Saturday, February 26, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-१


हापूसच्या गोडव्याचं वर्णन करणं हे निराळं आणि तो गोडवा प्रत्यक्ष अनुभवणं हे निराळं.... हा अनुभव म्हणजे असंच आम्ही प्रत्यक्ष हापूसचा गोडवा कसा चाखला होता त्याची गोष्ट. फरक एवढाच की त्यात गोडवाही नाहीये की हापूसही नाहीये. असले तर फणसाचे काटेच असतील आणि तेही कारल्याच्या कडूपणाबरोबर...... !!!

****  

गेल्या काही वर्षांत एकूण ट्रेकिंगच कमी-नगण्य-बंद अशा पायर्‍या उतरत गेल्याने हल्ली लक्षात येत नाही पण पूर्वी मात्र ट्रेकिंग म्हटलं की हमखास पेब डोळ्यासमोर यायचा आणि पेब म्हटलं की ८ फेब्रुवारी १९९८ डोळ्यासमोर चमकायचा. त्या पेब ट्रेकच्या आठवणी, झालेली प्रचंड दमछाक, तो गोंधळ, ती चुकामुक, तो उशीर... सगळं कसं पद्धतशीरपणे चुकलेलं.... !! थोडक्यात, या आठवणी 'रम्य त्या आठवणी' कॅटेगरीतल्या खचितच नाहीत (आणि वाटत असतील तर तो माझ्या लेखनशैलीचा दोष समजावा) कारण ट्रेकच्या रम्य आठवणींमध्ये गाणी, भेंड्या, धडपडणे, थट्टा, मस्करी, चढाई, रॉकपॅच, गप्पा, धुमाकूळ, आरडाओरडा असे प्रकार असतात. पण आमच्या पेब चढाईत यापैकी काहीच नव्हतं. असलंच तर जेमतेम १०% किंवा सकाळचे काही तासच !

सकाळी साधारण सात-साडेसातच्या सुमारास आम्ही नेरळ स्टेशनला उतरलो. प्रत्येक ट्रेकला होतो तसा चहा, वडापाव वगैरेचा कार्यक्रम पार पाडला. प्रत्येक ट्रेकला असतं तसं निरभ्र आकाश, मस्त फ्रेश हवा होती आणि प्रत्येक ट्रेकला असतो तसा एक मस्त, भन्नाट, बिनधास्त मूड आमचाही होता. आम्ही दहा-बारा जण होतो साधारण. चार-पाच मुली आणि बाकीची मुलं. काही महत्वाच्या फॅक्टस म्हणजे 

- निम्म्यापेक्षा जास्त लोकांचा पहिलाच ट्रेक होता, 
- सगळ्या मुलींचा पहिलाच ट्रेक होता आणि 
- आमच्यातल्या प्रत्येकाचाच हा पहिलाच पेब दौरा होता. 

थोडक्यात आधीच अनुभवी लोक कमी आणि त्यातही पेबचा अनुभव शून्य असलेले लोक अशी आमची एक अल्टिमेट गँग होती. हे दोन कारणांसाठी सांगतोय. पुढे येणार्‍या घटना वाचून तुम्ही आमचं नाव समर्थांच्या मुर्खविषयक लक्षणांमध्ये नोंदवण्यासाठी धावू नये म्हणून आणि दुसरं म्हणजे जे काही घडलं त्याचं खापर आम्हाला सर्वस्वी परिस्थितीवर फोडता येऊ नये म्हणूनही ! 

