Tuesday, May 11, 2010

सुंदर माझं घर !!


कसलं बायकी नाव वाटतंय ना. लेख मात्र बायकी नाही. पुर्षी आहे. पुर्षाने लिहिला आहे म्हणूनही आणि पुर्षावर लिहिला आहे म्हणूनही....... चला आजचा पांचटपणाचा कोटा संपला. (जास्त जोरात हुश्शकारू नये. तुमच्या हुश्श्कार्‍यांच्या (सुस्कार्‍यांच्या चालीवर) आवाजाने आम्हाला अजून पांचट लिहिण्याचा मोह झाल्यास त्याला समस्त पुर्षी मंडळी (म्हणजे सदरहु लेखातली) जवाबदार नाहीत)....  जाऊदेत. ऑन अ सेकंड थॉट, सव्वा (कंस धरून सव्वा) वाक्यांपूर्वी  सोडलेला संकल्प आम्ही मागे घेत आहोत. कारण लिहीत असताना वेळोवेळी पाउल सांभाळणे (घाबरू नका.. पांचटपणा या अर्थी म्हणतोय मी) अंमळ कठीणच जाईल असे आजवरच्या एकूण अनुभावरून दिसते आहे. (जास्त जोरात अरेरू नये. आधीचे हुश्श्कारे आणि आताचे 'अरेरे' हे एकाच व्यक्तीचे आहेत हे आम्ही आवाजावरून ओळखू शकतो. तेव्हा सांभाळून.) असो. पुणेरी पाट्या संपल्या.. आता मूळ मुद्द्याकडे वळू.

आटपाट नगरातल्या 'सुंदर माझ्या घरात' सगळं नेहमीप्रमाणे सुरळीत चालू होतं.

१. बायकोने डायनिंग टेबलच्या खालून पातेलं उचललं, हॉलच्या एका कोपर्‍यातून डाव उचलला.
२. लपवून ठेवलेली सुरी हळूच बाहेर काढून पटकन भाजी चिरली आणि पुन्हा पटकन सुरी लपवून ठेवली.
३. हॉलमधून हिंगाची आणि मिठाची डबी आणली आणि भाजीत हिंग, मीठ घालून पुन्हा जाग्यावर (म्हणजे हॉलमध्येच) ठेवून दिली.
४. मी बेडरूम मधून टूथपेस्ट घेतली आणि ब्रशवर लावून पुन्हा जाग्यावर (म्हणजे बेडरूममधेच) ठेवून दिली.
५. दात घासून बाहेर आल्यावर मी मगाशी आत जाताना शिताफीने चुकवलेल्या टॉयलेटपेपरच्या गुंडाळीत पाय अडकून धडपडलो.
६. हॉलमध्ये येऊन सोफ्याखालून मोबाईल उचलून २-३ फोन केले. फोन झाल्यावर मोबाईल पुन्हा सोफ्याच्या खाली ठेवून दिला.

नाही.. यातलं एकही वाक्य आणि त्यांच्या (आणि वस्तूंच्याही) जागा चुकलेल्या नाहीत. सगळं अगदी जागच्या जागी आहे व्यवस्थित. आणि सुरुवातीला थोडं अवघड गेलं असलं तरी आता आम्हालाही त्याची एकदम छान सवय झालेली आहे. कोण म्हणतं सवयी बदलणं कठीण आहे? सव्वा वर्षाचा युवराज मॅनेज करत असलेल्या कुठल्याही घराच्या आणि घरच्यांच्या सवयी या अश्शा चुटकीसारख्या बदलू शकतात. बदलाव्याच लागतात. नाहीतर इतकी वर्षं करतोय तसं बाथरूममधल्या छोट्या ब्रशहोल्डर मधून ब्रश आणि पेस्ट घेऊन दात घासून झाल्यावर तिथेच ठेवायला आणि रोज सकाळी तिथूनच परत घ्यायला कोणाला आवडणार नाही? हिंग मिठाच्या डब्या त्यांच्या स्वयंपाकघराच्या नेहमीच्या जागी सापडल्या तर कुठल्या गृहिणीला आवडणार नाहीत? स्वयंपाकाचं पातेलं, डाव, झारा, चमचा अशा वस्तू चमचाळ्यातून घ्यायला आणि तिथेच ठेवायला कोणाला आवडणार नाहीत? मोबाईल टेबलवर किंवा टीपॉय वर सापडला तर कित्ती मज्जा येईल. टॉयलेटपेपरची लांबच्या लांब गुंडाळी बेडरूम, किचनपर्यंत न येता बाथरुमात तो त्याच्या योग्य स्थळी अर्थात टॉयलेटपेपरहोल्डर वरच विसावला तर काय बहार येईल.

उगाच किती त्या अपेक्षा ठेवतो आपण आणि त्या अपेक्षांच्या गुंत्यात (मी जसा टॉयलेटपेपरच्या गुंडाळीत अडकतो तसे) उगाच अडकून बसतो. कारण खरं पाहता या सगळ्या वस्तू आपापल्या जागी असल्याच पाहिजेत असा नियम का? आणि 'आपापली जागा' च्या आपल्या व्याख्येत आणि युवराजांच्या व्याखेत जमीन आस्मानाचं नाही तरी निदान बाथरूम ते बेडरूम एवढं अंतर तरी नक्कीच असतं.

