Friday, July 16, 2010

(हि) किप्स डागदर अवेवेवेवेवे !!

 "उंची किती?" असं विचारल्यावर "३२ इंच - प्रश्नचिन्ह" किंवा "वजन किती?" असं विचारल्यावर "दहा किलो - प्रश्नचिन्ह" अशी उत्तरं द्यावी लागत असतील तर उत्तर देणार्‍याला कसं विचित्र वाटत असेल ना? आणि त्यात पुन्हा असं उत्तर द्यावं लागणारी व्यक्ती ही स्वतः डॉक्टर असेल तर तिला तर अजूनच मेल्याहून मेल्यासारखं होत असेल. या डॉक्टर लोकांबद्दल मला खरंच खूप सहानुभूती वाटते कधीकधी. आधीच कामाचं टेन्शन, कामाचे विचित्र तास, वेळीअवेळी/विकांतात अटेंड कराव्या लागणार्‍या इमर्जन्सीज हा मानसिक छळ जणु काही कमी असतो म्हणून त्यात काही उद्योगी पेशंट्सच्या कृपेने होणारे शारीरिक छळ !! शारीरिक छळ ???? हम्म्म्म. हो.. शारीरिक छळही !! तर ही गोष्ट आहे असं मेल्याहून मेल्यासारखं व्हावं लागणार्‍या आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागलेल्या एका बिच्चार्‍या डॉक्टरीणबाईंची आणि त्यांच्या सवंगड्यांची पक्षि अशिष्टंट वग्येरेंची. (योग्य शब्द 'वगैरे' आहे हे आम्हास ठाऊक आहे परंतु आत्ता उगाचंच चुकीचं लिहायचा मूड आला म्हणून लिहिलं. कृपया निषेध नोंदवू नयेत ;)) 

ठरल्याप्रमाणे आम्ही डॉक्टरीणबाईंच्या दवाखान्यात (चक्क चक्क) वेळेत पोचलो. वेळेत कसले वेळेआधीच. अशिष्टंटांकडे बघून खोट्या हास्याची देवाणघेवाण करून (खरं तर नुसती घेवाणच कारण मी खरं खरं हसलो होतो. त्या खोटं खोटं हसल्या. येथे 'त्या' हे तिथे असलेल्या (नसलेल्या) अशिष्टंट काकूंना उद्देशून आदरार्थी अर्थाने वापरण्यात आलेले नसून चिवचिव करणार्‍या इतर २-३ (मादक नव्हे तर) माफक अशिष्टंट सुंदर्‍यांना उद्देशून आहे याची कृपया नोंद घ्यावी.), नाव, येण्याची वेळ आणि प्रत्यक्ष अपॉइंटमेंटची वेळ इत्यादी निरर्थक तपशील (नाव सोडून) नोंदवून झाले. माअसुं पुन्हा एकदा माझ्याकडे बघून खोटं खोटं हसल्या. मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे बघून खरं खरं हसलो. त्यानंतर त्या 'ओव, ऑ, शो श्वीत' असं बोब्यद्य ('बोबडं' हा शब्द बोबड्या भाषेत कसा लिहिता येईल असा एक किडा अनेक दिवस माझ्या डोक्यात नाचत होता. त्या नाचर्‍या किड्याचे हे पहिले बोल) बोलत माझ्या कडेवर विराजमान झालेल्या युवराजांकडे बघून (अगदी, ज्याम, कैच्याकै) खरं खरं हसल्या. युवराजांनी एक क्षुद्र, तुच्छ कटाक्ष टाकून मान फिरवली. च्यायला दैव देतं नि कर्म नेतं !!!... तेवढ्यात त्यातली एक अशिष्टंट (हे लिखाण बायको देखील वाचू शकते या सत्याचा अचानक साक्षात्कार झाल्याने 'माअसुं' ला पुन्हा एकदा 'अशिष्टंट' हे जुनंच परिस्थितीजन्य रुपडं बहाल करण्यात आलेले आहे हे सुज्ञ वाचकांनी ....) उठून आमच्याजवळ आली आणि दोरीसदृश काहीतरी घेऊन बाळराजांच्या डोक्याला गुंडाळू लागली. 