नेरळला स्टेशनात उतरून डावीकडे गेलं की माथेरानकडे जायचा रस्ता लागतो आणि उजवीकडून गेलं की पेबचा रस्ता हे आम्ही सगळ्यांनी एकमुखाने पाठ करून ठेवलं असल्याने स्टेशनातून बाहेर पडल्या पडल्या उजव्या दिशेने आमचा जथ्था निघाला. वाटेत ओहोळ, काही भलेमोठे विजेचे टॉवर्स, पोल्ट्री फार्म वगैरे वगैरे (चूभूद्याघ्या. बर्‍याच वर्षांपूर्वीचं वर्णन आहे.) खुणा लागेपर्यंत चालायचं अशीही माहिती आम्ही काढली होती. या सगळ्या गोष्टी ओलांडल्यावर लगेच (बहुतेक) डावीकडे एका वळणावर वळलं की आपण पेबच्या पायथ्याच्या दिशेने जायला लागतो या माहितीचाही त्यात समावेश होता. साधारण पाऊण-एक तास चालूनही आम्हाला यातला पोल्ट्री फार्म सोडून काहीही दिसलं नाही ....... म्हणजे आम्ही बहुधा सुरुवातीपासूनच रस्ता चुकलो असू असा निष्कर्ष आता काढणं सोपं असलं तरी तेव्हा आमच्या कोणाच्याही ते साधं डोक्यातही आलं नाही. त्यामुळे त्यावेळी पोल्ट्री फार्म लागल्यानंतर त्यानंतरच्या एका (कुठल्यातरी) डाव्या वळणाला वळून आम्ही बिनधास्त समोर दिसेल तो पेबचा पायथा असावा असं समजून तिथून चढायला लागलो. यातले बरेच तपशील चुकीचेही असतील. कदाचित एवढा मुर्खपणा, निष्काळजीपणा आम्ही केलेलाही नसेल. पण अर्थात त्याने नंतर घडणार्‍या घटनांवर काहीही परिणाम होणार नव्हता एवढं मात्र नक्की. तर त्या अगम्य सो कॉल्ड पायथ्यापासून चढाईला सुरुवात झाली. हसत खिदळत निवांत रस्ता कापणं चालू होतं. साधारण तासभराचं चढण झालं की एक छोटं पठार लागतं. ते पठार म्हणजे पेबचा साधारण अंदाजे हाफवे मार्क. त्या पठारावरून गडाच्या दिशेने जाण्यासाठी योग्य वाट पकडणं आवश्यक असतं. कारण तिथे बर्‍याच वाटा आहेत आणि त्या किल्ला सोडून इतर कुठेही जातात. त्यामुळे योग्य वाटेने जाणं अत्यावश्यक. या पठाराचं अजून एक महत्व म्हणजे समोरच्या डोंगरावरून कोसळणार्‍या धबधब्याचं मनमोहक दर्शन. साधारण इथे हिरवळीवर पहिला ब्रेक घेऊन, थोडी खादाडी करून, धबधब्याचं सौंदर्य अनुभवून गडाच्या दिशेने कुच करण्याचा रिवाज, शिरस्ता वगैरे वगैरे आहे. पण अर्थातच आम्ही तो रिवाज पाळला नाही. म्हणजे पाळावाच लागला नाही. ती वेळच आमच्यावर आली नाही.. कारण ते मुदलातलं पठार आणि तो धबधबाच आम्हाला न लागल्याने त्यावर चढलेलं चुकीच्या वाटांचं व्याज आमच्या नशिबी आलं नाही. अर्थात पण त्याने काही फरक पडला नाही. कारण आम्ही आमच्या चुकण्याचा वाटा स्वतः ठरवत होतो आणि पावलागणिक त्यात वाढ होत होती. असो. ते सगळं नंतर येईलच..