आता आमच्याकडेच बघा ना. सकाळी युवराज उठले की बेडरुमीतून थेट हॉलच्या दिशेने धावत सुटतात, आवरलेला हॉल (दिवसभर पोराने केलेला सगळा पसारा आम्ही आवरून ठेवतो आणि मगच झोपतो हे सांगण्याचा सुप्त उद्देश या वाक्यात आहे असं जर कोणाला वाटत असेल तर ते १०१% खरं आहे.) बघून क्षणभर आम्हाला (आई किंवा बाप जो त्याच्या नजरेच्या तावडीत सापडेल त्याला) खुन्नस देतात, दुसरा तुच्छ कटाक्ष कोपर्‍यात विसावलेल्या खेळण्यांच्या बास्केटकडे टाकतात, त्यात विसावलेल्या कुत्रे, मांजरी, ससे, अस्वलं, गायी, बैल, बॉल, बॅट, गेम्स, विमानं, छोटी पुस्तकं, गाड्या, खुळखुळे, जोकर्स, रिंगा, ठोकळे, हेलीकॉप्टर यांना त्या बास्केटमधून दणादणा बाहेर काढतात आणि... आणि.. आणि त्याक्षणी काय होतं काही माहित पण निवडणुका संपताक्षणी जनतेकडे दुर्लक्ष करणार्‍या नेत्यांच्या थाटात आमच्या बाळासाहेबांचा (राजकारणाच्या उपमेला थोडं शोभेसं नाव नको का) ती खेळणी बास्केटमधून बाहेर भिरकावून लावून घरभर पसारा करून झाल्या झाल्या त्या खेळण्यांच्या राशीमधला इंटरेस्ट संपतो. (नक्की नेता होणार मोठेपणी.) आणि त्यानंतर त्या तुच्छ जीवांना, बाहुल्यांना, गाड्यांना तुडवत, लाथाडत '३००' मधल्या शूर योद्ध्यांप्रमाणे युवराज (मगासचं उदाहरण संपलं. म्हणून पुन्हा मूळ नाव) दणादण पावलं टाकत किचनच्या दिशेने प्रस्थान करतात. त्यांच्यामागे आम्ही हळू हळू सांभाळून पावलं टाकत कुठलंही खेळणं (आणि तंगडंही.. हे मुख्य) न मोडता चालण्याचा प्रयत्न करतो.

अ. तुम्ही 'मि. नटवरलाल' बघितलाय का? त्यात शेवटच्या प्रसंगात विक्रम (पक्षि अमजद) नटवर (पक्षि अमिताभ) ला, त्याच्या हिरविणिला (रेखा. पक्ष्याचं नाव आठवत नाही) आणि काही गाववाल्यांना एका गुहेत कोंडून ठेवतो. गुहेच्या बाहेर जमिनीच्या खाली बॉम्ब्स पेरून ठेवतो आणि स्वतः लाल चष्मा लावून जमिनीखालचे बॉम्ब्स शिताफीने चुकवून निघून जातो. त्यानंतर अमिताभ दाराचं कुलूप फोडून ('मी आणि माझा शत्रुपक्ष' मधल्या घोड्यासारखं तेही मरतुकडंच तर असतं खरं तर.. तरीही), त्या कैदेतून बाहेर पडतो. "पण त्याच्याकडे लाल चष्मा नसल्याने जमिनीखालचे बॉम्ब्स (अर्थात न दिसणारे) त्याला कसे दिसणार बरं आता?" छापाचे प्रश्न आपल्याला पडतात न पडतात तोच नटवर आयडियेची कल्पना लढवतो आणि विक्रमच्या बुटांच्या ठशांवर पाय ठेवून अगदी सावधपणे आणि शिताफीने बॉम्ब्स चुकवत गुहेच्या बाहेर पडतो.

(एवढं करण्यापेक्षा विक्रम त्यांना तिथेच मारून का टाकत नाही, एवढं मरतुकडं कुलूप का लावतो, लाल चष्म्याने जमिनीखालचे बॉम्ब्स दिसू शकतात का वगैरे वगैरे प्रश्न विचारू नयेत.)

आ. तुम्ही तुफ्फान पाऊस पडून गेल्यावर कधी डोंबिवलीच्या रस्त्यातून हिंडला आहात का? किंवा जनरलच पावसाळ्यात डोंबिवलीत फिरला आहात का? प्रत्येकजण एका हातात छत्री आणि दुसर्‍या हाताने जीन्स/पँट्स/साड्या/सलवारी पावलापासून वर करून, नजर जमिनीला खिळवून ठेवून, हलकेच एकेक पाऊल टाकत, रस्त्यावरचा चिखल, पाणी, डबकी, घाण शिताफीने चुकवत चुकवत जाताना दिसतो.

(डोंबिवलीत अजूनही पाणी साठतं का, अजूनही चिखल होतो का, मग महापालिका रस्ते दुरुस्त का करत नाही वगैरे वगैरे प्रश्न विचारू नयेत.)

