Tuesday, May 4, 2010

मी आणि (माझंच) वय : भाग-२

अजून जास्त किस्से टाकून स्वतःला अजून म्हातारं करून (वाटून) घेण्यापेक्षा पोस्ट अर्धवट वाटली तरी चालेल पण दोन प्रसंगांत झाली तेवढी शोभा पुरे झाली असं म्हणून आधीची पोस्ट लवकर संपवली. 'पब्लिश पोस्ट' वर क्लिक केलं आणि अचानक अभिजात लेखकूपणाचं वरदान लाभलं असल्याप्रमाणे (त्याच विषयावरच्या) पुढच्या पोस्टचा विषय डोक्यात घुमायला लागला. एका दिवसांत दोन पोस्ट्स सुचतायत? (ह्ये काय इपरीत आनि !!). म्हणून म्हंटलं भाग-२ पण टाकून देऊ. अरे लोकं 'फुंक'चा दुसरा भाग काढण्याचं डेरिंग करतात तर मी माझ्या याच पोस्टचा दुसरा भाग काढला तर बिघडलं कुठे? फुंक-१ पेक्षा माझी पोस्ट कैक पटीने चांगला आहे हे तर स्वतः रामूही (मनात आणि वेळ आली तर जनातही) मान्य करेल.. बराबर ना? (अरेरे रामूच्या 'वर्मा' वर फुंक बसली.)

असो. नको तो रामू आणि त्याची ती फुंक.. आपण आपली "चला दोस्तहो (चढत्या) आयुष्यावर बोलू काही" ची कॅसेट लावू. अहा !!! पण थांबा.. ही साईड 'बी' आहे. :) ... कळेलच !!


**

मागे एकदा मी, माझे तीन कलीग्स आणि मॅनेजर हॉटेलमध्ये गेलो होतो. सगळ्यांच्या ऑर्डर्स घेत घेत वेटर शेवटी (नेहमीचं आहे हे !!) माझ्याकडे आला. मी मेन्यूकार्डाकडे ढुंकूनही न बघता नेहमीच्या थाटात माझी नेहमीची ऑर्डर दिली.

"चीज पावभाजी वुईथ एक्स्ट्रा चीज अ‍ॅंड चॉकलेट मिल्कशेक."

ऑर्डर घेऊन वेटर निघून गेला.

(याच्या पुढचा सगळा संवाद मॅनेजर बरोबर असल्याने आणि विंग्रजी फाडल्याशिवाय आपण मॅनेजर आहोत असं (त्याला) वाटत नसल्याने विंग्रजीत आहेत. परंतु आपली वटवट मराठीत असल्याने....... असो )

"अरे तुझी ऑर्डर म्हणजे एकदम सेम माझ्या लहान मुलासारखी आहे. त्यालाही हे चीज, चॉकलेट, वगैरे वगैरे प्रचंड प्रिय आहे. सगळ्याच लहान मुलांच्या सवयी एकसारख्याच असतात तर" मॅनेजर सायबाने उगाच कायतरी ज्योक टाकायचा क्षीण प्रयत्न केला. कोणीच हसलं नाही. पण 'कोणीच हसलं नाही' असं मी (मनात) म्हणेपर्यंत सगळ्यांनी गडगडाटी हसून तो क्षीण नाही तर चांगलाच यशस्वी प्रयत्न होता हे सिद्ध केलं. च्यायला क्षणभरापुर्वी तो ज्योक कळला नसल्याप्रमाणे (आणि ते काही अंशी खरंही असावं म्हणा) मख्खासारखी बसलेली ही डोकी अचानक खिदळायला का लागली हा प्रश्न मला पडला. आपापसात काय खाणाखुणा झाल्या, काय नेत्रपल्लवी (बाप रे, जिभेला झिणझिण्या आल्या हा शब्द म्हणून बघताना) झाली (असावी) काय माहित, पण अचानक सगळे खिदळायला लागले.