तर "त्या पठारावरून पुढे जाताना सांभाळून जा आणि योग्य वाट निवडा" असे महत्वाचे सल्ले देणार्‍यांच्या तपशीलात एक गडबड होती. "त्या पठारापर्यंत येतायेताच चुकलो तर काय" याविषयी कोणीच काहीच सांगितलं नव्हतं. त्या प्रश्नाचं नवनीत मार्गदर्शक, २१-अपेक्षित वगैरे वगैरे आमच्याकडे नव्हतं. कारण पठारापर्यंत येतानाच आम्ही चुकू हे कोणाच्या खिजगणतीतही नव्हतं. बहुतेक आत्तापर्यंत कधीच कोणीच असली क्षुल्लक, फुटकळ वगैरे चूक केलेली नसावी. पण "प्रत्येक गोष्ट कधी ना कधीतरी पहिल्यांदाच घडते" या नियमाला सर्वार्थाने सिद्ध करण्याची जवाबदारी आमच्या अननुभवी खांद्यांवर होती आणि त्याच्या सिद्धतेसाठी आम्ही अनावधानाने का होईना जंग जंग पछाडत होतो. तर थोडक्यात आम्हाला ते पठार न लागल्याने आम्ही समोर दिसेल तसा डोंगर चढत होतो, दिसेल ती वाट तुडवत होतो. तरीही म्हणावं तसं टेन्शन कोणाच्याच चेहर्‍यावर दिसत नव्हती कारण ज्याप्रमाणे "अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आधी अन्याय होतोय हेच कळणं आवश्यक असतं" त्याप्रमाणे चुकलो आहोत याचं टेन्शन येण्यासाठी आधी आम्ही चुकलो आहोत हेच आमच्यापैकी कोणाच्या गावीही नव्हतं. म्हणजे थोडंसं चुकलो आहोत याची कल्पना होती पण एवढं मोठं 'बलंडर' होतंय हे कोणालाही कळलं नव्हतं.

तर वाट तुडवता तुडवता ते विंग्रजी कादंबर्‍यांत वर्णन असतं की "ही फाउंड हिमसेल्फ इन फ्रंट ऑफ चर्च" अक्षरशः अगदी तसंच आम्ही आम्हाला अचानकच एका सत्तर अंशाच्या चढासमोर फाईंड केलं. म्हणजे अक्षरशः खरंच अचानक तो एवढा मोठा चढ/डोंगर/टेकडी समोर कुठून आली हे आम्हाला कळलंही नाही. आधी माफक आणि होता होता भयानक प्रयत्न करूनही आम्ही तो चढ चढू शकू याची कुठलीही चिन्हं दिसेनात. बरेच प्रयत्न केले तरी कोणीही माघार घेईना. कोणीही म्हणजे आम्हीही नाही की ती टेकडीही नाही याअर्थी.. एव्हाना सूर्य चांगलाच डोक्यावर आला होता. भयंकर उकडायला लागलं होतं. अक्षरशः आग आग होत होती. त्यादिवशी रोजच्यापेक्षा थोडं जास्तच ऊन पडलं होतं. अतीच गरम होत होतं. किंवा कदाचित नसेलही होत पण दर अर्ध्या तासाने पाणी पिऊन पिऊन आमच्याकडचं पाणी आम्ही संपवून टाकल्याने निदान आम्हाला तरी तसं वाटलं तेव्हा. पाणी संपलंय म्हटलं की अजून तहान लागते त्याप्रमाणे एकाच्या घशाला कोरड पडतेय ना पडतेय तोवर दुसर्‍यालाही ती जाणीव झाली आणि होता होता त्या गोष्टीचं जाणीव-अफवा-बातमी असं प्रमोशन होत होत सगळ्यांच्याच घशाला अचानक सामाईक कोरड पडली. झालं.. आता मात्र प्रसंग बाका होता. डोक्यावर रणरणता सूर्य, सुकलेले घसे, पोटात भूक आणि समोर न चढता येऊ शकणारी अशी उंच टेकडी... डबे होते पण ते या एवढ्या तळपत्या उन्हात आणि धड उभंही राहायला जागा नसलेल्या ठिकाणी खाणं शक्य नव्हतं. सुकी खादाडी चालताचालताच करून संपून गेली होती. काय करावं सुचत नव्हतं. तेवढ्यात त्या चढावरून थेट वर न जाता त्याला वळसा घालून जाऊन बघू अशी एक कल्पना कोणालातरी सुचली. अर्थात ज्याप्रमाणे प्रत्येक कल्पना सुचवणार्‍याला आपली कल्पना अभिनव वाटत असते त्याप्रमाणे यालाही ती वाटली परंतु आजूबाजूच्या सुकलेल्या घशांनी त्या एकमेव चाललेल्या मेंदूवर मात केली. सगळे त्या टेकडीच्या पायथ्याशी बसून राहिले होते. काही मिनिटांपूर्वी हसत खिदळत चालणार्‍या ग्रुपमध्ये अचानकपणे अंगात उठण्याचंही बळ नसल्यागत झालं. 

