Friday, March 12, 2010

हरवले ते ... !!!

त्या विश्वसुंदर्‍यांच्या स्पर्धांमध्ये विचारतात ना की "बाई ग, इतिहासातली कोणती घटना तुला बदलायला आवडेल" तसल्या प्रश्नाच्या धर्तीवर जर मला कोणी ('विश्व-सुंदर'स्पर्धेत भाग घ्यायाला न लावता) विचारलं की "बाबा रे, तुला इतिहासात कुठली घटना अ‍ॅड करायला आवडेल" तर मी मध्यरातीच्या गाढ झोपेतून उठूनही सांगेन की "या शास्त्रज्ञांनी जे हे गाडी, टीव्ही, आय-पॉड, लॅपटॉप, मिक्सर, व्हॅक्युम क्लिनर असले जे (फुटकळ) शोध लावले आहेत ना त्यांच्या जोडीला (किंवा प्रसंगी त्यांच्या ऐवजी) अशा एखाद्या मशीनचा शोध लावूदेत की जे हरवलेल्या, नेहमी हरवणार्‍या, 'आत्ता तर इथे होता आता गेला कुठे' अशा विचारात आपल्याला टाकून गायब होणार्‍या वस्तू क्षणार्धात आपल्या पुढ्यात हजर करून ठेवेल. किंवा हे असलं मशीन तयार करणं त्यांना फार अवघड आणि आव्हानात्मक वाटत असेल तर गेला बाजार असं काहीतरी केलं पाहिजे की प्रत्येक वस्तूला अशी काहीतरी सोय असेल की जिच्यामुळे आपण जसा हरवलेला (पक्षि कुठे ठेवलाय ते आठवत नसल्याने सापडत नसलेला) मोबाईल शोधण्यासाठी दुसर्‍या मोबाईल वरून कॉल करतो तसा हरवलेल्या (मगासचा मोबाईलवाला कंस विसरू नका) वस्तूलाही मिस कॉल किंवा रिंग देता आली पाहिजे. हे असलं काही दुकानात मिळायला लागलं ना तर काय धम्माल येईल या नुसत्या विचारानेच माझ्या अंगावर गोड शिरशिरी आली आहे. आणि हे असले काही प्रसंग घडले ना की मग तर मला माझ्या या लाडक्या, हव्याश्या वाटणार्‍या पण अस्तित्वात नसणार्‍या यंत्राची उणीव अतीवच तीव्रतेने जाणवते.

आता हे रिमोटच बघा. मला वाटतं रिमोट या वस्तूचा टीव्हीला (आणि त्यामुळे आपल्यालाही) कंट्रोल करण्यापेक्षा हरवण्यासाठीच जन्म झाला असावा. (सीडीज, पुस्तकं यांचा जन्म मित्रांना ऐकायला/वाचायला
दिल्यावर विसरून जाण्यासाठी झाला असावा या (माझ्याच असल्याने) माझ्या अत्यंत आवडत्या वाक्यावरून आधीच्या वाक्याचा जन्म झालेला आहे.) एवढे मोठ्ठाले टीव्ही बनवतात आणि त्यासाठी रिमोट हा एवढासा? अर्थात समप्रमाणात बनवा असलं काही म्हणत नाहीये मी. समप्रमाणात बनवायला तो काय गोडाचा शिरा आहे की घातली साखर आणि रवा समप्रमाणात. पण निदान उघड्या डोळ्यांना दिसेल इतपत तरी? "At least visible to bare eyes?"... दिवसांत निदान २०-२५ वेळा तरी टीव्ही चालू-बंद, आवाज कमी-जास्त करणे यासाठी रिमोट लागत असेल तर त्यातल्या निम्म्या वेळा आम्ही स्वतः उठून टीव्ही चालू-बंद करतो, आवाज लहान-मोठा करतो आणि उरलेल्या निम्म्या वेळा उठायचा आळस करतो. गणित चुकलं असलं तरी उरलेल्या १-२ वेळा रिमोट दृष्टीक्षेपात असल्याने वापरला जातो म्हणा पण ते प्रमाण एवढं नगण्य आहे की मी उल्लेख करायलाही विसरून जाणार होतो. आणि अर्थात यात मी चॅनल सर्फिंग गृहीत धरलेलं नाही. कारण रिमोट नेहमीच हरवला असल्याने चॅनल सर्फिंगची लक्जरी आम्हाला परवडत नाही ;). त्यामुळे टीव्ही बघताना आम्ही रिमोट-पूर्व काळातल्या कृष्ण-धवल युगात वावरत असतो.
आता त्याऐवजी जर रिमोटला मिस कॉल देणारं असलं काही यंत्र अस्तित्वात असतं तर कसली सोय झाली असती. अहाहाहा... हरवला रिमोट, द्या मिस कॉल... हरवला रिमोट, द्या मिस कॉल.. एकदम जबर्‍या.. भलेही त्याच्यामुळे मोबाईलची किंवा त्या मिस कॉल देण्याच्या यंत्राची बॅटरी संपली तरी काही हरकत नाही. बॅटरी पुन्हा पुन्हा चार्ज करू पण रिमोट हरवू देणार नाही. जय हो.

