Tuesday, May 18, 2010

ते, तुम्ही आणि आम्ही

छत्तीसगढमधील दंतेवाडा परिसरात नक्षलवाद्यांनी पुन्हा हल्ला करून एक बस भूसुरुंगांच्या सहाय्याने उडवून दिली. आता पुन्हा सर्वसामान्य जनता चवताळून उठेल. सरकार कसे निर्लज्ज आहे, कसे निष्क्रीय आहे हे दाखवणारी अनेक लेख वृत्तपत्र, मासिकं, ब्लॉग्स, टॉक शो, चर्चासत्रं आता रंगतील. किती वर्षात किती लोक मारले गेले याच्या आकडेवार्‍या सदर केल्या जातील. आणि या सगळ्यांमुळे 'सरकार भ्याड आहे' हा लोकांचा असलेला समज अजून दृढ होईल. मी मुद्दाम समज म्हणतोय. कारण तो निव्वळ समज आहे, सत्य परिस्थिती नव्हे. सत्यपरिस्थिती तुम्हाआम्हाला, जनतेला, बहुतांशी लोकांना माहीतच नसते. आणि उगाच सगळे म्हणतात म्हणून आपणही सरकारला नावे ठेवू लागतो. पण सरकारचीही बाजू आहे. अशी बाजू की जी आपल्याला कधीच कळत नाही, दिसत नाही. या दुसर्‍या बाजूवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.

काय आहे ही दुसरी बाजू?

दुसरी बाजू जाणून घेण्यापूर्वी 'सरकार निष्क्रीय आहे, कुठलीही ठाम भूमिका घेण्यास सक्षम नाही' असे जे समज आपल्या मनात भरून दिले गेलेले असतात ते दूर सारून पूर्वग्रहदुषितपणा दूर सारून मोकळेपणाने विचार करायला हवा. २००९-१० मध्ये सरकारने नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी अमुक अमुक रुपये वापरले.

शस्त्रखरेदी : रु. अमुक अमुक
वाहन खरेदी : रु. अमुक अमुक
प्रशिक्षण : रु. अमुक अमुक
पगार : रु. अमुक अमुक
विशेष टीमच्या नियुक्तीचा खर्च : रु. अमुक अमुक

सरकार जेव्हा एवढा खर्च करते तेव्हा ते निष्क्रीय आहे किंवा त्याला लोकांच्या मागण्यांची जाण नाही, भावनांची कदर नाही असे कसे म्हणता येईल? उलट सरकार नक्षलवादी चळवळीचा समूळ निषेध करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी सरकार वेगवेगळया योजना आखत आहे. पण त्या योजनांचे दृष्य परिणाम प्रत्यक्षात दिसण्यासाठी अजून काही वर्षं वाट पहावी लागेल. नक्षलवादाच्या चळवळीचा जन्म झाल्यापासून सुरुवातीची काही वर्षं सोडली तर उलट ती उत्तरोत्तर निकामी करण्यातच सरकारला यश आले आहे. ते कसे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला आधी नक्षलवादी चळवळीची सुरुवात कशी झाली हे पाहायला लागेल.

नक्षलवादाची सुरुवात

सुमारे अमुक अमुक रोजी, अमुक अमुक या जंगलात, अमुक अमुक आणि तमुक तमुक या दोन तरुणांनी त्यावेळच्या सत्तेच्या, जमिनदारीच्या, फसवेगिरीच्या विरोधात एक जालीम पाऊल म्हणून आणि निर्धन शेतकरी, भूमिपुत्र यांना मदतीचा हात देण्यासाठी ही चळवळ सुरु केली. त्या चळवळीचा इतिहास पुढील प्रमाणे

--------
--------
--------
------
-------
--------

तर हा झाला नक्षलवादाचा इतिहास. हा इतिहास पाहिल्यावर नक्षलवाद उत्तरोत्तर निकामी करण्यात सरकारला कसे यश आले आहे ते आपण बघू.

आकडेवारी

कालावधी : १९८१-९०
हल्ले : १२२
मृतांची संख्या : अंदाजे ४७३
मृत पोलिसांची संख्या : --
मृत स्त्रियांची संख्या : --
मृत मुलांची संख्या : --

कालावधी : १९९१-२०००
हल्ले : ११५
मृतांची संख्या : अंदाजे ४२७
मृत पोलिसांची संख्या : --
मृत स्त्रियांची संख्या : --
मृत मुलांची संख्या : --

कालावधी : २००१-२०१०
हल्ले : १०२
मृतांची संख्या : अंदाजे ३९८
मृत पोलिसांची संख्या : --
मृत स्त्रियांची संख्या : --
मृत मुलांची संख्या : --

तर या आकडेवारीवर बारकाईने नजर फिरवल्यास एक गोष्ट लक्षात येते की विरोधक कितीही काहीही म्हणत असले तरी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांची आणि त्यातील मृतांची कमी कमी होत चालली आहे हे नक्की. आणि अर्थात हे सरकारी आकडे आहेत त्यामुळे शंका घ्यायला वाव नाहीच. अशा वेळी सरकारच्या डावपेचांवर अविश्वास न दर्शवता सरकारला अधिकाधिक पाठिंबा देणे हे आपलं कर्तव्य आहे जेणेकरून सरकारला वाटाघाटी करून, चर्चेने प्रश्न सोडवायला मदत होते. या अशा वारंवार केल्या जाणार्‍या सरकारच्या आवाहनांना प्रतिसाद देऊन गेल्या तीस वर्षात जवळपास १४ नक्षलवाद्यांनी शस्त्रं खाली ठेवून शरणागती पत्करली आहे. अशा अजून काही चर्चांच्या फेर्‍या उत्तरोत्तर घडत गेल्या की शस्त्रं खाली ठेवणार्‍या नक्षलवाद्यांची संख्या वाढत जाईल हे नक्कीच. फक्त त्यासाठी सरकारला थोडा वेळ द्यायला हवा.

