Friday, April 23, 2010

बोलू वाकुडे... कवतुके...


साल : २०११/१२ वगैरे
स्थळ : घर (अर्थात स्वतःचंच. उगाच दुसर्‍यांच्या घरात डोकावण्याची मला सवय नाही. आणि डोकावलो तरी त्यांच्या घरातले किस्से मी (ब्लॉगवर) सांगत नाही.)
वेळ : सो. ते शु. मधली कुठलीही संध्याकाळ.

दरम्यान : अशा प्रकारची सुरुवात यापूर्वीही (म्हणजे ते विचित्र साल वगळता) वाचल्यासारखी वाटत असेल तर आधीच सांगतो ती माझ्याच काही दिवसांपूर्वीच्या पोस्ट मधून साभार घेण्यात आलेली आहे. चिकित्सकांनी पृ.क्र. अमुक तमुक बघावे. (त्या जगभरातल्या गाण्यांच्या रोज नवनव्या चोर्‍या करणार्‍या प्रीतमची गाणी "वा वा" करत आवडीने ऐकता आणि मी माझीच जुनी सुरुवात उचलली तर चोरी म्हणता? न्याय राहिला नाही जगात !!)
दरम्यान संपलं.

तर मी उपरोल्लेखित सालात, उपरोल्लेखित स्थळी आणि अर्थातच उपरोल्लेखित वेळी प्रवेश करता झालो. कपडे बदलून, फ्रेश होऊन आलो तर राजपुत्र (ठकसेन) गाल फुगवून कोपर्‍यात उभा. काय झालं कळेना. मी जवळ गेलो आणि म्हटलं
"एय शोनुल्या, काय झ्यालं बालाला?"
स्वारी ढिम्म 
"ए मनुली, बोलत का नाईश ग तू"
तरी पुन्हा तेच
सारखं सारखं विचारून झाली, आमिषं दाखवून झाली. मग जरा वेळाने लेकाला कंठ फुटला.

"एय बाबा.. मी काय मुग्गी आये का ल्ये?"
"नाई ले. कोन म्हनतं अशं"
"कोन काय. तुच्य मनालाश की आत्ता. नेयमीच्य मनतोश.. ती आई पन नेयमी मनते"
"काय मनते" काहीतरी बिनसलंय हे ओळखून मी "काय म्हणतो" हे शिताफीने गाळून फक्त "काय म्हणते" असंच विचारलं.
"ह्येच. शगली मुग्गीची नावं. शोनुली, मनुली, शकुली आनि ये अशच काय काय त्ये."


ठक.. क्लिक.. त्या कॉमिक्समध्ये दाखवतात तसा दिवा माझ्या डोक्यावर पेटला. (वातावरण निर्मितीसाठी तो दिवा इथे चिकटवला आहे. ठांकु गुग्ल्या !! ) अच्छा असं आहे होय रागाचं कारण.

"अले ती मुग्गीची नावं नशतात काई. आम्ही ते तुला लाडाने, प्रेमाने म्हणतो. अशच."
"पन लालाने मनायला मुग्गीची नावं कचाला पायज्येल? चोनुल्या, मनुल्या अच्यं मना की."
"अरे ते असंच. आता त्या शेजारच्या छकुलीला नाही का तिचे बाबा "ए माझ्या राजा" असं म्हणत? तसंच हे" मी उगाच खिंड लढवण्याचा अखेरचा प्रयत्न केला.
"पन छकुलीला पन त्ये आवलत नाई." 
'तुझं वय काय, बोलतोस किती?' टाईपचा लूक त्याला क्षणभरच देऊन मी सावरून घेत म्हणालो. 
"बरं आता नाही म्हणणार मुग्गीची नावं. सगळी मुग्ग्यांची नावंच म्हणू. खुश?" स्वारीने तोंड 'बहिर्वक्रचं अंतर्वक्र करून' लगेच खुश झाल्याची वर्दी दिली.

फुस्स फुस्स.. धूर धूर.. धुकं धुकं.. स्क्रीनवरची चित्रं गोलगोल फिरत स्थिरावली. माझ्यावर कॅमेरा. मी ढगाकडे तोंड करून काहीतरी विचारात गढलेलो... थोडक्यात बॅक टू फ्युचर आपलं प्रेझेंट. झालं काय की परवा लेकाशी हेच ते "शोनुली, छकुली" करत खेळत असताना हा फ्युचरवाला सीन डोळ्यासमोर चमकून गेला आणि माझं हे असं ज्यामुळे झालं ते कारण शोधताना काही वर्षांपूर्वी ब्येष्ट-हाफ बरोबर झालेला संवाद आठवला.

