Wednesday, April 28, 2010

उत्तर : भाग-२


"पण?"

"पण मला कळत नाहीये की मी उद्या जाऊ की नको. म्हणजे गेल्यावर मला माझं प्रोजेक्ट त्यांना नीट समजावून सांगता येईल की नाही? इतर प्रोजेक्ट्स, त्यांच्या कल्पना, त्यांचे रिपोर्ट्स, त्यांची निरीक्षणं माझ्यापेक्षा चांगली असली तर? माझं हे असंच होतं नेहमी. अपयशाची भीती वाटत राहते. भरपूर अपयश बघितलंय मी. व्यक्तिगत आयुष्यातलं अपयश, नोकरीतलं अपयश, आता धंदा करायला घेतला तर त्यातही अपयश. नाहीतर इतर लोक कसे दणादण यशाच्या पायर्‍या चढत जात असतात. माझ्यापेक्षा तुलनेने कमी कुवतीचे, कमी हुशारी कमी ज्ञान असलेले, बेफिकीरीने जगणारे अनेक लोक मला माहित आहेत. पण त्यांनी हा हा म्हणता मला मागे टाकलं. बघता बघता माझ्यापेक्षा यशस्वी झाले, माझ्यापेक्षा श्रीमंत झाले. एक साधासा व्यवसाय यशस्वी होण्याचं स्वप्न पाहणं, तशी अपेक्षा ठेवणं हे खरंच एवढं मोठं आहे का? चूक आहे का? अव्यवहारी आहे का?"

बराच वेळ मी अशीच काहीशी निराशेने भरलेली बडबड करत होतो. आत साठलेलं मोकळं करत होतो. मनातली सगळी मळमळ व्यक्त करून मी थांबलो. एवढं सगळं ऐकूनही दादा शांतच होते.

"दादा, मला एकच सांगा.... मिळेल का मला हे प्रोजेक्ट?" मी शेवटी एकदाचं विचारलं.

दादांनी माझ्याकडे रोखून पाहिलं. पण क्षणभरच. त्यानंतर पुन्हा पूर्वीचा तो मृदू भाव त्यांच्या चेहर्‍यावर परत आला.

"हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी काही कोणी ज्योतिषी, ज्ञानी, भूत-भविष्य जाणणारा बाबा वगैरे नाही. फार तर तुला बरं वाटावं म्हणून तुझ्या प्रश्नाला 'हो' असं खोटंच उत्तर देईन हवं तर. पण ते काही खरं नाही, योग्यही नाही आणि मला ते पटतही नाही. सध्या तरी तुझ्यासाठी मी हे एवढंच करू शकतो."

असं म्हणत त्यांनी ती पानाची पेटी उघडली. आणि त्यातून एक चिठ्ठी काढली आणि माझ्या हातात दिली.

**

मी पुस्तक उघडलं आणि तेवढ्यात त्यातून खुण म्हणून ठेवलेली चिठ्ठी बाहेर पडली. 'ती' चिठ्ठी आत्ता इथे समोर बघून माझे डोळे भरून आले. न राहवून मी चिठ्ठी उघडायला गेलो. पण तेवढ्यात दादांनी सांगितलेलं आठवलं.

"या चिठ्ठीत एक निरोप आहे तुझ्यासाठी. तुला पुढच्या आयुष्यात कसं वागावं हे समजावून सांगण्यासाठी. पुन्हा अपयश, पराभव पदरी आले तर त्यातून मार्ग काढण्यासाठी. पण अट एकच. ही चिठ्ठी तू आत्ता उघडायची नाहीस. तुला ज्याक्षणी वाटेल की  'मी यशस्वी आहे' तेव्हाच उघडायची ही चिठ्ठी. तोवर नाही."

हातातोंडाशी आलेलं मोठ्ठं प्रोजेक्ट आणि त्याबरोबरच आत्मविश्वासही गमावलेला, हातपाय प्लास्टरमध्ये घातलेल्या अवस्थेत या हॉस्पिटलमधून सुटण्याची वाट बघत असलेला माणूस कधी सुखी असेल का? मी सुखी शब्दापासून अनंत योजनं दूर होतो. अर्थातच मी चिठ्ठी उघडली नाही.

**

"गुड मॉर्निंग" संजू म्हणाला.

बातमी कळल्या कळल्या मिळेल त्या विमानाने संजू बंगलोरमध्ये आला होता. पहिल्या दिवशी मी दिवसभर गुंगीतच होतो तेव्हा तो येऊन मला बघून गेला होता. मला आयसीयूमधून बाहेर काढलं की मग भेटायला या असं डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं. आयसीयूमधून दोन दिवसांनी बाहेर आणण्यात येईल असंही सांगितलं होतं.

"कळलं काही सामानाचं ???"

"नाही रे. मी एअरपोर्टवर आणि त्या एअरलाईन्सच्या ऑफिसमध्ये दोन दिवस खेपा घालतोय. त्यांना तुझं काहीही सामान मिळालेलं नाही."