आपण काय करतो? आपण काय करायला हवं?

हल्ली सरकारला नावं ठेवून, सरकारच्या ध्येयधोरणांवर टीका करून, सरकारच्या कामाचं, मर्यादित का होईना पण मिळालेल्या यशाचं कौतुक न करता सरकारवर हल्ला करायची फॅशनच आहे. पण अशा वेळी आपण काही प्रश्न स्वतःला विचारायला हवेत.

आपण काय करतो? :

सरकारच्या धोरणांवर टीका करतो.
सरकारच्या पद्धतीवर हल्ला करतो.
सरकारला नावं ठेवतो.

आपण काय करायला हवं?

सरकारची भूमिका जाणून घ्यायला हवी.
चर्चा आणि वाटाघाटींचे दुरगामी परिणाम लक्षात घ्यायला हवेत.
सरकारला पाठिंबा द्यायला हवा.
जनमानसात सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

**

बस झालं च्यायला. पुन्हा एकदा झालेल्या नक्षलवाद्यांच्या भीषण हल्ल्यानंतर विविध तथाकथित बुद्धिवादी, विचारवंत, स्तंभलेखक आणि लाखो रुपडे घेऊन 'पेड न्यूज' छापणारे तथाकथित निर्भीड संपादक यांच्या दृष्टीकोनातून लिहायचा विचार करत होतो. तेवढ्यात चिदुभाऊं नक्षलवाद्यांकडे ७२ तास हल्ला न करण्याची मागितलेली भीक नजरेस पडली. आणि त्यानंतर तर खात्रीच झाली की असे काही लेख येतीलच. (अजून आलेले नाहीत.. म्हणजे निदान मी तरी वाचलेले नाहीत. पण पैसे घेऊन किंवा ना घेताही सरकारच्या चुकीच्या गोष्टींचीही भलामण करणारा एक मोठा वर्ग अस्तित्वात आहे.). वरची बडबड लिहिताना सुरुवातीला अवघड जाईल असं वाटलं होतं. पण नंतर लक्षात आलं की हे काही अवघड नाही. थोडा मेंदू बाजूला ठेवून, भावनाशून्य बनून, विचारांना फाटा देऊन लेखणी सरसावली की सगळं शक्य आहे. आणि आपलं मत अजून पटवून द्यायला उगाच जुना इतिहास द्यायचा, आकडेवार्‍या छापायच्या, सरकारने आत्तापर्यंत यांवर किती खर्च केला आहे ते दुकानात किमतीची लेबलं लावली असल्याप्रमाणे द्यायचं, प्रत्येक जीवाला किंमत आहे हे साळसुदपणे विसरून जाऊन मृतांची संख्या कशी ३/५/९/१३ अशा कुठल्याही आकड्याने कमी झाल्याचं दाखवायचं आणि त्यायोगे सरकारची भूमिका कशी बरोबर आहे हे लोकांच्या मनात ठसवण्याचा उगाच प्रयत्न करायचा.
अरे तुम्ही किती खर्च केलात याच्याशी काय घेणंदेणं आहे सामान्य माणसाला? अजूनही आदिवासी, पोलीस, इतर निष्पाप मारतायत एवढंच दिसतंय आम्हाला. तुम्ही गणित कसं सोडवता, किती हातचे घेता, कुठली पद्धत वापरता याच्याशी आमचा सबंध नाही. आम्हाला योग्य उत्तर मिळालं पाहिजे. सुभाषबाबू म्हणाले होते "इंग्रजांशी लढून भारतमातेला मुक्त करण्यासाठी मला सैतानाची मदत घ्यावी लागली तरी ती मी आनंदाने घेईन." तद्वत कुठलीही पद्धत वापरा पण या नक्षलवाद्यांचा बिमोड करा. पुरता बंदोबस्त करा. उगाच "लष्कराची मदत घेणार नाही, पोलीस सक्षम आहेत" च्या टिमक्या वाजवत बसू नका.

आणि हल्ली तर अजून एक प्रॉब्लेम झालाय च्यायला. असं सरकारला प्रश्न विचारायला लागलं की उलट आपल्यालाच प्रश्न विचारले जातात "हल्ली तर काही झालं की सरकारला नावं ठेवायची फॅशनच आहे. पण तुम्ही स्वतः काय करताय?" सरकारच्या निष्क्रीयपणावर वार केले की हे "आपण काय करतोय" वाले प्रश्न हमखास विचारले जातात. त्याने तर डोकं अजून किटतं... अरे !!!! आता नक्षलवाद्यांना तोंड द्यायला सामान्य माणसाने जंगलात उतरावं अशी अपेक्षा आहे की काय तुमची?

या असल्या लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो मला. नक्षलवादी, अतिरेकी हल्ल्यांमध्ये तुमच्या घरचे/नातेवाईक/मित्रमंडळी यातलं कधी कोणी मृत सोडा साधं जखमी तरी झालं आहे का? साधं खरचटलं तरी आहे का कोणाला? की स्वतःच्या जवळच्या कोणाचा जीव गेल्याशिवाय तिथे नक्षलवाद्यांच्या गोळ्यांना बळी पाडणार्‍या जीवांची किंमत कळणार नाहीये तुम्हाला?

सरकारला तर असंख्य प्रश्न आहेत.

१. अजून किती बळी गेल्यावर शस्त्रसंधीच्या भिका मागणं सोडून काहीतरी कडक उपाय योजण्याचा विचार आहे तुमचा?
२. अजून किती दिवस नक्षलवाद्यांना अतिरेकी न संबोधता त्यांना भारताचे नागरिक म्हणण्याचं ठरवलं आहेत तुम्ही?
३. अजून किती पोलीस ठार झाल्यावर (आणि तेही हालहाल होऊन) लष्करी कारवाई करण्याचा विचार आहे तुमचा?
४. अजून किती गावं, जिल्हे, राज्य नक्षलवाद्यांच्या हातात गेल्यावर जागे होणार आहात तुम्ही?
५. अजून किती लाख/कोटी रुपये आणि शस्त्रास्त्रांची मदत इतर अतिरेकी गटांकडून त्यांना होतेय हे सिद्ध झाल्यावर तुम्ही त्यांना अतिरेकी ठरवून त्यांचा बिमोड करण्याचा विचार करणार आहात?
६. अजून किती निष्पाप आदिवासींचे जीव जाईपर्यंत काही ठोस कृती न करता फक्त नक्षलग्रस्त प्रदेशाच्या हवाई टेहळण्या करण्याचा विचार आहे तुमचा?

