Monday, May 9, 2011

बँक नावाची शिवी : भाग २

* भाग १ इथे  वाचा.

भाग २ : कर्जाचा फुगवटा (द बबल)

अचानक अब्जावधी डॉलर्सच्या कर्जाचा (लक्षात घ्या, प्रत्यक्ष डॉलर्सचा नव्हे !!! ) नुसता ओघ वाहू लागला. कोणालाही कितीही डॉलर्सचा कर्ज मिळणं सहज शक्य होतं. त्यामुळे बघता बघता घराच्या किंमती अक्षरशः आकाशाला भिडल्या आणि इतिहासातल्या सर्वात मोठ्या फायनान्शियल बबलला जन्म दिला गेला. याधीचा गृहकर्जाचा/घराच्या किमतीचा फुगा/बुडबुडा ८० च्या दशकाच्या दरम्यान आला होता. पण त्यावेळी जेमतेम १०० टक्क्यांनी चढलेल्या घरांच्या किंमती या आताच्या वेळच्या तुलनेत जवळपास नगण्य होत्या.

१९९६ पासून ते २००६ पर्यंत घरांच्या किंमती २००% हून अधिक वाढल्या. सबप्राईम कर्जांची रक्कम फक्त दहा वर्षांत प्रतिवर्षी ३० बिलियन डॉलर्स वरून थेट ६०० बिलियन डॉलर्स पर्यंत पोचली. मेरील लिंच, बेअर स्टर्न, गोल्डमन सॅक्स हे सगळे सगळे यात सामील होते आणि काय चाललंय हे या सगळ्यांना चांगलंच ठाउक होतं.

कंट्रीवाईड ही वित्तसंस्था सबप्राईम कर्जं देण्यात सगळ्यांत आघाडीवर होती. कंट्रीवाईडने एकट्याने किमान ९७ बिलियन डॉलर्सची कर्जं वाटली आणि त्यातून त्यांना ११ बिलीयन डॉलर्सचा थेट नफा झाला. वॉल स्ट्रीटवरच्या अधिकाऱ्यांना मिळणारे बोनसचे आकडे गगनाला भिडले.

लीमन ब्रदर्स हे या सबप्राईम कर्जांमध्ये असलेलं अजून एक प्रमुख नाव. लीमन ब्रदर्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड फुल्ड याने ४८५ मिलियन डॉलर्सचा बोनस कमावला.

रिचर्ड फुल्ड
अशा अनेकांनी अनेक मिलियन्सचे बोनस कमावले. वित्त कंपन्यांनी करोडो डॉलर्सचा नफा कमावला. पण तो खरा नफा नव्हता. प्रत्यक्षातली कमाई नव्हती. ते आभासी धन होतं जे यंत्रणेचा गैरवापर करून निर्माण केलं गेलं होतं आणि मग प्रॉफीट बुकिंग केलं गेलं होतं. जेमतेम तीन वर्षांत त्यातला खोटेपणा सिद्ध झाला आणि आभासी पैसे अक्षरशः गायब झाले ज्यामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात हाहाःकार मजला. जगभरात राबवली गेलेली ती एक पोन्झी स्कीम होती.

सगळ्यांचेच हात बांधले गेलेले असल्याने दुर्दैवाने सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड आणि तत्सम नियंत्रक संस्थांनी बँक्स आणि अन्य वित्तीय संस्थांवर कुठलाही बडगा उभारला नाही की त्यांची साधी चौकशीही केली नाही.

या फुगवट्याच्या दरम्यान वित्तसंस्था अधिक अधिक कर्ज घेत होत्या आणि अधिक अधिक सिडीओज तयार करत होत्या. बँकेचे स्वतःचे पैसे आणि कर्जाऊ घेतलेली रक्कम यांच्यातल्या गुणोत्तराला लीव्हरेज असं म्हणतात. बँका जेवढ्या अधिक कर्जं घेतील तितकं जास्त त्यांचं लिव्हरेज असतं.

हेन्री पॉल्सन
२००४ मध्ये गोल्डमनचा प्रमुख कार्यकारी अधिकारी हेन्री पॉल्सन याने सिक्युरिटीज अंड एक्सचेंज कमिशन वर दबाव आणून या लिव्हरेजवरची बंधनं शिथिल करायला भाग पाडलं. अधिक लिव्हरेज मिळाल्याने बँकांना सहजतेने अधिक कर्जं घेणं सोपं जायला लागलं. हे कर्जं घेण्याचं प्रमाण बघता बघता इतकं वाढत गेलं की काही बॅंकांचं लिव्हरेज गुणोत्तर ३३:१ झालं. थोडक्यात बँकेकडे स्वतःचा फक्त १ रुपया असताना त्यांना ३३ रुपयांचं कर्ज मिळालं.