युवराज ताडताड निघून गेल्यावर आम्ही त्यांच्या मागे जाताना कशी सावरत, सांभाळत, सावकाश पावलं टाकत जातो याचं अगदी चित्रमय वर्णन करण्यासाठी आणि चं प्रयोजन होतं. (बाकी मीही डोंबिवलीचाच आहे. आणि त्या चिखलाचा मला अभिमानही आहे कारण त्या सवयीमुळेच मी आज (माझ्याच) घरात कितीही पसार्‍यात निर्भयपणे चालू शकतोय. तेवढंच एक वाईटात चांगलं.) विषयांतराबद्दल (नेहमीप्रमाणेच) क्षमस्व. तर असे तीन 'सा' लावत आम्ही किचनात पोचेपर्यंत तिथल्या ट्रॉल्या, ड्रॉवर्स उघडले गेलेले असतात. त्यातून हिंग, मीठ, मसाल्याच्या डब्या (आठवतंय?) बाहेर येतात. पातेली, चिमटे, चमचे, डाव, कालथे, गाळणी आपापल्या जागा सोडतात. अशा रीतीने समस्त वस्तू अस्ताव्यस्त करून झाल्या की विक्रमची स्वारी बेडरूमीच्या दिशेने वळते. चार्जिंगला लावलेला मोबाईल खेचला जातो, धुतलेले कपडे धुण्याच्या कपड्यात आणि व्हाईसव्हर्सा ("याला मराठीत समर्पक प्रतिशब्द काय?".. हा मला आत्ता लिहिताना पडलेला प्रश्न आहे. विक्रमला तो प्रश्न पडण्याची आवश्यकता भासत नाही.) केले जातात. त्यानंतर बेडरुम, किचन, हॉल अशा अनेक फेर्‍या घडतात, अनेक वस्तूंचं (अर्थात जबरदस्तीने) स्थलांतर केलं जातं, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात रहात नाही (पायपुसणं धुतलेल्या कपड्यांच्या ढिगात बघितलं की हा वाक्प्रचार अक्षरशः जिवंत झाल्यासारखा वाटतो मला.). अचानक काहीतरी राहून गेल्याचं आठवून सिकंदराची स्वारी बाथरूममध्ये धडक देते. टॉयलेटपेपरच्या रोलवर घाव घातला जातो. तो एका हातात धरून खेचत खेचत मधल्या पॅसेजमधून बाहेर येऊन त्याची बेडरूमपर्यंत वरात काढली जाते. त्या कागदाच्या ढिगावर वर्चस्व प्रस्थापित करून झालं की कंटाळा येतो. मग पुन्हा किचन, हॉल, बेडरुम अशा फेर्‍या घडणं सुरु होतं.

तर हे असं चालू आहे अनेक दिवस. (आणि बाहेरच्या जगाला त्याचा पत्ताही नाही. जरा कोषातून बाहेर निघा आपापल्या ;-) ) पहिल्या दिवशी आवरलं, दुसर्‍या दिवशी (स्वतःला) सावरलं आणि पुन्हा आवरलं. आणि असं करता करता हे रोजच व्हायला लागलं हो. आणि त्यामुळे बाकीची कामं (म्हणजे नवीन पोस्ट्स लिहिणे, इतरांच्या पोस्ट्स वाचणे, मेलामेली करणे, बझ-बझ खेळणे वगैरे वगैरे) सोडून सारखं घरच आवरत बसायला लागायला लागलं. आधीच आम्ही 'कं'ग्रस्त आणि त्यात ही सततची आवराआवरी करून अजूनच कं यायला लागला आणि आम्ही निर्णय घेऊन टाकला. 'ठेविले अनंते तैसेची रहावे' अर्थात युवराजांनी वस्तूंना जसं आणि जिथे ठेवलं आहे तसंच आणि तिथेच राहू द्यावं आणि अगदी खरं सांगतो 'चित्ती असो द्यावे समाधान' वालं समाधान आम्ही अगदी स्वानुभवाने उपभोगायला लागलो. त्यामुळे वर दिलेलं १ ते ६ (अजूनही बरेच आहेत. आत्ता एवढेच आठवले) ची आता आम्हाला सवय झाली. सुरुवातीला जड गेलं पण आता काही वाटत नाही. मसाल्याच्या डब्या हॉलमधेच असणार, स्वच्छ कपडे धुवायला टाकलेल्या कपड्यांमध्येच मिळणार, मोबाईल सोफ्याखालीच सापडणार वगैरे वगैरेची आम्हाला एवढी सवय झाली की काहीच वेगळं वाटेनासं झालं.. अगदी अंगवळणी पडलं. आणि आता अगदी आपल्यात म्हणून सांगतो.. पातेलं, डाव, चमचे हॉलमध्ये असलं, किंवा टूथपेस्ट बेडरुममध्ये असली किंवा मोबाईल सोफ्याखाली असला की कसं बरं पडतं. म्हणजे चमचा शोधताना उगाच भांड्यांचा अख्खा ढीग शोधायला नको किंवा चमचाळ्यातली गर्दी हटवायला नको.. सोफ्यावर बसल्या बसल्या सोफ्याखाली हात घातला की मिळाला मोबाईल उगाच त्यासाठी टेबल/ड्रॉवरपर्यंत जायला नको. थोडक्यात फायदे अनेक आहेत फक्त आपल्या (वाईट) सवयी थोड्या बदलाव्या लागतील. आहात तयार?

तळटीप : वर्णन अधिक वास्तवदर्शी वाटावं (कारण ते वास्तवच आहे) म्हणून पुराव्यादाखल घरातल्या पसार्‍याचे फोटो टाकणार होतो परंतु बायकोच्या धाकाने ते आवरतं घेतलं आहे.

55 comments:

 1. वा..आदितेयवरची पोस्ट...काही प्रश्नच नाही मस्तच..उदाहरणही भारी.. लहान मुलांना जरी खेळण्याबरोबर खेळायच नसल तरी त्यांचा अस्ताव्यस्त पसारा करुन ठेवायलाच आवडतो अस माझ निरीक्षण..बाकी ३०० च नाव ऐकुन त्या वेशातील आदितेय आणि एकुण प्रसंग डोळ्यासमोर येउन चांगलाच हसलो...अजुन बरयाच सवयी बदलाव्या लागतील रे सत्यवाना कारण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त....

  ReplyDelete
 2. धन्स देव. अरे खेळण्यांशी तर खेळतच नाही तो. फक्त सगळी खेळणी बाहेर काढून ठेवतो आणि मग किचन मध्ये जाऊन भांड्यांशी आणि असंच कशाकशाशी खेळत रहातो. आणि पसारा आवरताना मग आमची ततपप होते.