आमची ब्येष्ट-हाफ, आमच्या जीजुंची ब्येष्ट-हाफ, आणि बाबांची ब्येष्ट-हाफ एकत्र बसून भावी 'मिस युनिव्हर्स'च्या ब्येष्ट-हाफाला खेळवत होत्या. थोडा जास्तच यॉर्कर पडला असेल तर सरपटी टाकतो आता. तर माझी बायको, बहिण आणि आई एकत्र बसून माझ्या भाच्याला खेळवत होत्या. तेव्हा त्यांचं ते गोड गोड, लाडं लाडं, बोबडं बोलणं, ती बडबडगाणी, कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या कविता आणि दर कवितेआड पुन्हा ते गो , ला , बो बोलणं मी ऐकत होतो. त्यांच्या प्रत्येक गाण्याला, बोलण्याला, दर वेळी ते छोटुलं खिदळत होतं. शेवटी मी न राहवून विचारलं "तुम्हाला कसं जमतं हे उगाच खोटं खोटं बोबडं, लाडं लाडं बोलायला? मला तर या जन्मात जमणार नाही."

बहिण म्हणाली "अरे आपोआप जमतं. मला पण अगदी असंच वाटायचं पूर्वी. आता याच्याशी खेळताना आपोआप जमून जातं."

आईने आणि बायकोने पण तिला दुजोरा दिला. तरी मला पटेना. मी तिला म्हटलं "छे मला नाही पटत. मला हे जमणारच नाही असं लाडात बोलणं. आणि तसंही मला माझ्या मुलाशी बोबडं बोलायचंच नाहीये. मी अगदी व्यवस्थित मोठ्या माणसांसारखं शुद्ध बोलणार. उगाच हवंय कशाला ते "बोबडकांदा पळीचा दांडा.".. उगाच आपलं बोबडं बोलणं ऐकून मोठा झाल्यावर मुलाचं कंफुजन (हो आमच्याकडे घरगुती संवादात कन्फ्युजनला कंफुजनच म्हणतात. मी तरी म्हणतो) होणार की चूक काय आणि बरोबर काय, योग्य काय नि अयोग्य काय, बोबडं काय नि अ-बोबडं काय, लाडंलाडं काय नि अ-लाडंलाडं". 
माझ्या फालतू बडबडीला कंटाळून तिघींनी त्या 'मिस युनिव्हर्स'च्या नवर्‍यासकट तिथून काढता पाय घेतला. (काय हे.. निदान एकेकीने तरी जायचं !!!)

त्यानंतर कालांतराने दोन हजार नवात (अरे काय ते काय टाईम मशीन लावल्यासारखं पुढे मागे करतोयस) दुसर्‍या एका (हे महत्वाचं) 'मिस युनिव्हर्स'चा ब्येष्ट-हाफ आमच्या घरात प्रवेश करता झाला. सुरुवातीचे काही महिने बोबो-लाला (बोबडंबोबडं-लाडंलाडं) बोलता येत नसल्याने मी त्या वरच्या भाषणातले बरेचसे उतारे 'मी बाळाशी बोबडं का बोलत नाही' हे सगळ्यांना पटवून देण्यात घालवले. (किंवा हे सगळ्यांना पटवून देण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहिलो हे वाक्य जास्त चपखल बसतं तिकडे. पण असो.).. शेवटी आपण सोडून जो येतो तो बाळाशी छान गाल फुगवून (यशस्वीपणे) बोबडं बोलतो आणि छोटूकलं   हसून, खिदाळून त्याला चांगला प्रतिसाद हे लक्षात यायला लागलं. हळू हळू कुठेतरी त्या तीन ब्येष्ट-हाफांचं बोलणं पटायला लागलं होतं. आणि "काय हे, आपलं बाळ, आणि आपण त्याच्याशी संवाद साधू शकत नाही, बोलत नाही" असे काहीतरी विचार डोक्यात यायला लागले. आणि झालं.. 