(मी मनात) "अहा.. बॉसा, अप्रायजल आहे म्हणून तुझ्या या तुच्छ इनोदाला हे सगळे मारून मुटकून हसतायत" (मी माझीच समजूत घालण्याचा प्रयत्न केला)
(मी जनात) "ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.. म्हणून काय चॉकलेट आणि चीज मोठ्यांनी खाऊ नयेत असं थोडंच आहे !!"
"माझ्या भाच्याला पण सेम असंच चीज आणि चॉकलेट प्रचंड आवडतं." एक अप्रायजलेच्छुक कलिग खिदळला.
(मी मनात) "बाहेर भेट रे, लाथ घालतो तुझ्या.. अरे आणि आता कितीही गोंडा घोळलास तरी तुझं रेटिंग बदलणार नाही तो रेडा. कळत कसं नाही तुला? माठ आहेस का?"
(मी जनात) "ह्यॅ ह्यॅ"

बॉसाच्या लेकाला चीज आणि चॉकलेट आवडतंय म्हंटल्यावर अप्रायजलला आसुसलेल्या त्या तमाम दुर्दैवी जीवांची आपल्या भाचरांना, पुतण्यांना, लेकरांना, शेजारपाजारच्या लिंबूटिंबू गँगलाही ते कसं आवडतं, सगळ्याच लहान मुलांना ते कसं आवडतं (थोडक्यात मलाही ते कसं आवडतं आणि तस्मात माझ्या आवडी निवडी कशा लहान मुलांसारख्याच आहेत) वगैरे वगैरे दाखवण्याची अहमहमिका सुरु झाली. माझं आपलं जनात 'ह्यॅ ह्यॅ' आणि मनात '#$%^' चालूच होतं. पण काही काळापुरतं इनोद आणि त्या माठांच्या अप्रायजलच्या अगतिकतेला बाजूला सारून मी विचार (अर्थात मनातच. जनात विचार केला तर त्याला संवाद असे म्हणतात.) करायला लागलो. "अरेच्चा, खरंच माझ्या खाण्याच्या आवडीनिवडी लहान मुलांसारख्या आहेत का?" चीज, चॉकलेट, आईस्क्रीम, पिझ्झा, कोल्ड्रिंक्स असा चहूबाजूंनी (नावडत्या) उत्तरांचा भडीमार व्हायला लागला. मी मनात मजबूरमधल्या अमिताभसारखा डोक्यावर, कानावर हात दाबून धरून, कुठल्याही पिक्चरमधल्या राखी सारखा "नSSSही" असं जोरात ओरडलो. असंच मला जनातही करावंस वाटत होतं परंतु त्यांच्या त्या तुच्छ टोमण्यांना घाबरून मी ओरडतोय असं त्यांना वाटलं असतं म्हणून जनात मात्र ह्यॅ ह्यॅ च (आणि सोबतीला खा खा) करत राहिलो. पण मनात विचार चालूच..

"अरेच्चा, खरंच माझ्या खाण्याच्या आवडीनिवडी लहान मुलांसारख्या आहेत का??"**

"कुठल्या पिक्चरला जायचं रहस्यमय, प्रेमकथा की मारधाडपट?" बाप रे पुन्हा झिणझिण्या आल्या जिभेला. (म्हणजे मगाशी नेत्रपल्लवी मधला 'वी' म्हणून झाल्यावर गेल्या होत्या त्या. पण आत्ता एकदम मारधाडपट वगैरे म्हणताना पुन्हा आल्या.)
थोडक्यात थ्रिलर/सस्पेन्स, लव्हस्टोरी की अ‍ॅक्शन कुठला पिक्चर बघायचा यावर आम्हा भावंडांची मसलत चालू होती दिवाळीच्या सुट्टीत. (या आणि आधीच्या ही पोस्टीत लिहिताना (अनुच्या क्रमानी) हिंदीचा आणि इंग्रजीचा अनुवाद करण्याच्या नादात आत्ताच्या मराठी शीणचा पण अ‍ॅक्शन म्हणजे मारधाडपट वगैरे अनुवाद करायला लागलो आणि झिणझिण्यांना आमंत्रण दिलं. असो.)