क्षणभर ही बया 'खैके पान बनारस वाल्या' 'अमिताबच्चन'सारखा ('अमिताबच्चन' या मूळ नावाचा अपभ्रंश 'अमिताभ बच्चन' किंवा 'बिग बी' असा करतात लोक हल्ली. पण त्यात 'अमिताबच्चन'ची मजा नाही.) रुमाल माझ्या बाळाच्या डोक्याला का बरं गुंडाळते आहे हे मला उलगडलं नाही. पण तेवढ्यात त्या दोरीवरचे आकडे दिसल्यावर ती टेप आहे हे लक्षात आलं. पण एवढे लहान आकडे? एवढी बारीक टेप? दिसणार तरी कसे ते आकडे? मोजणार तरी कसा लेकाच्या डोक्याचा घेर? असे अनेक 'क'कारांभ प्रश्न माझ्या डोक्यात पिंगा घालतायत ना घालतायत तोच 'उप्स' असा तारस्वरातला चित्कार आणि 'भ्याआआआ' अशी मोठ्ठ्या आवाजातली तक्रार माझ्या कानी पडले. हे एवढ्या चटकन झालं होतं की जणु एखाद्या सस्पेन्स चित्रपटात हिरोने पडद्यावर दिसावं आणि एन्ट्रीलाच कुठेकुठे लपलेल्या चार व्हिलनांना सटासट लोळवावं आणि आपल्याला ते कळूही नये. अगदी तसंच झालं होतं इथेही. फक्त इथे हिरोने (पक्षि बाळराजांनी मी नव्हे. हिरो म्हंटल्यावर गैरसमज होण्याची अमाप शक्यता असल्याने मुद्दाम स्पष्टीकरण दिले आहे हे सुज्ञ वाचकांनी.....) व्हिलनांऐवजी ललनांना लोळवलं (शब्दशः नव्हे) होतं हाच काय तो तपशीलातला फरक.

अर्थात हे नक्की कसं झालं हे रिवाईंड करून बघता येणं शक्य नसल्याने साधारण अंदाज लावल्यावर असं लक्षात आलं की डोक्याचा घेर मोजायला आलेल्या ललनेने उर्फ अशिष्टंटने ती टेप हिरोच्या (वरचाच कंस) डोक्याला लावताक्षणीच हिरोने अशा जोरात मान हलवली होती की घाबरून जाऊन ललना मागे आणि टेप जमिनीवर पडली आणि तिच्या तोंडून (ललनेच्या.. टेपच्या नव्हे) 'उप्स' रूपी उसाचे उपसे बाहेर पडले. "ओह ही मस्ट हॅव स्केअरर्ड !!!! लेट्स ट्राय अगेन..." क्षणार्धात प्राप्त परिस्थितीचं विवेचन करून पुढील योजनांची घोषणा करण्याची तिची तत्परता वाखाणण्याजोगी होती. "कॅन यु गिव्ह मी अ हँड हिअर?" मी तत्परतेने पाउल पुढे टाकणार एवढ्यात हे तिने मला "मला जरा हात देतोस का?" याअर्थी विचारलं नसून तिच्या सह-ललनेला किंवा को-अशिष्टंटला "मला जरा (पोराच्या डोक्याचा घेर मोजायला) मदत करतेस का?" याअर्थी विचारलं आहे हे ती क्षणाचाही विलंब न लावता उठून उभी राहिली यावरून माझ्या लक्षात आलं. वाढलेल्या पोटामुळे पावलं टाकण्याच्या मंदावलेल्या वेगामुळे पुढचा बराच अनर्थ टळला होता. मी मनोमन पिझ्झाराजांचे आभार मानले आणि पुढे केलेला हात घड्याळात किती वाजले आहेत हे बघण्यासाठी केला होता असं दाखवून उगाचच वेळ बघून वेळ मारून नेली. ६:१५ झाले होते. अचानक गेल्या पंधरा मिनिटांत मी कित्येक गोष्टी 'उगाचच' केल्या असल्याची जाणीव मला 'उगाचच' झाली.

दरम्यान लेकाचा एकूण रागरंग पाहून माझ्या सुविद्य पत्नीने पडद्यावर एन्ट्री घेतली आणि लेकाला माझ्याकडून स्वतःकडे घेतलं. ललना एकवार माझ्याकडे आणि नंतर एकमेकींकडे पाहून (कुत्सितपणे) हसल्याचा भास मला उगाचच झाला. मी उगाच तिकडे लक्ष नाहीये असं दाखवून मान वळवून 'रडत असलेल्या बाळाला शांत कसं करावं?' वाला टीव्ही शो बघायला लागलो. सँडल्सच्या टक टक टक टक टक टक (तीन ललना, सहा सँडल्स, प्रत्येकी एक 'टक') आवाजावरून ललना पुन्हा हिरोच्या दिशेने वळल्या असाव्यात असा अंदाज मी बांधला.

तेवढ्यात अचानक जोरदार रडण्याचा आवाज आला आणि त्यामागोमाग पियानोचे मंद सूर ऐकू आले. "आयला डॉक्टरकडे पियानो आहे आणि एवढा वेळ दिसला कसा नाही? या पोरी खरंच अशिष्टंट आहेत की पियानो-बडव्या? आणि मगाशी त्या पोरींना रडवणारं कार्ट स्वतः रडतंय? अशक्य !!" असले भलते सलते विचार डोक्यात येऊन मी मागे वळून बघणार एवढ्यात लक्षात आलं की हे सगळे चित्रविचित्र आवाज टीव्हीवरच्या जाहिरातीतले आहेत. कारण रडण्याचा आवाज तिथून येत होता आणि एक बाब्या पियानोसदृश दिसणारं एक छोटंसं खेळणं (अक्षरशः) बडवत होता. त्या बडवण्याच्या पुष्ठ्यर्थ "पियानोच्या मंद सुरांनी बाळांचं चित्त स्थिर होतं, त्यांचं रडणं बंद होतं : डॉक्टर इशेक क्वोश्चीमिन्न, येमेन" असा कुठल्याशा डागदराच्या शोधाचं कॅप्शनही खालून फिरत होतं. 'बाबा बंगाल्यांची' पृथ्वीच्या डोस्क्यापासून (पृथ्वीच्याच, बाबा बंगाल्याच्या नव्हे) पायाच्या करंगळीपर्यंत पसरलेली पिलावळ पाहून मला 'आमची कुठेही शाखा नसलेल्यांची' आठवण येऊन भरून आलं.

