Tuesday, February 16, 2010

तो आणि ती

तो अलिकडे तसा अस्वस्थच होता. मधून मधून चिडायचाही थोडा. पण संस्कार आणि भीती या अजब समीकरणामुळे बरेचदा गप्प बसायचा. तसा तो कोणाचाच नव्हता. त्याला वाघ (किंवा धनुष्यबाण) आवडत नसे. हाताबद्दल विशेष आत्मीयता नव्हती की घड्याळाबद्दल विशेष प्रेम नव्हतं. कमळाचा गुच्छ थोडा प्रिय होता पूर्वी पण तोही एक कमळ वेळेआधीच खुडलं गेल्याने आणि दुसरं मोठ्ठ कमळ अगदी कोमेजून गेल्याने विशेष आवडेनासा झाला. सुरु झाल्या झाल्या इंजिन आवडलं थोडं. पण लगेच  एवढं हुरळून जायला नको असंही वाटायचं. कारण आताशी पहिलाच थांबा तर घेतला होता इंजिनाने. आणि बाकी हत्ती बित्ती तर त्याच्या आवडी-नावडीच्या यादीतही नव्हते. ती बरेचदा त्याला काही बाही (समजावून) सांगायचा  प्रयत्न करायची पण हा काही तिला विशेष बधत नसे. पण तो मनातल्या मनात आणि त्याच्या स्वत:च्याच नकळतपणे आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवून असतो हे तिला चांगलं माहित होतं. आणि त्याच्या या भाबडेपणावर (ती त्याला मुर्खपणा म्हणायची) भरपूर हसायची. या बिचा-याला त्याचं कारणही कळत नसे.

त्यात एकदा त्या शांत गावातली बेकरी फुटली आणि हा बेचैन झाला खूप चिडला, हताश झाला.  आणि त्याचदिवशी तिने त्याला एका प्रधानाने १०० दिवस पूर्ण केल्याची बातमी निर्ल्लज्जपणे येऊन सांगितली. याची अस्वस्थता अजूनच वाढली. खूप वाढली. त्याच बेचैनीत त्याने खूप विचार केला, जुनं वाचन आठवलं, तिने सांगितलेल्या सगळ्या जुन्या घटना आठवल्या. ती विश्वासघात करेल असं त्याला स्वप्नातही वाटत नव्हतं. पण त्याच्या दृष्टीने जे स्वप्नातही घडणं अशक्य होतं ते रोजच्या जीवनात घडवणं हा तिच्या डाव्या हातचा मळ होता. त्याचं विचार करणं चालूच होतं. फार लांब कशाला जा म्हणून  फक्त गेल्या महिनाभारताल्या तिच्याशी झालेल्या गप्पा आठवून पाहिल्या. आणि तो जागच्या जागी उडालाच. कारण तिच्या खांद्यावर मान टाकून ती सांगेल त्या सगळ्या गोष्टी तो ऐकत असे आणि ती सांगेल ते तात्पर्य प्रमाण मनात असे. या सगळ्यात तिने आपल्याला हातोहात फसवलं आहे हे त्याला कळलंही नव्हतं अगदी आत्तापर्यंत. 