"ठीके.. तुम्ही सगळ्यांनी इथेच बसा. मी थोडं आजूबाजूला बघून येतो" त्या कल्पनेच्या मालकाने प्रस्ताव मांडला आणि लोकांचं मौन हीच त्यांची मूकसंमती गृहीत धरून तो चालायलाही लागला. सगळेजण वैतागून, काही न बोलता तिथेच तसेच बसले होते. काहीजण त्या जळत्या उन्हाचा बिमोड करण्यासाठी म्हणून रुमाल हलवून अक्षरशः 'सुर्व्याने' काजव्यासमोर चमकण्याचा प्रयत्न करत होते. असाच काही वेळ शब्दशः जळफळाट (डोक्यावर आणि पोटातही) सहन करेपर्यंत तो मालक पुन्हा हजर झाला. ओरडतच... !!! आमच्यातल्या दोघा तिघांना त्याने त्याच्याबरोबर यायला सांगितलं. दहा पंधरा मिनिटांनी तो कल्पनेचा मालक आणि त्याच्याबरोबर कल्पना बघायला गेलेले ते ३-४ प्रेक्षक असा सगळा ग्रुप परत आला. सगळ्यांच्या चेहर्‍यावर टेकडीच्या मागच्या बाजूला तानसा-वैतरणा तलाव आणि त्याच्या शेजारी आंबरस-पुरीचं पोटभर जेवण पुरवणारं हॉटेल असावं इतका आनंद ओसंडून वाहत होता. त्याचं कारणही तसंच होतं. एक म्हणजे थोडं मागच्या बाजूने गेल्यावर तो चढ तितकासा भयंकर नव्हता. त्याच्या कोनात भरघोस घट होती आणि दुसरं म्हणजे तिथून काही अंतरावर गड, सुळका वगैरे वगैरे असं काय काय दृष्टीक्षेपात येत होतं. हे असं काही ऐकल्यावर सुकलेले घसे, थंडावलेले मेंदू, थकलेली गात्रं एकदम उठून उभी राहिली. अक्षरशः दहा मिनिटांत आम्ही पुन्हा एकदा आम्हाला त्या कमी कोनाच्या चढाच्या पायथ्याशी फाईंड केलं.