पण हे इतक्यावरच थांबलं नव्हतं. अजून एक टाईमबॉम्ब स्फोट होण्याची वाट बघत होता. एआयजी ही जगातली सर्वात मोठी विमा कंपनी 'क्रेडीट डिफॉल्ट स्वाप' नावाचा डेरीव्हेटीव्हचा अजून एक प्रकार खुप मोठ्या प्रमाणात विकत होती. ज्यांच्याकडे सिडीओज आहेत अशा ग्राहकांसाठी (वित्तसंस्था, बँक्स वगैरे) 'क्रेडीट डिफॉल्ट स्वाप' हे एखाद्या विम्याप्रमाणे काम करतं. जर सिडीओजमध्ये पुढे मागे काही तोटा झाला तर तो तोटा एआयजी च्या 'क्रेडीट डिफॉल्ट स्वाप' या योजनेच्या माध्यमातून ग्राहकाला भरून मिळेल  अशी योजना होती. थोडक्यात तोटा झाला तरी त्यासाठी ग्राहकाला काही चिंता नव्हती. एआयजी सगळ्याची काळजी घेणार होती आणि त्या बदल्यात एआयजी कडून क्रेडीट डिफॉल्ट स्वाप योजना विकत घेतलेल्या ग्राहकाला एआयजीला त्रैमासिक हफ्ता भरावा लागत असे.

परंतु क्रेडीट डिफॉल्ट स्वाप मध्ये अजून एक खोच होती. ती म्हणजे तुमच्याकडे नसलेल्या सिडीओजचाही विमा तुम्ही उतरवू शकत होतात. (हे अत्यंत चुकीचं आणि धोकादायक असूनही एआयजी याचा अवलंब करत होतं कारण त्यातून त्यांना प्रचंडउत्पन्न मिळत होतं.)

एक सोपं उदाहरणं बघू. आपल्या नेहमीच्या विमा पद्धतीनुसार आपण फक्त आपल्या मालकीच्या घरचाच विमा उतरवू शकतो. परंतु क्रेडीट डिफॉल्ट स्वापमुळे फक्त आपणच नाही तर त्या घराची मालकी नसलेले इतर कोणीही त्या घराचा विमा उतरवू शकत होते. थोडक्यात भविष्यात जर घराला आग लागली तर विमा कंपनीला तितक्या पटीने लोकांना पैसे द्यावे लागणार होते. (आणि अर्थात ती आग लागलीच. !!!) आणि क्रेडीट डिफॉल्ट स्वापवर कुठल्याही कायद्याचं बंधन नसल्याने त्या घराच्या विम्याच्या भविष्यातल्या परताव्यासाठी एआयजीला कुठल्याही प्रकारची रक्कम बाजूला काढून ठेवावी लागत नव्हती !!! किंबहुना एआयजीच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी नवीन नवीन क्रेडीट डिफॉल्ट स्वापची कंत्राटं मिळवल्या मिळवल्या गडगंज बोनस मिळत होते !! एआयजीच्या लंडन शाखेने फुगवट्याच्या काळात ५०० बिलियन डॉलर्स किंमतीच्या क्रेडीट डिफॉल्ट स्वापची विक्री केली.

जोसेफ कसॅनो
जोसेफ कसॅनो या एआयजी च्या प्रमुखाने ३१५ मिलियन डॉलर्सच्या घसघशीत बोनसची कमाई केली. या क्रेडीट डिफॉल्ट स्वापच्या चुकीच्या पद्धतीच्या निषेधार्थ एआयजीच्या ऑडीटर्सनी कसॅनोला वारंवार सावधानतेचे इशारे दिले. परंतु तरीही कंपनीच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही हे पाहून त्याच्या निषेधार्थ जोसेफ डेनिस या एका ऑडीटरने राजीनामाही दिला. पण तरीही सारं तसंच चालू राहिलं !!! करोडोंचे बोनस, महागड्या गाड्या, आलीशान महालांसारखी चार चार घरं !! ही हाव न संपणारी होती.


