Wednesday, February 10, 2010

बारा-मति


आपल्याला जगण्यासाठी काय काय लागतं? बापरे हा माणूस आता जीवन, आयुष्य असं काय काय बडबडत चावणार असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण नाही मी पकवणार नाहीये. म्हणजे अर्थात प्रयत्न तरी तसाच आहे. बघू. तर काय काय लागतं? ते अन्न, वस्त्र, निवाराच्या चालीवर नका सांगू. मी जिवंत राहायला काय काय लागतं ते विचारत नाहीये. जगायला (हो. फरक आहे दोन्हींत) काय काय लागतं असं विचारतोय. तर एखादी कला, नाट्य, नृत्य, खेळ असं कोणी सांगेल. पण कुठलीही कला किंवा खेळ येत नसलेल्या माझ्यासारख्या जमातीतल्या एखाद्याला विचारलं तर? तर मी सांगेन की अशाच कुठल्या कला किंवा खेळ यांचा आस्वाद घेणं. तर माझ्यासारख्याला जगायला आवश्यक म्हणजे पुस्तकं, संगीत, चित्रपट, क्रिकेट किंवा तत्सम काहीतरी. अर्थात लॅपटॉप, इंटरनेट, ब्लॉग हेही आहेत त्या यादीत. पण त्याच्यावर नंतर (म्हणजे नंतर कधीतरी) बोलू. त्यातही पुन्हा काही पुस्तकं, गाणी, चित्रपट आपण (मी) पुन:पुन्हा, वारंवार बघतो/ऐकतो एवढी त्यांची सवय झालेली असते आपल्याला. मला तर पार्टनर, व्यक्ती आणि वल्ली, फुलोंके रंग से, (आशाताईंचं) जीवलगा, शोले, आनंद, अब तक ५६, मैने प्यार किया या सगळ्या गोष्टी दर २-४ महिन्यांनी पुन्हा पुन्हा वाचायला, ऐकायला, बघायला लागतातच. नाहीतर चुकल्याचुकल्या सारखं वाटतं. (अर्थात 'मैने प्यार किया' आणि 'अब तक ५६' वर प्रचंड मतभेद होतील. इतके की मी अल्पमतातही जाईन कदाचित.. नाही मला खात्रीच आहे तशी. पर नाविलाज्य को क्या विलाज्य). 

तर माझ्या या सवयींमधला असाच एक चित्रपट म्हणजे "12 Angry Men". १९५७ चा ऑस्कर नॉमिनेटेड. ऑस्कर विजेत्या (या चित्रपटासाठी नाही) हेन्री फोंडाच्या संयत अभिनयाने नटलेला. पण हा चित्रपट बघितला कि आपल्याला वाटतं याला याच चित्रपटासाठी का नाही मिळाला ऑस्कर. 
१९५७ चा म्हटला म्हणजे अर्थातच कृष्ण-धवल. पूर्वी मला कृष्ण-धवल चित्रपट विशेष आवडत नसत. पण नंतर आवडायला लागले. (मॅच्युरिटी का कायसं म्हणतात ते हेच असावं) कारण आत्ताचे साय-फाय, हायटेक, कॉम्प्युराईज्ड, अॅनिमेटेड, कृत्रिम टेक्नो-थ्रिलर्स (सरसकट सगळे नव्हे) बघितले की ५०-६० च्या दशकात यातलं काहीही नसतानाही निव्वळ मनाला भिडणारी कथा, संवाद, पार्श्व-संगीत, दिग्दर्शन या सगळ्यांतून निर्माण झालेल्या कलाकृती मनाला जास्तच भिडतात. कारण त्या सच्च्या असतात. आणि कधीही आपल्या आजूबाजूला घडू शकतील असं वाटायला लावणा-या असतात. त्यामुळे एकाच वेळी हव्याशा आणि नकोशा वाटणा-या असू शकतात. माझं "दो बिघा जमीन" बघताना असं झालं होतं.