एकदा देऊनच टाका सगळी उत्तरं. म्हणजे मग हे सगळे आकडे सर होईपर्यंत, तुमच्या पापांचे घडे भरेपर्यंत, तुमच्या कोडगेपणावर आणि षंढपणावर प्रश्नचिन्हं उमटवण्याचं धाडस करणार नाही आम्ही. जगत राहू तुमच्यासारखेच स्वतःपुरताच विचार करत, स्वतःच्याच विश्वात मग्न होत !!!

43 comments:

 1. श्रिलंकेने लिट्टेविरुदध जी पाउले उचलली व ज्याप्रकारे तीचा नायनाट केला.ते भारतासारख्या मोठ्या देशाला का जमत नाही.आता हयांना तिथे दौरा काढायचा असेल ना म्हणुन ती ७२ तासांची भिक.एवढ्या मोठ्या संख्येने लोक मरत आहेत काहीच वाटत नाही का हया लोकांना,खरच इतक स्वस्त झाल आहे का मरण.असो वाचतांना सुरुवातीला तुझ एवढ मतपरिवर्तन कस झाल अस वाटत होत.

  ReplyDelete
 2. अगदी उत्तम उदाहरण दिलं आहेस देव. श्रीलंकेने उत्तम उदाहरण घालून दिलं आहे दहशतवादाचा नायनाट करण्याचं.

  सुरुवातीला मुद्दामच उलटं लिहिलं. कारण असेही बरेच लेख वाचायला मिळतात काही तथाकथित बुद्धिवादी स्तंभलेखकांकडून..

  ReplyDelete
 3. Glad to read your post. If you can recollect my previous comment on your Kasab's case, i proposed the same solution. Democracy is not meant for every country and not every problem can be solved using democratic ways. Indira Gandhi, during operation "Blue Star" successfully eliminated Babbar Khalsa 'coz she never really relied on democratic ways to fight terrorism. Again repeating myself,,,, If we've to wage war on these foreign infiltrators, certain civil rights, at least for sometime, must be suspended...

  ReplyDelete
 4. Thanks a lot, Sarang. Yes, I do remember your comment. Pretty much. In fact I, too, was willing to mention about 'Operation Blue star' in the post but somehow missed that. What keeps me wondering is even after these repeated attacks and man-slaughterings how could anyone as good as home minister of nation could make a fresh offer for talks with Naxals !!!!

  ReplyDelete
 5. हेरंब,
  लेख वाचायला सुरुवात केली आणि वाटलं, ह्याला सरकारचा एव्हढा पुळका कुठला? हा पण विकला गेला काय. आणि पुढे वाचल्या वर ह्या लेखन शैली वर फिदा झालो. एकदम परीणामकारक लेख.

  नक्षलवादी, भिन्द्रनवाले, ही सरकार / राजकारण्यांनीच तयार केलेली भूतं आहेत. तेव्हा त्यांचा नायनाट करायचे काम कठीणच. आणि हा प्रश्न सोडवायचा तर त्याच्या मुळाशी जाऊन कारणमिमांसा करायला हवी ना? स्थानिकांवर केलेल्या अत्याचारामध्ये नक्षलवादाचा जन्म झाला आहे. तेव्हा स्थानिकांचा विश्वास परत मिळवूनच नक्षलवादाच्या प्रतिकाराची सुरूवात व्हायला हवी. नाहीतर सारं मुसळ केरात!

  ReplyDelete
 6. अगदी उत्तम लेख लिहिला आहेस हेरंब..
  सुरुवातीला वाटलं असा काय लिहितोय हा. असं कसं ह्याच एकदम सरकारी प्रेम जाग झालं पण नंतर च्यायला ने सुरुवात झाली आणि सर्व उलगडा केलास. तू लिहिल्या प्रमाणे ह्या सरकारने एकदा तरी विचार करावा आणि ह्या अजून किती ....? ह्या सर्व प्रश्ननांची उत्तरं द्यावीत. आणि हो सरकारची कदाचित हीच अपेक्षा असेल कि क्षलवाद्यांना तोंड द्यायला सामान्य माणसानेच जंगलात उतरावं. काय माहित कदाचित हे बोलायलाही हि लोकं मागेपुढे पाहणार नाहीत.

  ReplyDelete
 7. लोकशाही लोकशाही जी काय म्हणतो ती ही असेल तर त्यापेक्षा हुकुमशाही बेहत्तर. तुमच्या राज्यात चाललेला हिंसाचार जर तुम्ही सामंजस्य आणि बोलणी करून (ती पण टॅप्मप्लीस म्हणून :) ) सोडवणार असाल तर झाला कल्याण आपल. जो पर्यंत हे नक्षलवादी एका मोठ्या राजकारण्याला उडवत नाही तो पर्यंत कोणालाच जाग येणार नाही लिहून घे हेरंब. सामन्य लोक मरतात, थोडी सहानभूती दाखवतात हेच राजकारणी आणि व्यस्त होतात..
  कोणाला काही काही पडली नाही आहे सामान्य लोकांच्या जीवाची...