'MIT Laboratory for Financial Engineering' चे संचालक असलेल्या अँड्रयु लो यांनी एक विलक्षण निरीक्षण नोंदवलं आहे. ते म्हणतात की शास्त्रज्ञांनी एक अनोख्या प्रयोगादरम्यान काही लोकांना एकत्र करून त्यांना एमआरआय मशीनमध्ये ठेवलं आणि एक खेळ खेळायला सांगितला. जो जिंकेल त्याला काही डॉलर्स बक्षीस म्हणून मिळणार असंही त्यांना सांगितलं होतं. प्रयोगाअंतीचं त्यांचं निरीक्षण धक्कादायक होतं. पैसा जिंकणं/कमावणं हा विषय निघाल्यावर मेंदूच्या काही विशिष्ट पेशी कार्यरत होतात. त्या पेशी आणि कोकेनच्या सेवनानंतर कार्यरत होणाऱ्या पेशी या सारख्याच असतात !!!!!!!!!!! थोडक्यात अधिकाधिक पैसा कमावणं हे एखाद्या व्यसनाप्रमाणेच आहे ज्यात आपल्याकडे आहे त्यापेक्षा अधिक धन मिळाल्याशिवाय चैन पडत नाही !

कमावलेले पैसे घरं, बंगले, गाड्या इत्यादींवर उधळण्यातच मर्यादित नव्हते. त्यातला अजून एक महत्वाचा पैलू म्हणजे अक्षरशः करोडो डॉलर्स वेश्यांवर उडवले गेले!!! स्ट्रीप क्लब्जवर (ज्यांना प्रत्यक्षात जंटलमन्स क्लब म्हणतात) अक्षरशः लाखो-करोडो डॉलर्सची उधळण झाली !!

क्रिस्टीन डेव्हीस
क्रिस्टीन डेव्हीस नावाची उच्चभ्रू वर्तुळात वावरणारी स्त्री तिच्या अतिशय उंची आणि महागड्या घरातून वेश्याव्यासाय चालवत असे...... !! तिचं घर न्यूयॉर्क शेअरबाजारापासून काही पावलांवरच होतं !!!!!!!!!!!!!!

या स्त्रीच्या मुलाखतीचाही समावेश या माहितीपटात आहे. तिच्या म्हणण्यानुसार जवळपास प्रत्येक वित्तसंस्थांमधले उच्चाधिकारी यात गुंतलेले होते. मार्केट रिसर्च, कॉम्प्युटर रिपेअर अशा कुठल्याही कारणांनी ही भलीमोठी बिलं दाखवली जात आणि ती सहजपणे पासही केली जात.


गृह्कर्जं घेणाऱ्या लोकांनी घराच्या किंमतीच्या जवळपास ९९.३% किंमतीची कर्जं घेतली होती. थोडक्यात त्यांच्याकडे ७० पैसे असताना १०० रुपयांचं घर त्यांनी विकत घेतलं होतं. आणि अशा प्रकारच्या कर्जांनाही रेटिंग एजन्सीज एएए अर्थात सर्वाधिक सुरक्षित किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर 'सरकारी बॉण्ड्स एवढी सुरक्षित गुंतवणूक' असं गुणांकन देत होत्या.

गोल्डमन सॅक्सने २००६ च्या पहिल्या सहामाहीत या असल्या कचऱ्याचीही लायकी नसलेल्या सिडीओजची ३.१ बिलियन डॉलर्सची विक्री केली. गोल्डमन सॅक्सचा प्रमुख कार्यकारी अधिकारी हेन्री पॉल्सन हा तेव्हाचा वॉल स्ट्रीटवरचा सर्वाधिक पगार घेणारा सीईओ होता. २००६ च्या मे महिन्यात जॉर्ज बुश यांनी या पॉल्सनची ट्रेजरी सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली !! करोडो डॉलर्सचा पगार सोडून सरकारी नेमणुकीत कोणीही स्वखुशीने का जाईल हा प्रश्न कोणालाही पडू शकतो. पण त्यामागचं कारण ऐकल्यावर आपण चक्रावून जातो.

ट्रेजरी सेक्रेटरी होण्यापूर्वी पॉल्सनने त्याच्याकडे असलेले ४८५ मिलियन डॉलर्स किंमतीचे शेअर विकून टाकले. पहिल्या बुशने संमत केलेल्या एका कायद्यान्वये पॉल्सनला या एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीवर एका पैशाचाही कर भरावा लागला नाही. थोडक्यात कराचे ५० मिलियन डॉलर्सही त्याने बुडवले.

