Tuesday, February 2, 2010

राहु (ल)

राहुल म्हटलं ना की
१. कोण राहुल?
किंवा
२.  राहुल कोण?
आणि मग त्याच्यानंतर

३. कोण????? राहुल????

अशा ३ प्रश्नांचं त्रांगडं नाचतं माझ्या मनात नेहमी. काये माहित्ये का अहो चिक्कार मित्र आहेत माझे राहुल नावाचे आणि  माझे मित्र म्हटल्यावर अवली असणार हे ओघाने आलंच. तर दर वेळी कोणीतरी काहीतरी विचित्र प्रकार, मस्ती, गोंधळ, फजिती, पोपट करतं आणि ते प्रकार करणा-याचं नाव शोधताना म्हणजे ती व्यक्ती शोधताना हे असे प्रश्न विचारावे लागतात.

अर्थात राहुल द्रविड, राहुल बोस, राहुल बजाज, राहुल खन्ना अशा सेलिब्रिटीजचाही पंखा आहेच मी (आणि तो साबणाच्या जाहिरातीतला "राहुल, पानी चला जाएगा" वाला राहुल पण आवडायचा मला). पण त्यांच्या बाबतीत असले प्रश्न विचारून नाही शोधावा लागत तो माणूस. कारण २ दिवसात २५० ठोकले की द्रविडांचा, जास्त आरपीएमची नवीन दुचाकी अजून कमी किमतीत बाजारात आली की तो बजाजांचा, मल्टीप्लेक्स दर्जाचा नवीन सिनेमा कायच्याकाय जोरात आपटला की तो बोसांचा किंवा खन्नांचा राहुल,  ही काळ्या दगडावरची रेघ असते.  (तो बायकोला मारझोड करणारा, नशाबाज, गर्दुल्ल्या (आणि तरीही), स्वयंवराला उभा राहणारा राहुल खिजगणतीतही नाही माझ्या हे किती बरं आहे ना?)
अर्थात अजून एक राहुल सुद्धा आहे. पण तो ना धड मित्र ना धड सेलिब्रिटी. अर्थात तो स्वत:ला सेलिब्रिटी समजतो ही गोष्ट वेगळी. पण एखादा स्वत:ला जे काय समजतो ते तो प्रत्यक्षात आहे असं व्हायला लागलं तर मी एक दिवस सचिन तेंडूलकर, दुसऱ्या दिवशी टायगर वूड्स, तिसऱ्या दिवशी बिल गेट्स, चौथ्या दिवशी अमिताभ बच्चन, पाचव्या.....  सहाव्या.....  सातव्या......  असा काय काय होईन.
तर आपल्या या राहुलला अशा काळ्या दगडावरच्या रेघेसारखी ओळख नाही (अर्थात दगडाचा सामाईकपणा सोडला तर) आणि वरच्या साध्या सोप्प्या तीन प्रश्नांच्या उत्तरातूनही त्याला ओळखता येत नाही. त्याला ओळखण्यासाठीच्या प्रश्नांचा सेट वेगळा आहे. थोडा मोठ्ठा आहे. पण सगळेच्या सगळे प्रश्न लागू होतात त्याला ओळखायला.