तीच गोष्ट प्रवासाला गेल्यावर हरवणार्‍या वस्तूंची. कधी ऑफिसच्या कामासाठी कुठे बाहेरगावी(देशी) गेल्यावर तर मला माझी बॅग म्हणजे आपल्या अंतरंगात (माझ्याच) अनंत वस्तू लपवून ठेवून गनिमी काव्याने लढत लढत माझा पुरता पराभव करणारी चतुरंग सेनाच वाटते. मी पहिल्या वेळी जेव्हा एकटा परदेशी गेलो होतो तेव्हा गॉगल, कंगवा, कॅप अशा विशेष आवश्यक नाहीत असं वाटणार्‍या पण त्या त्या वेळी आपलं महत्व जाणवून देणार्‍या किंवा अगदी टुथपेस्ट, ब्रश, सॉक्स सारख्या अतिमहत्वाच्या वस्तूंनी पुरता चकवा दिलेला आहे. अगदी एवढा की एकदा तर माझ्यावर चक्क बायकोला भारतात कॉल करून विचारायची वेळ आली होती  "अग ती माझ्या जॅकेटची कॅप सापडत नाहीये. कुठे ठेवली असेल माहित्ये का?" आणि तिने अगदी न गडबडता, न डगमगता, न गोंधळता (आणि हसणं न थांबवता) "मोठ्ठ्या हिरव्या बॅगेच्या डाव्या कप्प्याच्या आतल्या दुसर्‍या चेनमध्ये जो टॉवेल आहे ना, त्याच्या मागेच असेल" असं उत्तर दिलं होतं. आणि ते इतकं म्हणजे इतकं अचूक निघालं की क्षणभर माझी हिरवी बॅग एक चटपट भारत दौरा करून आली की माझी सुविद्य पत्नी मनोवेगाच्या वारूवर स्वार होऊन अमेरिकेतल्या हिरव्या बॅगेच्या डाव्या कप्प्याच्या आतल्या दुसर्‍या चेनमध्ये डोकावून गेली हे मला कळेना. "तुला पांढरी जादू (काळी म्हणजे वाईट) येते की काय किंवा असंभवातल्या सुलेखासारखी आत्म्यांची अदलाबदल/लपाछपी वगैरे खेळता येते की काय?" असले प्रश्न विचारायचा अनिवार मोह मला दाबून ठेवावा लागला होता. आणि त्याहीपुढे जाऊन पुढच्या वेळी परदेश दौरा करताना बॅग भरून झाल्यावर बायकोने बॅगांच्या पुढच्या चेन मध्ये चिठ्ठ्या टाकून ठेवल्या आणि त्या चिठ्ठ्यांवर लिहून ठेवलं की त्या बॅगमध्ये काय काय आहे ते. म्हणजे पुन्हा उगाच "पेन कुठाय, घड्याळ कुठाय, निळा टी-शर्ट कुठाय?" असल्या फडतूस प्रश्नांना आय एस डी कॉलवरून उत्तरं द्यायला नकोत. आता त्याऐवजी जर माझं ते प्रिय यंत्र माझ्याबरोबर असतं तर काय बिशाद होती त्या चतुरंग सेनेची (आणि माझ्या बायकोची) माझा पाडाव करण्याची. मला वाटतं सकाळी उठल्यापासून मी त्या यंत्राची बटनंच दाबत बसलो असतो. आणि तेही अगदी स्पेशल रिंगटोन सेट करून. म्हणजे टूथब्रश/पेस्ट शोधण्याचं बटन दाबल्यावर ब्रश आणि पेस्ट "वज्रदंती वज्रदंती, व्हीको वज्रदंती" असे बोंबलायला लागले असते किंवा शेव्हिंग क्रीम शोधायचं बटन दाबल्यावर "The Best the man can get" असं कोकलत जिथे असेल तिथून टुणकन उडी मारून जिलेट समोर आलं असतं. ** .. पण नाही ना... ते स्वप्नवत यंत्र कोणी शोधलं नाही नी माझे पोपट व्हायचे काही थांबले नाहीत.