  अरे हो रे. चिक्कार सवयी बदलाव्या लागणार आहेत. पुढच्या वर्षीपासून माझ्या ब्लॉगवर नवीन पोस्ट्स आणि तुमच्या नवीन पोस्ट्सवर माझ्या कमेंट दिसल्या नाहीत तर समजून जा रे बाबांनो की सवयी बदलाव्या लागल्या आहेत !! :)

  ReplyDelete
 3. जरी तुला धाकाने फोटो टाकता आले नसले तरी लिखाणाचा वास्तवदर्शी पण जराही कमी झालेल वाटत नाही.

  युवराज (पक्षी: बाळासाहेब) कि जय हो...........

  ReplyDelete
 4. अगदी तुझ्या सुंदरशा घराचं चित्रंच डोळ्या समोर उभं राहीलं. बाकी अ, आ आणि तीन सा मस्तच. आमच्या कडे भाचे कंपनी आली की घरातील सगळ्या वस्तू आपापली जागा सोडून कशा बाहेर येत त्याची आठवण झाली. :-):-)

  ReplyDelete
 5. धन्यु सचिन :-) .. मोहाला बळी पडून जर चुकून माकून मी फोटो टाकले असते तर माझ्या ब्लॉगने मान टाकली असती आणि ही ब्लॉगवरची शेवटची पोस्ट ठरली असती ;-)

  ReplyDelete
 6. हेरंब, आता तुझ्या घरी येईन तेव्हां काही विचारावेच लागणार नाही बघ मला. कुठे काय शोधायचे ते कळलेच आहे आणि उरले सुरले आदि सांगेलच. किती एनर्जी असते नं रे यांच्यात... आणि सगळा मुक्त कारभार. हे असेच सुंदर घरच मला आवडते... ज्यात खरी ’ जान ’ आहे नाहितर नुसती अती स्वच्छता व भयाण शांतता... त्यापेक्षा हे मस्त. आणि खेळण्यामधून भांडी बडवल्यानंतर येणार नाद कसा निघावा रे! :) आदितेय,झोपलास का अजून बाबाला फिरवतो आहेस? आय मीन बाबाच्या कडेवर फिरतो आहेस?

  ReplyDelete
 7. हा हा .. धन्स अपर्णा.ते अ आणि आ सारखं चालणं सततच चालू असतं. आणि वरचे सा तर सतत लागलेले असतात :P .. आता तर मी वस्तूंच्या खर्‍या जागाही विसरलोय.. खरंच :)

  ReplyDelete
 8. हा हा श्रीताई.. तू येईपर्यंत या सगळ्या वस्तूंच्या जागा अजून कुठे बदलल्या नसल्या म्हणजे मिळवलं. ;)

  फार पूर्वी आपल्या लाडक्या दूरदर्शनवर याच नावाची मुलाखतींची वगैरे काहीतरी मालिका होती. आठवत असेल तुला. चांगलं सुट होत असल्यासारखं वाटलं ते नाव (अर्थात विरुद्ध अर्थाने).. म्हणून म्हंटलं तेच देऊन टाकू.

  आणि 'सगळा मुक्त कारभार' हे अक्षरशः खरं आहे. कुठली वस्तू कुठे सापडेल, कुठून उत्पन्न होईल याचा काही नेम नसतो.

  आज युवराज झोपलेत लवकर म्हणून तर वेळच्या वेळी कमेंट्सना उत्तरं देता येतंय :)

  ReplyDelete
 9. कमेंट आदितेय साठी आहे... आदि बेटा जियो!! तुझे दोन बिछडलेले (आत्ते, मामे, मावस, चुलत कोणिही चालेल :) हेरंब आठवतेय ना हे अजून ठरायचेय.... :) )भावंड ईथे तुझी वाट पहाताहेत कारण एव्हाना आम्हाला या अति महान (महान हा शब्द कमी वाटला म्हणुन ’अति’ लावले मी) दिव्यातून शिताफिने पार पडायची सवय झाली आहे... तुझ्या आई-बाबालाही होईल :)आणि मग त्या वस्तूंच्या नव्या जागाच जास्त सोयिस्कर वाटायला लागतील.... तेव्हा तूम लगे रहो!!! :)

  हेरंब पोस्ट खुसखुशीत भन्नाट एकदम...अर्थात आदि चा पराक्रम म्हटल्यावर तू खुशीत असतोस मग या अश्या पुर्षी पोस्ट लिहितोस :D....पण मी अक्शरशहा : समजू शकते रे काय प्रसंगातून पार पडताय तुम्ही दोघं!!! परवा माझ्या याच अश्या अथांग चिडचिडीला नवरा शांतपणे म्हणाला, "हे बघ दोन पर्याय आहेत, मुलांना मारून-धमकावून शिस्त लाव की खेळणी जागी ठेवा, ते शक्य नसेल तर तू आवर, पण शांतपणे...." बघ म्हणजे तोंडाचा पट्टा पण नाही सोडायचा!!! छे कठीण, मग मी हातातले खेळणे, नेम खेळण्यांच्या डब्यातून चुकल्याचा आव आणत नवऱ्याच्या दिशेला भिरकावले... (या पसाऱ्याचा आणि एक उपयोग बघ!!! :) )
  आणि एक धोक्याची सुचना (once more...maage paN dileeye ekadaa)अजून आदि पुर्णपणे बोलायला, प्रश्न विचारायला किंवा तू कसा चुकतोयेस ते सांगायला आणि सगळ्यात महत्त्वाचे शाळेत जायला लागलेला नाही... तेव्हा निगाह रख्खो...(पायाखालच्या खेळण्यांवर आणि त्यातून सावरल्यावर भविष्यावरही :))


  वाचलीस कमेंट... बोल आता म्हणशील पुन्हा कोणाला की आपापल्या कोषातून बाहेर निघा!!! हेहे.... उगाच मला बोलायला लावून स्वत:च्या कानांवर संकट हवे आहे का???????घरोघरी उचापती मुलं....