श.. र.. णा.. ग.. ती... !! काही दिवसांतच मी आधी मनातल्या मनात आणि कालांतराने जाहीर शरणागती पत्करली. आई, बायको वगैरे बाळाशी कशा बोलतात, काय बोलतात, कुठला शब्द किती बोबडा बोलायचा, किती वाकडा उच्चारायचा, किती अर्धवट म्हणायचा या सगळ्याचं निरीक्षण करायला लागलो. आपला 'र' म्हणजे त्यांचा 'ल', आपला 'ल' म्हणजे त्यांचा 'य', आपला 'ग' म्हणजे त्याचा 'द', आपला 'श' म्हणजे त्याचा 'च' हा बेसिक क्रॅश कोर्स आणि "अलेच्च्या, काय झ्यालं ग या माऊला ", "माज्या चकाअली (सखाहरी) तो", "लल्लाच्य नाई ग अचं", "का कत्त्ये द माजी मनीमाऊ", "बोक्या, कोन ले उगाच्य तोतं तोतं ललताय? " (आणि असे अजून अनंत वाक्प्रचार) असा अ‍ॅडव्हान्स कोर्स असे दोन्ही कोर्स मी शिताफीने, झटपट आणि खळखळ न करता पूर्ण केले. म्हणजे करावेच लागले. न करून सांगतोय कोणाला? आणि बघता बघता "जान्हवं, शेंडीवाल्या भटजींनी मटणावर आडवा हात मारायला शिकावं, तुफ्फान कडक्या पोराने गल्लीच्या दादाला बुचकळून काढावं, एका चाश्मिष्ट, गरगट्ट पोरीने चिकण्या पोरीच्या नाकावर टिच्चून रोझ-क्वीन बनावं" तसं वर्ष दोन वर्षांपूर्वी मुलांशी बोबडं बोलण्यावर हसणार्‍या माणसाने (पक्षि स्वयमेव) त्यात प्राविण्य मिळवलं. आनि त्ये पन येकदम गोल्ड मेडल च्या मारी...

तर आता पुन्हा असा भविष्यातला प्रसंग डोळ्यासमोर आला किंवा खरोखर भविष्यात घडलाच आणि लेकाला उत्तर द्यायला लागलं तर आधी (बोबडं बोलत नाही म्हणून) मला हसणार्‍या आणि नंतर मला ते तसलं बोलायला (इनडायरेक्टली) भाग पाडणार्‍या आणि माज्या तोंडून लेकाला "चोनुली, चकुली, मनीमाऊ" असं काय काय म्हणवून घेणार्‍या त्या तीन ब्येष्ट-हाफांवर सगळं बिल फाडायचं ठरवलं ........ आनि मया इत्तं इत्तं इत्तं बलं वातलं मनून शांगु. येकदम चांत-चांत, अयकं-अयकं, च्यान च्यान.... !!

43 comments:

 1. लय भारी, सत्यवाना...

  फुस्स फुस्स.. धूर धूर.. धुकं धुकं.. स्क्रीनवरची चित्रं गोलगोल फिरत स्थिरावली. माझ्यावर कॅमेरा.

  हे..हे..मस्तच.

  ReplyDelete
 2. :D .. आभार आनंद. मला पुढे जाऊन खरंच अशा प्रश्नांना तोंड द्यावं लागणार आहे. म्हणून तयारी करत होतो ;-)

  ReplyDelete
 3. मीही हा क्राश कोर्स पुर्ण करुन घेतो.. कधिही कामी येउ शकतो.. दुस-याच्या मुलांशी बोलताना रे... ;-)

  ReplyDelete
 4. ही...ही..ही...लय भारी रे!!! चांगली जोरात तयारी चालू आहे!!

  ReplyDelete
 5. आनंद, ब्लॉगवर स्वागत. अरे हे असे क्रॅश कोर्स भारी उपयोगी पडतात. अरे दुसर्‍याच्याचा काय स्वतःच्या मुला/ली शी बोलतानाच :-).. कळेल तुला वेळ आल्यावर :D

  ReplyDelete
 6. hehe! mast aahe :)
  maladekhil asa kahi bolata yet nahee. me generally mag itakya lahan mulanshi bolane ch Talate :D jara motthi asali aani neet bolu lagali me magach ;)

  ReplyDelete
 7. योगेश, अर्रे एकदम. करावी लागतेच तयारी. तसं 'वाकुडं' बोललं नाही ना तर लेक काहीच भाव देत नाही. भाव काय अरे साधा बघतही नाही तो :-)

