Saturday, March 20, 2010

पाउल पडते पुढे !!माथाटीप (नो तळटीप फॉर अ चेंज) : "झालं.. याची पुन्हा लेकावर पोस्ट. २-३ इकडच्या तिकडच्या काहीतरी पोस्ट्स टाकल्या की आली याची गाडी  पुन्हा लेकावर." पोस्ट वाचायला सुरुवात केल्यावर हे असे काहीतरी विचार तुमच्या डोक्यात येणं स्वभाविक आहे पण आमच्या हिरोचे प्रताप दिवसेंदिवस इतक्या वेगाने "वाढता वाढता वाढे" झाले आहेत की त्या प्रत्येक पराक्रमावर एकेक पोस्ट लिहायची म्हटली तर लवकरच "भेदिले ब्लॉगमंडळा" असं होऊन जाईल. (आपलं कार्ट किती मस्तीखोर आहे, कसं उपद्व्यापी आहे, कसं शांत बसत नाही किंवा थोडक्यात त्याची प्रगती कशी जोरात आहे आणि तो शेजारपाजारच्या त्याच्या वयाच्या इतर चार-सहा पोराटोरांपेक्षा कसा पुढे आहे हे सगळं सांगण्याची पालकांमध्ये जी एक अहमहमिका लागलेली असते तसल्या 'अ'मधून (पूर्ण शब्द पुन्हा लिहायचा पुन्हा कं) जन्माला आलेलं हे वाक्य किंवा ही पोस्ट नाही याची सुजाण पालकांनी आणि पालक नसलात तरी सुजाण असणार्‍या वाचकांनी नोंद घ्यावी. आणि नोंद घेतल्यावरही जर 'अ' वाटत असेल तर वाटो बापडी. आप्पून काय करनार)..
 

प्रगट स्वगत (लाउड थिंकिंग म्हणतात म्हणे याला) : आयला ही टीप आहे की स्वतंत्र पोस्ट. आणि किती ते कंस आणि कंसात कंसात कंस. आणि माथाटीप आहे म्हणून काय डोक्यावर घेऊन नाचणार? पायीची 'टीप' पायीच बरी... त्यामुळे आता बस करा.

प्रगट प्रगट (असा शब्दच नाहीये त्यामुळे याला अजून दुसरं काही नाही म्हणत): नमनाच्या पिंपभर तेलामुळे सुरुवातीलाच जरा तेलकट तेलकट वाटत असेल तर तेच तेल डोक्याला लावून घ्या थोडं. डोक्याला आणि डोळ्याला तेल बरं असतं म्हणतात उन्हाळ्यात..

(खरीखुरी सुरुवात)
तसं पहिलं पाउल सगळ्यांचीच मुलं केव्हा ना केव्हातरी टाकत असली तरी मराठी लोकांना आणि त्यातल्या त्यात आयांना आपली लेकरं पाहिलं पाउल टाकतात याचं जरा विशेष अप्रूप असावं असं मला नेहमी वाटतं. (आठवा "मराठी पाउल पडते पुढे","पुढचं पाउल"... काहीही संबंध नाही.. उगाच आपलं ढकलेश) या विधानाचे म्हणजे कंसाच्या अलीकडच्या विधानाचे सर्व हक्क असुरक्षित. थोडक्यात माझं हे विधान खोडून काढण्याचा सगळ्या आया-भगिनींना पूर्ण अधिकार आहे. अर्थात मी हे असलं डिस्क्लेमर टाकलं नसतं तरी  सगळ्यांनी त्याला खोडून काढलं असतं हे तर झालंच. पण अशी खाडाखोडी, झोडाझोडी, तोडाफोडी (बरं जुळलं डी डी डी) करण्याआधी मी असं का म्हणतोय ते तरी ऐकून घ्या.


परवा माझा मोबाईल जोरात चित्कारला आणि कॉल उचलल्यावर बायको चित्कारली (पलीकडून बोलणार्‍याच्या त्यावेळच्या मूडनुसार मोबाईलची रिंग स्वतःला अ‍ॅडजस्ट करून घेते या भ्रमणध्वनी क्षेत्रातल्या महान शोधाची तंवर मला कल्पनाच नव्हती.) 

