Wednesday, March 17, 2010

डोसा : भाग ३ (अंतिम)


"नाही. अहो तसं नाही. मी गेल्यावेळी आलो होतो तेव्हा पण हा माणूस इथे होता. त्याच्याबरोबर अशीच २-३ मुलं होती. आज पण ३ मुलं आहेत. पण वेगळीच आहेत ती. गेल्यावेळेसची नाही. कोण आहे हा माणूस? कोण आहेत ती मुलं ? काय प्रकार आहे हा सगळा?"
त्याने मला थोडं बाजूला नेलं आणि बोलू लागला "सर त्याचं नाव शांताराम.....
-----------------------------------------

"सर त्याचं नाव शांताराम.. इथेच पलिकडच्या बिल्डिंगमध्ये वॉचमनचं काम करतो. विदर्भाकडचा आहे. थोडी शेती होती गावात पण दुष्काळाने काही पिकेना. डोक्यावर कर्ज चढत होतं. दोन मुलं, एक लहान मुलगी आणि बायको घरी. त्यांच्या तोंडात काय घालायचं या विचाराने तो दिवसेंदिवस हतबल होत होता. तशात दोन वर्षांपूर्वी बायको साध्या थंडीतापाने गेली. हा आणखीच विवश झाला. मुलांची उपासमार बघवेना. काही झालं तरी इतरांसारखं जीवाचं काही बरंवाईट करायचं नाही हे नक्की ठरवलं होतं त्याने.  म्हणून मग एक दिवस गुपचूप सगळं सोडून मुलांना घेऊन मुंबईला निघून आला. गाडीतून उतरला तेव्हा पोटात अन्नाचा कण नव्हता. रात्रीची वेळ होती. छोटीला भूक सहन होईना. ती काहीतरी खायला द्या म्हणून मागे लागली. रडायला लागली. खिशात फक्त दोन रुपये होते. त्या दोन रुपयात या अशा आडवेळी इथे काय मिळेल हे त्याला कळेना. सगळ्यांची सोय होणार नाही हे तर नक्की होतं. पण निदान छोटीची तरी भूक भागेल असं काहीतरी आणायला म्हणून तो तिथून बाहेर पडला. निघताना मुलांना सांगितलं की इथून हलू नका आणि छोटीवर लक्ष ठेवा. परिसर ओळखीचा नसल्याने त्याला कुठे जावं ते कळेना. तो चालत चालत थोडा लांब गेला. बरंच लांब चालल्यावर त्याला रस्त्यात एक डोश्याची गाडी दिसली. त्याने गाडीवाल्याच्या हातापाया पाडून कसाबसा एक छोटा दोन रुपयाचा डोसा मिळवला. तो सदर्‍याच्या खिशात कोंबून तो परत यायला निघाला तर त्याला लांबून फटाक्यांचे आवाज ऐकायला आले. कसले फटाके आहेत ते कळेना म्हणून तो त्या दिशेने बघायला लागला. पुन्हा आवाज आल्यावर त्याच्या लक्षात आलं की हे सध्यासुध्या फटाक्यांचे आवाज नाहीत. कसल्याशा भीतीने तो जोरात धावायला लागला. पण तेवढ्यात अचानक सगळीकडे आरडाओरडा झाला. दोन दिवसांचा उपाशी, धाव धाव धावलेला, मनातली अनामिक भीती आणि त्यात हा भयंकर आरडाओरडा, किंकाळ्या या सगळ्यामुळे त्याला अचानक गरगरल्यासारखं झालं. डोक्यावर हात घट्ट दाबून ठेवून तो अचानक जमिनीवर कोसळला.

नंतर शुद्ध आली तेव्हा मध्ये किती वेळ गेला ते त्याला कळेना. अंगात असलेलं बळ कसंबसं एकवटत तो स्टेशनच्या दिशेने धावला. आतलं दृश्य भयानक होतं. सगळीकडून धूर, आरडाओरडा, किंचाळ्या, कण्हण्याचे आवाज  येत होते. सगळीकडे सामान विखुरलं होतं, रक्त सांडलं होतं. हा कसाबसा आत शिरला. नजर इकडेतिकडे भिरभिरत होती. अचानक तो थबकला. एका कोपर्‍यात त्याच्या बायकोने स्वतःच्या हाताने शिवलेली पिशवी त्याला दिसली. आणि आजूबाजूलाच त्याच्या तीन पोरांची निष्प्राण शरीरं पडली होती."