  ReplyDelete
 8. मेघा :D .. अग पूर्वी मी ही असंच करायचो. पण स्वतःचं पोरगं झालं की सगळं शिकावं लागतं. न शिकून सांगतोय कोणाला? पोरगा नीट बोलायला लागेपर्यंत थांबलो तर बोलायला लागल्यावर बघणार पण नाही माझ्याकडे :P

  ReplyDelete
 9. हे हे हे...धम्माल हेरंब
  तुझी ही पोष्ट वाचून मया इत्तं इत्तं इत्तं बलं वातलं मनून शांगु. येकदम चांत-चांत, अयकं-अयकं, च्यान च्यान. :)

  ReplyDelete
 10. च्युआच, बलं ज्यालं तुया बलं वाटलं ते.. तेच्यामुले मया पन तूप तूप बय वात्त ;-)

  ReplyDelete
 11. खरच मलाही असच वाटयच मुलांशी आपण शुद्धच बोललं पाहिजे पण आर्यनशी मी ’ललु नतो, शानं बाल कधि ललत नाही’ असं कधि बोलायला लागले कळलच नाही रे!

  ReplyDelete
 12. नुसता हसतोय मी वाचतांना. शेजारच्या क्युबिकल मधला वाकून पहात होता मी कशाला हसतोय ते.. त्त्याला मराठी कळत नाही म्हणून बरंय.. :)

  ReplyDelete
 13. सोनाली, अगदी अगदी.. माझं पण असंच म्हणणं होतं. वाद घालायचो मी बायकोशी त्यावरून. आणि बघता बघता कधी शिकलो आणि बोलायला लागलो कळलंच नाही :-)

  ReplyDelete
 14. काका, असाच जरा टीपी.
  तुमच्या शेजार्‍याला पण भाषांतर करून समजावून सांगा असं म्हणणार होतो. पण "आनि मया इत्तं इत्तं इत्तं बलं वातलं मनून शांगु. येकदम चांत-चांत, अयकं-अयकं, च्यान च्यान.... !!" चं काय कप्पाळ भाषांतर करणार :-)

  ReplyDelete
 15. हा हा हा..हेरंब वेळ नाही तरी परतिकिया द्यायला भाग पाडलंस यार....सही आहे यावेळी तर यॉर्कर काय फ़क्त चौकार आणि षटकार आहेत आमच्या सचिनसारखे...(आमचा कारण माझी मैत्रीण त्याची शेजारीण आहे म्हणून रे...जळ्लास ना??) असो..
  आणि हो आता ते ’मिस युनिव्हर्स’ असल्यासारखं मलाही वाटतंय अरे म्हंजे काय?? अमुकतमुक सालात तोही 'मिस युनिव्हर्स'चा ब्येष्ट-हाफ त्यांच्या घरात प्रवेश करता झाला असेलच न??? ओह पोस्त बोबल्या बोलावल होती नाय का??? :))
  (ला काय वाटतं तुझ्या पोश्टा वाचुन निदान वटवटाट तरी करु शकतो रे थोडी फ़ार अम्ही वाचक...)

  ReplyDelete
 16. आयला सहा चेंडूत सहा सिक्स!

  ReplyDelete
 17. मस्त मजा येते ना ,,,,सुंदर

  ReplyDelete
 18. हतुन हतुन पोतात दुथु लादल ले हेलंबा,गननायका.....नतो हतवु आता द्यात्त.....हतुन हतुन ना मादे दाल दुथले आता...हे हे हे...थुप दिवतांनी अची कोमेली पोत्त वातुन ना च्यान च्यान ,मत्त मत्त वतल...भा पो का???

  ReplyDelete
 19. एक अजुन सांगावेसे वाटते..पोस्ट वाचुन झाल्यावर अगदी कोमेंट ही लिहुन झाल्यावर काही क्षण डोक्यात "बोबले बोल धुमत" होते.थोड्या वेळानी लेक शाळेतुन आला..मी "...आलाश ये ये..पन्ह पिउन धे बाला,बाहेल थुप उन आहे नं..मह देते देवायला..लेक :-o...

  ReplyDelete
 20. ये हुई ना बात... बरे झाले केलास कोर्स पटकन ते... नाहीतर इतक्या मोठ्ठ्या आनंदाला मुकला असतास नं..... खूप भावली पोस्ट....नुसती हसतेय मी... चला आज दिवसभर हे मनात घोळत राहील...:)

  ReplyDelete
 21. हा हा .. मला वाटलंही नव्हतं की इतक्या गडबडीत तुला प्रतिक्रिया द्यायला वेळ मिळेल.. :-) आभार..