"आधे इधर जाओ आधे उधर जाओ" च्या थाटात निम्म्यांनी सस्पेन्स, निम्म्यांनी लव्हस्टोरीच्या मताच्या कळा दाबल्या (आठवा इलेक्ट्रॉनिक मतदान. अ‍ॅक्च्यूअली मी पारड्यात मत टाकलं असं म्हणणार होतो पण प्रसंग अधिक जिवंत आणि खराखुरा वाटावा (वाटावा म्हणजे काय आहेच) म्हणून 'मताच्या कळा' असे संबोधले आहे.)

"और आधे मेरे पीछे आओ" च्या असरानी ष्टायलीत मी खरोखर एकटाच होतो.


"तुला फायटिंग बघायचीये?" सगळ्यांनी एकच गलका केला.

(वि सु : हा भावंडांबरोबरचा शीण असल्याने आणि मी (त्यांच्यात मोठा असल्याने) त्यांना घाबरत नसल्याने या शीणमधली मनात वाटणारी वाक्यंही प्रत्यक्षात जनातली आहेत. गैरसोयीबद्दल दिलगीर (मनात : खरं तर दिलगिरीची गरज नाही.. पण असूदे.))

"हो.. का? काय प्रॉब्लेम आहे त्यात?"
", तुला फायटिंग बघायचीये?" एक आक्काबाई
"होय.. का? काय प्रॉब्लेम आहे त्यात?" पहिल्यांदा ऐकू आलं नसेल बिचारीला !!
"अरे पण ते ढिशुम ढिशुम तर लहान मुलांना आवडतं. आपल्यासाठी लव्ह स्टोरीज आणि थ्रिलर्स असतात" एक बंधुराज

रामराया, तुला लक्ष्मण, भरतासारखे भाऊ होते. आणि आमचे हे हाल? पहातोयस ना? (हे एकमेव वाक्य मी मनात उद्गारलो. आणि तेही घाबरून नाही तर त्यांना लक्ष्मण, भरत म्हणावं लागू नये म्हणून.)

"कोणी सांगितलं?"
"कोणी कशाला सांगायला हवंय? माहित्ये सगळ्यांना" अपूर्व एकजूट उत्तरली.
"अरे त्या अ‍ॅक्शन (मला अ‍ॅक्शनला मारामारी, ढिशुम ढिशुम, फायटिंग वगैरे म्हटलेलं अजिबात आवडत नाही हे दर्शवण्याचा एक असफल प्रयत्न मी केला कारण तसं म्हणणं म्हणजे अ‍ॅक्शन चित्रपटाचा अपमान आहे) मध्येही एक क्लास असतो, दर्जा असतो."
"त्यात कसला आलाय दर्जा!! सगळा नुसता गोळीबार आणि रक्तपात"
असाच काय काय गोळीबार त्यानंतर बराच वेळ होत राहिला आणि त्याची परिणती (माझ्या) दुर्दैवाने आम्ही एक गुलाबी आणि एक भुताचा चित्रपट बघण्यात झाली. दोन्ही चित्रपट बघताना मी राहून राहून हाच विचार करत होतो की


"अरेच्चा, खरंच माझ्या चित्रपटांच्या आवडीनिवडी लहान मुलांसारख्या आहेत का?"

**

हे असलं काही आठवायला लागलं की मग बायको/आई "अरे आता एका पोराचा बाप झाला आहेस. मग तसा वागत जा जरा" असं म्हणते त्या म्हणण्याचा खराखुरा अर्थ कळतो. तिसर्‍या भागात माझ्या खर्‍या (तिशी+) वयावर लिहायचा विचार होता. पण एकूण अनुभव पाहता त्यावर काय लिहिणार हा प्रश्नच आहे. म्हणून तूर्तास तरी नको. नंतर बघू कधीतरी !!