मी उभ्या जागी हादरत होतो. आतून फुटत होतो. माझं एकंदर रूप बघून त्याने मला चटकन थंड पाणी दिलं प्यायला. आणि पुढे बोलायला लागला.

"त्या दिवसापासून तो वेड्यासारखा भटकत राहिला. भटक भटक भटकला. गावी परत जाण्यात तर काही अर्थ नव्हता. भीक मागणार्‍यातला तो नव्हता. मग तो हळूहळू काम शोधायला लागला. जे मिळेल ते, जिथे मिळेल तिथे. असं करता करता एक दिवस समोरच्या बिल्डिंगमध्ये काम मागायला आला. तिकडे त्याला रखवालदाराची नोकरी मिळाली. दर शुक्रवारी पगार व्हायचा. पगार कमीच होता आणि सुट्ट्याही नव्हत्या. पण त्याला काही फरक पडत नव्हता. त्याची फक्त एकच अट होती की पगार झाल्यावर त्या दिवशी त्याला ४ तासाची सुट्टी हवी होती. बस इतकंच."

"ते कशासाठी?" मी उरलीसुरलेली सगळी ताकद एकवटून अगदी अस्पष्टसं पुटपुटलो.

"तो दर शुक्रवारी पैसे मिळाले की व्हीटीचा प्लॅटफॉर्म गाठतो. तिकडे एक फेरफटका मारतो. तिकडे उभ्या असलेल्या गरीब भिकारी किंवा गोळ्या, पिना, शिट्ट्या, फुगे विकणार्‍या मुलांना भेटतो. त्यातून त्याच्या मुलांच्या साधारण वयाची दोन मुलं आणि त्याच्या मुलीच्या वयाची मुलगी निवडतो. कधी पैसे असतील तर त्यांना नवीन कपडे घेऊन देतो. आणि नंतर त्यांना घेऊन इकडे येतो. पैसे नसतील तर तिथेच त्यांना सार्वजनिक नळावर न्हाऊ माखू घालून त्यांना इकडे घेऊन येतो खायला. बाकी काहीही मागवलं नाही मागवलं तरी त्याची एक डिश ठरलेली असते आणि ती म्हणजे डोसा. डोसा आला की आपल्या हाताने तो मुलीला भरवतो. आणि इतर मुलांनाही जे हवं असेल ते मागवतो. तो स्वतः एका पदार्थालाही स्पर्श करत नाही. मुलं जेवत असतात तेव्हा त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत रहातो. मधेच त्याच्या मुलांच्या आठवणीने हेलावून जातो आणि आकाशाकडे किंवा इथेतिथे अर्थहीनपणे बघत राहतो."

त्याच्या त्या मध्येच कौतुकाने आणि मधेच शून्यात बघण्याचं कारण माझ्या अंगावर अक्षरशः कोसळलं.

"आणि तुम्हाला हे सगळं कसं माहित?"

"हा माणूस बरेच दिवस वेगवेगळया मुलांना घेऊन येतो आणि सारखे डोसे मागवतो हे माझ्या लक्षात आलं होतं. पण म्हटलं असेल काहीतरी आपल्याला काय. एकदा असाच तो आला होता आणि निघताना बिल भरण्यावरून काहीतरी भांडण झालं. त्याच्याकडे पैसे नव्हते आणि तो अगदी काकुळतीला येऊन सांगत होता की माझ्याकडे पैसे नाहीयेत. मी इथे नेहमी येतो. दर शुक्रवारी येतो. पुढच्या शुक्रवारी येईन तेव्हा नक्की पैसे देईन. पुढच्या आठवड्यात जास्त काम करून किंवा मालकांकडून थोडे पैसे उधार घेऊन मी पैसे नक्की फेडेन असं अगदी कळकळीने सांगत होता. शेवटी वेटरने मला बोलावलं. मीही त्याला दर शुक्रवारी बघत असल्याने चेहरा तसा ओळखीचा होता. म्हटलं काय झालं? का देत नाही आहात तुम्ही पैसे. त्याने आधी वेटरला सांगितलं होतं तेच सगळं मला पुन्हा सांगितलं. मग माझंही कुतूहल तुमच्यासारखंच जागृत होत गेलं. म्हणून मग मीही त्याला ही मुलं कोण, कुठली, तुझी कोण, तू इथे दर शुक्रवारीच का येतोस, आणि नेहमी डोसाच का मागवतोस असे सगळे मला इतके दिवस पडलेले प्रश्न विचारले. त्याचा बांध फुटला. तो हमसून हमसून रडायला लागला आणि एकेक करत त्याने मला सगळं सांगून टाकलं."