(** लेखाचा एकूण विषय, व्याप्ती आणि दर्जा पाहता रोजच्या वापरातल्या प्रत्येक वस्तूवर मी हे असलं फुटकळ गाणं शोधू शकतो किंवा प्रसंगी पाडू शकतो. पण अतिपांचटपणाने पाणी पाणी झाल्याने वस्तूंची आणि गाण्यांची यादी आवरती घेतली आहे.)
पण बघता बघता हे असले किस्से एवढ्या वेळा आणि इतक्या वारंवारतेने (फ्रिक्वन्सी वो) घडायला लागले की मेऱ्येम्येक्ये आत्मसम्मान को ठेच्यच्य पौचने लगी (च्यायला त्या हिंदी पिक्चरच्या..).. मग मी पण पिसाळलोच.. म्हणजे चांगल्या अर्थाने. रेबीजवाल्या अर्थाने नव्हे. म्हटलं दर वेळी हे असले वाभाडे काढून घेण्यापेक्षा काहीतरी बदललं पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. वस्तू कुठे ठेवली आहे हे लक्षात ठेवण्याची दैवी कला आत्मसात करणे हे तर माझ्या मेंदूवर असणार्‍या अत्यल्प सुरकुत्यांची संख्या पाहता (पाहता म्हणजे कल्पना करता या अर्थी) सर्वस्वी अशक्य होतं. म्हणून मी दुसरा सोप्पा मार्ग निवडला. दिवसरात्र एक करून, नाना खटपटी लटपटी, शोधाशोध करून, नेट पालथं घालून शेवटी मीच ते महान यंत्र बनवलं. आणि त्यात पहिला प्रोग्राम टाकला तो अर्थातच रिमोट शोधण्याचा. आणि काय सांगू तो झालाही  यशस्वी. फक्त त्यात थोडीशी गडबड होत होती. रिमोट शोधण्यासाठीचं बटन दाबलं की रिमोट सापडण्याऐवजी टीव्हीची चॅनल्स आपोआप बदलली जाऊन आपोआपच जिथे सोनिया किंवा बाळासाहेब यांची काही बातमी, कार्यक्रम, फोटो दाखवत असेल ते चॅनेल लागायचं. म्हटलं तर यंत्र अचूक होतं म्हटलं तर त्यात बग होता. पण हा बग फार किचकटीचा नसला तरी तसा काही मानवणाराही नव्हता. त्यात लवकरात लवकर दुरुस्ती करणं हे आवश्यकच होतं. पण इतक्या दिवसांच्या अपार आणि अविश्रांत मेहनतीने शरीराने आणि (त्याच त्या कमी सुरकुत्यावाल्या) मेंदूने संप पुकारला होता. म्हणून "उद्या बघू त्या यंत्राचं" असा विचार करून मी त्या दिवशी जरा लवकरच निद्रादेवीच्या अधीन झालो. दुसर्‍या दिवशी उठताक्षणी आधी ताबडतोब मी त्या यंत्राच्या दिशेने धाव घेतली. पण ते माझ्या स्टडीटेबलवर नव्हतं. पण मला आठवत होतं त्याप्रमाणे तरी मी ते तिथेच ठेवून मग ते निद्रादेवीच्या अधीन बिधीन झालो होतो. (आयला उगाच ते निद्रादेवी वगैरे. आधीच्या वाक्यात सरळ झोपलो असं लिहिलं असतं तर ते निद्रादेवी आणि अधीन असं दोनदोनदा लिहायला लागलं नसतं. आणि या वाक्यातलं धरून तीनदा. ओह नो.). मी पुन्हा सगळीकडे शोधलं. सगळी कपाटं, सगळे कप्पे, सगळ्या बॅगा सगळं सगळं सगळं शोधून झालं. पण ते माझं दैवी यंत्र काही सापडलं नाही. आणि 'हरवलेल्या वस्तू शोधण्याचं यंत्र' हरवलं तर ते कसं शोधायचं यावर तर मी अजून विचारच केलेला नव्हता !!! :-(