  ’खेळण्यांचा पसारा व त्यावरील (असहाय) चर्च” हे वय वाढल्याचे लक्षण दाखवणारा अजून एक टप्पा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल तुझे अभिनंदन!!!

  ReplyDelete
 10. अदि, घराला घरपण देणारे युवराज...
  लेख झकास, अगदी अदि स्पेशल नेहमीप्रमाणे

  ReplyDelete
 11. Luved this post! वेळ सार्थकी लागला.

  धन्यवाद!

  ReplyDelete
 12. त...... न..... वे....... !!!

  हुश्श.. मगाशी वाचायला घेतली कमेंट ती आत्ता संपली :P .. jokes apart. पण एकदम झक्कास लिहिली आहेस. एकदम दिल से...

  अग आदितेय तर तिकडे यायला धावत सुटेल अशी बिछडलेली ((आत्ते, मामे, मावस, चुलत कोणिही चालेल :) तन्वी, आठवतेय ना हे अजून ठरायचेय.... :) ) भावंडं आहेत तिथे म्हटल्यावर. आणि मग त्या तिकडीने घातलेला पसारा आवरताना कंटाळून तुलाही आमच्यासारखंच 'सुंदर घर' ठेवायची सवय लागेल ;-)

  अथांग चीडचीड.. हा हा हा.. पण ते अगदी खरं आहे. चिडचिड तर होतेच पण बोलूनही काही उपयोग नाही. आपण त्यांना का रागावतोय (मुळात रागावतोय हे ही) हे त्यांना कळतच नसतं. उगाच आपली तोंडाची वाफ दवडून आरडाओरडा केल्याचं पातक माथी :) त्यापेक्षा 'मौनं सर्वार्थ साधनं' हेच खरं.

  >> मग मी हातातले खेळणे, नेम खेळण्यांच्या डब्यातून चुकल्याचा आव आणत नवऱ्याच्या दिशेला भिरकावले... (या पसाऱ्याचा आणि एक उपयोग बघ!!! :) )

  बापरे हे असे उपयोग? थोडक्यात बायकोलाही ही कमेंट वाचू देता कामा नये तर ;-)

  हो ग ही तर सुरुवात आहे. पुढचे टप्पे तर अजून अजून परीक्षा घेणारे.. patience test, stress test. काहीही म्हण. आणि पुन्हा पैकीच्या पैकी मार्क मिळवावे लागणार (आणि पैकीच्या पैकी मार्कांची तर मला आयुष्यात सवय नाही. तुला तो तरी advantage आहे ;-))

  पांढरं निशाण. कोणीही कोषात नाही. आणि जे असतील तेही तुझी कमेंट वाचून बाहेर निघातीलच :P

  आणि आता तर 'वय झालं' यांवर शिक्कामोर्तब.. १०१% !! :) :(

  तळटीप (आयला कमेंटमध्येही तळटीप. छान चाललंय) : 'आजच्या श्री हेरंब ओक यांच्या लेखावर माझे मतप्रदर्शन' असं म्हणून तू तुझी कमेंट तुझ्या ब्लॉगवर नवीन पोस्ट म्हणून टाकू शकतेस. !! :P ;)

  ReplyDelete
 13. धन्स आनंदा..

  'घरपण देणारे आणि घरभर पसारा करून घर विस्कटणारे युवराज' हे जास्त चपखल आहे. :)

  ReplyDelete
 14. नेहा, खूप आभार... अशा कमेंट्समुळेच वेळ सार्थकी लागू शकणार्‍या अजून अजून पोस्ट्स लिहायला हुरूप येतो.

  ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

  ReplyDelete
 15. फोटो नाही टाकले तरी लिखाणाच्या वास्तवदर्शी पणा मुळे सर्व चित्र डोळ्या समोर उभं राहिलं...
  नेहमी प्रमाणे लेख मस्त झालाय....

  ReplyDelete
 16. हेरंब,
  एकदम भारी वर्णन आहे. भलताच पराक्रमी युवराज आहे की! आदितेय की अद्वितीय :) अजून सव्वा वर्षाचेच आहेत चिरंजीव. आगे आगे देखो होता ही क्या!

  ReplyDelete
 17. मला तर अगदी आमच्या घराचेच वर्णन वाचल्यासारखे वाटले. माझा कुकर हॉलमध्ये असतो आणि ’a' च्या गाड्या किचन ट्रॉलीमध्ये :)
  डोंबिवलीतले रस्त्यांतुन चिखल चुकवत चालण्याची कसरत मी ही केली आहे ३ वर्षे. तरी आता स्काय वॉकमुळे थोडे कमी हाल होतात. कालच जावुन आले डोंबिवलीच्या घरी बर्‍याच दिवसांनी. बरं वाटलं, ती फडके रोडवरची गर्दी, रस्त्यावरच्या छान फ्रेश भाज्या, (rennovation केलेले) मॉडर्न कॅफे बघुन बरं वाटलं.

  ReplyDelete
 18. आदितेयचं टोपण नाव अनंत असं ठेवू शकतोस तू..."ठेविले अनंते तैसेचि.." मस्त जमून जाईल एकदम.
  बाकी...त्याचे प्रताप वाचायला मजा येते...माझ्या पुतण्याचे असलेच प्रताप बाबा मला रोज फोनवर सांगत असतात.

  ReplyDelete
 19. राजेहो, उगीच त्या छोट्याला कशाला बोल लावता? त्याच्या निमित्तने तुम्ही बाल्पणाची मजाघेता कि नाही? हा, कधि कधि होतो त्रास पण मजा ही पण येतेच की!आणी खाण तशी माती, खरे न?
  बकी तुमची वर्णन शैली एकदम परफ़ेक्ट. सुन्दर चित्र उभे केलेत.

