Friday, March 26, 2010

माझे(ही) खादाडीचे प्रयोग !!

लोकं खादाडी खादाडी करत, नव्या रेसिप्या देत, नवीन नवीन हॉटेल्सची आणि तिथल्या डिशेसची नावं सांगत, नवीन नवीन पोस्ट्स टाकत, असले जळवायला लागले आहेत ना आजकाल की म्या बी ठरिवलं की खादाडीवरची कायतरी लय भारी पोस्ट टाकायची आज. तेवढाच जरा दुर्बळाचा जोरकस सूड ('जोर का झटका' चं सुटसुटीत मराठी भाषांतर) !!

रेसिप्या वाचण्यापूर्वी घ्यायच्या दक्षता आणि आपल्या मनाला द्यायच्या सुचना उर्फ मध्यटीप (तळ झाली, माथा झाली आता हीच राहिली होती) :

१. प्रत्येक कृती आपल्या जवाबदारीवर करून आणि खाऊन बघणे. हे असलं खाऊन पोट न बिघडता, कसलेही आजार न होता लेखक सुखरूप राहिला म्हणजे आपणही राहु असे गृहीत धरून चालण्याचे काहीच कारण नाही.

२. कृतीत दिल्याबरहुकूम सर्व करूनही आपला पदार्थ लेखकाच्या पदार्थाएवढा चविष्ठ झाला नाही तरी नैराश्याने ग्रासून घेण्याचे कारण नाही. प्रयत्नांती परमेश्वर.

३. हे इनोदी लिखाण वाटत असलं तरी ते तसं नाही. यातील प्रत्येक पदार्थ लेखकाने जसाच्या तसा करून आणि खाऊन बघितला आहे आणि तृप्ततेची जोरदार ढेकरही दिलेली आहे. हो हो प्रत्येक वेळी.


पदार्थ १ : कोरडं मॅगी

१. मॅगी म्हटल्यावर उगाच धावपळ  करून मटार, बटर, गाजर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असले काही पदार्थ आणायला न धावता एका पातेल्यात न मोजता दोन कप पाणी घाला (पदार्थाच्या यशस्वितेसाठी अतिशय महत्वाचा मुद्दा) आणि पातेले गॅसवर ठेवा. अरे हो आणि गॅस चालू करा.

२. एका घावात मॅगीच्या पाकिटाला वरून छेद द्या. (याचा चवीशी काहीही संबंध नसला तरी स्वतःबद्दल 'प्रो' आणि 'यो' फिलिंग हवं असेल तर हे काम एका घावात करता आलं पाहिजे.)

३. मॅगीचे एकसर, समान तुकडे करण्याच्या बिरण्याच्या भानगडीत न पडता दणाद्दण कसेही तुकडे करा. (तोंडात आणि पोटात गेल्यावर कोण बघतंय त्यांची फिगर उर्फ आकार?)

४. हे तुकडे करायला बरोब्बर २ मिनिटं लागतात (मॅगीवाले काय मुर्ख वाटले का २० वर्ष "२ मिनट, २ मिनट" करून ओरडायला?) त्यामुळे तुकडे होताक्षणी ..................... काय कराल सांगा बरं? जर ते तुकडे पातेल्यात घालणार असाल तर फसलात... चूक. आधी गॅस बंद करा लगेच. गॅस बंद झाल्याची खात्री झाल्यावर ३ नंबरचे (म्हणजे ३ नंबरच्या मुद्द्यातले) तुकडे ४ नंबरात आपलं सॉरी गॅसवरच्या उकळत्या पाण्याच्या पातेल्यात घाला.

५. पातेल्यावर ताटली ठेवा. बरोब्बर २ मिनिट हरिनाम घेत निवांत बसा. (दमला नसाल तर बागडण्यास हरकत नाही)

६. २ मिनिटांचा अलार्म वाजल्यावर (मी लावतो बाबा. मॅगी उगाच जास्त का शिजू द्यावं? ग्लोबल वार्मिंग बाब्बा. हो गॅस बंद असला तरी ग्लोबल वार्मिंग म्हटलं की भारदस्त वाटतं ना.) लगेच गॅसच्या दिशेने धावा.