"अरे आदितेय थोडं थोडं चालतोय"..
"अरे वा मस्तच" तिच्या अमाप उत्साहापुढे आपला उत्साह म्हणजे अगदी लल्लुपंजू वाटणार नाही आणि ऑफिसमधले लोक उगाच माना वळवून त्रासिक चेहर्‍याने आपल्याकडे बघणार नाहीत अशा पद्धतीच्या, या दोघांचा साधारण सुवर्णमध्य साधणार्‍या सुरात मी उत्तरलो.
"एक-दोन पावलं टाकतो, मग धुपकन पडतो.. पुन्हा चालतो पुन्हा बसतो."
"अरे वा. सहीच. आज संध्याकाळी आल्यावर बघतोच"
"चालेल, बाय" (चार वाक्यात बोलणं संपतं आमचं. उगाच रट्टाळ चौकश्यांचं पाल्हाळ लावायला आम्ही काय गर्लफ्रेंड्ड-बॉयफ्रेंड्ड आहोत की काय (आता)..?)

घरी गेल्यावर टीव्ही, लॅपटॉप, गप्पा या सगळ्यांच्या आडून मध्येमध्ये लेकाशी खेळत तो चालतोय का याच्यावर मी लक्ष ठेवून होतो. पण काहीच चालाचाली न झाल्याने कालांतराने पेशन्स संपल्यावर सगळं लक्ष मी लॅपटॉपकडे केंद्रित केलं आणि त्यानंतर जणु ते समजल्याप्रमाणे लेकाने अचानक दोन पावलं टाकली आणि बसला.

"बघितलंस SSSSS??" मातोश्री चित्कारल्या

"...." आमचं ओशाळ हसु.

"...." तिच्या चेहर्‍यावर फणकारा

मी लॅपटॉपचं झाकण लावून पुन्हा लेकाकडे आशाळभूतपणे पहात राहिलो. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. (याचा नक्की अर्थ काय हे मला कधीतरी कोणीतरी समजावून सांगेल का?). मला मनसोक्त गंडवून झाल्यावर मी पुन्हा लॅपटॉपमध्ये तोंड घालता क्षणी बाळराजांनी पुन्हा दोन पावलं टाकली (असावीत). बायकोने मला पुन्हा हाक मारली (ही असावी नाही.. ही नक्की ). आणि तिच्या हाकेने बावचळून जाऊन राजे पुन्हा बसले (असावेत). डोळे भरून पहात राहण्याजोगं ते दृष्य मी पुन्हा मिस केलेलं बघून मगासच्या 'ओशाळ हसु' आणि 'फणकारा' वाल्या "कोशिश" स्टाईलने संवाद न साधता बायकोने चक्क "सवत माझी दोडकी" (पक्षि लॅपटॉप हे सु सां न ल) वर मनसोक्त तोंडसुख घेऊन त्या दोडक्याचा जबरदस्त उद्धार केला.
बघता बघता १२ वाजून गेल्याने बाळासाहेबांची नसली तरी जगाची झोपायची वेळ झाली असल्याने आम्ही बेडरूमीत शिरलो. आणि बघतो तर काय. एवढ्या रात्री अचानक कुठून एवढा अमाप उत्साह शिरला चिरंजीवांच्या अंगात कोण जाणे पण त्यांनी चक्क उभे राहून दोन पावलं टाकली आणि आमच्या प्रतिक्रियांचा अंदाज घेण्यासाठी आमच्याकडे पाहिलं. ते चालणं बायकोने तिसर्‍यांदा (किंवा चौथ्यांदा, पाचव्यांदा ....) बघितलं असलं तरी मी पहिल्यांदाच आणि आम्ही दोघांनी एकत्र पहिल्यांदाच बघितल्याने आम्ही दोघेही सॉलिड खुश होऊन ओरडलो. आमचा लेक ऑफिशियली चालायला लागला होता. (कोणी याला "पावलं टाकायला लागला" म्हणतील. म्हणोत बापडे. आम्ही "चालायला लागला" असंच म्हणणार. आणि हो. हेही 'अ'मुळे नाही हां )

