यायाचा परमोच्च बिंदू झाला. पण अनेक घटना किंवा आपल्या रोजच्या जीवनातले आचार-विचार, व्यवहार यातही ते इतक्या बेमालूमपणे मिसळलेले असतात की आणि (त्यामुळेच की काय) आपल्याला त्याची इतSSSSकी सवय झालेली असते की त्या घटना, त्या पद्धती यांच्यात आपल्याला काहीच वावगं वाटत नाही.

साधं लग्नाचं उदाहरण घ्या. (पौराणिक/वैदिक कुठल्याही पद्धतीचा) लग्नाचा सोहळा हे म्हणजे या छुप्या अन्यायाचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. मला धर्मबुडव्या, धर्मभ्रष्ट, स्वतःला अतिशहाणा समजणारा, आधुनिक विचारांचा बेगडी आव आणणारा अशा शेलक्या विशेषणांचा आहेर देण्यापूर्वी जरा पुढे वाचा.

अजूनही अनेक लग्नात वधूपक्षाने सगळा खर्च करायचा अशी पद्धत आहे. या नियमाचा मला आत पर्यंत तरी अर्थ लागलेला नाही. कोणी केला हा नियम? ५०-१००-२०० वर्षांपूर्वीच्या वरपक्षाला अनुकूल असे नियम बनवणाऱ्या सुपीक मेंदूतून ही कल्पना आली असावी. पण ती आपण काहीही सारासार विचार न करता लग्नातल्या रुढी म्हणून बिनडोकपणे तशीच पुढे चालू ठेवण्यात काय हशील आहे? जर लग्न दोघांचंही होणार आहे तर खर्च एकजण का करेल? आणि हल्लीच्या लग्नात उधळले जाणारे वारेमाप पैसे बघता या प्रश्नाची तीव्रता अजून वाढते. आणि एकापेक्षा अधिक मुली असतील तर बघायलाच नको. तसंच अजूनही बऱ्याच लग्नात घेतला जाणार हुंडा ही अजून एक गोष्ट. प्रत्येक लग्नात आणि हुंड्याला लागणारे लाखो रुपये उभे करताना मुलीच्या घरच्यांच्यावर काय परिस्थिती येत असेल याची कल्पनाच केलेली बरी. गर्भजल परीक्षा करून मुलीचा गर्भ असल्यास तो पाडण्याच्या वृत्तीत या लग्न आणि हुंड्याच्या खर्चाच्या "पारंपारिक" पद्धतीचा किती मोठा हात आहे ते नीट विचार करून बघा. अर्थात तशा सगळ्याच घटना या एकाच हेतूने होतात असं म्हणत नाहीये मी. पण बराच प्रभाव असणार/आहे हे मात्र नक्की.

वधू पक्षाची आर्थिक अवहेलना संपली की त्यांच्या स्वत्वाची मानखंडना, अवहेलना करणाऱ्या अनेक छोट्या छोट्या प्रथा पारंपारिक लग्न विधीच्या नावाने त्यांच्या माथी मारल्या जातात. यादीच सांगतो. वधूच्या आईने वराचे (जो तिच्या मुलाच्या वयाचा असतो) पाय दुध-पाणी घालून धुवून, पुसून, त्यावर स्वस्तिक काढून स्वागत करायची पद्धत आहे. आणि त्याचं कारण काय तर वर हा विष्णूचं रूप असतो. बोंबला च्यायला .. आपल्या वयाच्या जवळपास दुपटीच्या वयाच्या व्यक्तीकडून पाय धुवून घ्यायला भाग पडणारी स्वागताची पद्धत मला तरी सर्वस्वी अमान्य आहे. हे कसलं स्वागत? हे पहिलं "स्वागत" झाल्यावर हॉलमध्ये फिरल्यावर बिचाऱ्या नवरदेवाचे पाय खराब होत असावेत बहुतेक. त्यामुळे लग्न विधी सुरु करताना पुन्हा एकदा तसेच पाय धुण्याची पद्धत आहे.   तसंच लग्नात नवरदेवाच्या घरच्यांचे मानपान (आणि त्यातून निर्माण होणारे मानापमान) करण्याच्या पद्धती हे अजून एक उदाहरण. वधूपक्षाचं मानपान अशी गोष्ट कधी ऐकली आहे का आपण? मी तरी नाही. स्वागत करायचं ते वर पक्षाचं, पाय धुवायचे ते वर पक्षाचे, मानपान करायचे ते वर पक्षाचे, हुंडा घ्यायचा तो वर पक्षाने आणि का तर लग्न त्यांच्या "सुपुत्राचं" आहे म्हणून. बाकी निकष काही नाही.
नंतर येतो तो लग्नाच्या शेवटी असणारा "झाल" ठेवण्याचा विधी. या विधीत दिव्यांनी/पणत्यांनी भरलेली परात वधूच्या आई वडिलांनी घेऊन ती समोर बसलेल्या वरपक्षातील प्रत्येकाच्या डोक्यावर ४-५ सेकंद ठेवायची असते. प्रत्येक वेळी गुरुजी मंत्र म्हणतात आणि मग ती पुढे न्यायची अशी पद्धत आहे. या विधीत खरं तर वावगं वाटण्या सारखं काही नसावं.पण नंतर कळलं कि या प्रथेचा, त्यातल्या मंत्रांचा अर्थ असा आहे की वधूचे मातापिता वरपक्षातील प्रत्येकाला "विनंती" करतात की आम्ही आमची मुलगी तुमच्या घरी देतोय. तेव्हा तिला प्लीज सांभाळून घ्या हो. आणि त्यासाठी ती परात प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवली जाते.
लग्नातली ही छुपी अवहेलना तिथेच संपत नाही. खरं तर छुपी नाही उघडउघडच.. पण प्रथा, पद्धत या गोंडस नावाखाली आपल्या विचारांवर, मत मांडण्याच्या पद्धतीवर इतकी पद्धतशीरपणे गदा आणली जाते आपल्याला वर्षानुवर्षे चाललंय तेच योग्य वाटायला लागतं. तर ही छुपी अवहेलना पुढेही (कमीत कमी) वर्षभर चालू राहते. वर्षासण, दिवाळसण, पहिली संक्रांत, अधिक महिना अशा वर्षभर या ना त्या कारणांनी जावईबापूंना आणि त्याच्या आई वडिलांना आहेर, भेट वगैरे द्यावे लागतात. पुन्हा एकदा वधू पक्षाने नुसतं द्यायचं. घ्यायचं काही नाही. आणि पुन्हा एकदा निकष फक्त "वरपक्ष आहे म्हणून" हाच.