तेवढ्यात पुन्हा रडण्याचा आवाज आला. आयला म्हणजे पियानो बडवा नाहीतर माउथ ऑर्गन, पोरं रडतात ती रडतातच, मग काय उपयोग इतक्या डॉलरां (गुणिले ४७) चा चुथडा करून. बरं झालं असलं काही घेतलं नाही ते.
माझ्या टाळक्यात अशा मध्यमवर्गीय विचारांची गर्दी होते ना होते तोच लक्षात आलं की त्या जाहिरातीतलं लेकरू तर खुशीत मुठी चोखत होतं. म्हणून चटकन मागे वळून बघितलं तर पुन्हा टेप जमिनीवर पडलेली होती, बाळराजांचा आवाज टिपेला पोचला होता, राजांचे हात घट्ट धरून ठेवलेल्या, डोकं पकडून ठेवलेल्या आणि प्रत्यक्ष डोक्याचा घेर मोजणार्‍या तीन अशिष्टंटांच्या डोळ्यातलं बाळराजांबद्दलचं कौतुक किंचितसं ओसरत चाललेलं दिसलं. मी पियानोतून डोकं काढून घेऊन त्या काय म्हणतायत हे बघायला गेलो तर तेवढ्यात त्या 'लेटस डू इट लेटर' असं म्हणून किंचित हसून तिथून निघून गेल्या. यावेळी त्या खर्‍या हसल्या होत्या की खोट्या हे मात्र कळलं नाही. अर्थात ते खोटंच असणार हे मी पूर्वानुभवावरून सांगू शकत होतो.

कर्माने नेल्यावर थोडक्यात अशिष्टंटा तिथून निघून गेल्यावर राजे जरा मुडात येऊन खेळायला लागतायत ना लागतायत तोच ते पाहवलं जात नसल्याप्रमाणे त्यातली एक अशिष्टंट परत आली आणि या वेळी खरं-खोटं काहीही न हसता म्हणाली 'लेट्स चेक हिज वेट'. आम्हीही मग 'व्हाय वेट' म्हणत तिच्या मागोमाग चालायला लागलो. काहीतरी वावगं घडतंय असं लक्षात येऊन राजांनी मगाशी शिल्लक राहिलेल्या हुंदक्यांची मदत घ्यायचं ठरवलं. पण त्यांनी ते ठरवून त्याची अंमलबजावणी करेकरेपर्यंत आम्ही त्यांना त्या वजनाच्या काट्यावर नेऊन आदळलंही. पण त्याक्षणी जणु दाही दिशांनी होणारे हल्ले परतवून लावावेत तशा प्रकारे बाळराजांनी हात, पाय, मान गदागदा हलवायला सुरुवात केली. वजनकाट्यावर घातलेला पातळ कागद फाटून त्याच्या चिंध्या झाल्या. काटा थरथरायला लागला. या दुष्ट लोकांना त्या काट्याचं कॅलिब्रेशन पुन्हा करायला लागल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही असा जणु चंग बांधल्याप्रमाणे राजांचं हातपाय हलवणं चालूच होतं. आणि जोडीला मुसळधार रडंही. अशा बिकट प्रसंगाची सवय नसल्याने अशा प्रसंगांत कसं रिअ‍ॅक्ट व्हायचं याची काहीच कल्पना त्या अशिष्टंटांना नव्हती. राजांनी एकेक खिंड, गढी, बुरुज, माच्या, दरवाजे सर करत अखेरीस किल्ला सर केला. थोडक्यात वजनाचा काटा चांगलाच डुगडुगायला लागला.

अखेरीस अशिष्टंटांनी कंटाळून जाऊन आणि मुख्य म्हणजे काट्याची अवस्था बघून हे सुद्धा 'लेटर' करुया असं सुचवलं. आम्ही पडत्या फळाची आज्ञा मानून लेकाला त्या सीसॉच्या फळीवरून उचललं. तेवढ्यात एका बयेने "वुई विल हॅव टू डू इट सम अदर वे" असं म्हणत एका मोठ्ठ्या वजनकाट्याकडे बोट दाखवलं आणि बाळाला घेऊन मातोश्रींना तिथे जाण्याची विनंती केली. त्यानंतर राजे आणि राजमातेचं एकत्र वजन करून झाल्यावर राजांना आमच्याकडे सोपवलं गेलं. त्यावेळी राजांनी जणु काही त्यांना बोर्डिंगच्या शाळेत सोडून देऊन आम्ही निघून चाललोय अशा थाटात धिंगाणा केला. राजांना बोर्डिंगमध्ये पाठवल्यानंतर राजमातेचं पुन्हा एकदा वजन केलं गेलं आणि सोप्पी वजाबाकी करून वजाबाकीचं उत्तर आम्हाला राजांचं वजन म्हणून सांगण्यात आलं.