"..."

"तेव्हापासून आम्ही त्याच्याकडून पैसे घेत नाही. पण तो ऐकत नाही. जेवढे असतील तेवढे सगळे पैसे तो देतोच. दरवेळी नवीन नवीन मुलांना घेऊन येतो त्यांना न्हाऊ माखू घालतो, कपडे घेतो आणि पोटभर खाऊ घालतो. जवळपास वर्षभर चालू आहे हे असं."

आतापर्यंत कसबसं रोखून धरलेलं पाणी डोळ्यातून वाहायला लागलं. मी धडपडतच माझ्या टेबलजवळ गेलो. उन्मेष आणि छकुलीला पोटाशी घट्ट कवटाळून धरलं. आणि डोळ्यातून वाहणार्‍या पाण्याची फिकीर न करता बराच वेळ तसाच बसून राहिलो. टेबलावरच्या डिशमध्ये मला एक न खाल्लेला डोसा निपचित पडल्यासारखा वाटला !!

-- समाप्त

55 comments:

 1. मुद्दाम पहिली प्रतिक्रिया मीच टाकतोय कारण मला हे त्या कथेच्या पोस्ट मध्ये लिहायचं नव्हतं.
  पहिले दोन भाग पोस्ट करून झाल्यावर मला बर्‍याच जणांनी चॅट/मेलवर विचारलं की ही सत्यघटना आहे का? तेव्हा मी त्यांना म्हटलं की तिसरा भाग वाचल्यावर तुम्हीही माझ्याप्रमाणेच प्रार्थना कराल की ही सत्यघटना असू नये. ही सत्यघटना नाही पण या कथेच्या जवळपास जाणार्‍या अनेक दुर्दैवी घटना प्रत्यक्षात घडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही !! :( ..

  ReplyDelete
 2. बापरे !!खरच डोळ्यासमोर आले सगळे...भन्नाट...खुपच छान झाली आहे गोष्ट..कालपासुन ब्लोग्वर १० फ़े~या मारल्या..पण..शेवटी न रहावुन आत्ता सकाळी सकाळी पुन्हा एकदा डोकावले..सहिच..

  ReplyDelete
 3. Hi,

  I was waiting for this page to load since my morning...

  End is very emotional and like you said, it may have happened to few in reality.

  We should all be happy and content with what we have and give/help with whatever we can to others in our life.

  Thanks
  Vineet

  ReplyDelete
 4. अनेक आभार, माऊ. थोडा उशीर झाला तिसरा भाग टाकायला.

  ReplyDelete
 5. आभार विनीत. Glad you liked it.

  Yeah, whenever I think about those extremely unfortunate people who happened to be there that night, I could not help but cry..

  ReplyDelete
 6. हेरंबशी सहमत..आता मला कळलं की मी ब्लॉगवर कथा का वाचत नाही..असं इमोशनल व्हायला होतं आणि इतर खर्‍या टेंशन्समध्ये हे एक अजून नसलेलं ऍड होतं...

  ReplyDelete
 7. ह्म्म्म अपर्णा. मला पण ही कथा कशी काय सुचली काय माहित.. मला तसेही कॉमेडी पेक्षा सिरीयस, tragedy चित्रपट/पुस्तकं आवडतात. त्यामुळे असेल..