लग्न म्हणजे या अन्याय मालिकेचा grand ceremony आहे. पण रोजच्या जीवनातही स्त्रियांना अनुभवायला लागणारी छेडछाड, धक्काबुक्की, हपापलेल्या नजरा, गर्दीत केले जाणारे सहेतुक स्पर्श असं रोजचं चक्र आहेच.

आता याला अन्याय/भेदभाव म्हणायचं कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण अन्याय नाही म्हणायचं तर तो कसा नाही हे पटणारी कारणं द्यावी लागतील. आणि मला तरी अशी कुठलीही कारणं दिसत नाहीत.

अचानक नचिकेतच्या ब्लॉगवर एका पोस्टमध्ये वाचलेलं "शिवी बाईवरून दिलेलीच जास्त लागते.." हे वाक्य आणि नीरजाताईंच्या ब्लॉगवरचं "स्वच्छतेच्या बैलाला..!!" आठवलं..

तर कारणं सांगायची खरंच गरज आहे का ?????

22 comments:

 1. धन्यवाद हरेकृष्णजी.. आणि ब्लॉगवर स्वागत !!

  ReplyDelete
 2. हेरंभ,
  नमस्कार
  अत्यंत परखड आणि वास्तव विचार या लेखाद्वारे मांडले आहेस.
  शेखर

  ReplyDelete
 3. Thanks for mentioning my little article.. :)
  Neeraja

  ReplyDelete
 4. लेख आवडला.

  आपल्याकडे ‘सोशल कंडिशनिंग’ इतकं जबरदस्त आहे ना, की या सगळ्या गोष्टींमध्ये वावगं काही आहे असा विचारही फारसा कुणाच्या मनात येत नाही - अगदी वधूपक्षाच्यासुद्धा. आगरकर, कर्वे, फुले अश्या द्रष्ट्यांनी शंभर दिडशे वर्षांपूर्वी खूप मोठं काम करून ठेवलं. त्यांच्या नंतर आपण जिथे होतो तिथेच अजुनही आहोत असं वाटतं कधीकधी.

  ReplyDelete
 5. लिटील?? काहीही काय.. कसला अप्रतिम लेख आहे तो.. मी तर जाम फॅन आहे तुमच्या लेखांचा.. :) !!!

  ReplyDelete
 6. आभार गौरी. हो ना. उलट असा "वावगा" विचार करणाऱ्यांना वेड्यात काढतात बरेचदा..

  ReplyDelete
 7. हे जे काही चालत आलंय ते वर्षानुवर्षापासुनच्या आपल्या मानसिक बेड्या आहेत. लवकर तोडायला हव्या त्या..

  लग्न म्हणजे आजकाल एक इव्हेंट झालाय, ज्याचा खर्च मुलीच्या वडिलांनीच करायचा!! पण एक सांगतो, हल्ली बरंच बदललंय. माझ्या वडिलांची वयाच्या ८४ व्या वर्षी पण लग्न जुळवण्याची हॉबी आहे (ते पैसे घेत नाहीत ) ते म्हणतात, हल्ली चांगल्या मुली मिळणं कठीण झालंय. मुलांचे वडिल पण आपल्या मुलासाठी चांगली मुलगी सुचवा म्हणुन सांगायला येतात. बदल तर होतोय.. पण फारच कमी , आणि केवळ ठराविक ( ब्राह्नण ) जाती मधे. माझा एक मित्र (कुणबी)आहे त्याची मुलगी बीई झाली आहे, पण आता नुकतंच लग्न ठरलंय तर मुलाकडच्यांनी खुप अटी ठेवल्या आहेत. असो इथे जास्त लिहिलं तर पोस्ट होईल..
  पण चांगलं लिहिलंय..