७. मागचा पुढचा विचार न करता पातेल्यातलं सगळं प्रकरण गाळण्यात ओता. तत्पूर्वी गाळण्याखाली वाटी, बौल, ताटली (चमचा चालणार नाही) धरण्यास विसरू नका.

८. सगळंच्या सगळं पाणी काढून झाल्यावर गाळण्यातला सगळा प्रकार पुन्हा बॅक टू पॅव्हीलीयन आणा. म्हणजे पातेल्यात हे तर कोणालाही समजेल. असो.

९. पुन्हा एका घावात मसाला पाकिटाला वरून छेद द्या (इथेही चवीचा काही संबंध नसला तरी आरामात कापत बसल्याने मॅगी गार होण्याची शक्यता असते (म्हणजे होतंच) आणि मग ते चांगलं लागत नाही. म्हणून सांगितलं हो. बाकी काही नाही. बाकी तुम्ही आपल्या मर्जीचे मालक.)

१०. सगळा मसाला पातेल्यात ओतून झक्कपैकी ढवळा.

११. आता ओरपा..

झालं की नाही ४ मिनिटात आणि ११ पावलांत आपलं मॅगी तयार ?

पदार्थ २ : मॅगीवडे

११. कृती क्र १ ते १० अगदी शेम टू शेम. पण कृती क्र ११ मधे ओरपण्याच्या ऐवजी थोडी मेहनत घ्यावी लागेल. ढवळून ढवळून घट्ट करून झाल्यावर पातेल्याला चिकटलेलं मॅगी त्यात जरासं तेल सोडून हलकंफुलकं, तजेलदार, तेलकट करून घ्यावं.

१२. ते ओढून काढून त्याचं वड्याच्या आकाराचं काहीतरी थापून गोल करून घ्या.

१३. कढईत तेल घालून ते गरम होऊ द्या.

१४. तेल गरम झाल्यावर वडेसदृश्य पदार्थ तळायला लागा. खमंग झाल्यावर बाहेर काढा.

१५. पदार्थ-१ मधल्या ११ नंबरच्या वाटेने चालू लागा.

(पदार्थ-१ मधे दिल्याप्रमाणे मॅगी करताना मागे एकदा ते एवढं कोरडं झालं होतं की पातेल्याला चिकटूनच बसलं. आम्हाला पातेल्यात तेल घालून ते ओढून काढावं लागलं. आणि नंतर ते तेलकट मॅगी काय खायचं त्यामुळे त्याचे वडे करून आम्ही चक्क ते तळून खाल्ले होते. कालांतराने हीच आयडिया नेस्टलेच्या डोक्यात येऊन तेही ऑफिशीअली  मॅगी-वडे विकायला लागले असल्याचे स्मरते. असो. या पदार्थाचा जन्म अर्थातच त्या किश्श्यावरून झाला आहे.)

पदार्थ ३ : पांचट मॅगी

एवढं कोरडं मॅगी किंवा मॅगीवडे खायचे नसल्यास पदार्थ-१ मधल्या स्टेप ८ मधे सगळं पाणी काढून टाकण्याऐवजी थोडं पाणी शिल्लक ठेवून त्यात मसाला घालून ढवळा. झालं पांचट मॅगी. यामध्ये तळणासाठी कढईत सोडण्याचं आणि चिकटलेलं मॅगी सोडवण्यासाठी पातेल्यात घालायचं तेल वाचलं आहे. तेवढंच जरा फॅटफ्री, कोलेस्ट्रॉलफ्री मॅगी.