42 comments:

 1. बघ झालो लहान तुझ्यासोबत..सांगितला होत ना तुला कालच?
  आणि हो आपल्या आवडीनिवडी इथे जुळतात बर का :) :) :)

  ReplyDelete
 2. ह्या ह्या ह्या,
  मांजर असा शब्द जरी उच्चारला तरी आई मला "मोठा झालास आता जरा तसा वागत जा" हे वाक्य ऐकवते.
  आई वगैरेंचा समजू शकतो, पण लोकांना काय प्रोब्लेम असतो कळत नाही. केवळ वय वाढलं म्हणून छोट्या छोट्या आणि सहज आनंद देणाऱ्या गोष्टींकडेही निरीच्छपणे दुर्लक्ष करायचं याला काय अर्थ आहे ?

  ReplyDelete
 3. सुहास, अरे काल पोस्ट टाकून झाली आणि मग हे प्रकार आठवायला लागले. म्हणून म्हंटलं उद्या टाकू आणि तेव्हाच तुझी कमेंट होती बालपणाविषयीची. म्हणून काल तुला म्हंटलं मनकवडा आहेस :)

  >>आणि हो आपल्या आवडीनिवडी इथे जुळतात बर का :) :) :)

  म्हणजे तुला पण चॉकलेट, पिझ्झा, चिज आणि अ‍ॅक्शन मुव्हीज आवडतात वाटतं :-) .. छान छान

  ReplyDelete
 4. हा हा.. नचिकेता, ते 'माझ्या मनी म्याव' वरूनच लक्षात आलं होतं माझ्या :)

  हो ना. कोणी काही म्हणालं तरी मी बिनधास्त चॉकलेट मिल्कशेक वगैरे वगैरे हादडत असतो ;-)

  ReplyDelete
 5. अरे वाह...कालची पोस्ट वाचल्यावर..उद्या आता उर्वरीत कधी वाचायला मिळते असे झालेले...पुन्हा एकदा जिंकलेस दोस्ता...सहिच..सकाळी उठल्या उठल्या आधी pc समोर आहे..[नवरोबाला अजुन चहा पण नाहि]well now he is used to it...पोस्ट मस्तच..as usual...

  ReplyDelete
 6. अरे कितीही वयं वाढले तरी लहानपणच्या आवडीनिवडी काही जात नाहीत..मला सुद्धा वडापाव,चोकोलेट्स..चहा..आणि त्यात पार्ले-जी बुचकळुन [बुडवुन हं]खायला आवडते...

  ReplyDelete
 7. आभार माऊ. कालची पोस्ट टाकताना या पोस्टचा विचारही डोक्यात नव्हता. म्हणून तर कालच्या पोस्टचा शेवट करताना 'पुढच्या (वर्षीच्या) भागात' असा randomly केला होता :-)
  पण ती पोस्ट टाकून झाली आणि अचानक हे सुचलं म्हणून म्हंटलं टंकून टाकू.. :)

  वा वा. वडापाव, चॉकलेट म्हणजे पर्वणी आहे अगदी.. :)

  ठीक्के आता चहा कर, नाहीतर तुझे नवरोबा मला ओरडतील :P

  ReplyDelete
 8. छानच हेरंब. मी नचिकेतशी सहमत! मी कुत्र्याच्या पिल्लांविषयी बोलायला लागले की मला बाबां कडून (आता जरा तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या.....ते कुत्री बीत्री बास झालं) असं एकायला मिळतं. सुदैवाने अश्वमित्र माझ्या सारखाच आहे. किंबहुना मला शंका येते बर्‍याच वेळी की त्याच्या वयाचं १४-१५ इथेच फिक्सेशन झालेलं आहे का काय? :-)

  ReplyDelete
 9. धन्स अपर्णा.