त्याला सगळ्यात आधी आठवलं ते १५-२० दिवसांपूर्वीचं राजपुत्राचं वाक्य. अर्थात ते तिनेच येऊन त्याला सांगितलं होतं. पण कुठली गोष्ट कशी आणि किती जोरात ओरडून/हळू बोलून सांगायची याची तिला चांगली समज होती. त्याप्रमाणे यावेळी ती नुसतं पुटपुटली. त्यामुळे त्यानेही काही विशेष लक्ष दिलं नाही. पण वाघाने मात्र राजपुत्राची गोष्ट ऐकली होती,प्रचंड मनावरही घेतली होती आणि चिडून जाऊन प्रचंड डरकाळीही फोडली होती आणि त्याच्या सगळ्या सवंगडी वाघांना तो म्हणाला होता की राजपुत्राला शांत मार्गाने (म्हणजे काळे पंजे दाखवून) सळो की पळो करून सोडा. झालं. तिने हे मात्र अगदी छान फुगवून फुगवून सांगितलं त्याला. त्यालाही आला होता राजपुत्राचा थोडासा राग. पण तिच्या हळुवार समजावण्याने आणि मेंदू-धुण्याने त्याला वाघ कसा चुकीचा आहे आणि त्याची डरकाळी कशी अनाठायी आहे हे अगदी ठाम पटलं. ठरल्याप्रमाणे राजपुत्र आला तेव्हा प्रधानाच्या सांगण्यावरून एक तर हजारो वाघ पिंज-यात होते आणि उरलेल्या वाघांसाठी त्यांच्या दुप्पट शिकारी हजर होते. राजपुत्र आला, फिरला, बोलला, हसला आणि परत गेलाही. आणि वाघाचा झाला पोपट. पण पोपट कसा? आणि वाघाचाच का आणि कसा? वाघ चूक होता का? यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला ठाऊक नव्हतं. का बरं? आणि अचानक त्याला आठवलं की तिने त्याच्या मेंदूला असले प्रश्न पडण्याची संधीच दिली नव्हती. ती सकाळी सकाळी आली तीच ओरडत की वाघाचा पोपट, वाघ थंडावला असं काहीसं. आणि त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने ते एकलंही. म्हणजे ऐकावंचं लागलं. ती खोटं थोडंच बोलणार होती? सगळे प्रश्न आतल्या आत विरून गेले. कळलंही नाही त्याला. पण आता तो ते पुन्हा आठवत होता. विचार करत होता.
आत्मपरीक्षण करताना पुन्हा पुन्हा स्वतःला बजावत होता की वाघाचा आणि त्याचा काहीही संबंध नाही, वाघाबद्दल त्याला काहीही आत्मीयता नाही. पण तरीही त्याला वाघाचं म्हणणं योग्य वाटू लागलं. हे असं का होतंय म्हणून त्याची चिडचिड होत होती म्हणून त्याने तिच्या एका प्रगत मैत्रिणीची मदत घेतली. ही मैत्रीण खोटं बोलणार नव्हती. अगदी मनात आलं तरी खोटं बोलू शकणार नव्हती. तर या नवीन मैत्रिणीने त्याला राजपुत्र काय म्हणाला ते वाक्य न् वाक्य सांगितलं.
हिची अजून एक छान गोष्ट म्हणजे ती तात्पर्य बित्पर्य काही सांगणार नव्हती. ती फक्त गोष्ट सांगणार तात्पर्य त्याचं त्याने काढायचं. हा प्रकार त्याला जाम आवडला होता. थोडा मोकळा श्वास घेतल्याचा आनंद मिळत होता. आणि तिने हे आधी सांगत असताना हे काहीच आपल्या लक्षात कसं आलं नाही म्हणून तो स्वत:वरच मनोमन हिरमुसला. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की नवीन मैत्रिणीच्या मदतीने हे असं वाक्य न् वाक्य ऐकायला मिळणे वगैरे असे प्रकार जुन्या 'ती'च्या बाबतीत कधीच होत नसत. ती म्हणेल ते प्रमाणवाक्य असे. आणि बरेचदा ते बोलणारा 'मी असं बोललोच नव्हतो' असं म्हणून सुटका करून घेत असे. पण नवीन मैत्रिणीच्या बाबतीत ही शक्यताच नव्हती.  