आणि हो अजून एक. हा लेख म्हणजे त्या चित्रपटाचं समीक्षण नाही. चित्रपटाचं परीक्षण किंवा समीक्षा करायला त्या क्षेत्राचं सखोल ज्ञान लागतं जे पूर्वीचे कमलाकर नाडकर्णी किंवा आताचे मुकेश माचकर, श्रीकांत बोजेवार, जयंत पवार, गणेश मतकरी अशा लोकांकडेच आहे. मी तर एक सर्वसामान्य नेत्रसेन (कानसेनच्या तालावर). सामान्य प्रेक्षक. त्यामुळे हा चित्रपट मी फक्त माझ्या नजरेतून मांडतोय.
तर नावात आल्याप्रमाणे हा चित्रपट १२ भिन्न प्रकृतीच्या, स्वभावधर्माच्या लोकांचा एक ठाम, सक्षम, सुयोग्य निर्णय घेण्याच्या दृष्टीने (न ठरवता केलेला) प्रवास. कथा आणि चित्रपटाची रूपरेषा बघण्याआधी एक गोष्ट पटकन सांगतो. ही कथा अमेरिकन न्याय-व्यवस्था, कोर्टखटला आणि ज्युरींचा अंतिम निर्णय यावर आहे. अमेरिकन न्यायव्यवस्थेत प्रत्येक खटला हा ज्युरींसमोर चालतो. वकील मुद्दे मांडतात, न्यायाधीश खटल्याच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतात. पण सगळे मुद्दे, साक्षी, पुरावे ऐकून, तपासून आरोपी दोषी आहे कि नाही याचा अंतिम निर्णय देतात ते ज्यूरीच. हे ज्युरी म्हणजे विशेष कोणी नाही तर तुमच्या आमच्यासारखेच सामान्य (अमेरिकन) नागरिक असतात. प्रत्येक खटल्यासाठी न्यायालय अशा ज्युरींची रँडमली निवड करतं. त्यांचा त्या खटल्याशी, निकालाशी, साक्षीदारांशी काही संबंध नाही हे बघून घेऊनच अर्थात. आणि कोणालाही असं कोर्टाचं 'ज्युरी ड्युटी' साठी उपस्थित राहण्यासाठीचं पत्र आलं की ते बंधनकारक असतं. आणि एखादी व्यक्ती ज्युरी ड्युटीसाठी अनुपस्थित राहिली तर तो गुन्हा मानला जातो.

तर चित्रपटाची सुरुवात होते एका १८ वर्षांच्या मुलावरचा खटला संपतानाच्या प्रसंगातून.  आपल्या वडिलांचा खून केल्याचा आरोप असतो त्या मुलावर. सगळे साक्षी, पुरावे त्याच्या विरुद्ध असतात. घटना प्रत्यक्ष पाहिलेले साक्षीदार असतात, गुन्ह्यातलं हत्यार सापडलेलं असतं. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर न्यायाधीश ज्युरींना आरोपी दोषी आहे किंवा काय यावर चर्चा करायला सांगतात आणि निर्णय देताना तो एकमताने असावा असं सांगतात. म्हणजे दहा जणांना वाटतंय दोषी आहे आणि दोघांना नाही असं व्हायला नको अशी विनंतीही करतात. एक तर खटला ऐकून ऐकून कंटाळलेले, घरी जायची घाई असलेले, वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि निरनिराळ्या पार्श्वभूमीचे लोक आणि त्यातही सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ पुरावे पाहून अर्थातच आरोपी दोषी आहे असं घोषित करून चर्चा संपवण्याच्या मार्गावर असतात. पण हेन्री फोंडाला हे मान्य नसतं. तो म्हणतो कुठलाही पुरावा निर्भेळ नाही. प्रत्येकात संशयाला थोडीफार जागा आहेच. आणि अशी संशयाला जागा असताना एखाद्या व्यक्तीला मी असं सरळ सरळ चर्चा न  करता दोषी ठरवू शकत नाही. काहीच निष्पन्न होत नाहीये हे बघितल्यावर प्रमुख ज्युरी म्हणतो कि आपण मतदान घेऊ. अर्थात फोंडा सोडून सगळे ताबडतोब आरोपीला दोषी ठरवण्याबद्दल मतदान करतात. मग फोंडाला विचारलं जातं कि तू एवढा विरोध करतो आहेस शिक्षेला तर तुझं काय म्हणणं आहे किंवा तुला तो का निर्दोष वाटतोय हे तरी सांग. आणि त्याचं पुन्हा पुन्हा हेच उत्तर असतं कि "I Don't know. माझ्याकडे काहीही पुरावा नाहीये तो दोषी नसल्याचा. पण मी फक्त एवढंच म्हणतोय की तो दोषी असेलच असं मला ठामपणे वाटत नाहीये आणि त्यासंदर्भात आपण चर्चा करू.". तर अशा रीतीने चर्चा करत करत, वादविवाद होत, प्रसंगी ऑलमोस्ट हाणामारी करत करत एकेकाचं मत बदलत जातं. या सगळ्या चर्चांमधून समाजाची प्रवृत्ती, स्वभाव, निष्क्रियता, निष्काळजीपण, 'मला काय त्याचे' हा भाव अशा विविध छटा दिग्दर्शकाने अप्रतिमरित्या टिपल्या आहेत.