परवा एक मित्र आला घरी. समोर टीव्हीवर रट्टाळ 'फूड' चॅनेल चालू असलेलं पाहून आणि आमचे कंटाळलेले चेहरे बघून त्याला क्षणभर काहीच अर्थबोध होईना. पण क्षणार्धात त्याला परिस्थितीची कल्पना आली. "ओह, पुन्हा रिमोट" असं म्हणून तो उठला आणि झटक्यात टीव्ही बंद केला. त्याच्या मेंदूवर माझ्या मेंदुवरच्या सुरकुत्यांपेक्षा जास्त सुरकुत्या असल्या पाहिजेत नक्कीच !!!

28 comments:

 1. हेरंब,जरा ते यंत्र दे रे पाठवून इकडे. कोणासाठी ते तुला कळले असेलच..:D जरा चार दिवस माहेरपणाला जावे तर वेळी अवेळी ( तिथे मध्यरात्र तेव्हां इथे टळटळीत दुपार असते ना...:( ) दचकायची पाळी तरी येणार नाही. आदित्यने यंत्र पळवलं असेल पाहा... विचार त्याला. तुम्हारे किसी भी खोये हुये चीज का राज आदिके पास.... :) बाकी बायकांची स्मरणशक्ती सगळ्याच बाबतीत जबरी असते याची प्रचिती तुला आली असेलच.... अगदी कधीतरी चुकून तू बोलून गेलेल्या शब्दांपासून... ते हे अश्या हजारो मैलांवरूनच्या अचूकतेपर्यंत... पोस्ट एकदम तुझ्या नेहमीच्या खुसखुशीत इस्टाईल मे मस्त.

  ReplyDelete
 2. हा हा हा.. नचिकेतदादांना सांगितलं पाहिजे तुमचं म्हणणं.
  अहो आदितेयलाही विचारून झालं. तो काही बोलत नाही नुसता हसतो. (बोलता न येण्याचे फायदे म्हणायचे). आणि त्या चुकून बोलून गेलेल्या शब्दांच्या स्मरणशक्तीविषयी तर न बोलणंच उत्तम. सरे आम, सबके सामने, बडे पैमानेपे ओरडा खाना पडेगा :P

  ReplyDelete
 3. बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला असं वाटतं की त्यांना माहिती नाहीत, त्या पण अगदी व्यवस्थित माहिती असतात,आणि एखाद्या प्रसंगातुनच ते लक्षात येतं.
  आमच्या कडे मी सौ.ला माहेरी पाठवणे हा करंटॆ पणा कधीच करित नाही. आणि समजा वर्षभरातून एखाद्या वेळेस ती गेली , तर मी पण तिच्या मागोमाग जातो त्या भागात काम काढून काहीतरी..( अरे क्या बोला?? जोरू का गुलाम?? चलता हय भाय... खरंच!!!)

  पुरुषांसाठी हरवलेल्या गोष्टी शोधायचं यंत्र म्हणजे एकच ते म्हणजे सौ.!!! जरा स्वयंपाक घरात डोकाउन बघ.. असेल!!!

  ReplyDelete
 4. हा हा हा..शेवट मस्त आहे...आणि काय रे उगाच ’फ़ुड’ चॅनेलला कशाला वेठीला धरलंस?जेरी नाही तर जज ज्युडी जास्त बरी झाली असतात...(आता मी 'फ़ु ने' चा पण पंखा आहे म्हणून प्रेम अर्थात...)
  असो...आणि हो आता तू खराखुरा सॉफ़्टवेअरवाला आहेस हेही पटेश...अरे s/w बनवायची तिच मुळी बग घालुन नाहीतर मग आपलं पोट कसं चालणार?? प्रोजेक्ट्स संपुन नाही का जाणार...लगे रहो भाय...
  बाकी कॉमेन्ट काका आणि ताई दोघांशी सहमत....आमच्याकडे नवरा किचनमध्ये करायला उत्साहात जातो पण लागणार्‍या वस्तुंची माहिती द्यायचं म्हणजे डोकदुखी असते...