त्यामुळे ते वाक्य न् वाक्य पुन्हा पुन्हा ऐकल्यावर त्याला वाघाची डरकाळी नक्कीच चुकीची नव्हती हे कधी नव्हे ते पहिल्यांदा जाणवलं. आणि डरकाळीचं कारण जर चुकीचं नव्हतं तर मग वाघाचे बाकीचे साथीदार, मित्र, राजधानीतले सवंगडी वाघाबरोबर का आले नाहीत हा प्रश्न त्याला राहून राहून टोचत राहिला. आणि सवंगडीच जर आले नाहीत तर आपल्यासारख्या वाघाशी दुरान्वयेही संबंध नसणा-याला वाघाबद्दल काहीच वाटू नये आणि तिने सांगितलं की वाघाचा पोपट झाला की आपला तिच्यावर विश्वास बसावा यात त्याला वावगं वाटलं नाही. पण तो चुकला होता हे नक्की. वाघ बरोबर होता हे त्याला पहिल्यांदाच जाणवलं. आता त्याचं मन वाघाच्या नजरेने विचार करू लागलं. तिने पुढे हे सुद्धा विचारलं होतं की नेहमी डरकाळ्या फोडणारा वाघ शांततेने काळे पंजे वगैरे दाखवून हळू हळू का गुरगुरतोय. वाघ संपला आहे असं तात्पर्य काढून आणि त्याला तसं वाटायला आणि म्हणायला लावून मगच ती शांत बसली. आता आत्मपरीक्षणाच्या नादात त्याला आठवलं की पूर्वी हिनेच डरकाळ्या फोडणा-या वाघाला जंगली, रानटी, क्रूर ठरवून त्याच्या डरकाळी या प्रमुख अस्त्रालाच खलनायक ठरवलं होतं. तेव्हा तिच्यामुळे त्याला हे सगळे वाघ म्हणजे जंगली, रानटी, रक्तपिपासू वाटले होते. मात्र आता राजपुत्राच्या वेळी किंवा मागेही इतर १-२ छोट्या प्रसंगात वाघाने डरकाळ्यांऐवजी काळ्या पंजांनी लढायचं ठरवल्यावर हिनेच वाघाला भित्री भागुबाई ठरवून 'वाघ संपला' अशी आरोळी ठोकून दिली.
त्याचे विचार चालूच होते.  मनावरचं दडपण कमी झाल्याने विचारांना चालना मिळत होती, विचारांचा वेग वाढत होता. अचानक त्याचं मन सोंगाड्याच्या विधानांवर स्थिरावलं. याहीवेळी त्याने नवीन मैत्रिणीचा आधार घेत शहानिशा करायचं ठरवलं. जुन्या 'ती' च्या बोलण्यावर तो आता आंधळेपणाने विश्वास ठेवणार नव्हता हे नक्की. सोंगाड्याचं विधान बारकाईने ऐकल्यावर तर त्याच्या आश्चर्याला पारावरच उरला नाही. जुन्या 'ती' ने त्याला काहीच नीट कळू दिलं नव्हतं आणि ती नेहमी असंच करत असे याबद्दल त्याची पुन्हा एकदा खात्री पटली. सोंगाड्याने तर पैसे कमावण्याच्या, स्वत:ची प्रतिमा जपण्याच्या नादात 'त्या' च्या सारखे अनेक जण ज्या शेजा-याला शत्रू मानतात, ज्या शेजा-याने असंख्य वेळा कुरापती काढून 'त्या'ला, त्याच्या राजाला, प्रधानाला, सेनापतीला सळो की पळो करून सोडलं होतं त्या.. हो त्याच.. शेजा-याला सोंगाड्या आदर्श शेजा-याची उपमा देत होता. शेजारी कसा बरोबर आहे हे सांगत असतानाच सोंगाड्या स्वत: कसा बरोबर आहे हेही तो पटवून देत होता. त्याचं मनच विटलं हे पाहून. 'ती'च्या बद्दलचा संताप अजून उसळून आला कारण याहीवेळी त्याला उमगलं होतं की वाघ चुकला नव्हता. याहीवेळी राजा तीच खेळी खेळला होता. हजारो वाघ पिंज-यात आणि उरलेल्यांना ठोकण्यासाठी हजारो शिकारी. हजारो शिका-यांच्या पहा-यात राजा, प्रधान, घर-प्रधान, उप-प्रधान सगळे सगळे जण सोंगाड्याचा खेळ बघून गेले. त्याला आठवलं याही वेळी ती म्हणाली होती वाघ संपला. एका छोट्या मुद्द्यावरून एवढा तमाशा करायची काय गरज होती वाघाला आणि त्याने यावेळीही नंदीबैलासारखी मान डोलावली होती. त्याला तिचा आणि त्यापेक्षाही जास्त स्वत:चा राग येत होता.