पण खरंच सांगतो ते दुडूदुडू पावलं टाकणं बघून मला इतका प्रचंड आनंद झाला होता ना की अक्षरशः नाचावसं वाटत होतं. जाम खुश झालो होतो. एकदम सही रे सही वाटत होतो. पूर्वी ती एक कुठल्यातरी कॅमेर्‍याची अ‍ॅड लागायची टीव्हीवर. त्यात ते बाळ चालायला लागतं पण बाबा ऑफिसमध्ये असल्याने त्याला बाळाची पहिली पावलं बघता येत नाहीत. पण आई त्या कॅमेर्‍याने बाळाच्या पहिल्या चालण्याचे फोटो काढून ठेवते आणि ऑफिस मधून आल्यावर बाबाला दाखवते. आई-बाबा दोघेही मस्तपैकी खुश होतात. तेव्हा मला ते जाम इनोदी वाटायचं. हे म्हणजे कॅमेरा कंपनीला आपला धंदा वाढवण्यासाठी अ‍ॅड एजन्सीकडून मिळालेली एक मस्त जाहिरात आणि ह्या असल्या इमोशनल अ‍ॅड बनवून उगाच तो कॅमेरा गिर्‍हाइकाच्या गळ्यात मारण्याचं कॅमेरा कंपनीचं साधं सोपं गणित आहे असं वाटायचं. जसं ते मदर्स डे, फादर्स डे आणि आणखी कुठले कुठले 'र्स' डेज त्या आर्चिज, हॉलमार्क वाल्यांकडून आपल्यावर लादले जातात ना अगदी तसंचं. पर नाय बा !! हे प्रकरण काहीतरी वेगळंच होतं. लेकाचं ते हळूहळू, सांभाळत, हळूच बिचकत, धडपडत पावलं टाकणं हा एक सर्वस्वी नवीन अनुभव होता. एक(चि)दंत सारखाच. मी मनोमन त्या कॅमेरा कंपनीची माफी मागितली आणि त्या अ‍ॅडगुरुच्या कल्पकतेला जबरदस्त दाद दिली. "लग्न पहावं करून", "घर पहावं घेऊन" सारखंच "बाप पहावं होऊन" असं जे कोणीतरी म्हटलंय ते किती खरं आहे याची सार्थकता मला पटली. आणि कोणीही म्हटलं नसेल तर या 'बाबा हेरंबानंदांनीच' ते म्हटलं आहे असं त्यांचे भक्तगण (आणि वाचकगण) खुशाल समजू शकतात... नाही समजाच !!

होता होता पहिल्या पावलांचं कौतुक सरू लागलं होतं. म्हणजे ते नित्याचंच झालं होतं किंवा नव्याचे नऊ दिवस सरले होते म्हणून नाही पण बघता बघता त्या पावलांचं क्षितीज विस्तारू लागलं होतं. (आई ग.. चुकून लळित कादंबरीत शिरलो.).. सोप्पू भाषेत सांगायचं तर पूर्वी रांगत येणार्‍या बाळराजांना आता रांगण्यामुळे येणार्‍या अडथळ्यांची पर्वा करायची गरज उरली नव्हती. त्यामुळे अडखळत्या पावलांनी का होईना पण त्यांचा घरभर मुक्त विहार सुरु झाला. मग डायनिंग टेबलजवळ जाऊन चौड्यावर उभं राहून टेबलवरून अंदाजाने हात फिरवणं सुरु झालं, हाताला काहीच लागलं नाही तर टेबलक्लॉथ खेचण्याचे प्रयत्न करून झाले, गॅसच्या बटणांना बोटांची टोकं जेमतेम पोचत असल्याने ती फिरवण्याचे प्रयत्न करून झाले, आंघोळीला गेलो की मागोमाग येऊन बाथरूमच्या बाहेर गाण्या-बजावण्याचे म्हणजे राग 'किरकिर' गाण्याचे आणि बाथरूमचं दार बाहेरून 'बजावण्याचे' कार्यक्रम झाले, ड्रेसिंग टेबलचे ड्रॉवर उघडायचे प्रयत्न करून झाले, ते चुकून माकून उघडले गेलेच तर त्यातल्या वस्तू बाहेर फेकण्याचे प्रयोग करून झाले. तर कौतुक सरू लागलं होतं ते या अर्थी. त्याची जागा उगाच टेन्शनने किंवा त्याच्या मागे कराव्या लागणार्‍या धावपळीने आणि त्यामुळे होणार्‍या दमछाकीने घेतली. थोडक्यात मला आडवा आणि उभा किंवा एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस थोडक्यात हॉरीझॉण्टल आणि व्हर्टिकल यांच्यामधला फरक एवढा सोदाहरण स्पष्ट करून सांगणारा महागुरु आजवर भेटला नव्हता आणि या बळीराजाला तो फरक आम्हाला समजावून द्यायला तीन पावलंही लागली नाहीत.