  ReplyDelete
 20. @ Aaditey - Aadu, tu suru thev he asach...kaahi bighadat nai..!!! Are hi mothi maanase tyanchyaa soyisathi aapalyala vethila dhartaat...!!! Mazi aai pan me jara kuthe baaher gele, zopale ki sagale ghar aawarun thevate...aani mag me parat aale ki aarda orad suru ( majhi) ka aawarale sagale, mala mazya vastu milnaar kasha vaigare mhanun..!!! Pan he asech ghar sunder diste ki nai..? aapalya mule gharala gharpan yete aani hi mothi maanase "ukirada karun thevlayas gharacha" ase mhanat astaat...Aani hi tar suruwaat aahe. Tuzya aai babana vaatat asel motha zala ki hoil sagale neet tar ase naste haan kadhich...Ulat tyaat navnavin vastu add hot jaatil. Pan hyatach majja aahe re.. sagalya vastu jagewar sapadayala laagalya tar spice ch urnaar nahi kahi aayushyaat...!!! So, B as U r.... :)
  @ Heramb dada - Post lay bhaarrriii....

  ReplyDelete
 21. आदितेयला बिनशर्त पाठिंबा आणि मैथिलीला अनुमोदन. (पाठिंबा आणि अनुमोदन द्यायला आपलं काय जातं ;-), हेओ बघून घेईल...)

  आणि हल्ली तुझ्या पोस्टबरोबर प्रतिक्रिया वाचण्यात पण वेळ जातो. त्यामुळे मला माझ्या ब्लॉगवर काही लिहायला वेळ मिळत नाही. म्हणून मी पण आत्ता ठरवलं आहे त्या ब्लॉग चोरांसारखे दुसर्‍याचे पोस्ट आपल्या ब्लॉगवर टाकून आपला ब्लॉग चालू ठेवायचा. ;-)

  ReplyDelete
 22. itaka aani itaka changala kasa lihayala jamata tumhala....... mastach......thoda utsah aamhalahi dya ki....

  ReplyDelete
 23. हा हा हा हाहा ... सही वर्णन ....
  बाल पण किती मस्त असतं.. तुम्ही ओरडा, रडा की काय बी करा.. आम्ही करायच ते करुच...
  असला च्यालेन्ज देतात न ही बच्चे कंपनी ....
  पोरं थोड़ी मोठी झालीत की पद्धत बदलते , पण बाणा तोच असतो.. "आम्ही करायच ते करुच"
  तू लिहिल्या प्रमाण आपल्यालाच सवय बदलावी लागते..
  थोड्याच वर्षात, म्हणजे पोरं प्रश्न विचार्न्यालायक झालीत की, मस्त पैकी प्रश्न - उत्तरांचे तास सुरु होतात..
  आम्ही सध्या त्याच Phase मधून जातोय..
  (वडाच्या झाडा कड़े बोट दाखवून) त्याच झाडाला तश्या फांद्या का लोम्ब्तायत? बाकीच्याना का नाही?
  आपली तब्येत बरी नसली, की आपल्याला ताप का येतो..?
  नागपुर हुन बाबांचा आवाज इथे कसा येतो फ़ोन मधून? मग ते का नाही येऊ शकत?
  (नको त्या advertise बघून) "हे काय आहे?" किंवा "त्याची छत्री कशी झाली ?"
  आणि असे अनेक प्रश्न.. काय उत्तर द्याव, ते पण कळत नाही आणि प्रश्न विचारू नकोस असाही म्हणू शकत नाही..

  .. इतरानी कमेंटी लिहिल्या प्रमाने "पिक्चर अभी बाकि हैं मेरे दोस्त" ..
  "और फिर उस पे तुम्हारी जबरदस्त पोस्ट भी..."

  ReplyDelete
 24. धन्स सागर. अरे वर सचिनला म्हंटल्याप्रमाणे जर मी चुकून पसा-याचे फोटो टाकले असते ना तर माझी धडगत नव्हती ;-)

  ReplyDelete
 25. आदितेय म्हट्ल की डोळे(?)झाकुन ५ * द्यावे तुझ्या पोस्टला....
  येवु देत अजुन

  ReplyDelete
 26. आभार्स निरंजन. खरंय. त्याला खरं तर अद्वितीयच म्हटलं पाहिजे. (अर्थात सगळी पोरं त्यांच्या आईबापांच्या दृष्टीने अद्वितीयच :) ) .. हो ना. सव्वा वर्षात ही हलत झालीये. पुढे काय होईल या कल्पनेने आत्ताच घाम फुटतोय.

  ReplyDelete
 27. हा हा सोनाली.. अग हे AAA (आर्यन, आयुष, आदितेय) आणि ईशान, गौरी (तन्वीची बाळं) म्हणजे सगळी कुंभमेळ्यात हरवलेली (बिछडलेली) भावंडं आहेत :).. त्यामुळे सगळीकडे 'मातीच्या चुलीच' असणार :)

  हो मी गेल्यावर्षी गेलो होतो तेव्हा बघितलं स्काय वॉकमुळे बरंच सुसह्य झालं आहे चालणं. अहाहा फडके रोड.. !! नको आठवण करून देऊस :)

  आयला मॉडर्न कॅफे रिनोव्हेट केलं? सहीये. रेट्स पण रिनोव्हेट केले असतील मग. ;)

  ReplyDelete
 28. हा हा.. प्रोफेटा. अरे आमचीच नावं बदलायला लागणार आहेत आता "ठेविले आदितेये" :)

  अरे हे प्रताप रोज चालू असतात. आणि रोज नवीन नवीन काहीतरी. कधी कधी (ब-याचदा) तर डोकं दुखायला लागतं. पण (डोकं दुखत नसेल तेव्हा) मजाही येते जाम. it's an experience for life-time.