तेव्हाच वाघाने अजून एक डरकाळी फोडली होती की त्या दूरदेशात 'त्या'च्या सारख्यांना जिवानिशी मारलं जातंय, हल्ले होतायत आणि तेही जवळपास दररोज, सतत. वाघाचं म्हणणं होतं कि त्या दूरदेशातल्या खेळीयांना येउच द्यायचं नाही इथे. झालं. लगेच तिने येऊन त्याच्यासमोर आक्रोश केला, थयथयाट केला की खेळीया/सोंगाड्या आणि राजा हे एकमेकांपासून वेगवेगळे असले पाहिजेत. पुन्हा एकदा नंदिबैलाने बुगुबुगु केलं होतं. पण वाघाचा मुद्दा सरळ होता. दूरदेशात मरणा-या 'त्या'च्या सारख्या लोकांसाठी ना तिकडचा राजा काही करतोय ना आपला राजा आणि त्यामुळे ते खेळीयांना इथे येण्यापासून रोखणे किंवा निदान तशी गर्जना तरी करणे या गोष्टीने दोन्ही राजे त्या मुद्द्याकडे डोळे उघडून पाहतील असं वाघाचा हिशोब होता. कारण सोप्पं होतं. आपले खेळीये आणि त्यांचे खेळीये एकत्र येऊन खेळणं हे त्याच्या गल्लीतल्या पोराटोरांनी एकत्र येऊन विटीदांडू खेळण्यापैकी नव्हतं. इथे करोडो मोहरा लागत होत्या लिलावावर. त्या खेळीया गुलामांवर. आणि दुरदेशातले हल्ले रोखण्यासंदर्भात त्या राजाचे डोळे उघडण्यासाठी या करोडो मोहरांच्या  गोणीचे तोंडच आवळून ठेवणं हा एकमेव उपाय आहे हे वाघाला नक्की माहित होतं. हा उपाय चांगला लागूही पडत होता इतका की अगदी आपल्या खेळीयांचा आणि शेतक-यांचा राजा येऊन पाया पडला वाघाच्या. त्या पाया पाडण्यामागे शेतक-यांच्या राजाचे इतरही अनेक हेतू असले तरी त्यामुळे वाघाची सरशी होणं काही कमी होत नव्हतं. हळू हळू त्यालाही हे पटू लागलं होतं की गोणीचं तोंड आवळणं हा एकमेव आणि सर्वोत्कृष्ठ पर्याय होता.  हाच विचार करताना त्याला मागे झालेलं आपल्या शेजा-यांबद्दलचं तिचं बोलणं, त्याच्या पांढ-या सद-याच्या गळ्याच्या आणि  बुद्धी हाच जीव मानणा-या इतर मित्रांचं बोलणं आठवलं. अगदी बर्फाच्छादित डोंगरावरून दगाबाजी  होईपर्यंत या सगळ्या आंधळ्या, मुक्या, बहि-यांचं (सोंग आणलेल्यांचं) हेच मत होतं की शेजा-याला व्यापार उदीम, दळणवळण इ इ मदत करून त्याची गरिबी दूर केली की आपण सुरक्षित होऊ. आणि या सगळ्या मतप्रदर्शनात, मुद्दे समजावण्यात  ती अर्थातच सगळ्यांच्या पुढे होती. संताप संताप होत होता त्याचा की इतके दिवस ती कशी शिताफीने हातोहात फसवत राहिली आपल्याला आणि आपल्याला कधी कळलंही नाही. आणि मग या अशा आत्मपरीक्षणाच्या नादात त्याच्या विचारांची साखळी पुढे पुढे सरकत राहिली. इंजिनाच्या मालकाविषयी असो, खाकी अर्ध-विजारी, काळी टोपीवाल्यांविषयी असो, रेल्वेचे डबे पेटवून माणसं जिंवत जाळणा-यांविषयी असो किंवा मोठ्ठ्या बाईंच्या त्यागाविषयी असो वेळोवेळी आणि पद्धतशीरपणे  ती आपल्याला कशी फसवत राहिली हे त्याला आठवत गेलं आणि अधिकाधिक बेचैन करत गेलं.
पण त्याने आता ठरवलंय तिच्या एकाही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवायचा नाही, तिने सांगितलेल्या (ओरडून असो की पुटपुटत) प्रत्येक गोष्टीची शहानिशा करायची, जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा थोडक्यात जास्तीत जास्त वेळी नवीन मैत्रिणीची मदत घ्यायची किंवा नवीन मैत्रिणीच्या इतर मित्र मैत्रिणींची मदत घ्यायची. पण त्यामुळे त्याला आता आधार मिळाल्यासारखं वाटतंय, हलकंहलकं वाटतंय, तिचे हरत-हेने दिशाभूल करायचे प्रयत्न अजूनही सतत चालू असतातच. चुकून कधी कधी तो भूलातोही. पण तात्पुरताच. वेळीच डोळे उघडतो, चोळतो आणि क्षितिजाकडे अजून आत्मविश्वासाने चालू लागतो.