१. मुर्खासारखं बडबडून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतो?
२. कुठेतरी उगाच विदर्भातल्या गावातल्या एका गरीब घरात रात्री मुक्काम करून त्यांच्याबरोबर जेवणाची नाटकं करत चमकोगिरी करतो?
३. त्याचं सभेला जाणं किती आवश्यक आहे हे दाखवण्यासाठी कुठेतरी अंधारात हेलीकॉप्टर उतरवून आपण कसे डॅशिंग आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतो?
४. आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना त्याला पंतप्रधान करा असं म्हणायला भाग पडून स्वत: मात्र "मला अजून खूप शिकायचंय, मी सध्या तरी साधा कार्यकर्ताच राहणे पसंत करीन" असे विनम्र(!!) उद्गार काढतो?
५. कुठलाही कसलाही वाद नसताना उगाच "कोणीही मुसलमान पंतप्रधान होऊ शकतो" अशी नसती सर्वधर्मसमभावाची (वाचा मुस्लीमधर्मसमभावाची)  मुक्ताफळं अकारण, काहीही गरज नसताना उधळतो?
६.
६-अ. सैनिकांची जात, भाषा, प्रदेश यावरून ओळख करून देत भारतीयांना आत्तापर्यंत अनोळखी असलेल्या क्षेत्रातलं अमूल्य ज्ञान पुरवतो?
६-आ . मी सैनिकाची भाषा काढली तरी चालेल पण मुंबईतल्या नेत्यांनी टॅक्सीवाल्यांचीही भाषा काढायची नाही अशी गर्भित धमकी असलेलली भाषणं ठोकतो?
६-इ. त्याचा पक्ष सतत हरत असणा-या प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकांवर डोळा ठेवून तिथल्या मतदारांना खुश करण्यासाठी राष्ट्रीय अस्मिता असलेल्या सैन्याला भाषा, प्रदेश अशा सीमांमध्ये बांधायला मागे पुढे पाहत नाही?

तर अशी खूप म्हणजे खूप मोठ्ठी यादी आहे प्रश्नांची आमच्या या राहुलला ओळखण्यासाठी. पण आपण सगळे सुज्ञ आहात त्यामुळे पहिल्या २-३ प्रश्नांतच ओळखलं असाल.

तर असा आमचा हा बिचारा राहुल. काही काही साध्या गोष्टी ना त्याच्या लक्षातच येत नाहीत.

-त्याच्या हे लक्षात येत नाही की त्याला मिळणारा मान हा राहुलला मिळणारा मान नाहीये तर एका माजी पंतप्रधानाच्या मुलाला, नातवाला आणि पणत्याला [हे कसं लिहायचं? (कंसात कंस : हे राहुल नाही मी विचारतोय) ] मिळणारा मान आहे.
-त्याला हे कळत नाही की नुसते पांढरे कपडे घातले की नेता होता येत नाही. माझा एक (राहुल नाव नसलेला) कार्यकर्ता मित्र नेहमी म्हणतो की "नेता बनना है तो ताने खाना सिखो".
-त्याला-म्हणजे राहुल नाव नसलेल्या मित्राला नव्हे तर वरच्या ६ कलमी कार्यक्रमातल्या राहुलला-हेही कळत नाही की त्याचा पक्ष सर्वधर्म समभावाचे एवढे गोडवे गातो पण जास्त "भाव" एकाच धर्माला देतो.
-त्याला हे कळत नाही की धर्मातल्या भेदभावाला न मानणारा त्याचा पक्ष निवडणुकांची सारी गणितं मात्र जातीपातींच्या हातच्यांच्या मदतीनेच सोडवतो.

असो. पण त्याचाही काही दोष नाही म्हणा. १२५ वर्षांच्या पक्षाची ध्येयधोरणं ४० वर्षांचा तरुण (?) कसा बदलणार? पण राहुलबाबा, तुला एक गुपित सांगतो रे. जरा सांभाळून बोलत जा रे बाबा. कारण तू काय बोलतोयस (ते कितीही बालिश आणि मूर्खपणाचं असलं तरी) त्याचे वेगळेचं अर्थ काढून रान माजवून देण्यासाठी हे विरोधी पक्षवाले आणि मिडीयावाले टपूनच बसलेले असतात रे. आता म्हणालास तू मुस्लीम व्यक्तीला करू पंतप्रधान म्हणून (आपल्या बापाचं काय जातंय, वचने किम् दरिद्रता?),  किंवा म्हणालास की २६/११ ला NSG च्या बिहारी कमांडोजनी वाचवलं मुंबईला तर असुदेतकी. यांच्या का एवढं पोटात दुखतं कळत नाही. तू राहुल आहेस, तू काहीही करू बोलू शकतोस हे पचतच नाही या अल्पसंतुष्ट मराठी लोकांना. अर्थात कोलंबियन (एक्स)गर्लफ्रेंड असणा-या महान नेत्याची दूरदृष्टी या कुपमंडूक महाराष्ट्रीयांकडे कुठून येणार. 
माझंचं चुकलं. उगाच तुला जपून बोलायला सांगितलं. शेवटी मराठी पडलो ना. तर तू आपला विरोधी पक्ष, मिडिया, कोण्णा कोण्णाकडेही लक्ष देऊ नको. अगदी माझ्याकडेही नको. (नाहीतरी फडतूसच ब्लॉग आहे माझा). आणि पुल म्हणतात तशा शिव्या देत, पान खात लोकांचे लक्ष नसेल तरी बडबड बडबड करत राहणाऱ्या मास्तरांसारखा  बोलत रहा बोलत रहा. नक्की होशील पंतप्रधान एक दिवस.