  ReplyDelete
 8. हेरंब,खरेच हृदय हेलावून टाकणारी कथा आहे. असे काही दुर्दैवी जीव असतीलही. तू खूपच सुंदर मांडलीस. अश्या यातना जीवघेण्याच. पण त्यातही कोणा गरजू जीवांना मदत करण्याची तळमळ आहेच. मग त्यात आपली लेकरे शोधण्याचा प्रयत्न असेलही. शेवटी माणसाला आपले माणूस लागतेच ना.... ( माझे गेसवर्क होते.... तो अनाथ-रस्त्यावर टाकून दिलेल्या मुलांना आणून त्यांना औटघटकेचे सुख देण्याचा प्रयत्न करीत असेल हे होते.) तुझी कथा अजूनच कातर करून गेली.

  ReplyDelete
 9. श्रीताई, मला शेवट आधी सुचला होता की अशी दोन भिन्न परिस्थितली माणसं जर एकमेकांना भेटली तर काय होईल. आणि त्यावरून कथा विणली गेली.

  ReplyDelete
 10. हेरंब, कथा मनाला भिडली.
  विशेष म्हणजे भिन्न दृष्टीकोनातल्या व्यक्तीच्या माध्यमातुन विणल्यामुळे अधिकच परिणामकारक वाटली.

  ReplyDelete
 11. खूप आभार आनंद.. !!

  ReplyDelete
 12. हेरंब आज भारतात अश्याच भिन्न परिस्थितीत लोक जगत आहेत. . .सध्या श्रीमंत भारत अन् गरीब भारत यातील दरी वाढत चालली आहे. दिवसागणिक श्रीमंत लोकांची श्रीमंती वाढत चालली आहे आणि गरीब अजुन गरीब!!!!! कथेचा शेवट सुन्न करणारा आहेच...सोबत खूप सारे प्रश्न पण उभे राहिलेत....की ज्यांची उत्तर नक्कीच मनाला त्रास देणारी आहेत.

  ReplyDelete
 13. अगदी खरं आहे, मनमौजी.. आधीच गरीब आणि त्यात पुन्हा २६/११ किंवा त्यासारख्या इतर भयानक प्रसंगांमध्ये अडकणारे लोक खरंच किती दुर्दैवी असतील... कल्पनाही करवत नाही...

  ReplyDelete
 14. खुपच छान कथा आहे. सकाळी सकाळी डोळ्यात पाणी आणलस कि लेका :(

  ReplyDelete
 15. आभार अरविंद.. लिहिताना माझ्या डोळ्यातही आलं होतं. :(

  ReplyDelete
 16. ‘क्रमशः’ संपेपर्यंत प्रतिक्रिया द्यायची थांबले होते. तू पहिल्यांदा कथा लिहिली आहेस असं वाटत नाहीये वाचून. फार भिडणारं लिहिलं आहेस. ही सत्यकथा नसो अशी प्रार्थना !

  ReplyDelete
 17. आभार गौरी. मला पण वाटलं नव्हतं आधी जमेल म्हणून.

  खरंच सत्यकथा किंवा त्याच्या जवळपासही जाणारी नको हीच प्रार्थना .. :(

  ReplyDelete
 18. हेरंब
  अतिशय भावपुर्ण झाली आहे कथा.. दुसऱ्या भागानंतर सारखं वाटत होतं की आता पुढे काय होणार??

  ReplyDelete
 19. आभार काका. तिसरा भाग टाकायला थोडा जास्तच वेळ लागला.

  ReplyDelete
 20. Very touching story .........

  ReplyDelete
 21. हेरंब,
  मस्त लिहिली आहे कथा. अनपेक्षित शेवट. ही सत्यघटना नाहीये हे कळल्यावर बरं वाटल पण असू शकते हे ही सत्यच.
  सोनाली

  ReplyDelete
 22. आभार अनामिक.. !!

  ReplyDelete
 23. खूप आभार सोनाली. हो ना दुर्दैवाने सत्यघटनाही असू शकते :(

  ReplyDelete
 24. Katha bhannat aahe... shevatachya bhagasathi mi suddha kitti wela yeun gele..... Chaan lihitos tu khoop.... nakalat odh laavate tuze likhaan....

  ReplyDelete
 25. आभार मैथिली. शेवटचा भाग टाकायला उशीर झाला थोडा.

  आणि एवढ्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार.. !!