ते फारच कमी वाटल्याने रारा राजमातासाहेबांनी त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. "दोन महिन्यात एवढंसंच वजन वाढलं? शक्यच नाही. आपण पुन्हा करुया.. लेट्स डू इट अगेन". तिचं ते "लेट्स डू इट अगेन" ऐकल्यावर एक अशि न वाजलेला फोन उचलायला, दुसरी अशि पडलेलं पेन उचलायला आणि तिसरी कुठलीतरी फाईल शोधायला धावली. अशा तर्‍हेने तिचं ते "लेट्स डू इट अगेन" चारी भिंतींवर आदळून पुन्हा आमच्याकडे आल्यावर मी ते पटकन पकडून खिशात कोंबलं आणि तिच्या कानात जोरात खेकसलो उर्फ कुजबुजलो "लेट्स नॉट डू इट अगेन !!!". ती खेकस-कुजबुज बहुतेक भलतीच लाउड झाली असावी. कारण पहिल्या अशिने चटकन फोन ठेवून देऊन, दुसर्‍या अशिने पेन लगेच उचलून आणि तिसर्‍या अशिने फाईल टेबलवर आदळून "नो नीड टू डू इट अगेन" असं म्हणून माझ्याकडे पाहून स्माईल दिलं आणि ते खरं खरं होतं हे मी यावेळी पैजेवर सांगू शकत होतो.

बायकोचा "अरे पण"चा प्रयत्न ताबडतोब दाबून टाकून आपण त्याच्यापुढे 'अप्रोक्झीमेट' असं त्यांना लिहायला सांगू असा प्रस्ताव मी मांडला. ज्ञानोबा माउलींचं ऐकून रेड्यानेही वेद वदावेत तसं माझ्या मुखातून ते 'अप्रोक्झीमेटली' ऐकून तिन्ही 'अश्या' "यस, ऑफ कोर्स, इट्स अप्रोक्झीमेट" चे वेद वदु लागल्या. त्यातली एक जण पुढे होऊन राजमातेला समजावणीच्या सुरात म्हणाली की  "लेट्स पुट द वेट फिगर अ‍ॅज २२ पाउंड्स - क्वेश्चन मार्क". मातेच्या चेहर्‍यावरचा 'क्वेश्चन मार्क' तसूभरही कमी झालेला नसला तरी माझ्या चेहर्‍यावरची अख्खीच्या अख्खी अ‍ॅन्सरशीट बघून त्यांनी त्या माहितीच्या फॉर्मवर '२२ पाउंडस - क्वेश्चन मार्क' असं लिहून टाकलंही.

सौभाग्यवतीच्या जळजळीत कटाक्षांना चुकवावं म्हणून मी तो पियानोवाला कार्यक्रम पुन्हा बघायला लागलो. तर तो कार्यक्रम संपून तिथे लंबे काले घने बालांसाठी अ‍ॅलोव्हेरा उर्फ कोरफडीचं तेल कसं लावावं याचं प्रात्यक्षिक चालू होतं. "बाळांच्या असलेल्या वहिनीवर 'बालां'चे कार्यक्रम दाखवलेले चालतात वाटतं? इंग्रजीत 'ळ' अक्षर नसल्याने त्याचा ते फायदा घेत असावेत बहुतेक" असा फडतूस पीजे मारून सुविद्य पत्नीला हसवावं का असा विचार करून तिच्याकडे मान वळवून बघितल्यावर तिने पुन्हा हळू आवाजात "अप्रोक्झीमेट काय????" असं म्हंटल्यावर मी पुन्हा त्या बालांच्या कार्यक्रमात माझे चित्त गुंतवून घेण्याचा पर्याय लॉक केला. हे सारं होईतो डागदरीनबाई प्रवेश करत्या झाल्या आणि त्यांनी लेकाकडे बघून गोड स्माईल दिलं. (डागदरीनबाई मासुं नसून काकू क्याट्यागरीतल्या असल्याने इथे 'त्या' हे त्यांना आदरार्थी बहुवचन रुपात वापरले आहे हे सुज्ञ वाचकांनी....) लेकाने 'हसा तो फसा' हे जणु स्वतःचं बोधवाक्य असल्याप्रमाणे पुन्हा त्या स्माईलचा चुथडा करण्याचं काम इमानेतबारे पार पाडून मान दुसरीकडे वळवली.