मला वारंवार हेन्री फोंडा, फोंडा असं म्हणावं लागतंय कारण चित्रपटात कुठल्याही पात्राच्या (अपवाद शेवटच्या प्रसंगातली दोन पात्र) नावाचा उल्लेख नाही कारण ज्युरींनी आपली ओळख गुप्त राखायची असते असा नियम आहे. त्यामुळे पूर्ण चित्रपटात "हे यु जंटलमन" किंवा "ज्युरी नंबर ५" अशाच नावाने सगळेजण एकमेकांना उल्लेखतात. अर्थात त्या 'यु जंटलमन' वरून प्रसंगी 'यु बास्टर्ड' पर्यंतची वाटचाल श्वास रोखून धरायला लावणारी आहे. तर फोंडा एका प्रसंगात त्या साक्षीदाराप्रमाणे चालतो तो प्रसंग, किंवा भाषा, उच्चार, व्याकरण, बोलण्याची पद्धत यावरून माणसाची योग्यता ठरवणा-या एका ज्युरीला दुस-याने त्याच प्रकारे तोंडघाशी पाडण्याचा प्रसंग, फोंडाचे तळमळीने मुद्दा मांडण्याचे, आपला विषय पटवून देण्याचे अनेक लहान-मोठे प्रसंग हे वर्णनातीत आहेत. त्याचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा.

चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे सशक्त संवाद. कथेचा जीव छोटा असताना पटकथा आणि त्यापेक्षाही संवाद हे कुठल्याही चित्रपटाला कसे सर्वोच्च पातळीला पोचवू शकतात याचं उत्तम उदाहरण आहे हा चित्रपट म्हणजे. नाहीतर अनेक चित्रपट वर सांगितलेलं सगळं सशक्त असूनही निव्वळ दुर्लक्षिलेल्या संवादांमुळे कोसळू शकतात किंवा अपेक्षित उंची गाठत नाहीत. (माझ्या मते) उत्तम उदाहरण म्हणजे '१९४२, लव्ह स्टोरी'. कलाकार, संगीत, कथा, दिग्दर्शन सगळं उच्च दर्जाचं असूनही निव्वळ सक्षम संवाद नसल्याने हा चित्रपट मनात घर करत नाही. नाहीतर गेल्या वर्षी आलेला नानाचा एक सारखा बकवास चित्रपट.. (हो. 'एक' हेच चित्रपटाचं नाव आहे).. तो खरं तर २ दिवसही चालला नसता पण नानाच्या जबरदस्त संवादामुळे तो थोडीफार तरी तग धरू शकला. यात मी १९४२ हा एक पेक्षा चांगला होता वगैरे असलं काही म्हणत नाहीये.

यात हातघाईच्या एका प्रसंगात आपले रोजच्या जीवनातले बोल हे कधीकधी कसे अगदी निरर्थक आणि निव्वळ नेहमीच्या बोलण्याच्या सवयीतून आलेले असतात यावर एक उत्तम प्रसंग आहे. त्या प्रसंगातले संवाद, त्यांचं टायमिंग हे एवढं अफलातून आहे कि तो प्रसंग, त्यातली पात्र अक्षरश: त्याक्षणी लगेच आपल्या मनात घर करतात.

मी त्यातल्या त्यात कथा न उलगडू देण्याचा प्रयत्न केला आहे (आणि त्यात मी सपशेल फसलो आहे हे पण मला माहित आहे.) पण तरीही काही चित्रपट असे असतात कि त्यांची कथा कळली तरी चित्रपटाची मांडणी, सादरीकरण, विषय, संवाद यांच्या वेगळेपणामुळे कथा थोडी माहित असली तरीही चित्रपट बघायला खूप मजा येते. तर सांगायचा मुद्दा हा की अशाच वर्गातला चित्रपट आहे हा. 