बोलो राहुल बाबा कि जय !!!

45 comments:

 1. छान लिहिलंत हो. कोलंबियन गर्लफ्रेन्डशी तुटलं नसतं तर सोनीया सारखी नवी कोळंबी भारताच्या जनतेच्या पानात पडली असती !!
  जय हो ! मग ती कोलंबियन आहे म्हणून आदित्य ठाकरेने सामना मधून बोंब ठोकली असती !! पण तरिही भारतात व महाराष्ट्रात कॉंगरेसच निवडून आलेली असेल.

  ReplyDelete
 2. आभार साधक. मला अरे-तुरे चालेल. असलं डोकं फिरलं होतं ना ते राहुल गांधीचं वाक्य ऐकून. म्हटलं ठोकुया थोडं.
  बाकी भारतात पंतप्रधान व्हायचा एकमेव निकष म्हणजे गांधी आडनाव पाहिजे. बाकी तुम्ही दगड असलात तरी फरक पडत नाही. उगाच नाही फिरोजने (श्री. इंदिरा गांधी) आडनाव बदलून गांधी केलं.

  ReplyDelete
 3. अगदी बरोबर हेरंब, हल्लीच एका राहुल वर लिहून झाले माझे..त्यात अजुन एक राहुलची भर टाकलीस तू.
  ह्या राहुलचा इतिहासा बद्दलचा द्यान कमी असच दिसतय, कुठून तरी शॉर्ट नोट्स मध्ये वाचून लास्ट मिनिट रिवीजन करून भाषणा ठोकयची सवय दिसतेय याला...नको तो वाद सुरू केलाय त्याने हे बरळून. आता भोग म्हणाव

  ReplyDelete
 4. हो सुहास. तू लिहिलेलं राहुलवरचं आर्टीकल वाचलं. तेव्हाच तर कळलं मला कि तो स्वयंवर रचतोय.
  आणि हा राहुल तर खरंच फक्त चमकोगिरी करणारा आहे. बाकी कृती शून्य !!

  ReplyDelete
 5. Hach to Rahul jo Maharashtratil eka paper madhye Vachakanchya matani YOUTH ICON mhanun nivadalaa jaato. Aani tyala mate pathavanaryana vicharale ki ka re baba ha youth icon tar mhane 'To ki sahi disto, aani rajkaranaat asoon sudha kitti sophisticated aahe vaigare vaigare'
  Tar Jithali janataa jila ek don varshat matadanaach hakk prapt honar aahe kinva jyapiki kaahi janana to already (nukatach) milalay te jar hi asli muktafale udhalanaar astil tar He Gandhi asech Deshache Anadhikrut RAAJE banoon phiranaar....... Aaani te aapalyla sahanahi karave laagnaar.........!!!!!

  ReplyDelete
 6. अरे बापरे.. हे असं पण आहे का? तो युथ आयकन म्हणून पण निवडला गेला होता? कधी ते?

  आणि त्याला निवडून देण्याची कारणं तर भयंकर आणि हास्यास्पदच आहेत. जनतेची जशी लायकी असते तसेच राज्यकर्ते तिला मिळतात असं कुठेतरी वाचलं होतं. त्याचा साक्षात प्रत्यय आला.