"ओह ही इज सो स्वीट, काम अ‍ॅंड क्वायट" असं डागदरीनबाई वदताच तिन्ही अश्या पुन्हा एकदा आपापल्या (नसलेल्या) कामात व्यग्र झाल्या. फक्त राजमाता आणि मी अशा दोघांनीच डागदरीनबाईंच्या त्या विधानाला जोरदार अनुमोदन दिलं. "प्लीज ब्रिंग हिम इन" असं म्हणून डागदरीनबाई आत गेल्या. त्यांच्यामागोमाग आमचं अडीच तिकीट आत गेलं. त्यांनी आम्हाला जरा वेळ बसायला सांगून उगाच चार वह्यांत काहीतरी लिहून झाल्यावर, आठ फायली उघडून बंद करून झाल्यावर पुरेसा टाईमपास करून झाल्यावर खाटेवर जाड पांढरा कागद अंथरला आणि आम्हाला बोलावलं.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे मातोश्री लेकाला खाटेवर झोपवणार एवढ्यात त्याने कर्णकर्कश्श स्वरात साताचा भोंगा दिला. "ऑलाला, व्हॉट हॅपन्ड डिअर? डोंट क्राय.. आय डिंट डू एनिथिंग" असं म्हणत डागदरीन बाईंनी उंची मोजण्यासाठी त्याच्या डोक्याखालच्या कागदावर पेन्सिलने एक खुण केली आणि पायाखाली एक खुण करावी म्हणून त्याचा पाय ताठ करायला जाणार एवढ्यात त्याने मनोमन "दॅट्स युअर प्रॉब्लेम, बट आय विल डू माय जॉब" असं म्हणून त्यांच्या हातावर जोरदार लाथ मारली. या अचानक झालेल्या अनपेक्षित हल्ल्याने कळवळून जात त्या किंचित मागे सरकल्या. या सगळ्याची सवय असल्याने आम्हाला खरं तर काहीच विशेष वाटलं नाही परंतु त्यांच्यासमोर असं दाखवणं म्हणजे आम्ही आमच्या मुलाच्या हट्टीपणाला प्रोत्साहन देत आहोत किंवा आम्हाला स्वतःच्या लेकाला सांभाळता येत नाही असा त्यांचा समज करून दिल्यासारखं झालं असतं त्यामुळे काहीही निष्पन्न होणार नाही हे ठाऊक असूनही आम्ही उगाचंच (लेकावर) ओरडल्याचा अभिनय केला. आम्ही मायबाप जणु काही अदृश्य आहोत आणि आमचं ओरडणं (रागावणं या अर्थी) हे मानवी कानांच्या श्रवणक्षमतेच्या डेसिबल पातळीच्या पलीकडचं असावं अशा प्रकारे आमच्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करून राजांनी दुसरी लाथ झाडली.

त्यानंतर डागदरीन बाईंच्या मुखातून त्याचे दोन्ही पाय घट्ट धरून ठेवण्याचा हुकुम सुटेपर्यंत तिसरी, चौथी, पाचवी........ तेरावी, चौदावी असा गुणतक्ता चढत गेला होता. दोन्ही पाय धरून झाल्यावर मोठ्ठ्या प्रयासाने बाई त्याच्या पायाखालच्या कागदावर पेन्सिलची रेष ओढणार एवढ्यात कसा कोण जाणे त्याने एक पाय हलवालाच आणि पायाखालची रेष योग्य जागी मारली गेली आहे की नाही अशा संभ्रमात डागदरीनबाईंना टाकून गेला. त्यानंतर त्याला तिथून उचलण्याचा हुकुम सुटला आणि मगासच्याच 'खैके पान बनारस वाल्या' टेपने उंची मोजली गेली. तेवढ्यात "हाऊ मच?" असा आत्ता वाटत नसला तरी त्यावेळी उद्धट आणि भोचक वाटणारा प्रश्न विचारण्याचा नाकर्तेपणा माझ्या तोंडून घडला. एका जळजळीत कटाक्षाबरोबर "३२ इंच - क्वेश्चन मार्क" असं उत्तर आमच्या कानांवर आदळलं. "पुन्हा काय क्वेश्चन मार्क????" इति बायको. इथे तर तोंड लपवायला किंवा विषय टाळायला तो टीव्हीही नव्हता. काय हा कंजूसपणा, इतक्या फिया घेतात आणि प्रत्येक रूममध्ये टीव्ही लावायला यांना होतं काय? याच्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे असे विचार करत करत मी 'माय बेबीज बॉडी' वाल्या बाळांच्या अवयवांची सचित्र माहिती देणार्‍या तक्त्यात तोंड खुपसलं.

त्याच्या 'क्वेश्चन मार्क' उंची आणि 'क्वेश्चन मार्क' वजनाची नोंद करून झाल्यावर आपण त्याला आज ठरल्याप्रमाणे दोन लशींची इन्जेक्शनं देणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं. मी घामानं डबडबलेलं कपाळ पुसलं आणि 'आज शामके सबसे सुनहरे मौके के लिए' स्वतःला सज्ज केलं. बायकोने काय तयारी केली हे ठाऊक नाही कारण पहिल्या 'क्वेश्चन मार्क'नंतर आत्तापावेतो तिच्या नजरेला नजर द्यायची माझी तयारी झाली नव्हती.