  आणि ते दर वेळी सचिनचं सांगून जळवायला नको... !!

  हा हा मिस युनिव्हर्स.. पटलं पटलं..
  अग बिनधास्त.. 'माझिया मना'त असेल तेवढी 'वटवट' करण्यास 'हरकत नाय'..

  ReplyDelete
 22. सहा चेंडूत सहा सिक्स : थँक्स टू युवराज (ठकसेन) सिंग !! :D

  ReplyDelete
 23. आभार काका. हो जामच मजा..

  ReplyDelete
 24. हा हा माऊ... चग्ग्या च्या चग्ग्या भा पो. तूप आबाल !!

  बाप रे.. लेक तर विचारात पडला असेल काय झालं आईला ... हा हा

  ReplyDelete
 25. खूप आभार, अरुंधती..

  ReplyDelete
 26. धन्स श्रीताई.. कोर्स करावाच लागला पटापट. पण त्यामुळे मजा येते आहे आता :-)

  >> चला आज दिवसभर हे मनात घोळत राहील...:)

  सांभाळून हं.. नाहीतर माऊसारखं होईल.. :D

  ReplyDelete
 27. He..he.. Sahi aahe...!!! Changale aahe ki tu lawkar sharanagati patkarun course poorn kelas.. :)
  Pan na he bobade bolanya paryant thik aahe pan tyachya nantar "code words" prakaran suru hote. aani te khoop jast bhayankar aste. Mazya bhavandanchi hoti rather ajun aahe code language... like, Pa mhanaje Pani, Papa mhanaje Poli, Aau mhanaje Aoushadh, Kukudi mhanaje train,etc... Hya prakaramule pudhe jaam zol hoto, Karan He codes poornat: Koutumbik parshvbhoomi war aadharalele[ Husshhh ] astat. So, baherchyana te kalat nahi aani mag ti mule kaay magtatayat kinwa kaay sangtayat he kale paryant barach wel nighun jaato aani mag.... Thauk aselach tula pudhe kaay te....!!! :)
  So, Bobade bol bolane naisargik ch aahe pan Aaditey chya babtit he code words taal plz...
  Coz pudhe na Pilludi la ch [ Mi mazya aavadatya bhavandana hya navane haak marate.. I hope Aaditey wll b fine with it :)] tras hoil tyacha... :)
  Punha ekda aawarate ghya Maithili taai... :) Svatachya blog la tar diwasen diwas update karat nahi aamhi aani ithe sagalyanchya posts war hatbhar lambichya comments.... :) Pan kaay karnaar tumhi sagle lihitach itke chaan ki mala mothya mothya commnts lihanya shiway paryay ch urat nahi.. :)[ So, mazya lamb lachak cmmnt cha tras zala tula tari u r only responcible 4 tht :)]

  ReplyDelete
 28. कछी मत्त मत्त नि गंपुलि शंपुलि पोश जाल्ये :D

  ReplyDelete
 29. vachtana aaditeya dolya samor ubha rahila vatale apan aaditeyshi bolato ahe. khup chhan vatale

  ReplyDelete
 30. मैथिली,

  हा हा हा.. तुझ्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायला एवढा वेळ लागल्याबद्दल तूच जवाबदार आहेस.. कारण एवढी मोठ्ठी छान प्रतिक्रिया मी पुन्हा पुन्हा वाचत बसलो :D

  अग तु म्हणतेस ते कोड वर्ड्स कितीही टाळायचे म्हटले तरी आपोआप तयार होतातच (जसं मी कितीही टाळलं तरी बोबडं बोलायला लागलोच.. अगदी तसंच..) आणि त्याला काही इलाज नाही. पण त्यामुळे चिमुरड्यांची उर्फ पिल्लुड्यांची वाट लागत असणार हे खरंय.. बघुया त्यातल्या त्यात कमी करू :-)

  आणि हो. मी तेच म्हणणार होतो ब्लॉग का थंडावला आहे आपला?

  ReplyDelete
 31. :D :D .. तांकू तांकू नाकोबा...

  ReplyDelete
 32. हो ग.. आदितेय बोलायला लागल्यावर तो असंच काहीसं म्हणणार आहे :-)

  ReplyDelete
 33. अरे सही झालीये पोस्ट.... :)
  आनि मया इत्तं इत्तं इत्तं बलं वातलं मनून शांगु. येकदम चांत-चांत, अयकं-अयकं, च्यान च्यान.... !!