मागे एकदा "100 movies you should watch before you die" असं एक इ-मेल फॉरवर्ड आलं होतं मला बऱ्याच वर्षांपूर्वी आणि त्यात या चित्रपटाचा उल्लेख होता. आणि तो किती किती किती योग्य होता हे मला तो बघितल्यावरच कळलं.

तर बघताय काय बघाच लगेच.. भेटूच !!

एक राहिलंच : आपल्याकडे पण मागे याच कथेवर बेतलेला पंकज कपूरचा 'एक रुका हुआ फैसला' नावाचा चित्रपट आला होता. पण (बहुतेक) त्याच्या आर्टफिल्म किंवा समांतर सिनेमा (आत्ताच्या भाषेत मल्टीप्लेक्स सिनेमा ) सदृश्यतेमुळे तो विशेष चालला नाही.

* सर्व चित्रे अर्थातच गुगल इमेजच्या मदतीने.

32 comments:

 1. हा सिनेमा आता फायलाच हवा.. खुप छान लिहिलंय परिक्षण.. :)

  ReplyDelete
 2. नक्कीच बघा काका. माझ्या अत्यंत आवडत्या सिनेमांपैकी आहे हा !!

  ReplyDelete
 3. माझा फेवरेट क्लिंट इस्ट वुड . गुड बॅड ऍंड अगली मी खुप लहान असतांना पासुन पाहिला होता. आज पर्यंत कमीत कमी २५ दा तरी नक्कीच पाहिला असेल.
  त्या काळातले सगळेच फॉर अ फ्यु डॉलर्स मोर वगैरे पण बरेचदा पाहिलेली आहेत.
  हेन्री फोंडाचे काही फारसे बघितलेले नाहीत. पण आता नक्कीच बघतो.

  ReplyDelete
 4. अच्छा.. क्लिंट इस्टवुडचे मी जास्त नाही पाहिलेत. फक्त गुड बॅड ऍंड अग्ली च बहुतेक. तो पण खूप वर्षांपूर्वी..

  आणि हे एकदा 'kayvatelte' आणि एकदा 'महेंद्र' कसं आलं?

  ReplyDelete
 5. आधी चित्रपट मिळवतो, पहातो आणि नंतर कमेंट देतो...
  चित्रपट सुचविल्याबद्दल धन्यवाद!

  ReplyDelete
 6. नक्की बघ आनंद. मला खात्री आहे तुला आवडेल !!

  ReplyDelete
 7. राजा एक रुका हुआ फैसला सुद्दा बराच भारी आहे. सगळ्या भारी भारी नटांनी line लावली आहे. मला details jaast जास्त आठवत नाहीत पण सिनेमा आवडला होता हे नक्की. तो सुद्धा पहा, मी हा पाहिलेला नाहीये. लगेच ठेवतोय downloadला :)

  ReplyDelete
 8. हो अरविंद. भारी तर आहेच. नो डाउट. पण त्या आर्ट-फिल्म लूक मुळे तो चालला नाही असं म्हणायचं होतं मला. मी पण टाकतो तो डाउनलोडला आता :-)

  ReplyDelete
 9. सीडी मागवली आताच ऑनलाइन..मस्त जमलय मित्रा.
  खुपच बारकाईने परिक्षण केलस..आवडल

  ReplyDelete
 10. अरे वा सुहास. सुपरफास्ट आहेस एकदम. सहीच !!

  ReplyDelete
 11. मस्तच लिहलयेस रे......आता पहायला हवा सिनेमा...

  आणि एक ते जे पहिले दोन ’नमनाला तेलाचे’ पॅरेग्राफ आहेत ना ते जसेच्या तसे माझ्या नावाने खपवता तेयील इतके डिट्टो आहेत माझ्याबाबत...तेव्हा आज तुमने ये प्रुव्ह किया के तुम भी येकदम पक्के खेकडा हो...अरे ’मैने प्यार किया’ मी देखील अनेकदा पचवलाय, तोच काय जुना एक ’संसार’ नावाचा सिनेमा आहे बघ रेखा, अनुपम वगैरेंचा तो ही चालतो मला....लिस्ट काढली तर मोठी आहे........खेकडे आठवणीत रमतात म्हणे (या विचाराचे सौजन्य ’लिंडा गुडमन’ ला....) असो वहावत जाणे हा आणि एक दु(र्गूण).....
  पोस्ट झकास.....बाकि पोपटपंचीबद्दल (माझ्या कमेंटमधल्या) नाविल्याज को क्या विलाज????? :)