त्यानंतर पुन्हा एकदा 'हुकुमावरून' बाळराजांना खाटेवर आडवं केलं गेलं आणि 'होल्ड हार्ड अ‍ॅट हिज नीज' आणि 'होल्ड बोथ ऑफ हिज हँड्स टाईटली' असेही दोन महत्वाचे हुकुम सुटले. त्या हुकुमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करूनही जेव्हा प्रत्यक्ष सुई टोचण्यासाठी बाई जवळ आल्या तेव्हा हजार आदितेयांचं बळ अंगात संचारल्याप्रमाणे या एका आदितेयाने एक पाय सोडवून घेण्यात यश मिळवलंच. आणि त्यानंतर तो सुटलेला पाय धाडधाड धाडधाड झाडण्याचा कार्यक्रम काही काळ झाला आणि त्या प्रयत्नांच्या यशस्वितेचं परिमाण बघून अजून अजून जोर लावून दुसराही पाय सोडवला गेला आणि त्या धाडधाड तोफांच्या सरबत्तीचं प्रमाण वाढतच गेलं. अखेरीस बाईंनी बाहेरील शक्तींची मदत घेण्याचं ठरवून त्यांना पाचारण करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांना बोलावणं धाडलं. तेव्हा एका शक्तीने आपलं अशिने बाहेरूनच विचारलं की "इंजेक्शन्स देऊन झाली का?" त्यावर आतल्या शक्तीने तेवढ्याच जोरात ओरडून उत्तर दिलं "होतायत कसली एवढ्यात? उलट मलाच स्वतःला इंजेक्शन्स घेतल्यासारखं वाटतंय. तुम्ही लवकर आत या." हे ऐकताच त्यांची तिरंगी फौज आत धावली. "कॅन यु गाईज स्टँड लिट्ल बिहाईंड?" असं आम्हाला उद्देशून, "इच ऑफ यु होल्ड हिज हँड्स अ‍ँड लेग्स टाईटली अ‍ँड आय विल टेक केअर ऑफ द रेस्ट" असं तिरंगी फौजेला उद्देशून आणि "धिस इज द टफ्फेस्ट फिफ्टीन मन्थ बेबी आय हॅव एव्हर हँडल्ड" असं स्वतःशी पुटपुटत बाईंनी एकेक करत दोन सुया फटाफट खुपसल्या.

आता बिल्डिंग पडते की काय, भूकंप होतो की काय, सुनामी येते की काय असं वाटावं इतक्या उच्च डेसिबलातलं बाळराजे रडायला लागल्यावर त्या रणरागिणीने आणि तिच्या फौजेनी त्यांचं काम फटाफट आवरतं घेतलं आणि बघता बघता युद्धकैद्याची सुटका करून त्याला आमच्या हवाली केलं.

सारखं बाहेरच्या दिशेने बोट दाखवून तिथून बाहेर पडण्याविषयीची अपार तळमळ बाळराजे बोटांतून व्यक्त करत असले तरी पुढच्या महिन्यातल्या इंजेक्शन्ससाठी अपॉइंटमेंट घेणं आवश्यक असल्याने मी ते काम करण्यासाठी रिसेप्शनच्या दिशेने जात होतो तेवढ्यात डागदरीनबाई आपल्या जागेवरूनच ओरडून त्या रिसेप्शनिस्टला म्हणाल्या की "यांना आता (थेट) तीन महिन्यांनतरची तारीख दे (प्लीज)". अचानक त्या रिसेप्शनिस्टच्याही मुखकमलावर विलक्षण हास्य पसरलं आणि तिने तीन महिन्यांनंतरची तारीख दिली.

तिथून बाहेर पडल्यावर बाळराजे भलतेच खुशीत होते. मगासच्या हाय डेसिबल आरडाओरड्याचा आणि 'अमिताबच्चन' वाल्या लाथाळीचा मागमूसही चेहर्‍यावर नव्हता. चांगले खुशीत हसत होते. म्हणून मग असंच उगाच म्हणून तिथे जवळच असलेल्या बागेत आमची वरात शिरली. बागेतल्या छोट्या झोपाळ्यावर लेकाला बसवावं म्हणून त्या झोपाळ्याजवळ गेलो तर तेवढ्यात तिथल्या पाटीने लक्ष वेधून घेतलं "वीस पाउंड्पेक्षा कमी वजन असलेल्या मुलांसाठी नाही." आणि आमच्या चेहर्‍यावर साहजिकच उमटलं ते भलंमोठ्ठं 'क्वेश्चन मार्क' !!

* समस्त प्रश्न आणि अन्य चिन्हे गुगल इमेजेसवरून साभार 

38 comments:

 1. फ़ंडू....काय आवडलं लिहायचं तर पूर्ण पोश्टच कापी-पेश्ट करावी लागेल...मला आरुषच्या मागच्या २४ महिन्यातल्या जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या अपाइंन्टमेन्टा, अशिश्टंटा सगळं काही आठवलं...आता मात्र आमची सुटका झाली आहे....तुमची पण होईल लवकरच तोस्तर यंज्वाय....:)

  ReplyDelete
 2. हा हा आभार्स :) ..