  आवडीनिवडी उगाच वयाशी जोडल्या गेल्या की फार गुंता होतो.. त्यामुळे आपण बिनधास्त आपल्याला हवं ते करायचं. :-)

  ReplyDelete
 10. "अरेच्चा, खरंच माझ्या खाण्याच्या आवडीनिवडी लहान मुलांसारख्या आहेत का??" >> मुळीच नाही !!! खरंतर तुला नक्की काय हवय आणि कशार आनंड आहे हे तुला माहित आहे, त्यामुळे तू ते ऑरडर केलेस. अखंड भारतवर्षात अनुभवलेला हा पुचाट अनुभव म्हणजे .. चॉकलेट वा चॉकलेट फ्लेवर्ड म्हणजे लहान मुलांच !!!
  पण अमेरिकेत हे समजलं की - सकाळ कॅफेन ने सुरू‌ होते, दुपारी चिकन / चिज / चॉकेल्ट / च्युईंग गम आणि संध्याकाळी अल्कोहोल !!! त्यामुळे 'हे चुकीच/वाईट अस काही‌ मला वाटत नाही‌ .. उलट तुझ्या त्या माठ बॉसचा विनोद मात्र 'चाईल्डिश' वाटला. (‌जर रस असेल तर - 'मोठंझालो म्हणजे नक्की काय ?' यावर माईन्ड मॅप बडवू‌शकतो .. आणी लहान म्हणजे काय यावरही‌) .. खरतर क्रीएटिव्हीटी, अभियोजित तंत्रकौशल यासाठी 'अन-लर्निंग' करण्याची‌, चाईल्ड-लाईक विचार करायची जास्त गरज आहे .. कारण बौधिक लवचिकता वृद्धत्त्वी निजशैशवात आहे .. शुष्क मोठेपणाच्या आत्मप्रौधित नाही !!!

  ReplyDelete
 11. नाही नाही म्हणता अजुन एक क्रमशः भाग...
  पोस्ट मात्र एकदम भारी. खरं तर चाइल्डीश एकच गोष्ट हावरटपणा... बाकी काहीही तुमच्या आवडी असोत फरक पडत नाही..
  मला तर आता सुद्धा कारचे खेळण्यातले मॉडेल्स जमा करावे वाटतात.. आता बोल... ;-)

  ReplyDelete
 12. लहानपण अजूनही असतंच रे प्रत्येकामधे. मी पण एक लेख लिहिला होता पुर्वी यावर - नक्की आठवत नाही कधी ते.. पण अजूनही मला रस्त्यावरच्या पेरुवाल्याकडून पेरू, बोरं घेउन न धुता खायला आवडतात. अशा अनेक लहानपणीच्या आठवणी आहेत. गम्मत सांगतो, नुकताच यवतमाळला जाउन आलो, एका शाळेसमोरच्या बाई कडून चक्क बोरं , चिंचा, भाजलेले चिंचोके घेतले विकत. ( आजूबाजूला पहात होतो- की कोणी पहात तर नाही नां? )
  लहानपण प्रत्येकामधेच असत, कोणाला त्याची लाज वाटते तर कोणाला अभिमान!

  ReplyDelete
 13. arre mastach aahe he post! btw, majhe laksh thodase vishayapeksha ikde tikdech adhik jaate.. tyamule "apporv ekajuT uttarali" vagaire vaakya mala faarach aawaDtat.. :) tyane ekdam Pu.La.nchi aathavaN yete.

  ReplyDelete
 14. हेरंब,
  खरच प्रत्येकाला लहानपणीच्या गोष्टी अजुनही आवडतात जसे मला चंपक, ठकठक वाचायला, Denis the Menice बघायला. अशा कितीतरी गोष्टी.
  दोन्ही भाग मस्त लिहिल्येस.

  ReplyDelete
 15. सोनालीला अनुमोदन. चंपक, ठकठक मला आजही वाचायला आवडतं. मी शाळा संपवून कॉलेजला गेलो तरी चंपक, ठकठक वाचायचो मग घरचे हसायचे. हा बघ घोडा झाला तरी अजुन चंपक, ठकठक वाचतो. मग मी माझ्या लहान पुतण्यासाठी आणलयं म्हणून सांगायचो आणि त्यांच्या आधी चोरून वाचायचो. आज ही मी सकाळी एम् टीव्हीऐवजी टॉम अँड जेर्री बघणे पसंत करतो. नाही होतं वाढ एकद्याची. चालतं यार ;-)

  बाकी मला एक सांग तू राखी 'सावंत' सारखा ओरडलास का? म्हणजे तू मोठा झालास की ;-)