हल्ली मी आनंदाने पिझ्झा खातो आणि तोही विथ एक्स्ट्रॉ चीज.. पनीरच्या भाज्या, आईसक्रीम्स, पावभाजीवर एक्स्ट्रॉ बटर हे सगळं अगदी बिनधास्त चालू असतं. पूर्वी माझ्या पोटाकडे बघून हसणारे, माझ्या फिटनेसची खिल्ली उडवणारे माझे मित्र हल्ली दबून असतात. "याच्या फ्लॅटस्क्रीन पोटाचं रहस्य काय, कुठल्या जिमला जातो हा" असले प्रश्न त्यांच्या चेहर्‍यावर थुईथुई नाचताना दिसतात मला. पण मी त्यांच्याकडे विशेष लक्ष न देता माझ्या फिटनेस ट्रेनरचं गुपित हे गुपितच ठेवतो. एकीकडे "आज टेबलावरून पडून काय काय फुटलं असेल" असा विचार करत करत..  !!

32 comments:

 1. दादा
  अरे खुपच छान झालीय पोस्ट....मला तर जाम आवडली बाबा..."माथाटीप ""प्रगट स्वगत""प्रगट प्रगट " "
  "बघितलंस SSSSS??" मातोश्री चित्कारल्या

  "...." आमचं ओशाळ हसु.

  "...." तिच्या चेहर्‍यावर फणकारा"तर मस्तच....खरच किती छान वाटत असेल न तुला आदितेयला चालताना पाहून...अन पोस्टच नाव मस्त आहे...बाकी ते पिझ्झा न खायचं ठरवलं होतास न ....

  ReplyDelete
 2. आभार सागर.. असाच थोडा टीपी.. :)

  अरे जाम धमाल येते त्याचं धडपडत चालणं बघताना..

  ReplyDelete
 3. बधाई !!!पेढे कुठे आहेत.....??????सोबत पेढ्याचा फ़ोटु टाकला असता तर अतिउत्तम झाले असते..बाकी पोस्ट मस्तच ..डोळ्यासमोर उभे राहिले चिरंजीव..आता सज्ज व्हा......हळु हळु सगळं घर खाली येइल...[मग पोस्ट ही टाकायला वेळ मिळणार नाही नां...][:फ][:)]पुन्हा एकदा अभिनंदन !!

  ReplyDelete
 4. अभिनंदन...... थोडक्यात काय तर अदितेय ऐकतोय माझे..... त्याला सांगितलेच होते की बाबाला जरा नवा टॉपिक दे..... तर बाळं चालायला लागले, आता पोस्ट बघ कश्या वाढतील, नित्य नवे उद्योग!!!

  हो धोक्याचा ईशारा....आता हळूहळू जीभही चालायला लागेल बघ...तयार रहा!!!