  ReplyDelete
 29. खूप आभार अरुणाताई. अहो ही बालपणाची मजा घेणं कायच्याकाय भारी पडायला लागलंय हल्ली :) आणि खाण तशी माती हे ही थोडंफार खरं असेल म्हणा.. आम्ही आमच्या आईबाबांना छळलं त्याचं उटट पोरगा काढतोय आता :)

  आणि हो, मला अरे-तुरे चालेल (आवडेल)

  ReplyDelete
 30. मैथिली?? आदितेयला एवढी मोठ्ठी प्रतिक्रिया आणि मला एवढीशीच?? ;-)

  अग तुझं आणि आदितेयचं सगळं शेम-टू-शेमच असणार. कारण तुही बच्चू आहेस ना .. :)

  अग आणि पुढेही हा असाच पसारा करत राहिला तरी ठीके.. त्यालाच सांगायचं आवरायला. थोडं रागावलं की झालं (असं मला आत्ता तरी वाटतंय ;-) ) .. पण आत्ता तर ओरडूनही काही उपयोग होत नाही. नेमका भोकाड पसरला तर शांत करायचं अजून एक काम वाढलं :) हे एवढं सगळं करण्यापेक्षा 'सुंदर माझ्या घरात' राहण्याची सवय करून घेणं हे केव्हाही उत्तम :) पावलं थोडी ३ सा मध्ये टाकली की झालं :)

  आणि आता तुझ्या पसा-यावर पण एक पोस्ट येऊन जाऊ देत :)

  ReplyDelete
 31. >> आदितेयला बिनशर्त पाठिंबा आणि मैथिलीला अनुमोदन. (पाठिंबा आणि अनुमोदन द्यायला आपलं काय जातं ;-), हेओ बघून घेईल...)

  सिद्धार्थ, येईल येईल तुझीही वेळ येईल. आम्ही जात्यात असलो तरी तू सुपात आहेस हे विसरू नकोस ;-)

  >> त्यामुळे मला माझ्या ब्लॉगवर काही लिहायला वेळ मिळत नाही.

  ए नॉ चोलबे.. काहीतरी नवीन पोस्ट टाकून दे बघू झटपट.. फसलेल्या खादाडीचा भाग २ आहे का? ;-)

  ReplyDelete
 32. धन्स सुषमेय.. अरे तुझ्या सारख्या उत्तम लघुकथा कुठे लिहिता येतात बाबा आम्हाला. लघुकथा लिहायला बसलो तर ३-४ भागांचं पाल्हाळ लावलं जातं :)

  ReplyDelete
 33. :) अमित... धन्यु.. अरे तुम्ही सगळे मिळून अजून अजून घाबरवताय मला. आत्ताच तंतरली आहे माझी. पण हे मात्र खरं आहे की बोलायला लागल्यावर तर प्रश्नांच्या असल्या फैरी झडणार आहेत ना की त्यांना तोंड देताना वाट लागणार आहे नुसती.

  अरे "आम्ही करायच ते करुच" याला challenge देण्यात काहीच अर्थ नाही. कारण ते नेहमीच जिंकणार (जसं आपल्या लहानपणी आपल्या आई बाबांशी आपण जिंकायचो :) )

  अरे आणि मग तुमच्या घरातल्या या प्रश्नोत्तरांच्या तासावर एक पोस्ट होऊन जाऊदे तुझ्या ब्लॉगवर. काय म्हणतोस? :)

  ReplyDelete
 34. हा हा सागर. धन्यु. एवढे ५ * खाऊन दात कीडतील (कसला बकवास पीजे आहे हा :( .. असो..)

  ReplyDelete
 35. hee hee heeलगे रहो....
  आमच्याच घरातून तुझा आत्मा फ़िरून आलाय की क्काय अशी शंका वाटावी इक्ता लेख "आपला" वाटतोय.


  (:( मघाशी काय झकास मोठ्ठी कॉमेंट टायपली होती पण ती

  पोस्टच झाली नाही. आता उत्साह संपला)

  पण लेख झकास. भावना घरपोच झाल्या :)

  ReplyDelete
 36. हा हा.. धन्स शिनु.. अग माझा आत्मा बर्‍याच घरांमधून फिरून आला आहे असं वाटतंय. वरच्या कमेंट्स वाच :)..

  अरेरे आणि कमेंट पोस्ट का नाही झाली? अग कॉफीत पेस्ट तरी घालून ठेवायची ना. पण हरकत नाय.. तू काय टायपलं असशील याची कल्पना आहे (टू इज पसारा :-) ) त्यामुळे तुझ्याही भावना घरपोच झाल्या आहेत. चिंता नसावी.. :)

  ReplyDelete
 37. हेरम्ब, मी जरा गम्मत केली. लहानपणी सगळीच मुले ख्डकर असतात. आणी ती तशीच असलेली आवडतात.आणी खरे सान्गु, त्यान्च्या ह्याच खोड्या नन्तर चे दिवस सुखमय करतात. मनात, ह्रुदयात आणी केमेर्यात साठवून ठेवा.

  ReplyDelete
 38. एकूण घराला घरपण देणारा दि्सतोय तुमचा युवराज. वर्णन मस्त आहे

  शुभांगी

  ReplyDelete
 39. अरे, तो तुमच्या तब्बेतीची काळजी घेतोय!
  तुम्हाला भरपूर व्यायाम घडावा म्हणून पसारा करुन ठेवतो न चुकता..
  व्हाईसव्हर्साला एकच शब्द हवा असेल तर अदलाबदली किंवा याउलट असे म्हणता येईल, पण तो चपखल वाटत नाही. देकांना माहीत असेल..