पदार्थ ४ : आपापल्या पद्धतीचं मॅगी

पदार्थ १, २, ३  वाचायला, करायला किंवा करून झाल्यावर खायला आवडले नसतील (आठवा मध्यटीप. म्हणूनच स्पष्ट लिहिलं होतं तसं. उगाच बोलायचं काम नाय) तर आपण आपापल्या पद्धतीने मॅगी करू शकता. अरे हो नाहीतर मॅगीच्या पाकिटाच्या मागेही रेसिपी दिलेली असते म्हणे !!!

तळटीप :

१. कुठलेही फोटो टाकायची आवश्यकता नाहीच नाही का? तरीही त्यातून फोटोजशिवाय पोस्ट अपूर्ण वाटत असेल तर वाईस गुगल करा.
२. कुठल्याही निषेधाशिवाय वाचली जाणारी खादाडीवरची ही पहिलीच पोस्ट असेल !!! :D

50 comments:

 1. यकदम फ़ुल टु अजिबात निषेध नसलेली...लोटपोट बगा आक्षी....आता मॅगी आणलं की पहिलं डाव तुमचीच आटवन येनार बगा....
  मला वाटतं आजची तुझी आणि माझी दोनी बी पोस्टा त्या ’सेनापती’ करता यकदम योग्य....काये तो सध्या ती पानचट मॅगी खात असनार बग....कुटं गायब हाय....

  ReplyDelete
 2. वा वा.. निषेध न घेता खादाडीच्या पोस्ट वर कमेंट मिळवणं म्हणजे चांगलंच पुण्य गाठीशी झालं की :-)

  वा. आता पुढच्या टायमाला १/२/३ कुठल्या पद्धतीने करणार हायसा त्येबी सांगून ठ्येवा..
  हो ना सेनापती तर गायबच आहेत....

  ReplyDelete
 3. आज मॅगी पावन झाली. :D तुझी नंबर एक कृती शोमूची फेवरीट. आणि शेम टू शेम करतो रे तो. मॅगीवडे मी कधी केलेले नाहीत. हिमंत करावी म्हणतेय... (तुझ्या जबाबदारीवर....:P )मग आज घरी मॅगी क्रमांक...????

  ReplyDelete
 4. अरे वा. शोमुला सेमपिंच सांगा :) आणि ते मॅगीवडे पण accidently झाले. म्हणजे करावे लागले. पण छान झाले होते एकदम... तुम्ही पण करून बघा. मस्त लागतात :) खरंच.. :-)

  ReplyDelete
 5. मस्त पोस्ट :) अरे मला विचार मॅगीचे किती किती प्रकार करतो ते काही खायला नसेल किवा पहाटे खायचा मूड झाला की...:)
  १. सेजवान मॅगी
  २. चीझ मॅगी
  ३. एग मॅगी
  ४. सांबार मॅगी
  ५. फोडणीचा भात मॅगी
  ६. मॅगी सूप..
  अजुन भरपूर आहेत आणि भरपूर प्रकार येतील पण लवकरच...

  ReplyDelete
 6. हा हा.. अरे वा. सहीये. अरे पण या सगळ्याला वेळ लागतो ना जाम. आपलं (म्हणजे माझं) कसं आळश्याचं मॅगी ना. म्हणून झटपट. :-)

  ReplyDelete
 7. एकदम मस्त आहे तुझी पोस्ट अन मॅगी खाल्ल्याशिवाय काय सांगणार..खूप म्हणजे खुपच इनोदी आहे यार...खूप हसलो मी....
  अन हो पुण्यवान आहेस कारण माझ्याकडून निषेध नाही

  ReplyDelete
 8. वेळ कसला १० मिनिटे लागतात वरच्या प्रत्येक रेसीपीला..अनुभवाचे बोल आहेत बाबा :)

  ReplyDelete
 9. आलो रे आलो... सेनापति आलेला आहे. मॅगी का!!! वा. मज्जा आली वाचताना. २००६ साली नोर्वेला असताना मॅगी बरोबर काय-काय प्रकार केले होते ते आठवले. ६ आठवडे दररोज एकदा तरी मॅगी... काय पुन्हा अतिरेक ना??? हेहे... :)

  ReplyDelete
 10. हा हा सागर :D .. मॅगी खाल्ल्याशिवाय काय होणार :) .. अरे वा पुण्याचं गाठोडं भरत चाललंय.. अजून एक नो-निषेध !!