  ReplyDelete
 8. वाचायला सुरूवात केली आणि बेक्कार बुचकळ्यात पडलो. सरकारची बाजू घेऊन स्वतःचीच समजूत घालू बघतोयस वगैरे वाटलं. उत्तरार्ध बघून मात्र तू तूच असल्याची खात्री पटली.
  सरकारवरचा विश्वास हा विषय जेव्हा निघतो तेव्हा एका अत्यंत आचरट चित्रपटातलं एक अत्यंत अर्थपूर्ण वाक्य आठवतं.
  "You dont have to believe in your government to be a true patriot, you just have to believe in your country"

  ReplyDelete
 9. छान झालाय लेख. पहिल्यांदा वाटलं कॉँग्रेस जॉइन केलीयेस की काय....पण नंतर लक्षात आलं.
  आणि हो नक्शलवाद्यांनी चिदुभाऊंना भीक घातली नाही:
  http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=70943:2010-05-18-19-37-15&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104 या लेखा खाली बातमी आहे.
  नक्षलवाद्यांनी प्रस्ताव फेटाळला
  बस्तर :
  नक्षलवाद्यांनी ७२ तास हिंसाचार थांबविल्यास सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज केले. मात्र नक्षलवाद्यांनी ‘आम्ही आमची शस्त्रे खाली ठेवू शकत नाही’ असे प्रत्युत्तर देत हा प्रस्ताव फेटाळून लावला.

  ReplyDelete
 10. Apratim lekh...!!! Khoopch sunder mandani..!!
  Suruwaat vachtaana mi suddha chamakale ch jara..pan nantar ulgada zala.
  >> नक्षलवादी, अतिरेकी हल्ल्यांमध्ये तुमच्या घरचे/नातेवाईक/मित्रमंडळी यातलं कधी कोणी मृत सोडा साधं जखमी तरी झालं आहे का? साधं खरचटलं तरी आहे का कोणाला? की स्वतःच्या जवळच्या कोणाचा जीव गेल्याशिवाय तिथे नक्षलवाद्यांच्या गोळ्यांना बळी पाडणार्‍या जीवांची किंमत कळणार नाहीये तुम्हाला?
  kharey...majhya aaju bajula ase barech lok aahet je mhantat " Nakshalvad mhanje kahi dahashatvaad nave. Ti ek chalval aahe. Tyanchya virodhat lashkari kaarvaai karu naye. bla..bla.." Are pan chalvaliche swarup kadhich sodaley tyani. Niraparadh lokanche bali ghenare gunhegaar nahiyet ka...??? Tyanchya virodhat kathor kaarvaai ch vhayala havi.
  >> सरकारच्या निष्क्रीयपणावर वार केले की हे "आपण काय करतोय" वाले प्रश्न हमखास विचारले जातात. Are pan sarkaar ne kahitari karave mhanun ch tar aamhi nivdun diley na tyana. Ha pratiprashn tar dokyat jaato nehmich majhya...

  ReplyDelete
 11. जोपर्यंत सोनियामातांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर राहणार आहे, तोवर फक्त इटलीची भरभराट होत राहणार आहे. आपण हळूहळू अटळ अंताच्या दिशेने चाललेलो आहोत. हे वाक्य निराशावादी आहे, पण सत्य आहे. ज्या देशात फक्त आडनावामुळे बहुमत मिळू शकतं, त्या देशाची हीच लायकी आहे!

  ReplyDelete
 12. हेरंब सुरुवातीला वाचताना हे काय झालं ह्याला असंच वाटत होतं... ह्या चीड आणणा-या गोष्टीची हा भलावण कशी काय करू शकतो??

  पण लेख नेहमीप्रमाणेच फर्मास जमला आहे... खरच श्रीलंकेचा आदर्श ठेवायला हवाय...

  कधी कधी तर वाटतं की सैन्याच्या हातात सत्ता द्यायला हवीये... इतकी चीडचीड होते ना...

  पण तू खूप छान लिहिलं आहेस.. म्हणजे वाचताना प्रत्येक वाक्य अरे हे तर माझंच मत आहे असंच वाटत होतं... (फक्त ती सुरुवात सोडली तर...) :)

  ReplyDelete
 13. दंतेवाडा प्रकरण म्हणजे नंक्षावादायचा बालेकिल्ला आहे, सरकारवर विरोधी पक्ष टीका करणारच पण वेळ आली तर पाठिबा दिला पाहिजे,नंक्षावाद हा एकटा सरकारचा प्रश्न्न नाही तो सर्व लोकाच्या जीवनाचा प्रश्न्न आहे हे टीकाकारांनी समजून घ्यावे ,नुसती टीका करून काय करणार सरकारने व विरोधी गटाने एकमेकाला समजून या प्रश्नाला खंबीरपणे तोडं दिले पाहिजे ,आपला लेख सुंदर व योग्य आहे

  ReplyDelete
 14. अश्या हल्ल्या नंतर मला (किंवा इतर साधारण वाचकाला) जे म्हणायचे आहे ते हेरम्भ आणि इतरानी लिहिले आहेच...
  माझा प्रश्न आहे तथाकथित ह्युमन राइट्स वाल्याना... आता कुठे मेलेत सगले ??? का ओरडत नाहीयेत आता?
  साल्यांच नेहेमीच अस double standerd असतं...
  सरकार तर निर्लज्ज आहेच.. पण हे कुत्रे कुठे जातात अश्या वेळी?? शिव्या द्यायची इच्छा होते.. पण काय करणार.. पब्लिक प्लेस आहे न..
  नाही तर मला मेनका गाँधी कोर्टात उभ करेल.. कुत्र्याना जाहिर पणे शिव्या घातल्या म्हणून..

  ReplyDelete
 15. यांचा नायनाट करणं इतकं सोपं नाही.लोकल लोकांचा पण त्यांना खूप सपोर्ट आहे हे विसरता येत नाही. जरी इच्छा नसली, तरीही लोकल लोकं त्यांना जीवाच्या भितीने सपोर्ट करतात. लेख छान लिहिलाय, नेहेमीपेक्षा वेगळी स्टाइल!

  ReplyDelete
 16. निरंजन :) .. आभार. मुद्दाम थोडं वेगळं लिहिण्याचा प्रयत्न केला. असे समजुती घालू पाहणारे, सरकारची बाजू मांडणारे अनेक तथाकथित विचारवंत आणि संपादक/लेखकू मंडळी आहेत ज्यांना कितीही लोक मेले तरी काही फरक पडत नाही.