या असल्या काहीही किंमत आणि अर्थ नसलेल्या बॉण्ड्समध्ये दरमहा ८०,००० निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृतीवेतनाची काळजी घेणाऱ्या मिसिसिपी राज्याच्या निवृत्तीवेतन विभागाने पैसे गुंतवले आणि व्हायचं तेच झालं.. त्यांना कित्येक मिलियन डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला आणि त्यांनी गोल्डमन सॅक्सवर केसही केली आहे.

आपण संबंधितांच्या उत्पन्नांच्या आकड्यांची एक ढोबळ तुलना बघू.

मिसिसिपीच्या निवृत्त कर्मचाऱ्याचं सरासरी वार्षिक उत्पन्न : १८,७५० डॉलर्स

गोल्डमनच्या कर्मचाऱ्याचं सरासरी वार्षिक उत्पन्न : ६,००,००० डॉलर्स

पॉल्सनचं २००५ वर्षातलं उत्पन्न : ३,१०,००,००० डॉलर्स !!!!!!!!!!!

गोल्डमन सॅक्स एवढ्यावरच थांबले नाहीत. २००६ च्या अखेरीस त्यांनी अजून एक धोकादायक पाऊल पुढे टाकलं. जे कःपदार्थ सिडीओज ते विकत होते त्यांच्या विरुद्ध (म्हणजे ते सिडीओज बुडतील या अर्थाने... थोडक्यात ते सिडीओज बुडणार आहेत याची गोल्डमनला खात्री होती.) त्यांनी बेटिंग करायला सुरुवात केली आणि त्याचवेळी ग्राहकांना मात्र ते अतिशय सुरक्षित सिडीओज असल्याचं सांगून त्याची अजून अजून विक्री चालू ठेवली. स्वतःच विकत असलेले सिडीओज बुडतील यावर गोल्डमन ज्याअर्थी बेटिंग करत होते त्याअर्थी ते सिडीओज नक्की बुडणार आहेत याची गोल्डमनला पूर्णतः खात्री होती.

एआयजी कडून क्रेडीट डिफॉल्ट स्वाप विकत घेऊन स्वतःच्या मालकीच्या नसलेल्या सिडीओज च्या विरुद्धही गोल्डमनने बेटिंग केलं आणि जेव्हा ते सिडीओज बुडाले तेव्हा त्याबद्दलही एआयजीकडून पैसे कमावले. गोल्डमनने एआयजीकडून किमान २२ बिलियन डॉलर्स किंमतीचे सिडीओज विकत घेतले. कालांतराने गोल्डमनला स्वतःलाच लक्षात आलं की इतक्या अति किंमतीचे सिडीओज घेणं अतिशय धोकादायक आहे. धोकादायक म्हणजे उलट अर्थी. कारण यामुळे स्वतः एआयजीच बुडण्याची शक्यता अधिक आहे. आणि हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःच एआयजीच्या संभाव्य घसरणीपासून स्वतःला वाचवण्यसाठी १५० मिलियन डॉलर्सचा विमा उतरवला !!!!!!!!!!!!!

२००७ मध्ये एआयजीने अजून एक पाऊल पुढे टाकून प्रत्येक कंपनीसाठी विशिष्ट पद्धतीने बनवलेले (कस्टमाईझ्ड) सिडीओज विकायला सुरुवात केली जेणेकरून जेवढा अधिक तोटा ग्राहकांना झाला तेवढाच अधिक फायदा गोल्डमनला मिळाला !!! गोल्डमनचा प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि अन्य उच्चाधिकारी यांनी या माहितीपटासाठी मुलाखती देण्यास नकार दिला आहे.

या सगळ्या गैरकारभारात वित्तसंस्थांएवढाच मुडीज, स्टँडर्ड अँड पुअर आणि फिच या सर्वात मोठ्या रेटिंग एजन्सीजचाही बरोबरीचा सहभाग होता. अत्यंत धोकादायक गुंतवणुकीला एएए सारखं सर्वोच्च गुणांकन देऊन त्यांनी त्याच्या बदल्यात करोडो डॉलर्स कमावले ! मुडीज या सर्वात मोठ्या रेटिंग एजन्सीचा २००७ मधला नफा त्यांच्या २००० सालच्या नफ्याच्या चौपट झाला.. ४०० % !!!!!!!!!!!!!! रेटिंग एजन्सीजना हे थांबवणं, अनावश्यक एएए रेटिंग न देणं आणि थोडक्यात हा सगळा गैरकारभार थांबवणं सहज शक्य होतं. किंबहुना तेच तर त्यांचं काम होतं ! वर्षागणिक करोडो करोडो करोडो डॉलर्सची अतिशय धोकादायक असलेली गुंतवणूक प्रत्यक्षात मात्र  'गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित' गुणांकन मिळवत गेली. कालांतराने सगळा डोलारा कोसळल्यावर चौकशी समितीसमोर आपली बाजू मांडताना या रेटिंग एजन्सीजच्या जवळपास प्रत्येक उच्चाधिकाऱ्याने ही रेटिंग/गुणांकनं म्हणजे सल्ला नसून निव्वळ मत असल्याचं ठासून सांगितलं. दुर्दैवाने यातल्या कुठल्याही अधिकाऱ्याने या माहितीपटाच्या निर्मात्यांकडे आपलं 'मत' मांडण्याचं धारिष्ट्य दाखवलं नाही. एकजात सर्वांनी या माहितीपटातल्या मुलाखतीसाठी नकार दिले.