  ReplyDelete
 11. :) सुहास, दहाच मिनिट्स आहेत मग ठीक आहे बाबा :-)

  ReplyDelete
 12. सेनापती, ते मॅगीचे सगळे प्रकार टाका की मग खादाडीच्या ब्लॉगवर.. वाट बघतोय.

  ReplyDelete
 13. हेरंब
  तुझे मॅगी वडे एका हॉटेलमधे खाल्ले होते गोव्याला. कोलवा बीचवर एक बार आहे, तिथे ह्या मॅगीवड्यांचा सुधारीत प्रकार म्हणजे चिकन टिक्का नुडल्स डीप फ्राईड विथ शेजवान सॉस अशी माहिती लिहिलेला एक पदार्थ ( त्यांचं नांव विसरलो आज) मिळतो. त्यामधे चिकन टीक्का मॅगीमधे गुंडाळून डिप फ्राय करतात . खूप मस्त लागतो, बिअर सोबत..
  तुझे वडे पण मस्तंच लागत असणार..
  (तळटीप:- बाकी रेसिपी मस्त जमली आहे बरं का. माझ्या बायकोने, एगलेस केक करता करता, त्याचे शंकरपाळे झाले होते. ( आमच्या घरी अंडं पण चालत नाही कोणालाच)त्यावर पण लिहितो एखादी पोस्ट लवकरच. इतके विषय असतात लिहायला, फक्त वेळ कमी पडतो

  ReplyDelete
 14. अरे वा. माझे मॅगीवडे गोव्याला पण पोचले तर.. बरंय.. :-)
  हा हा एगलेस केकचे शंकरपाळे.. टाका ना तो किस्सा. वाचायला आवडेल. अर्थात सुपर्णाताईंची हरकत नसेल तर :-)

  तुमच्याकडे विषय आहेत तर वेळ नाही आणि आमच्याकडे वेळ आहे तर विषय नाहीत. मग या असल्या मॅगीच्या पोस्ट्स पाडाव्या लागतात :P

  ReplyDelete
 15. लै भारी राव, तेवढंच जरा फॅटफ्री, कोलेस्ट्रॉलफ्री मॅगी हे...हे...हे

  ReplyDelete
 16. :-) आनंद आभार. तेवढंच जरा काहीतरी चांगलं शोधायचं मॅगीमध्ये. नाहीतर मॅगी कसंही असलं तरी तब्येतीला वाईटच !!

  ReplyDelete
 17. ही पोस्ट माझ्या लेकाला दिली पाहिजे रे बाबा वाचायला.....

  कसला भन्नाट प्रकार आहे हा!!!
  अरे हो ईशानने एकदा ८ दिवस रोज सकाळी त्याच्या सुगरण (!) मावशीच्या हातून मॅगी खाल्ले होते, आणि आठवड्यात गुरुवारी बाबाचा उपास असतो याची आठवण ठेवत रोजचेच मॅगी, ’उपवासाचे मॅगी ’म्हणून खाल्ले होते :D

  आणि आम्ही हॉस्टेलला असताना तर काय रे रात्री अगदी २ वाजताही मॅगी खाल्लेले आहे... आज तुमने हमको वो (बिते ) दिन याद दिला दिये !!!

  मध्यटीप हेहे ...लगे रहो!!!!

  ReplyDelete
 18. नक्की दे. हा हा हा 'उपवासाचे मॅगी'.. तुझी लेकरं तर भन्नाटच आहेत ग. प्रत्येक पोस्ट/कमेंट मध्ये काहीतरी नवीन पराक्रम कळतो.. मजा आहे :D

  अग बिते दिन कशाला... अजूनही कर की मॅगी रात्रीच्या वेळी (अगदी २ नको पण ११-१२ ला वगैरे).. और आजभी जीलो वो दिन...