  पोस्ट एकदम हेरंबशिक्का असलेले त्यामुळे मस्त... आणि हो माथाटीपेचे जागतिक हक्क तुझ्या नावावर करून घे लगोलग!!!

  ReplyDelete
 5. आभार माऊ.. Actually पोस्ट टाकायला जरा उशीरच झाला. ही चालाचाली सुरु होऊन १०-१२ दिवस होऊन गेलेत. त्यामुळे पुढच्या संभाव्य धोक्यांची चांगलीच कल्पना आली आहे. त्यामुळे एकदम सज्ज आहोत आता :)

  ReplyDelete
 6. आभार तन्वी.. हो ग ते जागतिक हक्क लगेच करून घेतले पाहिजेत माझ्या नावावर :)

  याच्या जेमतेम ८-१० दिवसांच्या चालण्याने एक पोस्ट आणि नाकी नऊ आले आहेत.. आता पुढे तर अजूनच कठीण जाणार आहे. आणि जिभेचा पट्टा चालायला लागला की मग तर संपलोच. ईशानचे प्रश्न आहेत लक्षात :D

  ReplyDelete
 7. फ़र्मास झालंय....अभिनंदन आणि सावधान....हे हे....आता पळणं(ते तू हे वाचेपर्यंत सुरूही झालं असेल) आणि बोलणं हे दोन सुरु होतील आणि मग तुम्ही दोघं बेबीप्रुफ़िंगवर पी.एच.डी कराल बघ....:)
  चल आता त्यानिमित्ताने तुझं पोट कमी होतंय हेही चांगलं आहे पण त्यासाठी आम्हाला पिझ्झा आणि ते ही ए.ची...असं सांगुन तोंडात सक्काळ-सक्काळी पाणी आणवून द्यायची काय गरज होती का रे??? त्यासाठी निषेध....

  ReplyDelete
 8. आभार अपर्णा.. बाप रे पळणं आणि बोलणं. नुसतं ऐकूनच घाम फुटतोय मला..
  अग पिझ्झा आणि पुलं शिवाय एक तरी पोस्ट पूर्ण होते का आपली? :-)
  त्या ए. ची. पिझ्झा निमिताने तेवढीच सगळ्या पिझ्झाप्रेमींची आठवण.
  अग निषेध करण्यापेक्षा या वीकेंडात 'मोज' ला जाण्याऐवजी पिझ्झाहट ला जा ना :-)

  ReplyDelete
 9. इतके कंस ... मला वाटते श्रीकृष्ण बोलवावा लागणार ते मारायला.. हेहे ..(फालतू होता हा जोक) अभिनंदन रे बापा... :) ह्यावेळी जाताना १ दिवस थांबून तूला भेटून जाऊ का असा विचार करतोय. तुझ्या पोराला पण बघिन...पुन्हा ४-५ महीने इकडे येणे नाही आता!!!

  ReplyDelete
 10. बाळराजांच्या पाऊलांचा फोटो पाहून हि पोस्ट साहेबांवरच असणार याचा अंदाज आलाच होता ;)
  परंतु त्यांचे कारनामे वाचायची आता सवय झालीय आणि त्यावाचून राहवत हि नाही त्यामुळे लगेच वाचायला घेतली
  खूप खुश असशील ना ? कितीही काही म्हंटले तरी मुलाला पहिले पाऊल टाकताना पाहणे यासारखा आंनद दुसरा नाही हे पटले असेलच

  ReplyDelete
 11. हा हा हा.. आभार रोहन, नाही रे फालतू नाहीये हा जोक. मी पण टाकणार होतो actually. पण नीट बसत नव्हता आणि तसाच घुसडला असता तर फारच फालतुगिरी वाटली असती. पण कमेंटमध्ये वाचायला झ्याक वाटतोय :)
  अरे आणि विचार कसला करतोयस.. डन डील... आपण भेटतोय.. विचार कृतीत आणून टाक नक्की. :)

  ReplyDelete
 12. धन्यु विक्रम. कारनामे तर एकसेएक चालूच असतात :)
  अरे खरंच.. तो दुडकं चालणं बघायला तर जाम धम्माल येते..