भाग ३ इथे  वाचा.

9 comments:

 1. वाह !! अतिशय सुंदर आणि "अर्थ"पूर्ण लिखाण .....

  ReplyDelete
 2. आपल्या नेहमीच्या विमा पद्धतीनुसार आपण फक्त आपल्या मालकीच्या घरचाच विमा उतरवू शकतो. परंतु क्रेडीट डिफॉल्ट स्वापमुळे फक्त आपणच नाही तर त्या घराची मालकी नसलेले इतर कोणीही त्या घराचा विमा उतरवू शकत होते.
  >>> हे मला काही समजलेच नाही... म्हणजे ह्यात सरकारी धोरणाचा भाग येत नाही का? की ह्या सर्वाला सरकारकडून सुद्धा फाटा दिला गेला? हे म्हणजे कैच्याकै आहे...

  ReplyDelete
 3. साकेत, प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार..

  आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

  ReplyDelete
 4. रोहणा, अरे म्हणजे एकाच वस्तूचा विमा अनेकांनी उतरवला आणि त्या वस्तूचं नुकसान झाल्यावर अनेकपट नुकसानभरपाई विमा कंपनीला (या केसमधे एआयजीला) भरावी लागली. अरे सरकारचा काही हस्तक्षेपच नव्हता किंबहुना त्यांचा या सगळ्याला छुपा पाठींबाच होता :(( .. तो माहितीपट नक्की बघ. अनेक गोष्टी अधिक स्पष्ट होतील !

  ReplyDelete
 5. "कारण यामुळे स्वतः एआयजीच बुडण्याची शक्यता अधिक आहे. आणि हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःच एआयजीच्या संभाव्य घसरणीपासून स्वतःला वाचवण्यसाठी १५० डॉलर्सचा विमा उतरवला !!!!!!!!!!!!!"
  150 Dollars or 150 Million Dollars??
  btw, I have read all the post of this and u have amazingly analyzed this issue..I'm also working with one of the Indian Rating Agency and probably 'coz of that understand the seriousness of the issue..good work..keep it up..!!

  ReplyDelete
 6. जागृत, बरोबर.. तिथे १५० मिलियन पाहिजे. चूक दुरुस्त केली आहे. धन्यवाद.

  तुम्ही स्वतः रेटिंग एजन्सीशी संबंधित असल्याने तुम्हाला तर त्या गोष्टीचं गांभीर्य अधिकच जाणवलं असेल नक्कीच !!

  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत.. आधीच भेट देत रहा..

  ReplyDelete
 7. धन्यवाद जागृत.. बरोबर तिथे १५० मिलियन डॉलर्स हवंय. चूक सुधारली आहे. प्रतिक्रिया देखील मागेच दिली होती पण ब्लॉगरच्या गोंधळात ती गायब झाली ती काही अजून रिस्टोर होत नाहीये :(

  तुम्ही रेटिंग एजन्सीशी संबंधित व्यवसायात काम करत असाल तर तुम्हाला तर या गोष्टीचं गांभीर्य कितीतरी पटीने अधिक लक्षात आलं असेल !!

  प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत रहा..

  ReplyDelete
 8. सहीये! जागृत सारखे त्याच क्षेत्रात काम करणारी लोकं प्रतिक्रिया देतात याहून मोठे काय :)
  हा हि लेख मस्त!

  ReplyDelete
 9. धन्यवाद अभिषेक.. हो जागृतसारख्या त्याच क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची प्रतिक्रिया येणं हे नक्कीच महत्वाचं आहे.

  प्रतिक्रियेबद्दल आभार.

  ReplyDelete