होता होता अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर, हात धरून, साखळ्या बिखळ्या करून आम्ही कसेबसे तो चढ पार करण्यात यशस्वी झालो. पण........... वर पोचल्यावर आमच्या लक्षात आलं की इथे आलो तरीही परिस्थितीत विशेष असा काहीच फरक पडलेला नाही. पण एक छोटंसं झाड, कमी चढ, निदान कसंबसं का होईना बसता येण्यापुरती थोडीशी जागा अशा काही काही जमेच्या बाबी होत्या. पण तरीही डबे काढून, गप्पा मारत जेवणावर ताव मारता येणं हे अजूनही स्वप्नवतच होतं. कारण तेवढी जागा तिथेही नव्हतीच.... मला वाटतं तो आमचा 'ब्रेकिंग पॉईंट' ठरला. हिंदी चित्रपटातल्या 'दर दर की ठोकरे' खाल्ल्यावरही कुठेही नोकरी न मिळाल्याने गुन्हेगारी मार्गाकडे वाळलेल्या सुशिक्षित बेकार तरुणाप्रमाणे किंवा गरिबीला कंटाळून, आजारी मुलासाठी औषधं घ्यावीत म्हणून शेवटी नाईलाजाने चोरी करणार्‍या बापाप्रमाणे आमची अवस्था झाली होती. च्यायला, एवढं तडफडत, साखळ्या करत, उन तुडवत टेकडी चढून वर आलो ते काय पुन्हा वर येऊन उपाशीपोटी उभं राहण्यासाठी?? अरे हट !! हळूहळू तो पॉईंट कॉमन ब्रेकिंग पॉईंट ठरला. आपण रस्ता चुकलो आहोत हे मान्य करायलाच हवं, अजून शोधाशोध करून उगाच धडपडत, तडफडत, रस्ते शोधत वर जाण्याचा अट्टाहास सोडून द्यायला हवा हे जवळपास प्रत्येकाला पटलं. तरी एक-दोन मतं अशी होतीच की एवढे आलोय तर अजून थोडं वर जायला काय हरकत आहे. गड दिसतोय, साधारण अजून एक-दीड तासात गडावर पोहोचूही. गडावर भरपूर थंडगार निर्मळ पाणी आहे. क्षणभरासाठी का होईना गडाच्या टाक्यांमधलं थंड, निर्मळ, भरपूर पाणी हा वर चढाई करायला उद्युक्त करण्यासाठीचा एक आकर्षक मुद्दा भासत होता. पण तो भासमानच होता. कारण एक-दीड तासात पोचलो नाही तर काय? पुन्हा चुकलो तर काय? गडावर पाणी नसलं तर काय (हा पर्याय अशक्य होता.. तरीही)? असलं तरी पिण्यायोग्य नसलं तर काय? आणि एवढं सगळं करूनही वर पोचलो, वर पाणी असलं तरी वर पोचल्या पोचल्या जेमतेम दहा मिनिटं थांबून ताबडतोब परत फिरायला लागणार होतं. कारण या सगळ्या गडबडघोटाळ्यात, चुकामुकीत घडाळ्यात दुपारचे तीन वाजले आहेत याची कोणाला जाणीवच झाली नव्हती. मात्र ज्याक्षणी ती झाली (म्हणजे तीन वाजता ;) ) त्याक्षणी वरती साक्षात अमृत असलं तरी वर न जाता सरळ गड उतरायला लागायचा हा आमचा निर्णय पक्का झाला. कारण वर पोचायला लागणार्‍या तासा-दीड तासाच्या वेळेतच आम्ही खाली पोचू शकणार होतो, पोटभर खाऊ शकणार होतो. थंडगार पाणी पिऊ शकणार होतो. "खा मटार उसळी, खा शिकरण" वाल्या पुणेरी चैनीप्रमाणे सावलीत बसून पोटभर खाणं आणि थंडगार पाणी पिणं ही आमच्या दृष्टीने चैन होती त्या क्षणी. तर त्या चैनीच्या दिशेने मार्गक्रमणा करायला आम्ही सुरुवात केली. चढताना दमत थकत चढलेली ती टेकडी उतरताना मात्र आम्ही आश्चर्यकारक वेगाने उतरलो. गडावर पोचू न शकल्याचं दुःख, ट्रेक अर्धवट सोडावा लागल्याचं शल्य, तथाकथित अपमान, त्यातून येऊ शकणारं नैराश्य वगैरे वगैरे भावनांना (निदान तेव्हा तरी) पट्टीचे ट्रेकर नसल्याने निदान त्याक्षणी तरी आमच्या मनात थारा नव्हता आणि असलाच तरी त्या व्यक्त न करण्याएवढा सुज्ञपणा सुदैवाने जवळपास प्रत्येकाने दाखवला.. 

क्रमशः 

* जास्त मोठ्या पोस्ट्स असल्या की वाचणारा कंटाळतो या आजवरच्या अनुभवाने आणि स्वानुभवानेही मुद्दाम ही पोस्ट काही भागांमध्ये लिहितोय. कदाचित नेहमीपेक्षा अधिक भाग टाकावे लागतील. थोडक्यात, क्रमशः लिहून त्रास देण्याचा कुठलाही उद्देश नाही याची कृ नों घे :)

- भाग २ इथे  वाचा.