  ReplyDelete
 13. अभिनंदन..
  मजा असते रे. तुझ्या पोस्ट आठवतांना आमच्या मुलींचं लहानपण आठवतंय. लिहिणार होतो इथे, पण जाउ दे.. म्हणशिल प्रत्येक पोस्टला हा आपलं काहीतरी सांगत असतो म्हणून..

  ReplyDelete
 14. आभार काका :-) अहो उलट बरं आहे की तुम्हाला तुमचे जुने दिवस आठवतायत.. आणि आता काहीही झालं तरी तुमच्या Parenting days वर एक पोस्ट पाहिजेच.. माझी उत्सुकता जाम वाढलीये.. स्पेशल रिक्वेस्ट समजा हवं तर !! :-)

  ReplyDelete
 15. aaditey chaltana pahun amhalach etke chan vatte,tat tumhala pratyaksh pahun kiti anand hot asel yachi janiv post vachun hote.mastch zalay blog manjiri

  ReplyDelete
 16. खरंच काकू, जाम धमाल येते.. आणि चालायला लागल्यावर तर मस्ती अजून अजून वाढत चालली आहे.

  ReplyDelete
 17. बाळाच्या सगळ्याच पहिल्या पहिल्या गोष्टींचे खूप अप्रुप वाटते. अजयने तर आर्यनचा email id तयार केला आहे आणि त्याच्या अशा महत्वाच्या आणि गमतिच्या सगळ्या गोष्टी त्याला mail करतो, मोठा झाल्यावर त्याला मजा येइल वाचायला. आदितेय चालायला लागलाय ना, तयार रहा सगळ्या उचलता येतिल त्या वस्तु एका खोलीतुन दुसर्‍या खोलीत नेवुन ठेवणे हा आवडता उद्योग सुरु होइल. पण धमाल येते.
  सोनाली

  ReplyDelete
 18. बाबा हेरंबानंद...ती माथाटिप...बाप पहाव होउन...सगळच भारी...
  नेहमीसारखीच खुसखुशीत पोस्ट..एकचिदंत फ़ेम आदितेय महाराजांच्या पुढील भीमपराक्रमांना तोंड देण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा...:)

  ReplyDelete
 19. अगदी खरं.. प्रत्येक गोष्टीचं खूप अप्रूप वाटतं. इतरांचं ऐकतो तेव्हा त्याबद्दल विशेष असं काही वाटत नाही पण जेव्हा ते आपल्या बाळाच्या बाबतीत घडतं तेव्हा त्या प्रत्येक नवीन घडणार्‍या गोष्टीचा अर्थ कळतो आणि खूप मस्त वाटतं.

  वा सगळ्या गोष्टी आर्यनला मेल करून ठेवण्याची आयडिया एकदम मस्त आहे.

  आदितेयचा पण जीमेल आयडी आणि ऑर्कूट अकाऊंट आहे. त्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा मला माझ्या सगळ्या मित्रांना, कलिग्स टिपिकल पद्धतीने मेल करून बातमी सांगायची नव्हती. म्हणून मग मी आदितेयचं ऑर्कुट अकाऊंट तयार केलं आणि त्याच्यावरून माझ्या आणि अनुजाच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली.. And that's how they got the news :-)

  ReplyDelete
 20. हा हा.. आभार देव.. असाच जरा टीपी.. अगदी बरोबर बोललास.. भीमपराक्रमच आहेत त्याचे.. आणि त्यासाठी शुभेच्छांची मला गरज होतीच.. आभार :-) ..

  ReplyDelete
 21. अभिनंदन... आता बाळ चालू लागलंय, त्यामुळे तुमची अजुनच फजिती होणार हे नक्की..!! हा हा..!

  - विशल्या!