----------
यातला 'तो' म्हणजे सामान्य माणूस (किंवा अगदी मी स्वत:) आणि 'ती' म्हणजे फक्त मटा नाही तर सगळी प्रसार माध्यमं उर्फ मिडीया हे असलं काहीतरी तात्पर्यात सांगणं म्हणजे अगदीच किरकोळपण झाला हे माहित्ये मला. पण तरीही..... पुण्याचा बॉम्बस्फोट इतका ताजा असताना ही मागची मढी उकरून काढून त्याचा कीस पाडणं खरं तर अप्रस्तुत आहे. पण झालं काय की पुणे बॉम्बस्फोटानंतर लगेच (अक्षरश: काही तासांत) नेटवर आलेल्या बातमीत महाराष्ट्र सरकारने १०० दिवस 'यशस्वीरित्या' पूर्ण केल्याबद्दलची बातमी सौरभ यांच्या ब्लॉगवर वाचल्यावर माझा क्षणभर विश्वासच बसेना त्या बातमीवर. अरे वेळ काय आणि तुम्ही बातमी काय देता आणि तेही मटासारख्या दैनिकात? मी गेली कित्येक वर्षं मटाचा नियमित वाचक आणि भारतकुमार राउत यांच्या अग्रलेखांचा पंखा आहे. त्या मटाने ही असली बातमी इतक्या चुकीच्या वेळी (हा मुख्य मुद्दा आहे) देणं मला सहनच होत नव्हतं. तसंही प्रसार माध्यमांचा बेजवाबदारपणा आपण पावलोपावली अनुभवत असतो. पण यावेळी अजून एक म्हणजे 'शिवसेनेचा पोपट', 'वाघ थंडावला' , 'राहुलने दिली हातावर तुरी' या असल्या पांचट हेडलाईन्स वाचून मला खूप वाईट वाटलं. आणि त्यापेक्षाही वाईट वाटलं ते हे जाणवून की मिडीया आपल्याला तिच्या दृष्टीकोनातून विचार करायला कशी भाग पडते आहे, आपल्या विचारांना, बुद्धीला, गृहीतकांना (त्यांना) हव्या त्या दिशेने कसं वळवते आहे हे बघून. मी शिवसैनिक नाही, शिवसेनेचा खंदा, कट्टर अशा कुठल्याही कॅटेगरीला चाहता/समर्थक/कार्यकर्ता नाही. पूर्वी थोडा भाजपकडे ओढा आणि हल्ली राजच्या शैली, भाषणांमुळे मनसेबद्दल आपुलकी असं फार तर म्हणु शकतो. पण इतर वेळी सगळ्या मराठी माणसांनी पक्षभेद विसरून एकत्र या असं आवाहन करणारा राज शिवसेनेच्या त्याच मुद्यांना निव्वळ वेगळा पक्ष म्हणून साथ देत नाही हे बघून वाईट वाटलं. यावेळी बाळासाहेब जे करत होते ते योग्यच होतं असं मला मनोमन वाटतं. आणि मुदाम त्यासाठीच राहुल आणि शाहरुखचे मूळ विडीयोज इथे चिकटवले आहेत. त्यांनी जी मुक्ताफळं उधळली आहेत ती जर इतर कुणी उधळली असती तर राष्ट्रीय मिडीयाने त्यांचा ऑलमोस्ट जीव घेतला असता. पण ते राहुल आणि शाहरुख असल्याने त्यांच्या देशद्रोही विधानांनाही डोक्यावर घेऊन नाचणारी ही मिडीया. शिवसेनेने राडा केला तर 'गुंडांचा पक्ष' म्हणून हिणवणारी आणि विधायक मार्गाने काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला तर 'कुठे गेली शिवसेनेची आक्रमकता? शिवसेना संपली' अशी हाळी देणारी ही दुतोंडी मिडीया. आणि याला कुठल्याही प्रकारची मिडीया अपवाद नाही. प्रिंट, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या प्रकारची प्रसार माध्यमं पण डोळ्यावरल्या झापडांची लांबी, रुंदी, उंची अगदी सारखी. विचारातला कोतेपणा, उथळपणा अगदी एकाला झाकावं आणि दुस-याला काढावं एवढा हुबेहूब. आणि नेहमीप्रमाणेच आर के लक्ष्मणांच्या कॉमनमॅनची (आपलीच हो) फसवणूक. तर अशी वारंवार फसवणूक करणारी 'ती' आणि या फसवणुकीतून, गुदमरण्यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणारा तो. अशी 'तो' आणि 'ती' ची ही (प्रेम) कहाणी कधीच पाचा उत्तरी संपूर्ण होणार नाही !!

-- सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.

40 comments:

 1. फारच छान.
  मिडियाचे तमाशे, थयथयाट, नाही त्या गोष्टींना दिलेली अमाप प्रसिध्दी या गोष्टी उबग आणतात खऱ्या. त्यादिवशीचे ’पोपट, हातावर तुरी’ इ.इ. मथळे वाचून मी ही सर्द झाले होते.
  (बाकी, अम्रीकेत राहूनही तू देशी घडामोडी चांगल्याच फॉलो करतोस असं दिसतंय. हे खरंच कौतुकास्पद आहे.)

  अजून एक -
  ’पण इतर वेळी सगळ्या मराठी माणसांनी पक्षभेद विसरून एकत्र या असं आवाहन करणारा राज शिवसेनेच्या त्याच मुद्यांना निव्वळ वेगळा पक्ष साथ देत नाही हे बघून वाईट वाटलं.’ - या वाक्यात ’निव्वळ वेगळा पक्ष’ या शब्दांनंतर ’म्हणून’ हा शब्द हवा काय?

  ReplyDelete
 2. आभार प्रीति.. हो देशातले पेपर वाचल्याशिवाय दिवस उजाडत नाही माझा :-) .. हो आणि तिथे 'म्हणून' हा शब्द हवाय. चूक दुरुस्त केली आहे. आभार !!

  ReplyDelete
 3. मस्त..गुड मॉर्निंग :)

  ReplyDelete
 4. आभार सुहास. गुड इव्हिनिंग :-)

  ReplyDelete
 5. भारी लिहिलंस...बाकी तुझ्यासारखीच आमची गत...ऑनलाइन सगळं अपडेटेड ठेवायचं पण म.टा. तू म्हणतोस त्याप्रमाणे बराच उतरलाय आजकाल...ऑनलाइनला डावी बाजु अगदी टुकार केलीय...उत्तान फ़ोटोच्या लिंक्स का द्याव्या लागतात याचा बरेच दिवस विचार करतेय...तू कदाचित त्यावरही चांगलं लिहू शकशील....

  ReplyDelete
 6. हो ग.. मटा म्हणजे अगदी गल्लाभरू पेपर झालाय हल्ली.. त्यामुळे मी फक्त राऊतांचा अग्रलेख वाचतो आणि सरळ बंद करतो खिडकी. आणि डाव्या बाजूबद्दल अगदी सहमत आणि त्या लिंक्सची टायटल्स पण एकसे एक भयानक असतात. मस्त विषय दिलास. बघतो काही जमतंय का :-)

  ReplyDelete
 7. मग येऊ देत पोस्ट मटावर..मटाच नाही रे प्रत्येक वृत्तपत्राची अशीच हालत आहे.. :)

  ReplyDelete
 8. ओके. चालू करतो डोक्यात :-).. बघुया कशी जमेल ते..

  ReplyDelete
 9. Kharay... Te aapalyala tyanchya drushtine vichar karayalaa bhaag paadataat.
  Sattewar koni yayache he Media tharavate, lok naahi. hi kasli lokshahi???
  Patrkaarane nipakshpaati asave naa, mag Yaana THAAM MAT kase kaay aste buva???
  Kharetar agdi atta atta paryant print media war barach wishwaas aani prem hote mala...pan tyanihi taaltantr sodlaay aajkaal....

  ReplyDelete
 10. मस्तच लिहल आहे. आणि अपर्णा म्हणाली त्याप्रमाणे ऑनलाइनला डाव्या बाजूला उत्तान फ़ोटो लावल्यामुळे म.टा. वाममार्गाला लागला असे खेदाने म्हणावे लागते.

  ReplyDelete
 11. Mumbaicha Sandhyanand aahe MaTaa.Farak evdhach ki Sakali milato. Dok na waparata wachayachaa..Ugich roj dokyalaa traas karun ghyayacha nahi.

  ReplyDelete
 12. Times chya kuthalyhi paper chi is awastha aahe. Even Loksatta chi suddha hich awashta aahe…

  Jeva Jeva haatshi realed kahi hote kumar ketakar (K2) la harshvaayu hoto…. Kiti aani kuthale shabd vaapryache ase tyala hote. Pan Loksattamahil Lekhanchi quality ajunhi Marathi Paper madhey Top most aahe.
  Mag te weekend edition aasot kinwa daily columns aasot.

  K2 personally mala aavadat nahi, but he has strong communist thinking power, writes spectacualary, only when he becomes pitty when there is a matter of congress.

  Baki tuza lekh chaan jamala aahe.. Ekadya newpaper madhey daily column saathig try kar. Tuzya likhanachi barchshi shailie newpaer chya column la fit aahe.

  Probably u can start column like Tanbi Durai.. :))

  Mrunal

  ReplyDelete
 13. Heramb,

  Bhannat lihila ahe!
  -Niranjan

  ReplyDelete
 14. हिंदी मधे एक शब्द आहे ’भडास’. त्याचा मराठीत अर्थ असा आहे. राग, चीड, तिटकारा इ. इ. अनेक लोकांना माद्यमांबद्दल अशीच भडास निर्माण होते. ती भडास काढण्यासाठी एक ब्लॉग आहे. त्याचे नाव आहे भडास @blogspot.com
  मराठी मधे असा एखादा ब्लॉग निघाला तर तो फारच पाप्युलर होईल.

  ReplyDelete
 15. छान लिहिलंय. अर्थात नवीन मैत्रिणीवर तरी कितपत विश्वास ठेवायचा, हा प्रश्नच आहे. बाकी एकदम मस्त.