33 comments:

 1. २१ अपेक्षित आपल्या आयुष्यात किती महत्वाचे होते/असते आणि असायला हवे ह्याची आठवण झाली. फणसाचे काटे झाले आत्ता उरलेल्या भागात गोड गरे मिळतील की हटला?

  BTW हापूस तयार होतोय. त्यावेळी हुकलेला आमरस यंदा व्याजा सकट हाण.

  ReplyDelete
 2. बरेच प्रयत्न केले तरी कोणीही माघार घेईना. कोणीही म्हणजे आम्हीही नाही की ती टेकडीही नाही ...

  असल काय काय आहे तर थांबू रे..आणि स्क्रोलू पण...फ...जी...ती...वाचयला कुणाला आवडणार नाही...:D :D

  सध्या तरी इथे इतकी थंडी आहे की उन्हाची पोस्टपण सुसह्य आहे...श्रीताई वाचत असेल तर नक्की अग्रील बघ...

  ReplyDelete
 3. हे हे हे ..मस्त अनुभव. असाच अनुभव पेठच्या किल्ल्याचा आला होता. ऑफीस सुटल्यावर पहाटे ५ ला निघालो होतो. ऑफीसचाच एक ड्राइवर पकडून त्याला कर्जतपर्यंत सोडायला संगितल होत. किल्ला लहान आहे एकदम पण कर्जत ते पेठ गावापर्यंत पायपीट जीव घेते :)

  हाइट म्हणजे मी फॉर्मल शूस घालून हा ट्रेक केला होता, कारण आदल्यादिवशीच माझे बूट बंधूराज घेऊन गेले होते ;)

  ReplyDelete
 4. क्रमश :( :( :(

  हे म्हणजे आमरसाच जेवण सुरु करायच अन ३ वाट्या रस पिला कि थांबा अजून रस तयार होतोय म्हणून वाट बघायची.श्या ..

  बाकी अपर्णा म्हणाली तस फ ..जी ...ती.. वाचायला कुणाला आवडणार नाही .लवकर प्लीज

  ReplyDelete
 5. क्रमश: लिही अगर नको, तू शब्दांचा शब्दश: शब्दशहा आहेस एवढ मात्र नक्की !

  ReplyDelete
 6. खरच वाट बघतोय़...लवकर प्लीजx१०.....

  ReplyDelete
 7. जबरदस्त..

  "अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आधी अन्याय होतोय हेच कळणं आवश्यक असतं"

  काय सुंदर उपमा दिलीस रे..

  ReplyDelete
 8. इतक्या दिवसांनंतर तुझा ब्लॉग वाचल्याची शिक्षा म्हणून की काय क्रमश: वाचतेय. ए, हा अन्याव आहे. पुढचा भाग टाक लगेचच्या लगेच.

  ReplyDelete
 9. य्ये हेरंब परत आला... :) (ईज बॅक चे भाषांतर :) )... असे शब्दांशी आटापाट्या, लंगडी, खो-खो, वगैरे अनेक खेळ असले अफलातून खेळतोस ना की क्या बात...

  एक एक उपमा असली सही की वा रे वा!! :)

  बरं महत्त्वाचं... ३५ वजा १ जाता ३४ उरतो... पण त्या एकातच अनेक भाग हे असे काही ठरलेले नव्हते... तेव्हा क्रमश:चा तुर्तास निषेध :)

  भर्र्क्कन पुढचा भाग लिही... :)

  ReplyDelete
 10. बाप रे! बाकाच प्रसंग! नशीब उष्माघात वगैरे काही झालं नाही कोणाला!

  "अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आधी अन्याय होतोय हेच कळणं आवश्यक असतं"...सही!
  छान झालंय वर्णन! पुढचा भाग काय आहे? :)

  ReplyDelete
 11. सुपरलाईक, ओळ-न-ओळ सुपरलाईक !!! येऊ देत पुढचे भाग लवकर !!! मी समगुःखी आहे रे, भावना समजू शकतो !! :)

  ReplyDelete
 12. वेलकम बॆक! :)आली आली पोस्ट आली.