  मध्यटीपेला न्याय दिल्याबद्दल आवर्जून आभार :P

  ReplyDelete
 19. हेरंब, तुम्ही लिहिणं बंद करा पाहू ! कॉंप्लेक्स येतो बाकीच्यांना. इतकं चांगलं आणि इतक पटापट कसं काय लिहु शकता राव?

  ReplyDelete
 20. साधकला अनुमोदन (लिहिणं बंद करा सोडुन) ;-)

  ReplyDelete
 21. बा साधका, आपलं समाधान हाच आमचा फायदा ;-) आणि तसाही जामच पांचटपणा (मॅगीपेक्षाही जास्त) चाललाय सध्या. तो थोडा कमी करावा लागणार आहेच :-)

  ReplyDelete
 22. ब्रुटस(आनंद), यु टू?? ;-)

  ReplyDelete
 23. सत्यवाना बाबा रे. .. त्या मॅगी वड्यांच पेटंट घेऊन टाक रे!!! मॅगी वडा आजच ट्राय करतो!!!

  ReplyDelete
 24. घेतलं घेतलं.. :-) अर्रे नक्की ट्राय कर. आवडणारच.. आपली गॅरंटी आहे. कळव कसा झालेला ते.. :)

  ReplyDelete
 25. हा हा हा, मॅगी वडा लई भारी! बाकी प्रकार तर काय, एक से एक! रेसिपी सांगण्याची पध्दत तर एकदम कै च्या कै! आवडलं :-)

  ReplyDelete
 26. आभार :-)... यस्स.. मॅगी वडा तर भारीच आहे.. ट्राय कर एकदा.

  ReplyDelete
 27. मॅगी न आवडणारा जगी असा कोण आहे ?
  आपल्याला जाम आवडते बुआ
  चला आता तशीही वेळ झालीय पोटात भर टाकण्याची आता मॅगीवर ताव मारतो आणि ते मॅगीवाडे नक्की एकदा ट्राय मारणार बर का :)

  ReplyDelete
 28. अगदी बरोबर विक्रम.... कोणी नाही हेच योग्य उतर :-) ... लवकरच त्या मॅगीवड्यांचा फॅन क्लब काढावा असं म्हणतोय. भरपूर जण जॉईन होतील बहुतेक :-)

  ReplyDelete
 29. हे हे .... बिनानिषेध खादाडी पोस्ट टाकण्यात खरंच यशस्वी झालास की तू!

  मॅगीवडे भन्नाटच.

  मधे मी एकदा ‘खमंग मॅगी’ नावाची रेसिपी केली होती. त्यासाठी मॅगी झाल्यावर गॅस बंद करायला विसरावं लागतं, आणि तेंव्हाच फोन यावा लागतो. :D:D

  ReplyDelete
 30. खरंच शिव्याशाप न घेता खादाडी पोस्टचा मालक होणं एवढी सोप्पी गोष्ट आहे हे मलाही माहित नव्हतं :-)

  मॅगीवडे टोटल भन्नाट आहेत. ट्राय करून बघ इतरांप्रमाणेच :-)

  हा हा हा 'खमंग मॅगी'... मॅगी, गॅस चालू आणि फोन. वा वा वा... जब्बरदस्त कॉम्बो आहे हे तर.. असे खमंग उपमे, पोहे केले आहेत मी १-२ दा :P

  ReplyDelete
 31. सुंदर,
  मॅगीवडा आजच करून बघतो.

  ReplyDelete
 32. आभार नॅकोबा.. नक्की करून बघ.. आणि ब्लॉगवर स्वागत !!

  ReplyDelete
 33. करून पाहिले आज मॅगिवडे. काहीही तळायची पहिलीच वेळ तरीही चविष्ट लागलं :)

  ReplyDelete
 34. वा वा नॅकोबा.. जबरी.. आपण महान आहात. खरंच केलेस मॅगीवडे.. सहीच... :-) आणि आवडलेही म्हणून डबल सही !!