  ReplyDelete
 16. मला तर वाटतं की प्रसारमाध्यमं तर राज्यकर्त्यांच्या हातातलं माकड झाली आहेत. मदारी डुगडुगी वाजवतात तसं हे माकड उड्या मारतं. जर बिपाशा बासूने दरवाजा लावून कोंडून घेतल्याची बातमी हे लोक लोणच्यासारखी पुरवून पुरवून दाखवतात तर बाकी सगळ्याचा हे तमाशाच करणार ना!

  ReplyDelete
 17. बरोबर आहे मैथिली, यांचं 'ठाम' मत म्हणजे यांना पैसे पुरवणा-या कारखानदाराचं जे मत असेल ते. प्रिंट मिडियाच्या या घसरणीत मटा सारखा पेपर पण सामील व्हायला लागलाय हे दु:खद आहे.

  ReplyDelete
 18. हा हा सिद्धार्थ. डाव्या बाजूंच्या फोटोंमुळे मटा वाममार्गाला लागलाय.. एकदम सही...

  ReplyDelete
 19. खरंय निशिकांत. पण पूर्वी या असल्या खटपटी, लटपटी न करताही मटा 'पत्र नव्हे मित्र' होता. त्याच लोकांनी हे असं वागावं म्हणजे कहर झाला.

  ReplyDelete
 20. मृणाल, अगदी मनातलं बोललास. मलाही KK आणि LK बद्दल जराही आदर नाही आणि त्याचं कारण एकच की एवढी अफाट बुद्धिमत्ता, व्यासंग असूनही कॉंग्रेस, मॅडम, युवराजांचा विषय निघाला की यांच्या लाळघोटेपणाची परिसीमा होते. मटाच्या सध्याच्या लेखांचा दर्जा पाहता LK चे लेख नक्कीच उजवे आहेत असं म्हणावं लागतं.

  ReplyDelete
 21. आभार निरंजन. असेच येत रहा..

  ReplyDelete
 22. प्रकाशजी, आत्ताच भडासला भेट देऊन आलो. छान वाटतोय ब्लॉग.खरंच आपणही marathibhadas.blogspot.com सुरु करायला हवा. सुपरहिट होईल.

  ReplyDelete
 23. म्रुणालच्या मताशी सहमत, एकदम तंबी स्टाईल....

  ReplyDelete
 24. हो देविदास. तेही आहेच म्हणा. पण त्यातल्या त्यात उजवं डावं करायचंच झालं तर नवीन मैत्रिणीची विश्वासार्हता कणभर जास्त आहे असं म्हणू शकतो. अर्थात हेही किती दिवस म्हणू शकतो प्रश्नच आहे.

  ReplyDelete
 25. कांचन अगदी योग्य उपमा आहे. आणि हे बिपाशा बासूच्या कोंडण्याचं प्रकरण तर मला माहितच नव्हतं. मिडियामैय्या की जय !!

  ReplyDelete
 26. आभार आनंद. तंबी स्टाईल.. :-) .. मृणाल तुझेही आभार रे. मगाशी मानायचे राहिले.

  ReplyDelete
 27. अपर्णा व कांचनशी सहमत. हेरंब, तू एकदम खुमासदार शैलीत यांची चांगलीच वाजवली आहेस.शब्द न शब्द माझ्याच मनातला. खरेच आजकाल मटा आणि सकाळ मनातून उतरलेत. खरे तर एकाला झाकावे आणि दुस~याला काढावे.अगदी त्यातून उजवे डावेही करता येत नाही इतके भिकार झालेत. आणि राजकारणी मिडियाला हाताशी धरून सामान्य लोकांचा पध्दतशीर गेम करत आहेत. कोळसे आहेत सारेच. उगाळतात स्वत:लाच आणि सगळेच काळे करतात, झालं. महाराष्ट्र सरकारने १०० दिवस पूर्ण केले ही बातमी मोठीच वाटणारच की रे त्यांना.... ते मनोमन जाणून आहेत ना स्वत:ची लायकी. मग तिकडे बॉम्ब फुटू दे का हत्याकांड होऊ देत. निर्लज्ज.

  ReplyDelete
 28. भाग्यश्री ताई, या लोकांच्या सगळ्या ढिसाळ बातम्या आणि पोरकट हेडलाईन्स बघून कधीपासून वाजवायची इच्छा होतीच. त्या '१०० दिवसांच्या' बातमीने अखेरचा घाव घातला. ही कळसूत्री बाहुली बघून 'निर्भीड, निष्पक्ष पत्रकारिता' असं खरंच काही असतं का असं प्रश्न पडायला लागलाय. बहुतेक मुझियममध्ये असेल भुसा भरून ठेवलेली !!