  ReplyDelete
 16. Ha majhya agdi jivhalyacha vishay aahe... Balishpana... :)
  Majhe sagle friends mala bacchu mhanatat....karan arthat mi tase vagate mhanun...!!! Me bhar paawasaat chatri mitun chalate, paawasalyat sachnaarya dabkyn madhye udi maarate, chocklet melt karun khate, Hello kity, bunny, micky mouse wali stationery waparate, vargat kagadachi vimaane banavun udavate... aani he sagle sangayala mala mulich laaj vaatat nai. I proud 2 b childish yaarr...
  Hyawar post takayache khoop aahi pasun manat hote majhya.. ekda nakki taken karan ha vishay asa comment madhye urakataach nai yenar mala... after all majhi olakh aahe ha balishpana.... :)

  ReplyDelete
 17. लेख मस्त सुंदर आहे,लहानपणाची तू आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद

  ReplyDelete
 18. बाबा रे,
  तू आणि तुझे कंस...
  आणि बालपण म्हणशील...ते कधीच जाणे नाही....

  ReplyDelete
 19. बाकि काही बाबतीत आपण मोठे (ईथे वयाने असे म्हणतेय मी) झालो तरी लहान मुलांसारखे वागले तरी काय आभाळ कोसळा क्या!!!

  मला ती चीज नावाची ’चीज’ फार आवडत नसली तरी बाकि बऱ्याच सवयी म्येरे बच्चोंसे म्याचिंगच है!!! :)

  चंपक, जादूचा अमुक ढमुक वगैरे पुस्तके मला अजुनही आवडतात.
  अरे माझ्या कांदेपोह्याच्या झालेल्या एका कार्यक्रमात (टोटल झालेल्या २/३ पैकी एक... कारण तोवर आई-बाबांच्या भावी जावयाचे नाव सांगायची माझी हिम्मत न झाल्याने त्यांनी २/३ रिश्ते आणले होते :D ) तर त्या मुलाने (माणसाने, ईसमाने. गृहस्थाने काहिही चालेल ..मी कशाला बा त्याच्याकडे पाहू ;) ) मला विचारले की लेट्येष्ट पाहिलेला शीणीमा कोणता... त्यावर अस्मादिकांनी तोऱ्यात ’स्टुअर्ट लिटील’ हे नाव सांगितले होते :)... तो बहूतेक उडाला असावा मी त्याला उडवण्याआधीच :))

  च्यायला थोडक्यात काय कूच कुच लोगोंकी आदते लहान मुलांसारखीच रहती है तो क्या आभाळ कोसळा क्या !!!!

  ReplyDelete
 20. Tuzya mule mi aalas na karataa hya vishyawar majhi post takaliye... Thanks to You....!!! :)

  ReplyDelete
 21. " लहानपण देगा देवा अन मुंगी साखरेचा रवा " दुधाच्या कपात ग्लुकोज पुडा रिकामा करून तो लगदा बोटांनी उचलून ( सांडत ) खाण्यात, आंब्याचे ओघळ पार कोपरापर्यंत, नाक-गाल सगळ्यांना पावन करत...आरशासमोर उभे राहून स्वत:लाच वेडावून दाखवत..... अगदी छोट्याछोट्या गोष्टींसाठीही जान की बाजी लगाके हमरीतुमरी करनेमें कित्ता मजा था...खरेच लहानपणच्या आठवणी आणि आपल्यातले लहानपण कधीच जात नाही. जो भी मन में आये बस बिनधास्त करनेका... कोणी पाहील.... हसेल.... मरो... त्यासाठी आपला आनंद गमवायचा..... नो नो... हेरंब, मस्त रे! अभी आज मैं क्या दंगा करू सोच रहेली.... :D

  ReplyDelete
 22. धन्स सोमेश, अगदी मान्य. चॉकलेट आणि लहान मुलांचं इतकं अभेद्य नातं जोडून ठेवलं आहे आपण कि मोठ्यांनी ते खाल्लं कि लहानाचं लेबल लावलं जातं. म्हणून तर मी कोण काय म्हणतंय इकडे लक्ष न देता माझ्यातल्या लहान मुलाच्या आवडीनिवडी जपत असतो :)

  ReplyDelete
 23. धन्यु आनंद.. या क्रमशःचा पुढचा भाग येणे नाही. काळजी नसावी :)

  >> खरं तर चाइल्डीश एकच गोष्ट हावरटपणा.

