Wednesday, February 3, 2010

शब्द बापुडे केवळ वारा !!सुरुवातीला : हे पोस्ट वाचत असताना आवडलं नाही, कंटाळा आला, वैताग आला, बोर झालं, राग आला किंवा रागावून, चिडून अशा कुठल्याही कारणाने जर पोस्ट पूर्ण न वाचताच खिडकी बंद केलीत तरी हरकत नाही पण तसं करण्यापूर्वी तळटीप मात्र नक्की वाचा ही विनंती.

===========

रंभेने नुकत्याच ओतलेल्या अमृताचा चषक एका हातात आणि पृथ्वीवरून नुकतीच आलेली मराठी वृत्तपत्रं दुसऱ्या हातात अशा दोन्हींचा आस्वाद घेत सकाळची छान उन्हं अंगावर घेत साहेब खाटेवर लवंडले होते. त्यांच्या आजूबाजूला --वृत्तपत्रांशी काही संबंध नसल्याने-- फक्त चषकातल्या अमृताचा स्वाद घेणारे त्यांचे कार्यकर्ते बसले होते. वृत्तपत्रांमधल्या बातम्यांवरून नजर फिरत असताना साहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू बदलू लागले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते अचूक टिपलेही. पण हातात वृत्तपत्र नसल्याने नक्की काय बातमी आहे ते त्यांना कळत नव्हतं. पण काहीतरी आनंदी, विलक्षण चांगली, शुभशकुनी वगैरे वगैरे अशी काहीतरी बातमी आहे हे नक्की कळत होतं. साहेब ५-१० मिनिटं पुन्हा पुन्हा त्या बातम्या वाचत राहिले. आणि अखेर पुटपुटले "धन्य तो बिरबल. नाव काढलं पोरानं"..

अरेच्चा हे काय विक्षिप्तासारखं बोलताहेत साहेब असा चेहरा करून पुलंनी जशी गटण्याच्या डोळ्यात कुठे वेडाबीडाची झाक दिसतेय का ते पाहण्याचा प्रयत्न केला होता तसा प्रयत्न कार्यकर्त्यांनी साहेबांच्या डोळ्यात डोकावून पाहून केला. "काय झालंय काय यांना"  "असं का बडबडताहेत हे" "कोण पोरगा" "बिरबलाचा काय संबंध" असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात दाटले होते. पण प्रत्यक्षात मात्र यातलं काहीही न बोलता "काय झालं साहेब, साहेब काय झालं" असं काहीसं बोलून हस-या चेह-याने कार्यकर्त्यांनी बातमीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला.

साहेब खूप खुश होते. त्यांनी अजून एक चषक रिता केला आणि पुन्हा म्हणाले "बिरबला तू महान हायेस. माझ्या पोरा तू ग्रेट हायेस". यावेळी मात्र काक काहीही न बोलता स्वस्थ बसून राहिले आणि त्यांनी साहेबांना पुढे बोलू दिले. साहेबांचं मात्र कुठंच लक्ष नव्हतं. ते आपल्याच तंद्रीत बोलू लागले.

"लेकाला लहानपणी गोष्टी लई आवडायच्या. सारखा मागे लागायचा गोष्टी सांगा गोष्टी सांगा म्हणून. आणि रोज नवीन गोष्ट लागायची त्याला.  त्यामुळे मी ससा कासव, इसापनीती, हितोपदेश, सुरस अरबी कथा अशा सगळ्या सगळ्या गोष्टी त्याला सांगत असे. अशीच एकदा मी त्याला अकबर बिरबलाची एक गोष्ट सांगितली आणि ती त्याला इतकी आवडली म्हणून सांगू कि तो मला रोज तीच गोष्ट सांगा म्हणून मागे लागायला लागला."
साहजिकच कुठली एवढी छान गोष्ट असा प्रश्न काकंच्या मनात उभा राहिला. पण साहेब/मॅडम बोलत असताना आपण मध्ये बोलायचं नाही ही पक्षशिस्त सगळ्यांच्या अंगात चांगली भिनली असल्याने कोणीही "कुठली गोष्ट" असं विचारायचा उद्धटपणा केला नाही.

साहेब स्वत:हूनच गोष्ट सांगू लागले.