  अग प्रत्येक अपॉइंटमेंट म्हणजे एक नवीन ष्टोरी असते. म्हणून मग सगळ्या ष्टोर्‍यांची एक मोट बांधली आणि टाकली चिकटवून :)

  ReplyDelete
 3. युवराजांनी तर मस्त दाणादाणच उडवली की तुमची.... सहीये. खूपच छान झालीये पोस्ट, दोनदा वाचली मी. त्या वजनाच्या थंडगार पारड्यात कागद टाकला तरी थंडपणा जाणवणारच ना रे... आदि तरी काय करेल मग...

  ReplyDelete
 4. हा हा हा.... जबरदस्त! धमाल आली वाचून. तुमची अवघडलेली परिस्थीती मी देखिल अनुभवतो. सही पोस्ट!

  ReplyDelete
 5. पैसा वसूल................. (अक्शन + कॉमेडी +प्रश्नचिन्ह)

  ReplyDelete
 6. जबर्या...(बरहा मध्ये "र" तोडुन "य"ला कसा जोडावा हे माहित नसल्यामुळे असा लिहिला आहे)...ढासु...शंभर नंबरी....धमाल आली वाचताना..

  सँडल्सच्या टक टक टक टक टक टक (तीन ललना, सहा सँडल्स, प्रत्येकी एक 'टक') ...हे वाचताना "टक टक" ऐकु आल बर...:) :) :)

  ReplyDelete
 7. इथे बरं होतं. आमची मुलं लहान असतांना एवढं इन्स्पेक्शन( शब्द बरोबर असावा) काही नसायचं. चार दोनवेळा टोचून आणलं , दोन तिन दा पोलिओचे ड्रॉप्स दिले की झाले.अनूभव छान मांडलाय शब्दात.

  ReplyDelete
 8. भारतात बर असतं,कोणाची नियोजित भेट घ्यावी लागत नाही,(शक्यतो), प्रत्येक देशाची पद्धत वेगळी असू शकते,नाही आहेच ,अनुभव चांगला वाटला आपले निरीक्षण चांगले आहे,

  ReplyDelete
 9. अल्टिमेट हेरंबा..सिम्पली अल्टिमेट...
  ता.क.-बाळराजे भलतेच पराक्रमी दिसताहेत...लवकरच भेट व्हावी असें चिंतितो!

  ReplyDelete
 10. Baap re.... Vachata vachata damale mi...tumache kaay jhale asel pratyakshat...???

  ReplyDelete
 11. हा हा .. आभार श्रीताई. अग नेहमीची कथा आहे ही. नेहमी असेच काहीतरी प्रकार करत असतो तो. अग थंडपणा म्हणून असं नाही तिकडे ठेवलं की तो उगाच घाबरून जातो आणि हातपाय हलवत जोरजोरात रडायलाच लागतो .. :)

  ReplyDelete
 12. अभिलाष, खूप आभार. तुही याच परिस्थितीतून जातो आहेस का? :)

  ReplyDelete
 13. सचिन :D .. तुमचा खेळ (पैसा वसूल) होतो आणि आमचा जीव जातो :P ;)

  ReplyDelete
 14. आभार योगेशा :) ... अरे बरहा म्हणजे माझ्यासाठी "काला अक्षर .." मी गुगल इमे वाला.

  अरे नुसता टकटकाट चालू असतो तिकडे :)

  ReplyDelete
 15. :) आभार काका.. खरंच आपल्या इथे या सगळ्या कटकटी अजिबात नसतात. इथे म्हणजे सगळाच जरा अति प्रकार असतो. पण करणार काय..

  ReplyDelete
 16. आभार काका. हो इकडच्या पद्धती जरा जास्तच फॉर्मल आहेत.

  ReplyDelete
 17. बाबा, आभार्स रे..

  राजांचे पराक्रम स्थल/काल सापेक्ष नसल्याने जेव्हा केव्हा भेटीचा योग येईल तेव्हा आपण स्वतःच पहा आणि ठरवा ;)

  ReplyDelete
 18. अग अशीच नेहमीची दमछाक आहे ही. संदीप खरेला जसा कंटाळ्याचाही कंटाळा येतो तसे आम्ही आता दमण्यानेही दमून गेलो आहोत :)

  ReplyDelete
 19. >>>>इथे हिरोने (पक्षि बाळराजांनी मी नव्हे. हिरो म्हंटल्यावर गैरसमज होण्याची अमाप शक्यता असल्याने मुद्दाम स्पष्टीकरण दिले आहे हे सुज्ञ वाचकांनी.....) yala marathit god gairsamaj mhanatat :)

  Baki heramba sutalayes tu (vajanane navhe... :) ).... aadi aani rajmata pan gr8...

  Jabari jhaliye post.... hahapuwa!!!!!!