  ReplyDelete
 7. hmm ekdam = lihile aahes .......

  ReplyDelete
 8. Kharech..... 'jashi janatechi laayaki, tasech rajyakarte tila miltat'.
  Ha MAHAAN manoos Maharashtra Times cha youth icon zala hota.... I guess Disember madhye..!!!
  Aani mukhyatve MULInmadhye phaar ved aahe tyache.... arre kaay he... tumhi tumacha STAR nivadaa na thobaad baghun pan Icon vaigare kaay nivadataa?
  Asala santaap zala hota na tevha maza....

  ReplyDelete
 9. धन्यवाद अनामिक.

  ReplyDelete
 10. साहजिक आहे संताप होणं. माझा तर आत्ता वाचूनचही होतोय संताप.

  ReplyDelete
 11. हे बघ बाबा तुझ्या पोस्ट वाचल्यावर माझ प्रामाणिक मत झालय की आपल्या दोघांच्या विचारांचे तारू बरेचसे एकाच दिशेला भरकटतात..
  तेव्हा आत्ताचे पोस्ट तर नेहेमीप्रमाणे मस्त जमलय..
  पुढ्चा विषय महाजनांच्या (लाजत लाजत स्वयंवर करणाऱ्या )राहूलवर लिही तर!!!!!!!!!! लाजण्याचा आव आणणारा थोराड राहूल आणि न शोभणारा बालिशपणा करणाऱ्या त्या बाया (मुली म्हणवत नाहीये..)...लिही रे तू!!!!

  ReplyDelete
 12. 'राहू'न 'राहू'न 'हुल' देतोय का हां??? त्याला म्हणाव २५० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातुन (महाराष्ट्र हां आपल्या भारताचा एक अविभाज्य आणि सर्वातजास्त देशभक्त असलेला भाग आहे बरं का रे राहुल..) पानीपतात गेले होते मराठे ... अख्खा हिंदुस्तान वाचवायला.. उगाच आकडे काढायला लावू नकोस ... इतिहास उभा केला ना समोर तर तोंडात फेस येइल राहुल्या..... !!!

  ReplyDelete
 13. hi herab
  tumache article me nehami vachate...mi kolkata madhe rahate mhanun thode marathila miss karte.. rahul gandhi je bolala te vachale kalcha paper madhe ya var ekach Jashi Praja tasa Raja.

  ReplyDelete
 14. हेरंब!
  शुद्ध मराठीत एक म्हण आहे "आड्यात नाही तर पोहोर्‍यात कुठून येणार".या युवराजांच्या मातोश्रींच्या भाषणातुन त्यांच्या माहितीचा उजेड पडतच असतो चिरंजीव देखिल मातोश्रींच्या पावलावर पाउल टाकुनच बडबड करत असतात असल्या प्रकारची बाष्कळ विधाने करण्याइतपत सुमार बुद्धीच राहुल कडे आहे हे पुन्हा पुन्हा सिद्द झालच...सदरच विधान राहुलने केवळ बिहार मधे येऊ घातलेल्या निवडणुकांवर डोळा ठेऊन केले आहे हे सर्वशृत आहे...काँग्रेसचे हे भावी पंतप्रधान २६/११चा हल्ला झाला तेंव्हा कुठे होते याचे स्पष्टिकरण खरे तर यांनी स्वतः देण्याची गरज आहे. निदान माझ्या माहितीप्रमाणे (हि बातमी मी इंडियन एक्सप्रेसला वाचली होती)२६/११ चा हल्ला दहशवादी हल्ला आहे हे याचा दृष्टांत केंद्र सरकारला झाल्यावर केंद्र सरकारने बोलवलेल्या तत्काळ सभेला काँग्रेसचे युवराज गैरहजर होते .कारण जेंव्हा मुंबई पोलिस अपुर्या माहितीच्या व शस्त्रबळाच्या आधारावर त्या १० नरधमांचा सामना करत होते तेंव्हा काँग्रेसचे हे अल्पमती युवराज मेहरोली येथिल एका फार्म हाऊस वर मद्यप्राशन करत तरुणींच्या गराडयात धुंद झाले होते ... हि यांची देशभक्ती?पण केवळ राहुल मदनाचा पुतळा आहे म्हणुन त्याला पंतप्रधानपद मिळायला हवे असे मत वक्त करणारी तथाकथित सुशिक्षित तरुण पिढी(यात तरुणींचा समावेश जास्त आहे यांनीच त्याला युथ आयकॉन म्हणुन निवडुनही दिले दुर्दैव आमच? दुसर काय) ज्या देशात आहे त्या देशाचे कल्याण ३३ कोटि देव तरी करु शकतील काय?
  पण प्रत्येक वेळेस "जे चकाकत ते सोन नसत" हे कोण समजावणार?