  ReplyDelete
 5. हा हा.. एकदा सुपर्णाताईंना विचारलं पाहिजे !! बाकी बायकांच्या नको त्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या स्मरणशक्तीबद्दल तर समस्त पुरुषजातीचं (married n engaged :P) एकमतच होईल :)

  तेही खरं आहे म्हणा. एवढं चालतंबोलतं जितंजागतं यंत्र असताना मी उगाच ते दुसरं यंत्र बनवत बसलो. :)

  ReplyDelete
 6. अग ते 'फूड' वाले कसले चावतात ग. कुठलाही पदार्थ बनवताना एकदा हा टीन फोडून घालतात एकदा तो टीन फोडून घालतात आणि शेवटी सगळं त्या ओव्हानात टाकतात. कसं खातात देव जाणे.

  आणि तसं म्हंटलं तर मी s/w वाला नाही. admin वाला आहे. पण ते बग-बिग पोस्ट मध्ये वापरायला जरा बरं पडत होतं म्हणून ;-)

  आणि काही का असेना, त्या वस्तूंची माहिती त्याला दिली की तुला रेडीमेड चिली-चिकन हातात मिळतं हे विसरलीस??

  ReplyDelete
 7. हेरंब, परत जबरी लिहिले आहेस.
  यंत्र खरंच दे पाठवुन, मला सुद्धा गरज आहे, आणि महेन्द्रजी म्हणतात त्याप्रमाणे सौ. यंत्र अजुन नाही आहे, तो पर्यंत तुझ्याच यंत्राचा सहारा ... ;-)

  ReplyDelete
 8. आभार आनंद. अरे ते यंत्र सापडलं की त्याच्यासाठी वेटिंग लिस्ट आहे मोठ्ठी. तरी तुझं नाव लिहून ठेवतो त्या लिस्ट मध्ये :-)

  आणि येईल सौ.यंत्रही येईल लवकरच !! ;-)

  ReplyDelete
 9. मस्त जमलाय रे लेख !

  पण एक शंका आहे. जर ते यंत्रच हरवले तर काय ? शेजाऱ्याकडून उसने आणायचे का आपले यंत्र शोधायला ? :P

  ReplyDelete
 10. अरे सांगतो काय. ते यंत्र जे हरवलं ते हरवलंच.. पुन्हा सापडलंच नाही. बरी आयडीया दिलीस. शेजार्‍यांच्या घरावरच धाड मारतो एकदा गुपचूप.

  ReplyDelete
 11. अरेह्या यंत्राची मला तरी नितांत गरज आहे. . . दिवसाची सुरूवात बाइकची चावी शोधन्याने होते ती सापडली की मग लक्षात येत अरे चष्मा पण सापडत नाही. . थोडक्यात काय तर हाफिसात जाण्यापुर्वी सगळा आनंद असतो. . .अन् हे रोजचं आहे गेली ४ वर्षात यात काहीच फरक पडला नाही. . . . महेंद्र काकांनी सांगितल्याप्रमाणे आमच सौ. यंत्र मे महिन्यात येत आहे. . .बघू काय होतयं ते!!! :)

  ReplyDelete
 12. मनमौजी, वेटिंग लिस्टमध्ये आनंदनंतर तुझा नंबर आता :-) अरे हे बाईकची चावी, चष्मा वगैरे प्रकार तर अगदी शेम-टू-शेम व्हायचे माझे पूर्वी. :-) .. बाकी तुला यंत्रपूर्वक आपलं मन:पूर्वक शुभेच्छा !! ;-)

  ReplyDelete
 13. हेरंब यंत्राची मागणी वाढतीये जोरात.... :)

  आमच्याकडे मी आणि चिरंजीव दोघेही विसरण्यात पटाईत त्यामुळे ह्या प्रसंगांची वारंवारता (फ्रिक्वेंसी) भलतीच जास्त आहे....
  हो बाकि लग्नाच्या मांडवापासून ते आजतागायत नवऱ्याच्या एकुणच समुच्च नातलगांचे वेळोवेळचे प्रेमळ वाक्यं अगदी थेट लक्षात असल्यामुळे मी त्यांचा योग्य (!) वापर करतेच ..हे वेगळे सांगणे न लगे!!! तेव्हा श्री ताईला दुजोरा.....

  ReplyDelete
 14. अग एकदम. मी तर आता ब्लॅक-मार्केटिंग करायच्या विचारात आहे त्याचं. आपले कृषिमंत्री करतात तसं.