  ह्म्म्म हे पटलं.. पण चॉकलेट/पिझ्झा/चीज आणि हावरटपणा हे सगळं एकत्र आलं कि अजूनच चायल्डीश वाटतं ;-)

  मग किती कार्स जमल्या तुझ्याकडे? ;-)

  ReplyDelete
 24. काका, वा.. असे लहानपणीच्या आवडीनिवडी जपणारे बरेच आहेत तर :)

  लहानपणीच्या गोष्टी लाज वाटून केल्या किंवा अभिमानाने केल्या तरी लोक हसणारच. मग त्यापेक्षा अभिमानानेच करायच्या :) .. potato, patatoe .. big deal !! :)

  ReplyDelete
 25. धन्स मेघा !! अग विषय सकस नसला (थोडक्यात बालिश असला) कि वाचकाचं लक्ष असं इकडे तिकडे जातं. काही हरकत नाही :)

  अग एक वाक्यच काय, माझ्या प्रत्येक पोस्टमधलं प्रत्येक इनोदी वाक्य पुलंना स्मरून लिहिलेलं आहे. पुलंच्या विचाराशिवाय विनोदी लिहिण्याचा विचार करणंही अशक्य आहे !!

  ReplyDelete
 26. धन्स सोनाली.. अगदी खरं आहे. चंपक, ठकठक, tom n jerry ... मोठ्ठी यादी आहे. आपल्या प्रत्येकात एक लहान मुल अजूनही दडलेलं आहे हेच खरं.

  ReplyDelete
 27. >> नाही होतं वाढ एकद्याची. चालतं यार ;-)

  हा हा सिद्धार्थ. जाहीरपणे मान्य केलंस.. मानलं तुला.. घाबरू नकोस. मी तर आहेच तुझ्या ग्रुप मध्ये आणि सगळेच जण आहेत. कमेंट्स बघितल्यास ना एकेकाच्या :) .. सगळा 'बाल दरबार' आहे एकूण ;-)

  'राखी' या सुंदर नावाचं कळकट्ट केलं या दोन बायांनी.. :(

  ReplyDelete
 28. कु. बालिश, आवडलं आवडलं.

  बालिशपणा सगळेच करतात.. पण त्याचं ब्लॉगवर जाहीर प्रदर्शन मांडण्याचं धारिष्ट्य फक्त आपणच करतो !! :P

  कळावे बालीशपणा आहेच, तो दिवसेंदिवस असाच वृद्धिंगत व्हावा ही सदिच्छा !!

  मस्त लिहिलं आहेस, मैथिली. एकदम बालिश :D ..कमेंटलोय तिकडेपण..

  ReplyDelete
 29. काका, आभार. लहानपणाची आठवण तर सदैवच जागृत असते :)

  ReplyDelete
 30. प्रोफेटा, बालपण (आणि कंसही) कधीच जाणे नाही !!! :)

  ReplyDelete
 31. ’स्टुअर्ट लिटील’ हा हा हा.. बिचार्‍याचा चेहरा बघण्यासारखा झाला असेल ...

  खरंय. हे असं मधून मधून लहान मुलांसारखं वागलं पाहिजे. उगाच मोठेपणीच्या टेन्शनांतून तेवढीच सुटका आणि बालपण पुन्हा अनुभवण्याचं सुख.

  >> च्यायला थोडक्यात काय कूच कुच लोगोंकी आदते लहान मुलांसारखीच रहती है तो क्या आभाळ कोसळा क्या !!!!

  आज्याबात, मुल्यीच नाय कोसळ्या !!! लगे रहो (म्या बी)!