  आणि नक्षलवाद आता हाताबाहेर चालला आहे. तरी पोलीस सक्षम आहेत असं म्हणत रोजच्या रोज त्यांचा बळी देण्याचा अधिकार रारा चिदुभाऊंना कोणी दिला? लष्करी कारवाईला आता तरी पर्याय नाही माझ्या मते !

  ReplyDelete
 17. आभार सागर. सुरुवात मुद्दाम जरा फिरवून लिहिली. कारण अशा प्रकारचे लेख सर्रास आढळतात आणि त्यांना तिथल्या तिथे उत्तरं द्यावीशी वाटतात. पण उत्तरं देताना जर मूळ प्रकारचा लेख समोर असेल तर त्या उत्तरांमधला जहालपणा पटतो.

  ReplyDelete
 18. आभार अभिषेक !!

  ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा..

  ReplyDelete
 19. सुहास, अरे नक्षलवादी कधीच मोठ्या नेत्याला उडवणार नाहीत. लिहून ठेव.. !! सगळं सेटिंग आहे यार. खुर्चीवाल्या प्राण्यांना कधीही काहीही होणार नाही. मरणार ते दुर्दैवी आदिवासी आणि पोलीस. एवढा हिंसाचार होऊनही षंढासारखे चर्चेच्या भिका मागणार्‍या गृहमंत्र्याला पाहून संताप झाला नुसता !!

  ReplyDelete
 20. नचिकेत, मोठ्या पेपरवाल्यांसारखं, विचारवंतांसारखं मेंदू आणि भावना बाजूला ठेवून लिहिलं मुद्दामच. कारण नंतर त्यांचंचं एकूण एक वाक्य सोलून काढायचं होतं ना. म्हणून !!

  आणि चित्रपट कितीही आचरट असला तरी त्या वाक्यात जब्बरदस्त दम आहे. अगदी सहमत.. कुठला चित्रपट आहे हा?

  ReplyDelete
 21. आभार क्षितीज. मी आणि काँग्रेस?? या काय पुढच्या हजार जन्मांत शक्य नाही :)

  हो.. काल लेख लिहून झाला आणि मग ती बातमी दिसली. रामण्णाने चांगलं थोबाड फोडलं त्या चिदुभाऊचं !!

  ReplyDelete
 22. आभार मैथिली. अग तरीही नाक्षलवाद्यांना अतिरेकी न मानता भारताचे नागरिक मानणारे, त्यांच्या दहशतवादी कृत्यांना चळवळ, कार्य समजणारे अनेक लोक आहेत. माझे अनेक मित्र, ओळखीची मंडळी यांच्याशी वाद झाले आहेत माझे यावरून. खुद्द आपलं सरकारही असंच समजतं तिथे इतरांची काय कथा? आता यापुढे कोणी "तू काय करतो आहेस" विचारलं ना की मी सरळ सांगणार "मी माझ्या ब्लॉगवरून सरकारला धुतोय. करा काय करायचं ते"

  ReplyDelete
 23. >> ज्या देशात फक्त आडनावामुळे बहुमत मिळू शकतं, त्या देशाची हीच लायकी आहे!

  अगदी अगदी !!!

  पण हे असं अटळ अंताच्या दिशेने चालणं नुसतं कसं बघणार रे आपण? निदान आपल्या ब्लॉगवरून तरी झोडलंच पाहिजे. तूर्तास तरी तेवढंच शक्य आहे.

  ReplyDelete
 24. आभार स्वाती.. काट्याने काटा काढण्यासाठी आधी जरा दगड होण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासारखा. आणि नंतर मग यु टर्न घेऊन झोडाझोड केली.. सैन्याच्या हातात सत्ता देण्यात खूप धोका आहे. त्याचे दुष्परिणाम खूप आहेत. पण वेळ दवडून परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी निदान आवश्यक त्या ठिकाणी तरी लष्कराची मदत घेतली गेली पाहिजेच. याउलट आपले लोक चर्चेची भीक मागतायत. खरंच विषण्ण करून टाकणारं आहे हे.

  ReplyDelete
 25. आभार काका. पण या विषयावर विरोधी पक्ष पण मुग गिळून बसतात आणि सरकारही हवी ती मनमानी करतं. हेच तर खरं दुर्दैव आहे.

  ReplyDelete
 26. अमित, अगदी मनातलं बोललास. माझे एक नंबरचे शत्रू म्हणजे ह्युमन राइट्सवाले. त्यांना ठोकतोय पुढच्या लेखात. डोक्यात तयार आहे लिहायला वेळ मिळाला पाहिजे. आणि जाउदे. ते लोक आपल्या शिव्या खायच्याही लायकीचे नाहीत.

  ReplyDelete
 27. खूप आभार काका.

  >> यांचा नायनाट करणं इतकं सोपं नाही.लोकल लोकांचा पण त्यांना खूप सपोर्ट आहे हे विसरता येत नाही.

  अगदी अगदी सहमत. मी exactly तेच तर म्हणतोय. नक्षल्यांशी लढणं अजिबात सोपं नाही हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसत असतानाही चिदुभाऊंचा लष्करी कारवाईला एवढा विरोध का आहे कळत नाही. "नक्षल्यांशी लढायला पोलीस सक्षम आहेत" ही टिमकी वाजवून त्यांना काय मिळतं हे कळत नाहीये. निष्पाप आदिवासींचे आणि पोलिसांचे जीव निष्कारण धोक्यात घालताहेत ते..

  ReplyDelete
 28. मस्त झालाय लेख..सर्वप्रथम दचकले..हेरंब असे कसे लिहु शकतो..सरकार बद्दल ह्याला अवढा कसा काय पुळका आलाय..पण मग हळु हळु कोडं उलगडत गेले...असो !!

  अतिशय सुंदर लेखन शैली...प्रभावशाली...असाच लिहीत रहा..