  ReplyDelete
 8. फार चांगल लिहिल आहेत तुम्ही. कितीतरी गोष्टी समाजातल्या बदलायची गरज आहे. तुमच्या माझ्यासारख्या जगण्याची संधी लाभलेल्या माणसांची
  जबाबदारी जास्त आहे हे अनेकदा जाणवत...

  आणि हो, aativas म्हणजे सविता हा तुमचा अंदाज अचूक आहे..:)

  ReplyDelete
 9. काका, बदलतंय हे खरं आहे. पण त्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे. आणि या सो कॉल्ड परंपरा म्हणजे मानसिक बेड्या आहेत
  हे लोकांना कळायला हवं आणि कळलं तरी वळायला हवं. किती वर्षं लागतील हे व्हायला देवच जाणे.

  ReplyDelete
 10. सविता ( आता सविताच म्हणतो :-) ), अनेक गोष्टी चुकीच्या आहेत, त्या बदलायला हव्यात हे लोकांना उमगेपर्यंत शतकं उलटतात :( .. हा बदलाचा काळ आपण शतकातून निदान दशकात आणू शकलो तरी खूप काही मिळवल्यासारखं आहे..

  ReplyDelete
 11. खुपंच सुंदर लिहिले आहे, मानसिक बेड्या...
  आश्चर्य असे की पुरुषांपेक्षा स्त्रिया यामध्ये पुढे असतात...

  ReplyDelete
 12. धन्यवाद आनंद. बरोबर बोललात. "स्त्रीच स्त्रीची शत्रू असते" हे पूर्वी ऐकलेलं बऱ्याचदा समोर घडताना बघतो आपण.

  ReplyDelete
 13. लग्न म्हणजे या अन्याय मालिकेचा grand ceremony आहे. वाक्य थोडं बद्लुया का? मला वाटते 'आहे' नाही तर 'आपण बनवलाय' तो. काही नव्हे बऱ्याच गोष्टी खटकतात. थोड्याफार गोष्टी अजुनही वधुच्या पक्षात आहेत. 'रिता' करताना (आमच्यात 'विधी' ला 'रीता' म्हणतात) मुलीला सुद्धा मान असतो. जयमाला घालताना 'वधु' आधी घालते. त्यानंतर 'वर'.

  सध्या शहरात लग्नानंतर पहिल्यावर्षाचा कार्यक्रम दोघा वर-वधु यांचा सारखाच खर्चिक असतो. ५०-५०.. लग्न गावाला झाले तर मात्र पूर्ण खर्च वधु कडून. वराने फ़क्त वरात घेउन जायची.. सर्वच अजब आहे. कधी बदलेल काय माहिती...

  ReplyDelete
 14. ठीके. 'आहे' ऐवजी 'आपण बनवलाय' म्हणू. पण शब्द बदलल्याने अर्थ आणि त्याचे परिणाम बदलत नाहीयेत.

  सगळ्याच कमेंट्स मध्ये एक सूर आहे की हे सगळं बदललं पाहिजे. पन साला मांजर के गले मी घंटी बांधेगा कौन?

  ReplyDelete
 15. मांजर के गले मी घंटी बांधेगा कौन??????????????????

  ReplyDelete
 16. वोहीच प्रोब्लेम है.. प्रत्यकाने आपापल्या परीने करायचं थोडं थोडं !!

  ReplyDelete
 17. लेख छान आहे.तुमचे विचार अगदी रास्त आहेत.


  मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या...
  तिळगुळ घ्या गोड-गोड बोला……

  ReplyDelete
 18. देवेंद्र, आभार. पण हे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.. आपल्या सगळ्यांनाच !! तुम्हालाही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा !!!

  ReplyDelete
 19. chhan! kaalach ya naahee pan similar vishayawar ek post lihile. wel milala tar jaroor wachun abhipraay dya. http://man-udhaan-vaaryaache.blogspot.com/2010/04/learning-to-accept.html

  ReplyDelete
 20. मेघा, ब्लॉगवर स्वागत.. वाचली मी पोस्ट.. छान लिहिलं आहेस. कमेंटलोय तिकडे..

  बाल लैंगिक शोषणाबद्दल राही अनिल बर्वे यांचा एक उत्कृष्ठ चित्रपट आहे. मांजा. त्याविषयी इथे लिहिलंय. जमलं तर नक्की बघ मांजा.

  http://www.harkatnay.com/2010/03/blog-post_28.html

  ReplyDelete