  आणि हो.. चीज नावाच्या चीजवस्तूचं महात्म्य जनतेला कळावं या हेतूने त्यावर एक लेखमाला लिहिण्याचे मनात घाटत आहे. लवकरच मूर्तरूप देईन !! ;-)

  ReplyDelete
 32. धन्स श्रीताई.. कोणी पाहिल म्हणून हे करायचं नाही, कोणी हसेल म्हणून तसं वागायचं नाही असं करत राहिलो तर संप्याच मग.

  थोडक्यात "दुधाच्या कपात ग्लुकोज पुडा रिकामा करून तो लगदा बोटांनी उचलून ( सांडत ) खाण्यात, आंब्याचे ओघळ पार कोपरापर्यंत, नाक-गाल सगळ्यांना पावन करत...आरशासमोर उभे राहून स्वत:लाच वेडावून दाखवत" हे अजूनही करावसं वाटलं तर बिनधास्त करनेका :-)

  आज क्या दंगा किया वो ब्लॉगप्ये डाल दो. हमकु भी समझेगा श्रीताई का दंगा !! :)

  ReplyDelete
 33. भावना पोचल्या.

  पुढे नक्की.

  subhashinamdar@gmail.com
  www.globalmarathi.com
  9552595276

  ReplyDelete
 34. आभार सुभाषजी. !!

  ReplyDelete
 35. चीज पावभाजी वुईथ एक्स्ट्रा चीज अ‍ॅंड चीकू मिल्कशेक - अशी ऑर्डर असायची माझी... (लहान असताना) पण आता ह्यावेळी गेलो की तुझ्या नावाने खातोच सेम ऑर्डर... :) आणि पोस्ट सुद्धा टाकतो... :)

  अवांतर : मला हा धन्स शब्द अजिबात आवडत नाही... कुठून आणला???

  ReplyDelete
 36. नुसती ऑर्डर देऊ नकोस.. माझ्या नावाने घास बाजूलाही काढून ठेव.. नाहीतर पचणार नाही .. ;-)

  अरे धन्स = thanks + धन्यवाद .. ब-याच ठिकाणी वाचला, आवडला त्यामुळे वापरायला लागलो :) ..

  धन्यु कसा वाटतो? :)

  ReplyDelete
 37. च्यामारी लहानपणातल्या काही सवयी आताही सुटत नाहीत. ह्या ह्या ह्या.. म्हणजे हेच अगदी मलाही लागू होत बर का..

  ReplyDelete
 38. भारत, धन्स.. हा हा अरे पोस्टमध्ये तर काहीच सवयी सांगितल्या आहेत. उगाच सगळ्या सांगून अजून शोभा व्हायला नको ;)

  ReplyDelete
 39. च्यायला, हा लेख वाचल्यावर जाणीव झाली की, आपलंही आता वय झालं. (तशी ही जाणीव आरशात बघितल्यावर रोजच होते. कमी होत असलेले बाल (अकाली बरं का, एवढंही वय वाढलेलं नाही माझं. एक बरी सुरुवात करावी म्हणून ते पहिलं वाक्य लिहिलं होतं...) आणि त्या‍अनुषंगाने वाढत चाललेले भाल हे बघून उगाचच्च वाटायला लागतं की आपलं (पक्षी: माझं) आता वय वाढत चाललेलं आहे. (एवढे निराश विचार मनात येण्याचं वास्तविक काही कारण नाही; माझं लग्न अजून व्हायचं आहे.)) असो. आता प्रतिक्रियेपेक्षा कंसच जास्त झाल्याने थांबतो. (या सगळ्या कंसांतून मार्ग काढल्यानंतरही जर या प्रतिक्रियेचा अर्थ एखाद्याला समजला तर, त्या नरपुंगवाला मी ५ डॉलर्सचं बक्षीस द्यायला तयार आहे... ;-) )

  ReplyDelete
 40. संकेता, तू का बरं म्हातारा होतोयस बाबा एवढ्यात.. चांगला गब्रू जवान हाईस की :)

  रच्याक, ते ५ डॉलर्स या नरपुंगवाच्या पत्त्यावर पाठवणे.. ;)

  ReplyDelete