  ReplyDelete
 12. हा हा.. नक्कीच ते ’नमनाला तेलाचे’ पॅरेग्राफ आहेत. फक्त मला माझ्या तोंडाने तसं म्हणायचं नव्हतं. कारण दर पोस्टमध्ये असं म्हणायची वेळ येतेच माझ्यावर. म्हंटलं यावेळी जरा चोरी चोरी चुपके चुपके :P.. खेकडे आठवणीत रमतात हे तर १०१% खरय.. बाकी तू पोपटपंची म्हणत असलीस तरी ते तसं नाही हे मी वेगळं सांगायला नको. उलट अशाच एकदम मनापासून लिहिलेल्या कमेंट्स वाचायला मजा येते.. :) (बाकीच्यांनो : तुमच्या सगळ्यांच्याच कमेंट्स मनापासून असतात रे बाबांनो)

  BTW, पिक्चर नक्की बघ..

  ReplyDelete
 13. खूपच सुंदर चित्रपट आणि त्यांचे तितकेच सुंदर परिक्षण ! हा चित्रपट IMBD top 10 मध्ये आहे. त्याच्या हिंदी अनुवाद एक रुका हुआ फैसला पण चांगला आहे. हल्लीच अरुण नलावडे यांचे याच कथेवर आधारित "निखारे" हे नाटक आले आहे.

  ReplyDelete
 14. बघायलाच हवा आता हा सिनेमा ... तुझे ती १०० सिनेमांची यादीच टाक ना ब्लॉगवर ...

  ReplyDelete
 15. धन्यवाद अभिजीत. आता सगळेच जण म्हणतायत तर मीही म्हणतो त्याला परीक्षण ;-) ..
  ओह. तो IMDB top 10 मध्ये आहे हे नव्हतं माहित.. हो मी आत्ताच 'एक रुका हुआ फैसला' डाऊनलोड करत ठेवला आहे..

  अरे वा नाटक पण? हे पण माहित नव्हती. मस्त माहिती दिलीस.

  ReplyDelete
 16. गौरी, नक्की बघच. मी पण ती १०० सिनेमांची यादी शोधतो आता. मेलबॉक्स थोडा खणावा लागेल. ३-४ वर्षांपूर्वी आलं होतं ते मेल.

  ReplyDelete
 17. हा चित्रपट पाहिलेला नाही मी. आता पाहिन. MPK आणि AT 56 मलाही आवडलेले चित्रपट आहेत हं. शोले तर फ्रेम टू फ्रेम पाठ. या अशा काही गोष्टी आपण आयुष्यातून वजा करू शकत नाही. तुला आलेलं ईमेल अजून सेव्ह केलेलं असेल तर मला पाठवशील का? काही न पाहिलेले सिनेमे नक्की मिळतील.

  ReplyDelete
 18. नक्की बघ कांचन. अप्रतिम आहे. अरे वा MPK आणि AT56 साठी माझ्याबरोबर साथीदार असतील असं वाटलं नव्हतं :-)
  आणि त्या १०० सिनेमांच्या यादीसाठी मेलबॉक्स खणतो १-२ दिवसात. आणि मग पाठवतो.

  ReplyDelete
 19. आणि हि त्या १०० चित्रपटांची यादी (अर्थातच इंग्रजीपुरती मर्यादित). यातले चिक्कार चित्रपट मी बघितले काय ऐकलेही नाहीयेत.