"एकदा बिरबल आणि बादशहा घोड्यावरून रपेट मारत असताना घोडा मधेच धडपडला. बादशहाने चमकून जाऊन विचारले "बिरबला, घोडा का अडला?" बिरबल काही बोलला नाही. त्याने फक्त स्मित केलं. पुढे जात असताना एका झाडाच्या खाली काही पानं पडली होती. चांगलीच सडलेली दिसत होती. नेहमीप्रमाणेच "पानं का सडली" असा बावळटासारखा प्रश्न बादशहाने बिरबलाला विचारला आणि याही वेळेला बिरबलाने काही उत्तर दिले नाही फक्त हसला. पुढे एका गरीब वस्तीतून जात असताना एक बाई झोपडीबाहेर बसून चुलीवर भाक-या करत बसली होती. पुन्हा बादशहाने विचारलं, बिरबला, भाकरी का करपली?
यावेळी मात्र नुसते हसून न दाखवता बिरबलाने उत्तर दिलं " जहापनाह, तुमच्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर आहे माझ्याकडे. घोडा का अडला, पानं का सडली, भाकरी का करपली या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच. "फिरवली नाही" म्हणून. घोड्याला सराव असता त्याला सतत फिरता ठेवला असता तर तो अडला नसता, पानं हलवली असती, फिरवली असती तर ती सडली नसती, भाकरीही तव्यावर एकाच जागी न ठेवता फिरवली असती तर ती करपली नसती. उत्तर एकच "फिरवली नाही म्हणून".. तात्पर्य एकच "प्रत्येक गोष्ट फिरवा"

साहेब बोलतच होते. 

"ही गोष्ट लई आवडायची आमच्या बाळ्याला. नेहमी असंचं कायसं फिरवाफिरवीचं बोलत असायचा. अलिकडे तर काय काय ती गानी बी म्हनायला लागला व्हता.
अचानक साहेबांच्या डोळ्यासमोर बंद गळ्याच्या कोटातला, केस नीट विंचरलेला दोन्ही हात पसरून गाणं म्हणणा-या बाळ्याचा चेहरा आला. ती गाती मूर्ती त्यांच्यासमोर तरळली.

घोडा फिरवा, भाकरी फिरवा, फिरवा रे सारे
पाने फिरवा, शब्दही फिरवा, फिरवू जग सारे ||१||

फिरत्या शब्दांची ती सुंदर फिरती रे दुनिया
फिरत्या दुनियेसमोर हे जग भासे मोह अन् माया ||२||

फिरत्या शब्दांच्या दुनियेमध्ये फिरती खुर्ची ती
त्या खुर्चीला उबच भारी पण ती तर तात्पुरती ||३||

तात्पुरत्या त्या उबेमध्ये मन शोधे रे गारवा
अजून हवीये उब तर मग अजून शब्द फिरवा ||४||

"अरे मी त्याला घोडा, भाकरी, पानं फिरवण्याबद्दल सांगितलं होतं आणि तेही फक्त बिरबलाच्या गोष्टीत. पण पठ्ठ्या कसला बहाद्दर. भल्या भल्या टोपीवाल्यांना आणि कोटवाल्यांना जमणार नाही असे शब्द फिरवण्याचे चमत्कार करायला लागला हा मुख्यमंत्री झाल्या दिवसापासून.
आता हेच बघा ना आधी जाहीर केलं की मुंबईतील टॅक्सीचालकांना परवाने देण्यासाठी मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणं सक्तीचं आहे. पण त्यावर दिल्लीमॅडम कडून जोरदार कानपिचक्या मिळाल्यावर याने त्याच्या त्या लाडक्या फिरवाफिरविच्या  गाण्याप्रमाणे त्याचे शब्द फिरवले, आणि मराठीच नाही तर  हिंदी, गुजराती अशी कुठलीही स्थानिक भाषा आली तरी चालेल अशी सारवासारवी किंवा त्याच्या भाषेत फिरवाफिरवी केली."

साहेब काय महान आहेत आणि पृथ्वीवरची कशी खडान् खडा माहिती आहे त्यांना असं कौतुक काकंच्या नजरेत तरळत होतं. 