  अरेरे बिचारा अमित. तुम्ही बायका काही तुमच्या प्रेमळ, गरीब, सध्या-सरळ नवर्‍यांना सुखाने जगू देणार नाही. बायकांची स्मरणशक्तीच नाहीशी करण्याचं एक यंत्र शोधून काढतो आता :P

  ReplyDelete
 15. मला पण एक :D
  जबरी, लिहलय..तुम्हा विवाहित लोकाना बरय..आमचा काय? :(:(:(

  ReplyDelete
 16. आपल्याला तर बुवा अजून गरज नाही पडली अश्या यंत्राची.....मी हेरंब दादा च्या यंत्राबद्दल बोलतोय....काकांच्या नाही....... :)

  ReplyDelete
 17. चल सुहास तुझंही नाव लिहून टाकलं यादीत.. आणि 'त्या' यंत्राचे साईडइफेक्ट्स कळले की "तुम्हा विवाहित लोकाना बरय" असं म्हणणार नाहीस तू.

  ReplyDelete
 18. सागर, ग्रेट. तुला अशा यंत्राची गरज पडली नाही म्हणजे तर सॉलिड. मला तर पावलापावलाला त्या यंत्राची उणीव भासते..

  ReplyDelete
 19. तुझ्या त्या यंत्राच्या आयडियेचं पेटंट मी घेणार बरं का ... दर वेळी चष्मा शोधताना मी नवर्‍याला म्हणत असते चष्मा डिटेक्टर का तयार केला नाही लोकांनी अजून म्हणून :)

  एकदा कुणा चष्मावाल्याला विचार चष्मा शोधणं म्हणजे काय दिव्य असतं ते. बाकी गोष्टी मात्र कधीही दिवे नसतानाही बिनचूक सापडातात, आणि चष्मा मात्र आत्ता तोंड धूताना काढला होता तो सापडत नाहीये म्हणून घरभर धुंडाळावा लागतो ...

  ReplyDelete
 20. हा हा हा... कुणाचा चष्मा कुणाचा रिमोट कुणाचं अजून काय काय.. थोडक्यात तमाम जनतेला यंत्र मस्ट आहे :)

  ReplyDelete
 21. घरो घरी रिमोटची कहाणी अस आहे तर ;)
  बाकी आमचा मोबाईल आणि गाडीची चावी कधी कधी सापडत नाही लवकर
  त्यामुळे वेळ देऊन असे एक वस्तू शोधणार यंत्र तयार कराच साहेब

  बाकी लेख मस्त लिहिला आहेस नेहमीसारखाच :)

  ReplyDelete
 22. हा हा.. अगदी बरोबर बोललास. सगळ्याचं शेम-टू-शेम.. खरंच यार थोडा वेळ देऊन आणि डोकं वापरून असला काही प्रकार तयार करता आला ना तर बसल्या जागी अब्जाधीश होईन मी. बरं असो आता खाली उतरतो झाडावरून :P

  ReplyDelete
 23. आभार विद्याधर !!

  ReplyDelete
 24. Bhhaaaiiiiii... इसका पेटंट आपनेकोच मिळणा चाईये ... मस्त पैकी पुणे के एक कोपरे मे फ्याक्टरी डालेंगे और सब नवरे लोगोंको discount मे विकेंगे.... और हा... बीबीलोगोंको कोई आरक्षण नही मिळेगा.. ३३% तो बिलकुलच नही..
  उतनाच समदुखी लोगोन्के लिये कुछ करणे का समाधान मिळेगा..
  एकमेका साह्य करू, अवघे शोधू (हरवलेलं) सामान...
  अपने दोनो कि 50-50 % भागीदारी..बोल... मंजूर ??

  ReplyDelete
 25. हा हा हा.. जबरेश प्रतिक्रिया.. अरे खरंच जर असं यंत्र तयार केलं आणि विकायला लागलो ना तर बघता बघता अब्जाधीश होऊ. :)

  ReplyDelete
 26. आमच नशिब चांगल आहे कारण सध्या तरी आमच्या मातोश्री हयाबाबतीत नेहमीच आमची मदत करतात..पण पुढे लग्न वैगेरे झाल्यावर काय हाल होतिल ते माहित नाही तेव्हा एक यंत्र आमच्यासाठीही बुक करा...एकदम झक्कास विषय आणि लेखसुदधा...

  ReplyDelete
 27. आभार देव. हा हा .. आमचं पण असंच आहे. आधी मातोश्री आणि आता चिरंजीवांच्या मातोश्री यांच्यामुळेच सगळ्या गोष्टी सापडतायत :-)..
  ठीके तुझ्या नावे पण एक यंत्र बुक करून ठेवतो.. :)

  ReplyDelete