  ReplyDelete
 29. वाह वाह... बहोत खूब... काय मस्त लिहिलयस..
  काय वाजवलीस एका एकाची..
  जीकलस मित्रा.. :)

  ReplyDelete
 30. आभार अमित. अरे या राजकारण्यांच्या ताटाखालच्या मांजरांची कधीपासून वाजवायचीच होती !!

  ReplyDelete
 31. @ कांचन: बिपाशा बासू च काय घेऊन बसल्यात म्याडम.. यांना breaking news म्हणून काहीही चालत..
  काही ब्रेकिंग न्यूज :
  १. कमिशनर का कुत्ता खोया
  २. राहुल बाबा ने खाई दाल रोटी
  आणि कुठलस chanel आहे माहित नाहीं.. ते तर साले सतत You Tube वरचे videos सर्रास breaking news म्हणून दाखवत असतात.. जसं ह्यांच्या "खोजी" पत्रकारानेच शोधून काढलय सगळ..
  इकडे हे न्यूज वाले TV बघू देत नाहीं, तिकडे ती एकता (केकता ) कपूर.. त्यात बायको पण सामील तिला .. सगळे मिळून डोक शिनावतात
  ह्यांच्या सगळ्यांच्या नानाची टांग (बायकोच्या नानाची सोडून) ..

  ReplyDelete
 32. हा हा हा 'कमिशनर का कुत्ता' .. द ग्रेट इंडिया टीव्ही..

  ReplyDelete
 33. अतिशय उत्तम आणि खणखणीत लेख
  मेडिया मग ती कोणत्याही पद्धतीची असू द्या आजकाल अशीच वागत आहे जसे तुम्ही वर्णन केले आहे
  अगदी मनातील गोष्टी इथे दिल्याबद्दल शतशः आभार
  तुम्ही समर्थक असा व नसा पण खर काय आणि खोट काय याची शहनिशा करून मत बनवावं या दृष्टीचा मीही आहे
  असो लेख आवडला असेच लिहित रहा
  जीवनमूल्य

  ReplyDelete
 34. khupacha chan ..manala ekdum bhidanare lihale ahes..pan vishwas thev ya media cha kahra rang lok olkhu lagali ahet 2012 paryant media chi vishwasrta purna pane rasatalala janar ahe tichaycha karmane...

  ReplyDelete
 35. आभार विक्रम. मी अमुक अमुक पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून पक्ष म्हणेल ते सगळं खरं असं म्हणून आपली बुद्धी पक्षाच्या दावणीला बांधण्याच्या प्रवृत्तीचा मला तिटकारा आहे. आणि मिडीया तर काय फक्त भांडवलदारांच्या (म्हणजे थोडक्यात राजकारण्यांच्या) मर्जीवरच तर चालते. निष्पक्ष पत्रकारिता (काही अपवाद वगळता) दुर्मिळ झाली आहे. असेच येत रहा..

  ReplyDelete
 36. आभार मंगेश.. तू म्हणतोयस तसं झालं तर उत्तमच. पण मला तरी कठीण वाटतंय. उलट हे मिडीयावाले अजून अजून लोकांना फसवत राहतील. आणि आपल्या इथे (सगळीकडेच) गंडणा-यांची काय कमतरता आहे..

  ReplyDelete
 37. हे मिडीया वाले इथून तिथून सगळे एक सारखे आहेत!!! मस्त लिहलय!!!

  ReplyDelete
 38. अगदी छान शैलीत सर्वांच्याच मनात असलेल्या हया विषयाच सादरीकरण केलत...हे सगळेच कोणतीही बातमी त्यांना जशी हवी तशी आणी तितकीच आपल्यासमोर मांडतात.कित्येक वर्षापासुन आमच्याकडॆ मटा यायचा पण ५-६ महिन्याआधीच आम्ही घरातल्या सगळ्यांनी बहुमताने तो बदलला.लोकसत्ता बाकी सध्या तरी चांगला वाटतो आहे.

  ReplyDelete
 39. धन्यवाद देवेंद्र. हो ना सगळेच जण वैतागले आहेत या फालतूपणाला पण या प्रमां ना कधी अक्कल येणार देव जाणे. नक्कीच हल्ली लोकसत्ता बरा वाटतो. त्यांच्या काही काही लेखमाला (उदा मूषकांची मुंबई) भन्नाट असतात.

  ReplyDelete