  काय हे तू बोबडं पण ईतकं छान बोलू शकतोस हे माहित नव्हते ....हेहे

  पोस्टचा टॉपिक आदितेय असला की पोस्ट भन्नान्न्न्नाट असणार हे आलेच ओघाने.....

  ReplyDelete
 34. हा हा.. अग ते क्रॅश कोर्स केले ना त्यामुळेच तर शिकलो फटफट.. :D

  हो आदितेय वर लिहिताना मजा येते खरी :-)

  ReplyDelete
 35. अजुन एकदा = अदितेयवर लिहायचे म्हणजे हेरंबचा इन-फॉर्म सचिन तेंडुलकर होतो...

  ReplyDelete
 36. आनंद :D :D .. आभार..

  माझे बाकीचे लेख फार बोंब नसतात ना? ;-)

  ReplyDelete
 37. Sahich re...Kitti ushira vachayala survaat keli mi tuza blog..asa rahun rahun vattaye...Mi fan zaliye tuzya blog ci....ekdam sahich...

  ReplyDelete
 38. :)) .. हाहा.. खूप आभार सिया. काही हरकत नाही. आता नियमित वाचत जा. (म्हणजे मी नियमित लिहिलं तर :P)..

  आणि ब्लॉगवर स्वागत..!!

  ReplyDelete
 39. Tarich mala post varachi bobadi vakya vachun dhakkach basala.
  Dadane aani bobade bol lihile aahet bap re as kas? Mag pudhe
  vachun uttar milal aaditey mule sapshel sharanagati. Solid chotya
  maune kamalach keli Babachi ekadam viketach udavali.
  Pan tula ek maja sangu ka vedvratshi bolatana jevha mi ye g
  te maz mau as mhanate tevha tuzi athavan houn ye g nahi ye re
  maz sonu te as mhananyacha prayatna karate. Aani mag tohi aabana sangato ki ye g
  nahi ye re mhana aaba.
  tuzi post vachun mala lagech ph karavasa vatat hota (Pan he amerikech
  ghadyal aad yet na. kans tuzya post vachalyamule takala gela)
  karan mala mahit hot ki hya post chi mazi comment mhanaje ek
  nibandhach honar aahe. Aso Pan post khup awadali maja aali
  vachatana.

  ReplyDelete
 40. हा हा .. बापरे.. एवढी मोठ्ठी प्रतिक्रिया :)

  अग काय करणार. लेकाने बदलायला, बोबडं बोलायला भाग पाडलंच अखेर ... एकदम हिट विकेट... :)

  बरं आहे. तू आता वेदव्रतशी अगं, येगं, जागं करत बोलत नाहीस ते. आणि च्य्कून बोललीस तरी तो तुमच्या चुका सुधारत हे तर अजूनच ब्येष्ट :)

  चला कंसाचा वारा तुलाही लागला तर .. हा हा.. बोलूच लवकर..

  ReplyDelete
 41. आज वाचू उद्या वाचू करत बाजुला राहिलेली ही पोस्ट आत्ता मध्यरात्री वाचताना हसायची पण पंचाईत रे! मी हसायला लागले आणि मच्या घरात अवतरलेला "भावी मिस युनिव्हर्सचा ब्येश्ट हाफ़" (जो सध्या अर्धा पाव आहे) उठून बसला तर करता काय?

  पोस्ट झकास, धमाल, मस्त मस्त.....आणि हो सांगायचंच राहिलं. आपण सुरवातिला संकोचानं बोबडं बोलायला सुरवात करतो अआणि नंतर उत्साहाच्या भरात पोरं मोठ्ठी झालेली लक्षातच येत नाहीत, मग एक दिवस तीच आपल्याला आई/बाबा बोबडं बोलू नको असं दटावून विकेट घेतात.

  ReplyDelete
 42. धन्स शिनु :-) घरोघरी "भावी मिस युनिव्हर्सचे ब्येश्ट हाफ़" ;-)

  आणि ते दटावण्याचं एकदम बरोबर बोललीस. (म्हणजे असंच होत असावं. अनुभव इल्ले.) आधी बोबडं बोलण्याची सवय करण्यासाठी जेवढे प्रयत्न करावे लागतात तेवढेच नंतर ते बोबडं बोलणं सोडण्यासाठी करावे लागतात.. (लागत असावेत :-) )...

  ReplyDelete