  ReplyDelete
 15. शुद्ध मराठीत एक म्हण आहे "आड्यात नाही तर पोहोर्‍यात कुठून येणार".या युवराजांच्या मातोश्रींच्या भाषणातुन त्यांच्या माहितीचा उजेड पडतच असतो चिरंजीव देखिल मातोश्रींच्या पावलावर पाउल टाकुनच बडबड करत असतात असल्या प्रकारची बाष्कळ विधाने करण्याइतपत सुमार बुद्धीच राहुल कडे आहे हे पुन्हा पुन्हा सिद्द झालच...सदरच विधान राहुलने केवळ बिहार मधे येऊ घातलेल्या निवडणुकांवर डोळा ठेऊन केले आहे हे सर्वशृत आहे...काँग्रेसचे हे भावी पंतप्रधान २६/११चा हल्ला झाला तेंव्हा कुठे होते याचे स्पष्टिकरण खरे तर यांनी स्वतः देण्याची गरज आहे. निदान माझ्या माहितीप्रमाणे (हि बातमी मी इंडियन एक्सप्रेसला वाचली होती)२६/११ चा हल्ला दहशवादी हल्ला आहे हे याचा दृष्टांत केंद्र सरकारला झाल्यावर केंद्र सरकारने बोलवलेल्या तत्काळ सभेला काँग्रेसचे युवराज गैरहजर होते .कारण जेंव्हा मुंबई पोलिस अपुर्या माहितीच्या व शस्त्रबळाच्या आधारावर त्या १० नरधमांचा सामना करत होते तेंव्हा काँग्रेसचे हे अल्पमती युवराज मेहरोली येथिल एका फार्म हाऊस वर मद्यप्राशन करत तरुणींच्या गराडयात धुंद झाले होते ... हि यांची देशभक्ती?पण केवळ राहुल मदनाचा पुतळा आहे म्हणुन त्याला पंतप्रधानपद मिळायला हवे असे मत वक्त करणारी तथाकथित सुशिक्षित तरुण पिढी(यात तरुणींचा समावेश जास्त आहे यांनीच त्याला युथ आयकॉन म्हणुन निवडुनही दिले दुर्दैव आमच? दुसर काय) ज्या देशात आहे त्या देशाचे कल्याण ३३ कोटि देव तरी करु शकतील काय?
  पण प्रत्येक वेळेस "जे चकाकत ते सोन नसत" हे कोण समजावणार?
  या सगळ्यावर वांझोटा संताप व्यक्त करण्यावाचुन सर्वसामान्यांच्या हाती खरच काही उरल नाही आताशा!
  जनतेच्या लायकी प्रमाणे तिला पुढारी/ नेता मिळत असतो"-चर्चिल
  हेच खर!

  ReplyDelete
 16. या राहुलचं काय करावं? ’ काय वाटेल ते ’ लिहीण्य़ाचं काम माझं.. ते आता ह्याने सुरु केलं की काय??

  ReplyDelete
 17. धन्य ते राजकारणी..धन्य ती जनता..
  फिरभी मेरा भारत महान....