  ReplyDelete
 29. खूप आभार उमाताई. मुद्दाम थोडा वेगळ्या ढंगाने लिहिला लेख. कारण अशा लेखांमध्ये आढळणा-या मतांचा समाचार घ्यायचा होता. अशा पद्धतीने लिहिल्याने ते सोपं गेलं :)

  ReplyDelete
 30. We just can hope Mr.Chidambaram will take some strict action.


  BTW article was quite explosive but extremly excellent.

  ReplyDelete
 31. वस्तुस्थिती लक्षात घ्या....
  मी काही नक्षलवादाचा पुरस्कर्ता नाही. अगदी ठामपणे नाही. पण म्हणून मी काही लोकशाहीचा पुरस्कर्ताही नाही. सरकार नावाची व्यवस्था लोकांसाठी असते. सरकारनेच काही गोष्टी केल्या पाहिजेत त्या जर ते करणार नसतील तर एवढा पैसा त्या व्यवस्थेवर खर्च करण्यात अर्थ नाही. अगदी स्पष्ट सांगायचे झाल्यास सरकारी धोरणांमुळे जितकी लोकं रोज मरताहेत त्यांचा आकडा सरकारकडेही नाही. अगदी नक्षलावादांना शिव्या घालणाऱ्या लोकांमुळेच ही रोज माणसं मरताहेत. व्यवस्थेचे बळी रोज जाताहेत त्याला सरकारच कारणीभूत आहे. मग ते कॉंग्रेस असो वा भाजपाचे. 3 जी सेवा विकून सरकार 70 हजार कोटी रुपये मिळविणार आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी बुस्ट म्हणून उद्योगांनाच देणार.... गेला बाजार शेतकऱ्यांना 60 हजार कोटींचे कर्ज माफ झाले पण त्याततही मेखी हीच होती की कर्जमाफ..... कर्जमाफ आणि इकॉनॉमीक बुस्ट यात जमीन आस्मानाचा फरक असतो...... जाऊ देत.. व्यवस्था बदललीच पाहिजे...... एका बाजूने लढताना दुसऱ्या बाजुच्या सैनिकांचा काहीच दोष असत नाही... लढाईतील सगळेच शिपाई निष्पात असतात. आणि ज्यांच्यासाठी लढाई खेळली जाते त्यांच्यावर नैतिक जबाबदारी येतेच की.
  जय हो..... बाकी लेख म्हणून उत्तम नेहमीप्रमाणे..... आणि हो....

  ReplyDelete
 32. आभार अनिकेत. आपण आशाच करत रहायची फक्त.. :(

  ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

  ReplyDelete
 33. सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आभार, सुषमेय.

  काँग्रेस/भाजप हा प्रश्नच नाही. सध्या काँग्रेस सत्तेवर आहे आणि बोटचेपेपणा करत आहे म्हणून काँग्रेसला शिव्या. किंबहुना या शिव्यएखाद्या पक्षाला नसून सरकारला आहेत. इथे काँग्रेस ऐवजी भाजप, सपा/बसप (देव न करो) सत्तेवर असते तरी त्यांनाही मी एवढ्याच तीव्रतेने शिव्या हासडल्या असत्या.

  अर्थात माझी अनुकूलता ही नेहमीच भाजप/मनसे/शिवसेना किंवा थोडक्यात कोणत्याही काँग्रेसेतर पक्षांसाठी राहील.

  ReplyDelete
 34. ही नक्सलवाद्याची सवय झालीय. त्यांच्या जनुका मध्येच फेरबदल झालेयत.त्याना चर्चा करायची नहिय. मग त्यांच्यावरचा अन्याय दूर कोण कसा करणार.त्याना हे सगळ थांबवायाचाच नाहीय. आपल्या नेत्याना जसा सत्तेचा माज येतो तसाच नक्सलवादी पुढारयांच आहे. त्याना स्वताच महत्व टिकवून ठेवायचय

  दूसरा एक प्रश्न माझ्या डोक्यात येतो तो म्हणजे जर हे नक्सलवादी आर्थिकदृष्टया मागासलेली असतील तर मग यांच्याकड़े इतकी महागडी आधुनिक शस्त्र येतात कुठून. या पैशाचा ते स्वताचा आणि त्यांच्या पीड़ित समाजाचा (सामान्य माणस ज्यांचा काडीचाही पाठिंबा नाहीय ) करण्यासाठी उपयोग का नाही करत.

  सफ़ेद कुरते घालून जे राजकारण आपले (ना)लायक राजकारणी शहरात राज्यात करतात तेच राजकारण हे नक्सलवादी वेगळ्या प्रकारे राज्यांच्या वेशीवर , जंगलात करतायत
  सत्ता मग ती देशाची असो, राज्याची असो, गावाची असो, समाजाची असो, समुहाची असो ती हातात ठेवन्यासाठी सत्ताधारी-पुढारी कुठल्याही थराला जातो.
  बलात्कार तर रोजच होताहेत राजकारनी गोडीगुलाबिने अणि आपल्या मूक समंतिने करतात आणि नक्सलवादी अतिरेकी बळजबरीने करतायत एवढाच काय तो फरक

  ReplyDelete
 35. तुमचा ब्लॉग वाचल्यावर मनात जे काही आल ते वरच्या कमेन्ट मध्ये टाकल आणि झोपायला जात होतो पण मनात काही गोष्टी रेंगाळत होत्या त्या मग माझ्या या ब्लॉग वर टाकल्या वेळ मिळाल्यास वाचा

  http://my-abstractlife.blogspot.com/

  ReplyDelete
 36. योगेश, सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आभार. अगदी खरं आहे. नक्षलवादी आणि राजकारणी यांच्यात तसूभरही फरक नाही. खरं तर नक्षलवाद्यांची ही पिलावळ राजकारण्यांनीच पोसलेली आहे त्यामुळे त्यांचा समूळ नायनाट करण्याची त्यांची इच्छाच नाहीये. आणि दुर्दैवाने या सगळ्यांत भरडली जातेय ती निरपराध सामान्य जनता :(

  तुझ्या ब्लॉगवरची पोस्ट वाचली. चांगलं लिहिलं आहेस. कमेंटलो आहे तिकडे.