  BTW, मी तुझ्या लेटेस्ट पोस्टवर कमेंटलो आहे. ते बघ.

  ReplyDelete
 26. हेरंब तुला नाव बदलायची गरज नाहीये..... कमेंटतेय लगेच ...

  खरयं रे, खुपच हेलावून टाकणारा शेवट आहे.... आणि माहित नाही का पण काल मी माझ्या मुलांना खुप वेळ जवळ घेउन बसले होते.... तुझ्या या कथेचा साधारण ओघ लक्षात आला म्हणं किंवा असेच काहितरी पण एक विचार पुर्ण वेळ होता मनात या कथेचा.....

  आता महत्वाचे, हे बघ आपले ब्लॉग हे गंभीर वळणासाठी नाहियेत, इथे खुसखुशीतच बरे वाटते.... तेव्हा पटकन एखादी खमंग पोस्ट टाक बघु ...भरपुर स्मायली असलेली.....

  आदितेय बाबाच्या खोड्या काढ रे जरा.....

  ReplyDelete
 27. Heramb,

  Mazi aadhichee praktikriya kuthe gayab jhalee kon jaane. Katha khoopach chhan jhalee aahe. Shevat predict karta ala nahi, touching shevat hota.

  ReplyDelete
 28. जहापनाह तुस्सी ग्रेट हो....माझा निषेध, एकता कपूर ही पदवी..सगळं सगळं मी बिनशर्त मागे घेतो!

  ReplyDelete
 29. ह्म्म्म ... मित्रा, रडवलस कि रे.. एकदम touching...
  वेळ लावलास खरा.. पण उत्तम लिहिलं...

  ReplyDelete
 30. आभार तन्वी. मी पण गेले २-३ दिवस प्रचंड गुंतलो होतो य कथेत. आणि शेवटचा भाग टाकताना थोडं कठीण गेलंच. कधी कधी वाटलं उगाच एवढा भयंकर शेवट करतोय. असो.

  ओक्के.. खुसखुशीत तर काय लगेच पाडू शकतो आपण. त्ये गंभीर म्हनलं की वाईस टाईम लागतो. टाकतो एखादी खमंग पोस्ट १-२ दिवसात. आणि तुझ्या ब्लॉगला हलवून जागं कर ना जरा.

  ReplyDelete
 31. अनेक आभार निरंजन. शेवट आधी ठरला असल्याने त्याआधाराने कथा गुंफत गेलो.

  आणि ते प्रतिक्रियेचं ब्लॉगर आणि वर्डप्रेस च्या भांडणामुले झालं असेल कदाचित.

  ReplyDelete
 32. खूप धन्यवाद विद्याधर. :) निषेध हरकत नाही. तो कॉमन आहे आपल्या ब्लॉगविश्वात. पण एकता कपूर म्हणजे क्लीन बोल्ड. असो.
  तुला कथा आवडली हे वाचून बरं वाटलं.

  ReplyDelete
 33. रोहन, तुझी नि:शब्द प्रतिक्रिया पोचली. भापो.

  ReplyDelete
 34. आभार अमित. माझीही लिहिताना थोडीफार तशीच अवस्था झाली होती. !!

  ReplyDelete
 35. दादा कथा छान जमली रे.......कथे बद्दल काय बोलू हे कळत नाही...सेंटी सेंटी होत मग....
  आता डोसा खावून नाश्ता झाला....जेवायला काय अन कधी देणार?
  अन हो जेवण गोडधोड करा...तुला गोड पदार्थ चांगले जमतात... :)

  ReplyDelete
 36. khup chhan. shevat vachtana dolyat panich yete. lihilele japun tev. katha sagrah hoil. kahi divasat.

  aai

  ReplyDelete
 37. आभार सागर. ह्म्म्म.. सगळे रिप्लाय बघून असं म्हणतोय की आता पुढची कथा (जमली तर, लिहिली तर) काहीही झालं तरी भावनिक नाही लिहिणार. अशीच आपली हलकीफुलकी कॉमेडी वगैरे वगैरे.

  ReplyDelete
 38. अरे वा आई.. चक्क तुझी प्रतिक्रिया?? क्या बात है.. :) ..