  ReplyDelete
 18. खूप आभार तन्वी. अग त्या महाजनांच्या राहुलच्या स्वयंवराविषयी तर मला माहितही नव्हतं. काल सुहासच्या ब्लॉगवरच्या पोस्ट वरून कळलं ते. लिहायला मजा येईल खरी पण मी त्याचा (आणि राखीच्या वेळीही) अजून एकही एपिसोड बघितलेला नाही. त्यामुळे नीट जमेल असं वाटत नाही. तरी बघू youtube वर बघतो मिळालं तर आणि मग टाकेन एखादं पोस्ट. आणि एवढे सव्यापसव्य करण्यापेक्षा तू बघत असशील ते स्वयंवर आणि तुझ्या डोक्यात तयार असेल विषय तर टाकून दे ना एक पोस्ट झरकन. मजा येईल..

  ReplyDelete
 19. हा हा. 'राहू'न 'राहू'न 'हुल' .. सहीये.. बरोबर बोललास रोहन.. जर सगळे आकडे काढून यांच्या तोंडावर मारले तर तोंडघशी पडतील नक्की. आणि ते आकड्यांचं काम तू बेश्ट करू शकशील !! :-)

  ReplyDelete
 20. आभार अनामिक. "भालो आन्छे" .. कोलकात्याहून लिहिताय म्हणून टाकलं आपलं एक तोडकं मोडकं बंगाली वाक्य.. :-) .. माझा ब्लॉग नेहमी वाचता हे वाचून छान वाटलं. आणि प्रजेची जशी लायकी असते तसाच राजा मिळतो तिला हे तर एकदम खरं.

  ReplyDelete
 21. तपशीलवार प्रतिक्रियेबद्दल आभार, अनामिका..!!

  आणि हे मिडीयावाले पण लाळघोटेपणा करत जेव्हा त्याला युवराज युवराज संबोधतात ना तेव्हा तर नुसती चीडचीड होते. अरे युवराज काय? राजेशाही आहे का? खालसा झाली न संस्थानं? मग?
  बापरे हे २६/११ चं मला माहित नव्हतं.. आणि ते युथ आयकन प्रकरण पण मैथिलीच्या कमेंट्स मधून कळलं. Hate to say it पण मुर्ख आहे का ही तरुण पिढी? आणि मुख्यत: मुली.. तो राहुल द्रविड पण त्याच्या जबरदस्त खेळण्यापेक्षा त्याच्या दिसण्यामुळे आवडतो कित्येक बयांना..
  असो. चर्चिलचं म्हणणं सर्वसमावेशक आहे..

  ReplyDelete
 22. काका, तुलनाच नको. तुमचं "काय वाटेल ते" सदाबहार, प्रसन्न, प्रफुल्लित, विचार करायला लावणारं, मिश्कील असतं. आणि या रावल्याचं म्हणजे सगळाच आनंदी आनंद !!

  ReplyDelete
 23. आनंद, मेरा भारत (विचारांना) महाग !!!

  ReplyDelete
 24. छान लिहिली आहे पोस्ट.

  ReplyDelete
 25. धन्यवाद अनुजाताई !!

  ReplyDelete
 26. शेवटी राजकारणीच तो त्याच्या जातीवरच जाणार..आणि खरंतर कमांडोचं मुंबईत येणं आणि इतर मुंबईद्वेष्ट्या लोकांनी मुंबईला गिळायला इथं येऊन राहाणं याचाच मुळी संबंध आहे का?? उगाच याची शेपटी त्याला जोडून आपली मतांची पोळी भाजुन घेणारी जात आहे राजकारण्यांची....शेवटी लोकांनीच या सगळ्यांना अक्कल शिकवायला हवी....

  aani ho Rahul Dravid cha mi pan motha pankha aahe bara....lekh ekdam mast jamaly...