  ReplyDelete
 35. मॅगी वर एक पोस्ट??? हेरंब तु तर कल्पनाशक्तिचा कळस गाठलास रे! खरच असल्या लहान सहान गोष्टी आपल्या किती जीव्हाळ्याच्या असतात नाही... मजा आली वाचून! धन्यवाद!

  ReplyDelete
 36. अभिलाष, ब्लॉगवर स्वागत !! अरे मी असंच दिसेल त्याच्यावर आणि सुचेल तसं लिहितो.. :-) आणि या अशा लहान सहान गोष्टींत मॅगी तर जामच जिव्हाळ्याचं आहे यात शंकाच नाही :-) .. प्रतिसादाबद्दल आभार..

  ReplyDelete
 37. "स्वत:बद्दल प्रो आणि यो फ़िलिंग" he he he he मॅगी करताना मी हात झटकात "यो" म्हणतेय असं डोळ्यासमोर आलं. बाकी मॅगीवडे हा प्रकार इथेच वाचला, दचकले रे केव्हढी. खरंच बरे झाले होते का रे? नाही या रविवारी करून सासुबाईंवर विंप्रेशन मारावे म्हणते :p :D :D i just can't stop. मॅगीचे वडे ही सुगरणपणाची कमाल झाली रे! जय हो!

  ReplyDelete
 38. हा हा.. म्हणजे काय.. आपल्याला प्रत्येक बाबतीत प्रो आणि यो फिलिंग लागतं. !! :P
  दचकलीस?? हा हा . एकूण दचकवणाराच प्रकार आहे तो. अग मी पण एकदाच केले.. म्हणजे करावे लागले.. नंतर एकदाही (वेळ आली) नाही.

  सासूबाईंवर ब्याड ब्याड विंप्रेशन मारायचं असेल तर कर बापडी.. ;-) पेक्षा आपले उपमा, पोहे ब्येष्ट !!

  ReplyDelete
 39. he he he नको असलेल्य पाहुण्यांचा पहुणचार करायला बरी आहे ही डीश

  ReplyDelete
 40. एकदम टेस्टी झाली आहे पोस्ट... :)

  ReplyDelete
 41. खु खु आभार्स, देव :-)

  ReplyDelete
 42. jara late comment lihitoy mitra.. maaf kar.. madhe jara time miLala nahi..
  Post nehemi sarkhich jabrdast.. Maggi sarkhich teshtyy.....
  :)

  ReplyDelete
 43. तेच म्हटलं बरेच दिवस गायब होतास..
  धन्स.. सब मॅगी का कमाल हय !! :-)

  ReplyDelete
 44. झ्याक हाय. आमीबी असंच कदीतरी करतो बगा. मॅगी आमास्नीबी लई आवडते. येकदा तर मसाला न्हवता म्यागीत घालायला म्हनून आमचुर पावडर घातल्याचं बी आटवतंय बगा. थोडी म्यागी म्या खाल्ली आन्‌ बाकीची टाकल्याबद्दल मित्रांच्या श्या खाल्ल्या!

  ReplyDelete
 45. चांगली रेसेपी आहे, पेटंट करून घे :)

  ReplyDelete
 46. संकेत, मॅगीत आमचूर पावडर?? हा हा हा !! असलं काही केल्यावर मित्रांच्या शिव्या नाहीतर काय मॅगीवडे मिळणार?? ;)

  ReplyDelete
 47. प्रसिक :) .. लवकरच पेटंट करून घ्यायला लागणार आहेच :)

  ReplyDelete
 48. आत्ता मॅगी खाल्ली तुझी पोस्ट वाचत वाचत.(खात खात पोस्ट नाही वाचली)

  मस्त होती तुझी पोस्ट अन हो मॅगी सुद्धा :)

  ReplyDelete
 49. पोस्ट वाचत वाचत मॅगी... हाहाहा.. जबरी कॉम्बो !

  धन्स धन्स साबोबा :)

  ReplyDelete