"आता ही पुढची बातमी बघा...
NSG मधल्या बिहारी कमांडोजनी २६/११ च्या हल्ल्यात मुंबई वाचवली आणि मुंबईतील परप्रांतियांचे रक्षण करण्यास महाराष्ट्रातील सरकार कटिबद्ध आहे असे युवराजांनी बिहारमध्ये सांगताच याने युवराजांची आज्ञा शिरसावंद्य मनत मुंबईत लगेच पत्रकं काढली आणि मुंबईतील परप्रांतियांचे संरक्षण करण्यास सरकार सक्षम आहे असं सांगितलं. उडाला थोडा गोंधळ. पण त्यावर आपल्या नेहमीच्या सवयीने मार्ग शोधला पठ्ठ्याने. शिताफीने शब्दांची फिरवाफिरवी करत नवीन पत्रक काढून परप्रांतियांसह सर्व जनतेचे संरक्षण करण्यास सरकार कटिबद्ध आहे असं सांगितलं सुद्धा. आहात कुठे.."

काकंच्या चेह-यावरही आता आनंद स्पष्ट दिसत होता.

"लई मोठं झालं माजं लेकरू. अर्थात या मराठी लोकांना आनि नेत्यांना कायबी कळत न्हाई. शेक्युलर बिक्यूलर असं काय काय बोललं की गप बसतात त्ये बी."
साहेब अपार आनंदात असले आणि कौतुकाच्या भरात बोलत असले की त्यांचा टोन, उच्चार असा बदलतो हे
काकंना माहित होतं. साहेब पुढे बोलतच होते.

"खरं सांगायचं तर मला आज मॅडम, युवराज, युवराज्ञी, त्यांचे पीये, अशिश्टंट, पट्टेवाला, शेक्युरीटी, स्वयंपाकी, नोकर, ड्रायवर, गाडी पुसणारा, माळी अशा सर्वांचेच लय आभार मानावेसे वाटतायत. या सगळ्यांमुळेच बाळ्याची एवढी पर्गती झाली.
लेकरा, असाच मोठा हो, देशाची नाही केलीस तरी चालेल पण मॅडमची सेवा नक्की कर आनि नेहमी करत रहा. आनि मग पहात रहा कुठच्या कुठं जाशील ते. "

साहेबांच्या डोळ्यात चक्क अश्रू आले. काकंनी त्यांना कधीच रडताना बघितले नव्हते. सगळे एकदम विस्फारल्या नजरेने साहेबांकडे बघत होते. अचानक एक काक म्हणाला "साहेब, तुम्ही रडताय?"
"हो रे बाळा रडतोय मी. आनंदाश्रू आहेत हे"  साहेब
"साहेब रडू नका. रडू नका साहेब" सगळे काक.
तेवढ्यात साहेबांनी एकदम खवळून शब्द फिरवले "अरे मी कुठे रडतोय. मी कधीच रडत नसतो. रडताय तर तुम्हीच, माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं म्हणून पाणी आलं "

==========================

तळटीप : इथे कोणाही मृत व्यक्तीचा अगदी यत्किंचितही अपमान करण्याचा हेतू नाही आणि तरीही जर काही वाक्यांतून, शब्दांतून, वर्णनातून जर कोणाचा अपमान होत असेल, कोणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर क्षमा मागतो. मात्र अजून एक. या प्रसंगात आढळणा-या प्रत्येक पात्राचं ज्या जिवंत व्यक्तीशी साधर्म्य आहे त्या प्रत्येक जिवंत व्यक्तीचा जास्तीत जास्त अपमान करून पूर्ण चिरफाड करण्याचा हेतू मात्र नक्कीच आहे.

27 comments:

 1. हे हे ... फिरवण्याचं गाणं मस्तच बनवलं आहेस ... आणि तळटीप खासच!

  ReplyDelete
 2. सगळी साहेबांची कृपा ग.. आम्ही काय आपले निमित्तमात्र ;-)

  ReplyDelete
 3. हे हे हे..मस्तच लिहलय मित्रा..ते गाण आणि तळटीप आवडली (या प्रसंगात आढळणा-या प्रत्येक पात्राचं ज्या जिवंत व्यक्तीशी साधर्म्य आहे त्या प्रत्येक जिवंत व्यक्तीचा जास्तीत जास्त अपमान करून पूर्ण चिरफाड करण्याचा हेतू मात्र नक्कीच आहे)
  लय भारी :)

  ReplyDelete
 4. हेरंब,
  तळटीप खुपंच महत्वाची आणि खासंच आहे...

  ReplyDelete
 5. चाबूक पोस्ट आहे. एक नंबरी. लेकाराने वाचलं पाहिजे.