  ReplyDelete
 27. धन्यवाद अपर्णा. आणि खरंय "कमांडोचं मुंबईत येणं आणि इतर मुंबईद्वेष्ट्या लोकांनी मुंबईला गिळायला इथं येऊन राहाणं" याचा अजिब्बात काहीही संबंध नाही आणि ते त्यांनाही माहित्ये. पण हजारो लोकांसमोर बडबडायला दुसरे चांगले मुद्दे आहेत कुठे त्यांच्याकडे? मग भाषण वळवायचं उगाच मुंबईच्या दिशेने.
  आणि हो. मी द्रविडचा काही पंखा नाही फार मोठा पण पोस्टात लिहायला सुट होत होतं म्हणून टाकलं :P .. खरा किंग सचिनच :)

  ReplyDelete
 28. हेरंबजी,
  तुम्ही लिहीलयं ते अगदी खरं आहे. या असल्या लोकांची देशाला काहीच गरज नाही. बेगडी देशभक्ती आणि घाणेरडं राजकारण. नुसता कायम मतांवर डोळा. आपला देशच कारणीभूत आहे त्याला. जशी प्रजा तसा राजा. पाचशे रुपये घेऊन यांना निवडून आणून पाच वर्षांसाठी आपल्या डोक्यावर बसवणारे नादान आपण. भोगा म्हणावं आपल्या कर्माची फळं...

  ReplyDelete
 29. खरंय विक्रांत. वारा येईल तशी पाठ फिरवणारी लोकं ही. उद्या देश विकायालाही मागे पुढे पाहणार नाहीत. आपणच डोळे उघडे ठेवले पाहिजेत आणि इतरांचे डोळेही उघडले पाहिजेत.

  ReplyDelete
 30. ओ अच्छा म्हणजे पंखा नसतानाही वारा घालतोय हा सत्यवान...(म्हणून शक्यतो खरं असं आहे का?? ) असो...तो मला आवडतो कारण slow and steady wins the race ....

  ReplyDelete
 31. हा हा हा.. कळला का आता माझ्या डिसक्लेमरचा अर्थ :)
  टोटल पंखा नाही,फार तर टेबलफॅन किंवा पूर्वी अँबेसेडर मध्ये लटकवलेला असायचा ना छोटा पंखा.. तेवढाच ..

  ReplyDelete
 32. युवराज ? राहुल
  यांच्याबद्दलचे आपले अनमोल मत वाचून त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला माझा
  जय हो माता रोम
  जीवनमूल्य

  ReplyDelete
 33. मलाही लिहिताना असंच भरून आलं होतं. जय हो इटली जय हो रोम !!

  ReplyDelete
 34. New post on my blog about new great news about Rahul gandhi......
  Vacha jaroor....

  ReplyDelete
 35. मस्त लिहिलंयस.. कमेंटलोय तिकडे.

  ReplyDelete
 36. हरकत नाय...! ;) त्या राहूलचं मुंडकं एखांद्या खाटिकापाशी सापडलं तरी नवल नाही... त्येच्या "त्या" प्रकारच्या पांचट वक्तव्यांमुळे जर त्येला वाटत आसन की त्यो भारताचा पंतप्रधान होईन, तर होईन, पण मोहन गांधी, त्याची आज्जी, त्येचा पप्पाऽऽ... ह्यांचं जसं झालं तसं बी ह्याचं व्हायला टाईम नाही लागणार..! दुसर्‍यांच्या घरामंधी आग लावून त्येचं घर का शाबूत राहणार हाये की काय??? बाय द वे, लेख एकदम झक्कास लिव्हलाय तुम्ही..! मी बी इठं लिव्हला होता याच विषयावरील लेख, पण मला तेवढा रीस्पॉन्स नाही मिळाला, काहून कन्नू...?? जाऊ द्या, तुमच्या प्रयत्नांना तरी यश आलं... बरं झालं...!

  - विशल्या!

  ReplyDelete
 37. बापरे.. मुंडकं बिंडकं नको उडायला पण जीभ आणि मेंदू थोडा ताळ्यावर आला पाहिजे नक्कीच.. तुझा लेख पण वाचला मी आत्ता आणि तिकडे कमेंटलो पण. छान लिहिला आहेस.