  हो शेवट थोडा भयंकर झाला खरा :(

  ReplyDelete
 39. khupach chan zamli ahe katha man helaun gele. Ani dolyat tachkan pani ale.dusrya blog chi vat baghtey. manjiri

  ReplyDelete
 40. अरे वा. काकू तुमची पण कमेंट? तुम्हा दोघींच्या कमेंट्स आल्या म्हणजे ब्लॉग भरून पावला :) ..

  हो मला पण वाईट वाटलं होतं शेवट लिहिताना... :(

  ReplyDelete
 41. आभार तृप्ती आणि ब्लॉगवर स्वागत !!

  ReplyDelete
 42. खरच अगदी हृदय हेलावुन टाकणारी कथा आहे...पहिल्याच कथेत एकदम गंभीर विषयाला हात घातलात...असो आता उगाचच उदासपणा जाणवतो आहे...

  ReplyDelete
 43. आभार. मला पण सुरुवातीचे २-३ दिवस फार उदास वाटत होतं ते आठवून. तिसरा भाग पोस्ट करताना वाटलंही की उगाच एवढा दु:खद शेवट करतोय. पण...
  असो.. उद्या पुन्हा ब्लॉगला भेट दे. नवीन पोस्ट टाकतोय.. ती वाचून सगळा उदासपणा निघून जाईल..

  ReplyDelete
 44. फार छान.. विषयापेक्षाही मला तुमची मांडणी जास्त भावली.

  ReplyDelete
 45. आभार सविता.. मला तर दोन्हीही जमणार नाही असं वाटलं होतं आधी.

  ReplyDelete
 46. ऑफीसच्या कामात होतो गेला आठवडा त्यामुळे ही पोस्ट राहिली वाचायची...सॉरी
  खरच असा होऊ नये यार. बरय ही फक्त कथा आहे पण शेवट वाचताना त्या शांतारामाची प्रतिमा डोळ्यासमोर आली बघ आणि अश्रूंबरोबर अंधुक होत गेली :(:(

  ReplyDelete
 47. सॉरी कशाला. वेळ मिळाल्यावर वाचलीस.. That's ok..

  हो रे कोणावरच ही असली वेळ येऊ नये. आपण काल्पनिक कथा वाचून एवढे हादरतो ज्यांच्यावर २६/११ किंवा तत्सम प्रसंगात अशी पाळी आलीये त्यांनी काय करायचं ? :((

  ReplyDelete
 48. बाप रे!

  पहिले दोन भाग आणि तिसरा भाग वाचताना हे सगळं खरं आहे की काय असं वाटून ताण आला होता.

  ReplyDelete
 49. शिनु, सुदैवानेच खरं नाहीये. पण मी म्हटल्याप्रमाणे खरं नसेलच असंही नाही :( ..

  ब्लॉगवर स्वागत !!

  ReplyDelete
 50. आज कथा वाचली... आणि डोळ्यात पाणी आलं. मनात दाटुन आलेले विचार हे शब्दांच्या पलिकडचे आहेत.

  ReplyDelete
 51. आभार सारिका.. आपली वाचून हि अवस्था होते, ज्यांच्यावर अशी वेळ प्रत्यक्षात येत असेल त्यांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाही करू शकत नाही. :(

  ReplyDelete
 52. Heramb,

  hi tuzi original katha aahe ka? karan hich katha mi kahi varshapurvi kuthetari vachli aahe... hich kivva yach gist chi aani haach shevat asleli... mi yachyasathi viacharala karan.. hou shakata tevha vachleli katha kadachit tuzich asu shakate.. tya kathechya lekhakabaddal kahi aathvat nahi... tyamule tuch karach lihili aahes ka hi katha? ( mi confusion mule parat vicharat aahe .. tuzya vishayichya doubt mule nahi... infact tu ek atishay pratibhasampanna lekhak aahes he yapurvich janavala aahe... ).. tuza personal email id shodhaycha prayatna kela.. karan tu hi comment vachshil ki nahi mahit nahi... tyamule direct tula pathvaychi hoti.. anyways... jar tu ya kathecha original lekhak asashil tar maza tula manapasun, agadi manapasun namaskar....

  ReplyDelete