  ReplyDelete
 20. प्रिंटिंग मिष्टेक शोधल्याबद्दल धन्स.. तिकडे 'गोड' गैरसमज असा बदल करू का? ;)

  अग हो मधून मधून सुटायला होतं खरं.. आता काही दिवस ठीक जातील :)

  आणि खूप धन्स !!

  ReplyDelete
 21. आई शप्पथ लैई भारी राव..युवराजांना अनेक अनेक शुभेच्छा आणि गोड गोड पापा..
  काय धम्माल लिहलय हेरंब..मी फॅन झालोय, तुझा होतोच रे आता युवराजांचा पण :)

  ReplyDelete
 22. अपर्णा, विभि आणि सुझे + १००...
  माझ्या मोबाईल इंटरनेटने दगा दिल्यामुळे आमचं पाप पदरात(?) घ्यावं अशी विनंती... :(
  तेंडुलकरांना मॅन ऑफ द मॅच द्यायला हरकत नाय...

  ReplyDelete
 23. आभार सुहास :) अरे जे भोगलं ते लिहिलंय ;)

  बरंय बरेच फॅन्स आहेत ते.. चांगला वारा लागेल.. नाहीतरी जाम उकडतंय इकडे ;) :P

  ReplyDelete
 24. आनंदा, अनेकानेक आभार :)

  अरे या पापाचं काही नाही. किंबहुना हे तर पाप नाहीच. पण तू घरी जाऊन जे वेगवेगळं मनसोक्त हादडून आला आहेस त्या पापांचं काय? ;)

  ReplyDelete
 25. होय.. त्यापापाचं प्रायश्चित्त् करायचं आहे मला... घरी खाल्लेली काकडीची कोशिंबीर अजुन आठवत आहे.... सोबत घरून काकड्या आणल्या त्याचसाठी ;)

  ReplyDelete
 26. सही सही.. निदान फोटो तरी टाक रे !!

  ReplyDelete
 27. सुरुवातीच एक वाक्य वाचुन कपाळावर पडलेल्या आठ्या पुढे विरुन त्यांची जागा आपोआप मुक्त हास्याने घेतली...पुन्हा एकदा तो ३०० मधल्या स्पार्टाच्या राजाच्या वेषातला आदितेय डोळ्यासमोर येत होता...बोले तो ये पोस्ट सुपरहीट है भिडु...

  ReplyDelete
 28. हा हा देवेन.. खूप धन्स..

  अरे तो दवाखान्यात त्या स्पार्टाच्या राजसारखाच वागतो नेहमी. धाडधाड आणि दाणदाण :)

  ReplyDelete
 29. एकदम सही. मल जुनी आठवण करून दिली.काळ बदलला तरी काही गोष्टी बदलत नाहीत. पण त्या इतक्या समर्पक आणी खुस्खुशी रीतीने सगळ्याना सान्गता येत नाहीत.
  तुम्हाला तुमच्या महाराणीना आणी युवराजाना शुभेच्छा.

  ReplyDelete
 30. आभार अरुणाताई :)

  काळ बदलला तरी काही गोष्टी बदलत नाहीत हे अगदी खरं. आम्ही पण आमच्या आईबाबांना असाच त्रास दिलेला असणार त्याचं उट्ट पोरगा फेडतोय :P

  ReplyDelete
 31. mast .... aamhihi laukarach anubhav gheuch ....

  ReplyDelete
 32. वा! भलतीच धावपळ करायला लावलीये बाळराजांनी. वाढत्या पोटाची काळजी करू नकोस आता. ;-D

  ReplyDelete
 33. आभार विजय.. अशा अनुभवांना तोंड देण्यासाठीच्या पूर्वतयारीसाठी शुभेच्छा ;)

  आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा..

  ReplyDelete
 34. कांचन, अग काही विचारू नकोस. स्वतःच्या लहानपणी डॉक्टरांकडे जाताना मी जेवढा घाबरलो नसेन तेवढा याला नेताना घाबरतोय.. सगळी धमाल आहे नुसती. वेगळ्या डायटिंगची गरजच नाही :)

  ReplyDelete
 35. Khup majeshir Heramb, dhammal description..very good..yuvraajach te..pratap dakhavnarach :o)

  ReplyDelete
 36. हेहे.. धन्स पंकज. युवराजांचे लाईव्ह पराक्रम तर तू बघितलेलेच आहेस :)

  ReplyDelete
 37. आदी महाराज...
  एक और डाइविंग कॅच
  एक और मॅन ऑफ दि मॅच...

  बेष्ट म्हणजे सँडल्सच्या टक टक टक टक टक टक (तीन ललना, सहा सँडल्स, प्रत्येकी एक 'टक') ...

  ReplyDelete
 38. हेहे धन्स धन्स सिद्धार्थ..

  तो नेहमीच मॅन ऑफ दि मॅच असतो रे आणि आम्ही कायम बारावा खेळाडू ;)

  टकटकी बद्दल स्पेशल धन्स..

  ReplyDelete