  ReplyDelete
 37. swatantryanantar 60 varhsat jar aapan (sarkar) tyana kahich deu shakalo nasu tar tyani naxalvada kade valav he natural inclination aahe. mi tithe janmalo asato tar mi dekhil tech kel asat.
  aso.

  salwa judum ha prakarabaddal Red Sun (Sudeep Chakravarti) navachya pustakat sadhya vachat aahe.


  tithali paristhitri hatabaher geleli aahe.

  260 Rs. is a 10 day earning in good times. & in bad times anything above 0 is bonus.

  ashi vakya tya pustakat aahet. dok vichar karayachya layakich nahiye as vatun band hot.

  Salwa judum suru zalyapasun tithalya gavkaryanmadhye 2 bhitya basalya aahet.

  1) Naxalavadi
  2) salwa judum

  salwa judum madhye samil vha nahitar tumachi ghar jalato ase prakar tithe sarras chalalat.

  to government sponsered initiative asalyamule tya batamya kadhich baher yet nahit.

  aapalya kalpanapalikade geleiy paristhiti.

  ha problem sarkar naxalvadyanvar karvai karun solve karu shakat nahi hya matacha mi zaloy.

  tasa solve kela tar to aankhin pasarnar. etihas nit tapasala tar sahaj lakshyat yet ki ekhadi naxalvadi chalval sARKAR MODUN KADHAT. PAN TYANANTAR TE ADHIK VYAPAK RUP DHARAN KARAT.

  AAJ NAXALAVAD HI 1500 cR. RUPAYE TURNOVER ASLELI ECONOMY AAHE.

  Kahi conclude karan ashaky aahe.

  Redu Sun jarur vacha.

  ReplyDelete
 38. प्रसन्ना, आभार.

  salwa judum म्हणजे नक्की काय आहे? कळलं नाही नीट. ते पुस्तकं वाचलं पाहिजे आता. अरे पण नक्षलवाद मोडून काढणं शक्य नाही असं म्हणत तो तसाच पसरू देत राहणं कितपत योग्य आहे? अशा प्रसंगांसाठी लष्करी मदत घेणं हा उपाय नाही का?

  >> ekhadi naxalvadi chalval sARKAR MODUN KADHAT. PAN TYANANTAR TE ADHIK VYAPAK RUP DHARAN KARAT

  मला हे पूर्णतः पटत नाही. इंदिरा गांधींनी 'ऑपरेशन ब्लू स्टार' ने खलिस्तानी चळवळ बंद पाडलीच ना. आणि ताजं उदाहरण म्हणजे वर देवेंद्रने म्हटलंय त्याप्रमाणे श्रीलंकेने लष्कराच्या मदतीनेच LTTE ची चळवळ नेस्तनाबूद केली. माझ्या मते आत्ता चालू आहेत ते प्रयत्न अतिशय तोकडे आहेत आणि दिवसानिशी जाणार्‍या जीवांची कोणालाच काही पडलेली नाहीये कारण मारणारे हे कुठल्याच राजकीय नेत्याच्या घरातले नाहीयेत !!!! जेव्हा हे नक्षलवादाचं लोण त्यांच्या घरात शिरेल तेव्हा ते काय बाजू घेतील हे बघायला मला आवडेल. (देव करो आणि तो दिवस न येओ.)

  ReplyDelete
 39. हेरंब,

  लेख अगदी पोटतिडिकीनं लिहिलाहेस. या तर कोणत्याही सामान्य नागरिकाच्या भावना आहेत. पण हा विषय आता इतका गुंतागुंतीचा झाला आहे की सरकारलाही काय धोरण घ्यावं हे कळेनासं झालंय असं वाटतं.

  नक्षल कॉरिडॉरमध्ये सरकारच्या अस्तित्त्वाचा जवळजवळ अभाव आहे. विकास शून्य म्हणता येईल इतका. आणि आपल्या नागरी परिमाणांनुसारचा विकास तिथल्या स्थानिकांना हवा आहे का हा निराळा प्रश्न. याविषयात सर्वंकष धोरण आखणं किंवा स्थानिक मॉडेल्स विकसित करणं असे प्रामाणिक प्रयत्न झाले नाहीत. प्रचंड भ्रष्टाचारामुळं मूलभूत सुविधाही तिथं पोहोचल्या नाहीत. यातूनच नक्षल्यांना पाठिंबा मिळत गेला.

  मुळात हा राजकीय-सामाजिक प्रश्न आहे, लष्करी नव्हे असं मला वाटतं. क्रॅकडाऊन ऑर्डर करणं कदाचित सोपं असेल पण त्याचे परिणाम काय होतील याचा अंदाज बहुधा कुणालाच नसावा. त्यामुळंच सरकार अतिसावधगिरीनं वागत असावं.

  या प्रश्नाच्या काही अन्य पैलूंवर प्रकाश पाडणारे दुवे खाली देतोय. वेळ झाल्यास जरूर वाच.

  १. दीनानाथ मनोहर यांचा दै. पुढारीनं छापलेला लेख (बहुधा पुनर्मुद्रीत असावा):
  http://docs.google.com/leaf?id=0ByxG16xKES2JZTQ4M2EwOTQtNTAwNi00ZDVjLWI3ZmQtNDcyYjFiODZmZWQ3&hl=en

  २. प्रफुल्ल बिडवई यांचा फ्रंटलाईनमधला लेख: http://www.flonnet.com/fl2706/stories/20100326270609200.htm

  ३. आनंद सूनदास यांचा टाईम्समधला लेख: http://blogs.timesofindia.indiatimes.com/onefortheroad/entry/should-maoists-be-banned-or

  या लेखात त्यांनी मांडलेलं खालील मत मला उल्लेखनीय वाटलं:
  "In Lalgarh, it was hunger, years of discrimination, poverty and injustice. These are not people waging a war against the country. In case the Indian government failed to notice, they don’t want to secede. Instead, they are desperate to integrate."