  बापरे! उतरेपर्यंत घसे अगदी सुकून गेले असतील ना तुमचे? अशावेळी कितीही पाणी बरोबर असले तर कमीच पडते.

  सुरवात एकदम ब्येस झालीये. येऊदे क्रमश: पटापट...

  "अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आधी अन्याय होतोय हेच कळणं आवश्यक असतं"

  काय सुंदर उपमा दिलीस रे.. +१००

  ReplyDelete
 13. आणि उन्हाच्या पोस्ट धावतेय रे मला. :D:D:D
  अपर्णाशी फुल टू अग्रीड!

  ReplyDelete
 14. खरंच सिद्धार्थ.. २१ अपेक्षितचं महत्व अनन्यसाधारणच. त्यामुळेच मला तिथे वापरायला तोच शब्द सगळ्यात चपखल वाटला.

  >> फणसाचे काटे झाले आत्ता उरलेल्या भागात गोड गरे मिळतील की हटला?

  गरे मिळवण्याच्याच प्रयत्नात होतो आम्ही.. पण एकंदरीत...... असो. कळेलच पुढच्या भागांमध्ये.

  ReplyDelete
 15. हाहाहा अपर्णा.. फजिती तर आहेच पण एकदम ग्रँडवाली.. आणि तीही मल्टीफोल्ड.. कळेलच पुढच्या भागांमध्ये..

  हाहा.. अग ही थंडी जेवढी एक्स्ट्रीम आणि तेवढाच तो उन्हाळा अतिरेकी होता आणि पाणी नसल्याने तर अजूनच खल्लास झालो आम्ही.

  श्रीताई अग्रलीये बघ :)

  ReplyDelete
 16. हेहे सुहास.. सही. माझेही पेठ ट्रेकचे किस्से आहेत बरेच. एकदा प्रचंड पावसात अडकलो होतो तिथे.. एकदा येताना ट्रकमध्ये बसून वगैरे यायला लागलं होतं. धम्माल नुसती.. पण पेठ किंवा अन्य आठवणी जेवढ्या सुखद आहेत तेवढीच ही पेबची नकोशी.. कळेलच पुढे !

  ReplyDelete
 17. साबोबा.. :) अरे पहिल्याच क्रमशःला एवढे रडके स्मायली? अजून बरेच क्रमशः यायचेत रे.. थोडं धीराने..

  रसाच्या वाट्या भरतायत.. येतील लवकरच :)

  ReplyDelete
 18. हा हा ब्लॉगोबा.. एवढ्या छान प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार्स..

  आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा !

  ReplyDelete
 19. रोहित, येणार येणार.. लवकरच टाकतोय पुढचा भाग. :)

  ReplyDelete
 20. आभार आनंदा.. अरे ते वाक्य माझं नाहीये. फार पूर्वी तशाच अर्थाचं कुठेतरी काहीतरी वाचलं होतं.. ते फक्त आत्ता वापरलं :)

  ReplyDelete
 21. हाहा कांचन.. टाकतोय लवकरच पुढचा भाग..

  रच्याक, तुही आम्हाला 'क्रमशः हंगामा'ची शिक्षा देते आहेसच की ;)

  ReplyDelete
 22. हेहे तन्वे.. भरत आला परत :P

  लंगडी, खो-खो... हेहे.. बरं वाटलं वाचून.. मला उगाचंच ही पोस्ट फारच फ्लॅट होतेय असं वाटत होतं.. धन्स धन्स..

  अग गंमत म्हणजे या पोस्टी त्या ३५ मधल्या नाहीयेत.. Those 35 are untouched yet :)

  पुढचे भाग लवकरच टाकतोय एकेक करत.