  ReplyDelete
 38. आपला हा राहुल कसाही असला तरी मनमौजी आहे. कुठल्याही दुःखद गोष्टींचा परिणाम तो आपल्या मनावर हो‍ऊ देत नाही; मनाला मरगळ येऊ देत नाही. मुंबईत नव्हेंबरमध्ये जो क्रूर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा हा मित्राच्या घरी पार्टीत दंग होता. मुंबईत तेव्हा अनेक माणसं मरत होती. अनेक माणसांचे प्राण पणाला लागले होते. आपले जवान प्राणांची बाजी लावून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. अशा वेळी आपले हे राहुलमहाराज पहाटे ५ वाजेपर्यंत मित्राच्या घरी पार्टीमध्ये धुडगूस घालण्यात व्यस्त होते. तिकडे चालू असलेल्या संगीताचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होता. पण बरोबरच आहे म्हणा... एवढा धडाडीचा नेता एवढ्या फुटकळ गोष्टींनी अस्वस्थ व्हायला लागला तर कसं नेतृत्व करणार तो देशाचं? आता १ अब्ज लोकसंख्या आपली; मेली चारपाचशे माणसं तर काय मोठा फरक पडणार आहे? उगाच ५०० माणसांचा मृत्यू राहुल मनाला लावून घ्यायला लागला तर त्याला कधी आनंदी होण्याची संधीच मिळणार नाही! तसंही भारतात प्रत्येक सेकंदाला टोटल ५०० माणसं तर नक्कीच मरत असतील!

  ReplyDelete
 39. खरंय रे.. एकदम मनमौजी आणि दिलफेक माणूस आहे तो. हो ना.. मुंबई हल्ल्याच्या वेळी स्वतः पार्टीत दंग होता आणि भाषणं ठोकताना मात्र 'बिहारी कमांडोजने मुंबई को बचाया' म्हणतो साला. खरंय माणसाच्या जीवाला किंमत कितीशी असणार मुंबईत? आणि तिकडे राहूलने लक्ष का द्यावं !

  ReplyDelete
 40. हो ना. राहुलमध्ये राजकारणी होण्याचे सगळे गुण आहेत. काम काही करायचं नाही; नुसती ड्रामेबाजी आणि दिखावा करायचा; आणि काहीही असंबद्ध बोलायचं हे अतिमहत्त्वाचे गुण आहेत त्याच्यात. लेटेस्ट बाय राहुल: बिहारींमुळे महाराष्ट्राचा विकास होत आहे

  ReplyDelete
 41. मी सुद्धा राहुलच पण फक्त
  राहुल भजे
  राहुल गांधी सारखे राजकारणी होण्याचे सगळे गुण नकोत.

  मस्त लिहिलंयस..

  ReplyDelete
 42. संकेत, खरंय.. रोज काहीतरी नवीन बडबडत असतो हा मनुष्य.. रोज नया ड्रामा रोज नया हंगामा !!

  ReplyDelete
 43. हाहा आभार राहुल..

  ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा !

  ReplyDelete
 44. राहुल गान्धीची मुक्ताफळे वाचून खरे तर मनोरन्जन व्हायला पाहिजे. वयाने वाढून ही माणूस कस बाळबुद्धीचा रहतो याचे हे एक उत्तम उअहरण. पण थ्याचे दुष्परिणाम सग्ळ्या देशाला भोगवे लग्तात तेन्व्हा he needs to be gagged. his advisers give him wrong advise and he follows it in toto, and then makes a fool of himself! do u think he can think for himself?

  ReplyDelete
 45. अरुणाताई, खरंय.. या राहुल्ल्याची रोज नवीन नवीन मुक्ताफळं उधळण्याची सवय देशाला सर्वनाशाच्या तोंडाशी नेऊन उभी करणार एक दिवस :(

  ReplyDelete