"कसं शक्य आहे? सगळ्यांचं सामान मिळतं माझंच मिळत नाही असं कसं होईल? अरे त्यात माझा लॅपटॉप, प्रोजेक्ट रिपोर्ट असं सगळं होतं रे. तो प्रोजेक्ट रिपोर्ट मिळाला नाही तर माझी इतक्या महिन्यांची अविश्रांत मेहनत वाया जाईल. आणि पुन्हा पुढे काय करायचं हा प्रश्न आ वासून उभा आहेच. श्या. नॉनसेन्स... !!!!! मी त्या पुस्तकाबरोबरच माझा प्रोजेक्ट रिपोर्टही माझ्या ब्लेझरच्या खिशात ठेवायला हवा होता."

"अरे तुला माहित होतं का की असं काही होणार आहे म्हणून? उगाच त्रास करून घेऊ नकोस. आपण बघू काय करायचं ते."

काहीही करता येणार नाहीये हे आम्हाला दोघांनाही माहित होतं त्यामुळे कोणीच काही बोललं नाही. कारण आता आधी सामान शोधा, त्यात प्रोजेक्ट रिपोर्ट शोधा, तो नाही मिळाला तर घरच्या पीसी वरच्या अपुर्ण आणि रफ कॉपीवरून पुन्हा नवीन रिपोर्ट तयार करा, आणि हे एवढं सगळं झाल्यावर पुन्हा क्लायंटची नवीन अपॉइंटमेंट घ्या, ते ही त्यांनी पुन्हा भेटायची तयारी दर्शवली तर. आणि तेही हे सगळं होईपर्यंत त्यांनी बाकीच्या प्रोजेक्ट्स मधून एखादं प्रोजेक्ट शॉर्टलिस्ट केलं नसेल तर. नाहीतर मग संपलंच सगळं. 'संपलंच' नाही खरोखर सगळं 'संपलंच' होतं !!

-- पुढचा भाग लवकरच..

- भाग ३ इथे  वाचा.

16 comments:

 1. हा ही भाग आवडला. मस्त होत्ये गोष्ट. :)
  गोष्ट सरळ चाललीय असा वाटत असलं तरी गोष्टीचा मूड मात्र लोलाकासारखा हलतोय असं वाटतंय ...

  ReplyDelete
 2. आभार नचिकेत.. पुढच्या भागात ट्विस्टेल अजून थोडी..

  ReplyDelete
 3. मस्त पळवतोय रे......आयला पहिला अंदाज चुकला..:(

  पुढे बघू काय होतय ते.....आमच्या डोक्यात असाच भूंगा सोडत रहा...

  आता पटकन पुढचा भाग येऊ दे...

  ReplyDelete
 4. आभार योगेश..

  दुसरा अंदाजही (कदाचित) चुकणार आहे. उद्या पुढचा भाग टाकतो तेव्हा येईलच लक्षात :-)

  ReplyDelete
 5. बरा वाचला तू.. क्रमशः ऐवजी आज "- पुढचा भाग लवकरच.." टंकलं म्हणुन...

  ;-) लवकर येऊ दे रे बाबा (प्रॉफेट्वाला नाही) ;-)))))))

  ReplyDelete
 6. हा हा.. मला संभाव्य धोक्याची जाणीव होती म्हणूनच क्रमशः नाही टाकलं :)..

  पुढचा भाग उद्या येतोय रे बाबा (हाही (प्रॉफेट्वाला नाही).. ;-)

  ReplyDelete
 7. क्रमशः नाहीये म्हणून आज निषेध नाही......लवकर येऊ दे..वाट पाहतोय रे बाबा(हा प्रॉफेट्वालाच आहे ;-) )

  ReplyDelete
 8. मस्त. उत्कंठा वाढली आहे. का कुणास ठाऊक पण तो "प्रथम पुरषी एकवचनी" माणूस आपला वाटायला लागलाय.

  ReplyDelete
 9. Pudhacha bhaag tak lavkar...waat baghatyey....!!! :)

  ReplyDelete
 10. आभार प्रोफेटवाल्या बाबा.. चला क्रमशः टाळले की निषेधही टळतात तर .. :)

  ReplyDelete
 11. सिद्धार्थ, आभार .. खरंच माझाही हा अनुभव आहे की 'प्रथमपुरुषी एकवचनी' लिहिलं/वाचलं की कथा उगाचच जास्त आपलीशी वाटायला लागते.

  ReplyDelete
 12. मैथिली, आज संध्याकाळी येतोय पुढचा भाग .. :)

  ReplyDelete
 13. अरे... मी उदया इकडून उडालो की ४-५ दिवस ऑनलाइन नसणार... लवकर पूर्ण कर की... :)

  ReplyDelete
 14. :) .. आज एक भाग येतोय आणि उद्या शेवटचाही येईल. वाचून मगच उड..

  ReplyDelete
 15. वाचतेयं.... :) प्रथमपुरुषी एकवचनी लिहलं कीच कशाने रे, कथा या आपल्याच असतात म्हणून तर लिहिल्या/वाचल्या जातात नं... आने दो पटापट...:)

  ReplyDelete
 16. ते आहेच ग श्रीताई. आपली कथा आपल्याला आवडतेच. पण इतर कोणाच्याही कथाही 'प्रपुएव' असल्या की जास्त जवळच्या वाटतात मला.. :)
  पुढचा भाग संध्याकाळी.. :-)

  ReplyDelete