  ReplyDelete
 23. त्या प्रश्नाचं नवनीत मार्गदर्शक, २१-अपेक्षित वगैरे वगैरे आमच्याकडे नव्हतं.

  "खा मटार उसळी, खा शिकरण" वाल्या पुणेरी चैनीप्रमाणे सावलीत बसून पोटभर खाणं आणि थंडगार पाणी पिणं ही आमच्या दृष्टीने चैन होती त्या क्षणी.
  मस्तच रे....प्रत्येक वाक्यागणिक हसु येत होते...पुन्हा एकदा ट्रेकवर घेउन गेलास आम्हा सगळ्यांना...
  मस्त मस्त !!
  .फ...जी...ती...वाचयला कुणाला आवडणार नाही...:D :D+१००

  ReplyDelete
 24. अनघा, हो खरंच वाचलो.. उष्माघात वगैरे काही उद्भवला असता तर फारच कठीण होतं.. अर्थात तरीही आमच्यावर जे प्रसंग पुढे ओढवले ते कठीण होतेच.. कळेलच हळूहळू...

  त्या अन्यायाच्या ओळीचा जनक मी नाही.. अर्थात मूळ व्हर्जनमध्ये किंचित बदल करून मी ती वापरली असं म्हणता येईल :)

  >> पुढचा भाग काय आहे? :)

  अग ही तर आत्ताशी सुरुवात आहे. पिक्चर अभी बाकी है.. !

  ReplyDelete
 25. हाहा सुपरधन्स स्वामी सुपरधन्स... पुढचे भाग टाकतोय फटाफट..

  रच्याक, समदुःखी? तुही चुकला/अडकला होतास की काय कधी ट्रेकला?

  ReplyDelete
 26. श्रीताई, हेहेहे.. आली आली पोस्ट आली एकदाची.. धन्स ग..

  अग आणि होतं नव्हतं तेवढं पाणी आम्ही वेड्यासारखं संपवून टाकलं कारण गडावर भरपूर पाणी असतं.

  पुढचे भाग टाकतोय एकेक करत. अग त्या उपमेविषयी वर आनंदला सांगितलंय बघ..

  हेहे.. उन्हाची पोस्ट आत्ता या थंडीत कसली मस्त वाटतेय ना? पण तेव्हा आम्ही अक्षरशः भाजून निघालो होतो :(

  ReplyDelete
 27. हाहा माऊ.. अग मटार उसळी, शिकरण पुलंच्या कृपेने.. ("तुम्हाला कोण व्हायचंय पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर?" मधून साभार)

  फजितीचे पुढचे भाग येतायतच लवकर.. :)

  ReplyDelete
 28. अंतिम भाग येइपर्यंत पोस्ट वाचायची नाही असा पण केला होता.

  आज बझ पाहिला अन आता वाचायला घेतल आहे.

  यापुढे प्रत्येक क्रमशःला अशीच वागणुक दिली जाइल...याची नोंद घ्यावी

  >>अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आधी अन्याय होतोय हेच कळणं आवश्यक असतं

  हे लय भारी...आवड्या

  ReplyDelete
 29. अरे वा यवगेशा.. एकदम भारीच पण होता की तुझा. तुझ्या प्रतिक्रिया नव्हत्या तेव्हा मला एक क्षणभर शंका आली होती म्हणा पण तरीही नक्की काही कळत नव्हतं :)

  यापुढे कमीत कमी क्रमशः टाकण्याचे ठरवले आहे याची नोंद घ्यावी ;)

  ReplyDelete
 30. कधी पासून पेब वर लिहिणार होतास.. अखेर पोस्ट सुरू झाल्या... पण मीच बघ किती उशिराने वाचतोय... असो... सुरुवात तर झाली.. आता एका मागून एक धडधड कमेंटा ... :D

  ReplyDelete
 31. हो रोहणा.. पोस्ट टाकताना तुझी आठवण आलीच होती :) आता वाचून टाक धडाधड..

  ReplyDelete
 32. मस्त मस्त मस्त :-)

  ReplyDelete