  12 Angry Men (1957)
  2001: A Space Odyssey (1968)
  The 400 Blows (1959)
  8 ½ (1963)
  A Hard Day’s Night (1964)
  The African Queen (1952)
  Alien (1979)
  All About Eve (1950)
  Annie Hall (1977)
  Apocalypse Now (1979)
  The Battle of Algiers (1967)
  The Bicycle Thief (1948)
  Blade Runner (1982)
  Blazing Saddles (1974)
  Blow Up (1966)
  Blue Velvet (1986)
  Bonnie and Clyde (1967)
  Breathless (1960)
  The Bridge on the River Kwai (1957)
  Bringing Up Baby (1938)
  Butch Cassidy and the Sundance Kid (1969)
  Casablanca (1942)
  Chinatown (1974)
  Citizen Kane (1941)
  Crouching Tiger, Hidden Dragon (2000)
  Die Hard (1988)
  Do the Right Thing (1989)
  Double Indemnity (1944)
  Dr. Strangelove or: How I Learned to Stop Worrying and Love the Bomb (1964)
  Duck Soup (1933)
  E.T. the Extra-Terrestrial (1982)
  Enter the Dragon (1973)
  The Exorcist (1973)
  Fast Times At Ridgemont High (1982)
  The French Connection (1971)
  The Godfather (1972)
  The Godfather, Part II (1974)
  Goldfinger (1964)
  The Good, the Bad, and the Ugly (1968)
  Goodfellas (1990)
  The Graduate (1967)
  Grand Illusion (1938)
  Groundhog Day (1993)
  In the Mood For Love (2001)
  It Happened One Night (1934)
  It’s a Wonderful Life (1946)
  Jaws (1975)
  King Kong (1933)
  The Lady Eve (1941)
  Lawrence of Arabia (1962)
  The Lord of the Rings (2001,2002,2003)
  M (1931)
  M*A*S*H (1970)
  The Maltese Falcon (1941)
  The Matrix (1999)
  Modern Times (1936)
  Monty Python and the Holy Grail (1975)
  National Lampoon’s Animal House (1978)
  Network (1976)
  Nosferatu (1922)
  On the Waterfront (1954)
  One Flew Over the Cuckoo’s Nest (1975)
  Paths of Glory (1958)
  Princess Mononoke (1999)
  Psycho (1960)
  Pulp Fiction (1994)
  Raging Bull (1980)
  Raiders of the Lost Ark (1981)
  Raise the Red Lantern (1992)
  Rashomon (1951)
  Rear Window (1954)
  Rebel Without a Cause (1955)
  Rocky (1976)
  Roman Holiday (1953)
  Saving Private Ryan (1998)
  Schindler’s List (1993)
  The Searchers (1956)
  Seven Samurai (1954)
  The Shawshank Redemption (1994)
  The Silence of the Lambs (1991)
  Singin’ in the Rain (1952)
  Snow White and the Seven Dwarfs (1937)
  Some Like It Hot (1959)
  The Sound of Music (1965)
  Star Wars (1977)
  Sunset Blvd. (1950)
  Terminator 2: Judgment Day (1991)
  The Third Man (1949)
  This is Spinal Tap (1984)
  Titanic (1997)
  To Kill a Mockingbird (1962)
  Toy Story (1995)
  The Usual Suspects (1995)
  Vertigo (1958)
  When Harry Met Sally… (1989)
  Wild Strawberries (1957)
  Wings of Desire (1988)
  The Wizard of Oz (1939)
  Women on the Verge of a Nervous Breakdown (1988)
  The World of Apu (1959)

  ReplyDelete
 20. This is a test comment written by Akshay.

  ReplyDelete
 21. कांचनचं वाचुन आठवलं एकदा रात्री (म्हणण्यापेक्षा पहाटे) न्यु-यॉर्क सिटीतून फ़िलीला ड्राइव्ह करताना माझा नवरा आय-पॉडवर डाउन्लोड केलेला "शोले" ऐकत ड्राइव्ह करत आला..बाकी सगळे म्हणजे मी आणि आई-बाबा गाढ झोपलो होतो....मध्ये मध्ये मला जाग आली की बाजुला बाबा आणि तो गप्पा मारतात असा विचार करून मी परत झोपी...आणि दुसर्‍या दिवशी म्हटलंही की बरं झालं नं बाबा तरी जागे होते म्हणजे तुला ड्राइव्ह करायल कंपनी....मग कळलं कंपनी कुणाची ...पण चित्रपटांचा असाही फ़ायदा होतो माझी झोपही झाली आणि त्यानेही आम्हाला पोटातलं पाणी न हलवता मुक्कामी पोहोचवलं...

  ReplyDelete
 22. हा हा.. सही कंपनी मिळाली ग.. ठाकूर, गब्बर, जय-वीरू अशा महान लोकांची.. गब्बरचे डायलॉग नुसते ऐकून पण झोप पळत असेल हे नक्की.. माझी पण शोलेची पारायणं झाली आहेत..