  ReplyDelete
 6. तुमच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर ब्लॉग लिहीला आहे. भेट द्या आणि नक्की वाचा. तुम्हाला खुप आवडेल. http://vikrantdeshmukh.blogspot.com

  ReplyDelete
 7. धन्यवाद सुहास. बघ किती निर्मळ आणि प्रामाणिक हेतू होता माझा हे पोस्ट लिहिण्यामागे ;-)

  ReplyDelete
 8. आभार आनंद. मला वाटतं माझ्या लेखांपेक्षा तळटीपचं आवडतात सगळ्यांना ;-) .. हरकत नाय. काहीतरी आवडतं ना. शेवटी दोन्ही माझंच तर आहे :-)

  ReplyDelete
 9. धन्यवाद कांचन. लेकराने वाचलं ना तर पोलीस पाठवेल पकडायला. महाराष्ट्राचा, जनतेचा, देशाचा, पक्षाचा अपमान केला या आरोपवरून :-)

  ReplyDelete
 10. विक्रांत, आत्ताच वाचलं तुझं पोस्ट आणि कमेंट पण टाकलीये तिकडे. इकडे पण टाकतो पुन्हा.. :-)

  "निषेध निषेध निषेध.. जाहीर निषेध.. त्रिवार निषेध, पाचवार निषेध, सातवार निषेध, नउवार निषेध... जाउदे चुकून साड्या आणि धोतराच्या दुकानात शिरल्यासारखं वाटतंय.

  अरे काय हे. किती जळवायचं लोकांना? आणि काय ते वर्णन. चीज पराठा, मेथी पराठा, आलू पराठा, भात-पात बिर्याणी. अहाहा अहाहा!!! तोंडाला नायगारा, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, प्रशांत महासागर असे सगळे एकत्र सुटलेत."

  ReplyDelete
 11. Bharri.....
  Taltip ekdam mastach.....!!!!

  ReplyDelete
 12. धन्स ग मैथिली :-) ..
  आता मी ठरवलंय फक्त तळटीपाच लिहिणार.. किंवा तळटीपांचच एक वेगळं पोस्ट करणार ;-)

  ReplyDelete
 13. मस्तच लिहलय ....तळटीपांचच एक वेगळं पोस्ट कर ना,,,,

  ReplyDelete
 14. 'वाजवा रे वाजवा' प्रमाणे हे 'फिरवा रे फिरवा' मस्त आहे... :) आणि साहेबांशिवाय ते कोणाला येणार जास्त परफेक्शनने... आणि

  चित्रकार मी चित्र काढतो... तसे 'राजपुत्र मी फ़क्त बडबडतो...' हेच खरे ... हेहे !!!

  ReplyDelete
 15. हेरंभ,
  तळटीप तर एकदम झकास.
  शेखर

  ReplyDelete
 16. हो अपर्णा. पुढचं पोस्ट मी नक्की तळटीपांवर टाकणार.

  शब्द पडती टपटपा
  टाकतो मी तळटीपा

  ;-)

  ReplyDelete
 17. अरे रोहन,
  सायेब, लेकरू, राजपुत्र, राजकुमारी आणि राजमाता असे सगळे सुखात असले की आम्हाला सगळं मिळालं. मग कितीही फिरवाफिरवी का करेनात..

  ReplyDelete
 18. आभार शेखरजी. तळटीपा भलत्याच फार्मात आहेत :-)

  ReplyDelete
 19. आह्हा हा हा हा !!

  लै भारी सेठ.

  ReplyDelete
 20. hi heramb,
  apratim.aare kitire mavaal bhasha vaparali aahes.kashaalaa ugaach aamachya mantryana dosh detos.gendyachi katadila ugach chapat maru nakos re raja.tuza panja laal laal hoil.tyancha panja 100 varsha juna aahe. tyana dhimm kahihi honar nahi.
  tula daad dyayachi tu lekhani haataat ghetalis mhanun.aamha mumbai karana sare he nityachech aahe.sadhya mumbait shiva vada pav gadya sudhha up valech chalavatat he satya aahe.
  jayant oak

  ReplyDelete
 21. धन्यवाद विक्रम :-)

  ReplyDelete
 22. आभार राज सेठ :-)

  ReplyDelete
 23. "black/dark humor".... well done Heramb..
  Enjoyed thoroughly...... :-)

  ReplyDelete
 24. खूप खूप आभार, श्वेता..

  ReplyDelete