  नक्षल कॉरिडॉरमधल्या स्थानिकांची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली असावी. सरकारचं कठोर धोरण नक्षल्यांनाही हवंच असणार कारण त्याचाच बागुलबुवा दाखवून स्थानिकांना ते माथी भडकावून स्वतःकडं वळवत असणार. पोलीस आणि निमलष्करी दलांचे अत्याचार हा आणखी स्वतंत्र विषय आहे.

  सलवा जुडुम हा छत्तीसगढ़मध्ये भाजप सरकारनं काट्यानं काटा काढणे अशाप्रकारचा अमलात आणलेला उपाय आहे. स्थानिकांना हातात शस्त्रं देऊन नक्षल्यांविरूद्ध लढायला लावलंय. म्हणजे दोन्हीकडून आदीवासीच भरडले जाणार. या उपाययोजनेबद्दलही उलटसुलट मतं आहेत.

  आणखीही काही गोष्टी आहेत. पण नंतर.

  -विवेक.

  ReplyDelete
 40. विवेक,

  सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. अजून ते तीन लेख वाचले नाहीत. पण नक्की वाचतो १-२ दिवसांत.

  >>सरकारला काय धोरण घ्यावं हे कळेनासं झालंय.<<
  सहमत.. मीही तेच म्हणतोय. जर का तुम्हाला झेपत नाहीये, गोष्टी तुमच्या आवाक्याबाहेर आहेत हे कळतंय तरी मग "पोलीस सक्षम आहेत, लष्कराच्या मदतीची गरज नाही" च्या टिमक्या कशाला वाजवायच्या. सरकारच्या या अशा भूमिके पायी अनेक निष्पाप लोकांचा जीव जातोय.

  थोडक्यात सध्यातरी माझ्यामते लष्करी कारवाईशिवाय अन्य कोणताही उपाय नाही नक्षलवाद संपवण्यासाठी. लष्करी कारवाईनेही नक्षलवाद संपूर्णतः आणि ताबडतोब संपेल असा दावा मुळीच नाही. पण परिस्थिती सध्यापेक्षा बरीच बरी असेल, नक्षल्यांच्या मनात लष्करविषयीचा थोडा तरी धाक निर्माण होईल असं मला तरी वाटतं !!

  ReplyDelete
 41. आजच सकाळी http://ase-vatate-ki.blogspot.com/2010/05/blog-post_24.html हा सुरेख लेख वाचायला मिळाला. स्थानिक पातळीवरचे बरेच छोटे छोटे मुद्दे या लेखात अधोरेखित केलेत.

  मी वर म्हटल्याप्रमाणं “..नक्षलवाद हा लॉ ऍण्ड ऑर्डरचा प्रश्न नाही. Socio-political आहे..” असं या लेखात म्हटलंय.

  त्याचप्रमाणं “... गोळ्या घालण्याची तयारी हवी. नक्षल होण्याची किंमत वाढवली पाहिजे. माणसाला भिती वाटली पाहिजे नक्षल होण्याची...” असंही मत त्यांनी मांडलंय. एकांगी कृतीऐवजी सर्वंकष धोरण अवलंबलं पाहिजे असं मत या लेखात प्रकट केलंय.

  >> लष्करी कारवाईशिवाय अन्य कोणताही उपाय नाही नक्षलवाद संपवण्यासाठी<<
  हे मात्र मान्य करणं कठिण. काश्मिर आपण साठ वर्षं सैन्याच्या बळावर ताब्यात ठेवलाय. पण काश्मिरी लोकांचं alienation कमी न होता अधिकच वाढलंय.

  शिवाय, >>लष्करी कारवाईनेही नक्षलवाद संपूर्णतः आणि ताबडतोब संपेल असा दावा मुळीच नाही<< असं तू नमूद केलेलं आहेसच.

  १६८२ ते १७०७ या आपल्या इतिहासातल्या कालखंडाशी तुलना करण्याचा मोह होतोय, पण तो आवरता घेतो.

  ReplyDelete
 42. विवेक, हो. वाचलाय मी हा लेख. छान लिहिला आहे. लॉ ऍण्ड ऑर्डरचा प्रश्न असो की Socio-political.. नाव काहीही द्या. but at the end of the day निष्पाप जीव मारताहेत. कित्येक वर्षं. त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे सरकारने. काहीही करा. पण लवकरात लवकर करा.. काय पावलं उचलायची, पुढचा पवित्रा कसा असावा वगैरे सरकारने ठरवायच्या गोष्टी आहेत. तर ते लवकर ठरावा आणि या कत्तली थांबवा. एवढंच म्हणणं होतं माझं..

  दुसरं म्हणजे काश्मीर आणि नक्षल चळवळ हे कितीही सारखे वाटत असले तरी दोन्हींत मुलभूत फरक हा आहे की काश्मिरी अतिरेक्यांना शेजारी राष्ट्रांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे अतिरेक्यांची घुसखोरी होते आहे. आणि त्यामुळेच लष्करी कारवाई आणि त्यांच्या यशाला थोड्याफार का होईना मर्यादा आहेत. नक्षली अतिरेक्यांचं तसं नाही. तिथे लष्करी चळवळीने बराच फरक पडू शकतो. आणि "लष्करी कारवाईनेही नक्षलवाद संपूर्णतः आणि ताबडतोब संपेल असा दावा मुळीच नाही" हे मी एवढ्यासाठीच म्हणतोय की लष्करी कारवाईने नक्षल चळवळ लगेच संपेल असं नाही परंतु आत्ता आहे त्यापेक्षा त्यांची दहशत, अत्याचार, कत्तली हे प्रकार नक्कीच थोडेफार का होईना कमी होतील आणि कित्येक जीव वाचतील. असो.

  ReplyDelete