  ReplyDelete
 23. हेरंब, मस्त लेख !!! आवडत्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकण्या/पाहण्याविषयी तर 'अगदी अगदी' :)

  12 angry men माझा(ही) all time favorite आहे. नुकताच 'एक रुका हुआ..' (vcd/dvd निघाल्याने) पुन्हा पहायला मिळाला. कैक वर्षांपूर्वी टि.व्ही. वर अचानक लागलेला तेव्हा पाहिला होता. खूप आवडला होता तेव्हाही ('देमार' पटांवर मनापासून प्रेम करण्याच्या वयात असं काही होणं म्हणजे माझा मलाही धक्काच होता. पण तो थेट आणि नि:संशय आवडला होता). आता पुन्हा पाहिला तेव्हा थोडा मंद लयीचा वाटला तरी परिणाम तोच होता. कसलेले आणि/किंवा 'फिट्ट' बसणारे अभिनेते आहेत एकेक!
  फारच कमी चित्रपट असे असतात त्याचे 'रिमेक' (किंवा 'भारतीय' करण ) मूळ चित्रपटाइतकेच चांगले होतात. ज्याला 'वैश्विक' म्हणता येतील असा विषय, समाजातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तींचे प्रतिनिधी असलेले ते १२ जण.. वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले, वेगवेगळ्या जगात राहणारे, वेगवेगळे पूर्वग्रह पाळणारे ते सर्व, जगातल्या साधारण कुठल्याही समाजात आढळू शकतील.

  p.s. एके काळी शोले मधला संवाद नसलेला भाग (न बघता )ऐकला, तर ४-५ सेकंद पार्श्वसंगीत ऐकून मी सीन सांगत असे. ब-याच दिवसात ही 'परिक्षा' घेतली नाही, बहुतेक आताही उत्तीर्ण होईन :).. (अर्थात, माझ्यापेक्षाही जास्त 'वेडे' आहेतच :))

  ReplyDelete
 24. p.s. 2 : लेखाचे शीर्षक एकदम फंडू ! :)

  ReplyDelete
 25. p.s. 2 : लेखाचे शीर्षक एकदम फंडू :) !

  ReplyDelete
 26. आभार राफा (उर्फ आयशॉट.. हा हा).. मस्त प्रतिक्रिया दिलीस.. हो ना. एवढा ताकदवान चित्रपट मी अभावानेच बघितला आहे.

  आणि तू म्हणालास तशी परीक्षा मी ही घेतली आहे.. शोले बद्दल आणि MPK बद्दलसुद्धा. MPK मी म्युट करून बघायचो आणि सगळे संवाद माझे. आणि तेही सिक्स सिग्मा स्टायलीत ९९.९९९९९९९९९% अचूक असायचे. पुन्हा घ्यायला लागेल परीक्षा :)

  शोलेचा माझ्या एका मित्राने सांगितलेला एक किस्सा : परीक्षा जवळ आलीये म्हणून एक मित्र एकदा रात्री गप्पा मारायला आला नाही नाक्यावर. दुस-या दिवशी त्याला विचारलं कसा झाला अभ्यास.. तर म्हणतो कसा "काय करणार यार. अभ्यासच करत होतो. पण केबल वाल्याने शोले लावला. मग बघायला लागला" :-)

  ReplyDelete
 27. फेब्रुवारी १०ला म्हटल्याप्रमाणे चित्रपट पाहुन प्रतिक्रिया देत आहे...
  अप्रतिम सिनेमा आणि अप्रतिम रसग्रहण....
  हेन्री फोंडाचा आणि बाकी ११ लोकांचा अभिनय लाजवाब... एकाच हॉलमध्ये(क्वचित दोन सिन रेस्ट रूम मध्ये) चित्रिकरण असूनही एकाही सेकंदासाठी बोअर होत नाही... क्लासिक...

  ReplyDelete
 28. आनंदा, आभार..
  ह्म्म्म.. १० फेब्रुवारी ते १० जुलै.. ५ महिने लावलेस. ;).. But honestly it's better late than never !!

  होना एकाच जागी चित्रित झालेले सिनेमे कंटाळवाणे, संथ होण्याची खूप शक्यता असते पण अशा सगळ्या शक्यतांना या चित्रपटाने विराम दिला आहे. आणि फोंडा तर लाजवाबच.. एकेका प्रसंगात त्याचे डोळे, हावभाव त्याच्या प्रत्यक्ष संवादांपेक्षा अधिक बोलतात !!

  ReplyDelete