  ReplyDelete
 22. आभार विशल्या.. हो फजिती तर जीवनाचा अविभाज्य घटक आहे आता. शी किती छापील.. थोडक्यात रोजच पोपट होत असतात :-)

  ReplyDelete
 23. हेरंब, अभिनंदन! सॉरी रे जरा उशीरच झाला.( फार गडबड- शोमूने पळवपळवले आणि आता तो स्वत: गायब झाला. ) आदी ( तुझी परवानगी न घेताच मी त्याचे आदी हे नामकरण करून टाकलेय.) चालू लागला. चला आता वस्तूंच्या जागा बदला. वरच्या फळ्यांवर रवानगी होऊ देत. लॅपटॉप सांभाळ रे. पोस्ट मस्तच (नेहमीप्रमाणे ) पण आदीची असल्याने अजूनच खास झालीये. सवत माझी दोडकी चा उध्दार लयी भारी.

  ReplyDelete
 24. वाटलंच मला तुम्ही गडबडीत असाल म्हणून. छे. अहो परवानगी कसली त्यात..
  हो त्याच्यामुळे आता मला पण थोडी शिस्त लागलीये. वस्तू वेळच्यावेळी जागच्याजागी जातात माझ्या. तुटण्याफुटण्यापेक्षा ते बरं ना :-)

  आणि सवत माझी दोडकीचा उध्दार आमच्याकडे तिन्ही त्रिकाळ होत असतो :-(

  ReplyDelete
 25. हेरंब, सकाळी सकाळी किती जोराने हसावं माणसाने ? तुझी पोस्ट वाचून सकाळी ६:३० ला मी मित्राची झोपमोड केली :)
  अभिनंदन, आदितेय चालू लागल्याचे आणि तुझ्या ब्लॉगला प्रथम पारितोषिक मिळाल्याचे....

  ReplyDelete
 26. :-) आभार आनंद. हो जरा जास्तच आचरट झालीये ही पोस्ट ..:P

  अरे आणि त्या प्रथम पारितोषिकाबद्दल सलीलला मेल टाकलं होतं त्याचा रिप्लाय आलाय की तो लकी ड्रॉ मधून आहे. सो माझं कर्तृत्व शून्य आहे. सगळं माझ्या नशिबाचं कर्तृत्व ;-)

  ReplyDelete
 27. अभिनंदन. . .चला, बाळराजे चालायला लागले म्हणजे आता नवनवीन पराक्रम आम्हाला ऐकायला मिळतील. . .माथा टीप जबर्‍या आहेत!!!! मस्त झाली आहे रे पोस्ट!!! अन् हो अभिनंदन...आत्ताच नेट भेट वर निकाल वाचला!!!

  ReplyDelete
 28. sahich mi tula mhatal hota na dat aalyawar itak changle lihilas tar chalayala lagalyawar kay karshil. solid mast lihil aahes mazya dolyasamor aaditey yeto aahe table varachya vastu odhatanacha

  ReplyDelete
 29. आभार मनमौजी. हो आता पराक्रमच पराक्रम. फक्त लिहायला वेळ झाला पाहिजे.. माथाटीपा जरा आचरटच झाल्यात. पण ठीक्के. सगळे आपलेच आहेत. सांभाळून घेतात :-)

  हो.. तो लकी ड्रॉ मध्ये आला नंबर. पुढची पोस्ट टाकली आहे बघ.

  ReplyDelete
 30. अग हो :-) चालायला लागल्यावर लिहीन असं वाटलं नव्हतं. तू म्हणालीस तेव्हा सुचलं :-)
  अग टेबलवरच्या वस्तू ओढणं त्याचं जाम आवडतं काम आहे.

  ReplyDelete
 31. mastach watal re wachayla... kharach jitki majja mulana wadhatana baghanyat asate ti kashatach nasate pan at the same time you can never forget someone's saying "raising kids is a part joy and part Guerilla warfare".
  Enjoy your fatherhood to the fullest..cheers

  ReplyDelete
 32. खूप आभार श्वेता !! खरंच जाम धम्माल येते ना पहिला दात, पहिलं पाउल असे सगळे पहिले अनुभव घेताना.

  On a lighter note, from that saying, in my case the later is more prominent ... LOL.

  ReplyDelete