  ReplyDelete
 40. अरे, तो तुमच्या तब्बेतीची काळजी घेतोय!
  तुम्हाला भरपूर व्यायाम घडावा म्हणून पसारा करुन ठेवतो न चुकता..
  व्हाईसव्हर्साला एकच शब्द हवा असेल तर अदलाबदली किंवा याउलट असे म्हणता येईल, पण तो चपखल वाटत नाही. देकांना माहीत असेल..

  ReplyDelete
 41. हो अरुणाताई. मी पण गंमतच करत होतो :) .. पण खरंय.. मजा येते जाम .. This is a lifetime experience.. !!

  ReplyDelete
 42. धन्स शुभांगी. हो खरंय. घराला घरपण आहे ते युवराजांमुळेच. ऑफिसमधून कधी एकदा घरी जाऊ त्याच्याशी खेळतो असं होतं.

  आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

  ReplyDelete
 43. अगदी बरोबर मीनल. मागे एका पोस्टमध्ये म्हटलं होतं त्याप्रमाणे आम्हाला फिट राहण्यासाठी वेगळ्या जिम, जॉगिंग वगैरे कसली कसलीच गरज नाही. रोज पसारा आवरून ठेवला की झालं :P

  हो आता देकांनाच विचारतो. ते तर रागावणार आहेत आता की हा सारखा नवीन नवीन शब्द घेऊन येतो आणि प्रतिशब्द विचारत रहातो.

  ReplyDelete
 44. Sneh Melawyawar post takali aahe....Mothi taakane nai jamale pan takaliye... :)

  ReplyDelete
 45. कमेंटलोय तिकडे :)

  ReplyDelete
 46. मी नेहेमी म्हणतो, व्यवस्थित असेल तर ते घर म्हणजे घर वाट्त नाही. चहा प्यायल्यावर कप सोफ्याच्या खाली सरकवून ठेवणॆ. चिवडा खाणं झालं की डिश समोरच्या टेबलवर तशीच ठेउन देणे, लॅप टॉप चार्जिग ला लाउन समोरच्या सोफ्यावर तसाच दिवसभर ठेउन देणे, ऑफिसची बॅग समोरच्या खोलीत कोपऱ्यात फेकणे.
  अरे खरंच.. माझं पण आदी सारखंच आहे नां????
  मस्त आहे रे पोस्ट !!

  ReplyDelete
 47. धन्स काका आणि खरंच की.. !! तुमच्या दोघांच्या सवयी अगदी जुळतायत :).. आणि आता तुम्हीही असंच म्हंटल्यावर तर आम्ही लेकाला ओरडूही शकत नाही..

  ठीके मग 'सुंदर माझ्या घरात' असंच राहायची सवय करायला लागणार तर ;-)

  ReplyDelete
 48. लहानपणीची मजा वेगळीच असते, म्हणूनच पूर्वी किंवा आता म्हणतात कि लहान पण देग देवा, मस्त सुंदर झकास केखा आवडला

  ReplyDelete
 49. आभार काका.. लहानपण दे गा देवा हे अगदी खरं आहे.

  ReplyDelete
 50. बर्‍याच दिवसांपासून 'वटवट सत्यवान' चं विजेट वेगवेगळ्या ब्लॉगवर पाहत होतो....आणि आज विज़िट दिली. मस्त ब्लॉग आहे. खूप आवडला. जुन्याही खूपश्या पोस्ट्स वाचल्या. सही लिहिता तुम्ही.
  आणि सगळ्यात आवडलं ते 'नवी जर्सी नवा यॉर्क' ! मस्तच !!
  बाकी मी पण डोंबिवलीचाच. पारिस्थिती काहीच बदललेली नाही, म्हणून येता पावसाळ्यातही 'अडथळ्यांच्या शर्यतीत' भाग घ्यावा लागणार दिसतोय ;-) :-D

  ReplyDelete
 51. आभार क्षितीज. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल तुझेही आणि माझं वटवट विजेट लावणार्‍या सगळ्या मित्रमंडळींचेही. आणि तुझं ब्लॉगवर स्वागत. असाच भेट देत रहा.

  हो मी गेल्या वर्षी डोंबिवलीत जाऊन आलो. सगळं तसंच आहे अजून :(

  ReplyDelete
 52. हेरंब एक म्हणजे आधीची कमेन्ट (वावि प्रकरणावरची) तर उतारा म्हणून हे वाचायला घेतलं हे वेगळं म्हणून सांगाया नको...:) लोटपोट झाले...
  BTW तुमचं एक (कुठलंही) भावंडं दुसर्‍या कोस्टात सुखाने हेच प्रकार करतंय हे वेगळं सांगायला नको....फ़क्त आता त्याच्याच तोंडाचा पट्टा सुरु झालाय त्यामुळे मी निमुटपणे गाडी हाकतेय....(अगदी शब्दशः घेतलास अर्थ तरी खरंय...)

  ReplyDelete
 53. धन्स अपर्णा :D .. उतारा चांगला शोधलास ;)

  सगळ्या कोस्टात, सगळ्या देशांत आमच्या शाखा (भावंडं) आहेत ;)

  हो. शब्दशःच घेतोय.. आजच ऐकला की तो तोंडाचा पट्टा :)

  ReplyDelete
 54. नेमक्या कोणाच्या सवयी घेतल्या आहेत त्याने??? तुझ्या बरोबर त्याला भेटायची जाम उत्सुकता आहे... आरुष आणि आर्यन यांना भेटून झाले आता हाच बाकी आहे.

  ReplyDelete
 55. अरे कोणाच्या म्हणजे काय अर्थात माझ्याच.. (Proud to announce ) )

  कधी भेट होणार आहे देव जाणे. तुझी बोट वळव की रे जरा आणि नवीन यॉर्काच्या किनारी आण बरं !!

  ReplyDelete